मोदींच्या कॅबिनेटचा गर्भित अर्थ – राजकारण आणि बरंच काही !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

२०१९ च्या मेगा निवडणुकीपूर्वी रणांगणातील आपली बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार हरएक तऱ्हेने प्रयत्न करीत आहे. त्यातील त्यांची एक खेळी म्हणजे कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार. या विस्तारात अनेक फेरबदल होणार, मोदींच्या टीममध्ये मोठी उलथापालथ होणार, जेष्ठ नेत्यांची खाती बदलणार, मोजक्याच चेहऱ्यांना संधी मिळणार वगैरे चर्चांना अगदी उधान फुटलं होतं. पण ज्याप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी मोदींनी जो अनपेक्षित धक्का संपूर्ण देशाला दिला, त्याचप्रकारे कॅबिनेट मंत्रीमंडळ विस्तारातही त्यांनी अनेक अनोळखी चेहऱ्यांना संधी देऊन पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला आहे. विविध बदल करून मोदींनी अवघ्या १८ महिने दूर असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आपली माणसे योग्य त्या ठिकाणी पेरण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान कॅबिनेटमध्ये नेमका काय बदल झाला आणि त्यातून मोदी नक्की काय साधू पाहत आहेत ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्मला सीतारामन यांच्या हातात भारताचे संरक्षण खाते सोपवून सर्व चर्चाकारांना तोंडघशी पाडले आहे. इंदिरा गांधी नंतर पहिल्यांदाच कोण्या महिलेच्या हातात भारताच संरक्षण खातं सोपवण्यात आलं आहे. सोबतीला परराष्ट्र खात्याचा भारही सुषमा स्वराज यांच्याकडे असल्याने येणाऱ्या काळात ही महिला दुकल धडाडीचे कार्य करून दाखवले अशी आशा आहे. निर्मला सीतारामन यांची संरक्षण मंत्री केलेली निवड ही मोदींची अजून एक चलाख खेळी आहे हे सांगण्यासाठी कोण्या चाणक्याची गरज नाही. निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्रातील जनता ओळखत नसली तरी भाजपचा हा चेहरा राष्ट्रीय राजकारणात प्रसिद्ध आहे. भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे आणि विविध राष्ट्रीय वाहिन्यांवरच्या चर्चासत्रात आपल्या पक्षाची बाजू अतिशय मुद्देसूदपणे मांडणाऱ्या म्हणून त्यांची ओळख होती.

modi-cabinet-marathipizza01
idiva.com

२०१४ च्या निवडणुकीच्या यशाचे सूत्रधार म्हणून मोदी ज्यांची नावे घेतात त्यापैकी एक निर्मला सीतारामन आहेत हे विसरून चालायचे नाही. पुढे भाजपाचे सरकार आल्यावर अर्थातच त्यांची कॅबिनेटमध्ये निवड झाली. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल पण त्यांनी गेल्या ३ वर्षे भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खात्याचा तसेच वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री पदाचा कार्यभार वाहिला आहे. निर्मला सीतारामन यांची संरक्षण मंत्री पदी निवड करण्यामागे त्यांचे वकृत्व हे एक मोठे कारण असू शकते. मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्या आपल्या पक्षाची बाजू हिरहिरीने मांडण्यात तरबेज आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारविरोधात ज्या काही वाईट बातम्यांच्या वावटळ्या उठल्या आहेत, त्यांना लगाम घालण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्यासारखे प्रभावी अस्त्र मोदींनी वापरले असावे.

दुसरीकडे उमा भारती ह्या स्वच्छ गंगा मिशनमध्ये अपयशी ठरलेल्या पाहून मोदींनी त्यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी कार्यक्षम नितीन गडकरी यांची वर्णी लावली आहे. गडकरींनी पूर्वीच आपल्याला रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त भार नको असल्याचे सांगितले होते, जणू मोदींनी त्यांच्या विनंतीला मान दिला असेच चित्र आहे. गंगे मिशन बद्दल यापुढील सर्व कामांचा दोर हा गडकरींच्या हाती असेल. उमा भारती यांच्याकडे आता पिण्याचे पाणी आणि स्वच्छता पाहण्याचे काम सोपवले आहे. हे काम तरी त्या नीट करतील ही आशा!

मोदींच्या टीममध्ये तीन निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकारी- आर.के. सिंग, के.जे. अल्फोन्स आणि हरदीप पुरी यांचा देखील नव्याने समावेश करण्यात आला आहे. २४० खासदार असूनही पक्षाला आणि सरकारला भक्कम पाठींबा न मिळणे आणि त्यांच्यामध्ये टॅलेंट बेसची कमी असल्याने, हीच त्रुटी भरून काढण्यासाठी मोदींनी प्रशासनाची उत्तम जाण असलेल्या या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.

या घडामोडीला नाही म्हटल तरी जातीच्या राजकारणाचा वास आलाच. उत्तर प्रदेश, बिहार मधील उच्च वर्णीय नेत्यांना डावलून मोदींनी अजून एक कार्ड खेळले आहे. तर इकडे कर्नाटकमधील नवा चेहरा अनंतकुमार हेगडे यांना राजीव प्रताप रुडी यांच्या जागी बसवत मोदींनी त्यांच्या हाती कौशल्य विकास मंत्रालयाचा भार सोपवला आहे. उप वित्तमंत्री म्हणून मोदी-शहा या जोडगोळीने शिवप्रताप शुक्ला यांची नेमणूक केली आहे. हे शिवप्रताप शुक्ला उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे खूप काळ कट्टर विरोधक राहिलेले आहेत. त्यामुळे आता उत्तरप्रदेशात ब्राम्हण विरुद्ध ठाकूर असे चित्र पुन्हा एकदा उभे राहणार आहे.

modi-cabinet-marathipizza02
pbs.twimg.com

या व्यतिरिक्त सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी बिहारचे राजकारण एका रात्रीत बदलले त्या नितीश कुमारांच्या जनता दल कडून मात्र कोणाचाही मोदींनी आपल्या टीममध्ये समावेश केला नाही. अर्थातच नितीश हे काही खरंच मोदींविषयी प्रेम उफाळून वगैरे आल्याने त्यांच्यासोबत सामील झाले नव्हते, दोघांमध्ये नक्कीच काहीतरी डील झाली असेल, म्हणूनच एवढ्या महत्त्वाच्या विस्तारात जनता दलला स्थान नसणे ही गोष्ट खटकणारी आहे. कदाचित आता नितीश यांच्या लक्षात येईल की, शिवसेना सारखी भाजपावर आगपाखड का करत असते.

उर्जा मंत्रालयाचा कारभार उत्तमरीत्या सांभाळणाऱ्या पियुष गोयल यांची आता पदोन्नती होऊन त्यांना भारताचे नवीन रेल्वेमंत्री म्हणून बढती मिळाली आहे. त्यांनी प्रभावीपणे राबविलेल्या योजनांचा भाजपाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला होता.

या नव्या बदलांसह कॅबिनेटमध्ये आता मात्र एकच मुस्लीम चेहरा उरला आहे, तो म्हणजे मुख्तार अब्बास नख्वी यांचा. त्यांच्याकडे अल्पसंख्यांक खात्याचा भार सोपवण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे मुख्तार अब्बास नख्वी यांनी सातत्यपूर्ण केलेली कामगिरी आणि त्यांची असलेली प्रतिभा जी नेहमीच पडद्याआड राहिली. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी मुख्तार अब्बास नख्वींच्या माध्यमातून मोदी अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्की करतील. विजय गोयल यांना क्रीडा मंत्रालयावरून हटवून त्यांच्या जागी आर.एस. राठोड यांना संधी देण्यात आली आहे. विजय गोयल यांची आता संसदीय कामकाज मंत्रालयामध्ये अनंत कुमार यांचे सहाय्यक मंत्री म्हणून रवानगी करण्यात आली आहे.

प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून २.५ करोड नागरिकांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. धर्मेंद्र प्रधान यांना देखील मोदींनी आपल्या कॅबिनेटमध्ये स्थान दिले आहे. सध्या ओडीशाच्या राजकारणात प्रधान हे नवा चेहरा म्हणून उदयास येत आहेत, तर झारखंडमध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षाची केलेली उभारणी पाहून मोदी-शाह त्यांच्यावर भलतेच खुश आहेत.

modi-cabinet-marathipizza03
indianexpress.com

तर असे आहे हे मोदींचे फ्रेश कॅबिनेट. यातील एकही बदल ज्याप्रमाणे बाहेर चर्चा होती त्याप्रमाणे झालेला नाही. उलट मोदी आणि शहा जोडीने केलेले बदल येणाऱ्या काळातील संकटे काहीशी कमी व्हावी आणि २०१९ ची निवडणूक सुखरूप पार पडावी या अनुषंगाने केल्याचेच निदर्शनास येते.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?