बेन स्टोक्स प्रामाणिक पणे म्हणाला होता, “केन, मला माफ कर..”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना प्रत्येक क्रिकेटप्रेमी माणसासाठी अगदी न भूतो न भविष्यती अश्या प्रकारचा झाला. शेवटच्या बॉलपर्यंत पारडे सतत वर खाली होत होते. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इतका थरारक ह्यापूर्वी कधीही झाला नसेल.

बीपीच्या रुग्णाने बघू नये किंवा “कमजोर दिल वाले इसे ना देखे” ह्या प्रकारात सामना झाला होता .

या सामन्याने अगदी शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून ठेवायला लावला आणि अत्यंत अटीतटीच्या ह्या लढतीत अखेर २०१९ चा विश्वचषक इंग्लंडने पटकावला.

ह्यात अर्थात इंग्लंडच्या टीमचे कष्ट होतेच पण न्यूझीलंडच्या संघाने अगदी तोडीस तोड टक्कर दिली.

पण इंग्लंडचे नशीब जोरावर होते आणि न्यूजीलंडच्या संघाला थोडेसे लक कमी पडले आणि सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलला विजयाचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले.

 

final inmarathi
crickbuzz.com

न्यूझीलंडने सामना जवळजवळ जिंकल्यातच जमा होता पण त्या एका ओव्हरथ्रोने मोक्याच्या क्षणी इंग्लंडला चार धावा मिळवून दिल्या आणि न्यूझीलंडच्या अक्षरश: तोंडचा घास काढून इंग्लंडच्या हाती विश्वचषक गेला.

न्यूझीलंडने ५० ओव्हर्समध्ये २४१ धावा केल्या. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने शेवटपर्यंत कडवी लढत देत २४१ धावा केल्या.

सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपर ओव्हर खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सुपर ओव्हरमध्येही दोन्हीही संघांच्या १५ धावा झाल्या. पण सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वचषक स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.

सामन्याच्या पन्नासाव्या षटकात इंग्लंडला जिंकण्यासाठी ९ धावांची गरज होती आणि केवळ ३च चेंडू शिल्लक होते आणि ह्या स्पर्धेत सुंदर फॉर्ममध्ये असलेला ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता.

बोल्टने पहिला बॉल एक अप्रतिम यॉर्कर टाकला. आणि स्टोक्सचा फटका हुकला. बोल्टने दुसराही डॉट बॉल टाकला.

आता इंग्लंडच्या हातून मॅच गेली असे म्हणेपर्यंत बोल्टच्या तिसऱ्या बॉलवर बेन स्टोक्सने षटकार मारत इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या. बोल्टच्या पुढच्या फुल टॉस बॉलवर स्टोक्सने फटका मारला आणि बॉल डीप मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेवर गेला.

 

stokes inmarathi
Hindustan Times

मार्टिन गप्टिलने बॉल अडवेपर्यंत स्टोक्सने एक धाव काढली होती आणि तो दुसरी धाव काढण्यासाठी पळत होता. मोक्याच्या क्षणी धावचीत होऊ नये म्हणून त्याने क्रीजपर्यंत पोहोचण्यासाठी बॅट पुढे ठेवून झेप घेतली.

नेमक्या त्याच वेळेला गप्टिलने सीमारेषेवरून फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि इंग्लंडच्या सुदैवाने आणि न्यूझीलंडच्या दुर्दैवाने चौकार गेला.

अर्थात हे झाले तेव्हा स्टोक्सने लगेच दोन्हीही हात वर उचलून “अरेच्या! मला असे काहीही करायचे नव्हते” अश्या अर्थाने हात वर उचलून न्यूझीलंड संघाची माफी मागितली. आणि थोड्या गोंधळानंतर इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या.

दोन धावा त्यांनी स्वतः काढल्या त्या आणि चार धावा ओव्हरथ्रो मुळे चुकून चौकार गेल्या अश्या त्या सहा धावांमुळे इंग्लंडच्या दिशेने पारडे झुकले.

नंतरच्या चेंडूवर दोन धावा घेताना आदिल रशीदने प्रसंगावधान दाखवत स्वतः धावचीत होऊन स्टोक्सला स्ट्राईक दिली.

 

overthrow inmarathi
FOX Sports Asia

शेवटच्या चेंडूत जिंकण्यासाठी दोन धावा हव्या होत्या आणि शेवटचा फलंदाज मार्क वुड दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. आणि सामना अधिक उत्कंठावर्धक होत सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

सुपर ओव्हरमध्ये देखील सामना अनिर्णित राहिला आणि चौकार षटकारांच्या निकषावर जरी इंग्लंड विश्वविजेता ठरले असले तरी टेक्निकली कुठलाच संघ हा सामना हरला नाही.

त्या ओव्हरथ्रोमुळे ज्या चार धावा इंग्लंडला मिळाल्या, त्याच न्यूझीलंडला नडल्या असेच म्हणावे लागेल. अर्थात त्याविषयी बोलताना स्टोक्स म्हणाला की,

“मला ह्या प्रकारे सामना नक्कीच जिंकायचा नव्हता. अश्या प्रकारे धावा काढण्याचा माझा हेतू अजिबातच नव्हता. पण ज्याप्रकारे माझ्या बॅटला लागून चेंडू सीमापार गेला, त्यासाठी मी केनची माफी मागतो. मी केनला म्हणालो की ह्या घटनेसाठी मी आयुष्यभर न्यूझीलंडची माफी मागेन.”

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सचा जन्म मात्र न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झाला.

२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा खेळ फारसा चांगला झाला नव्हता. बेन स्टोक्स आणि पूर्ण इंग्लंड संघानेच त्यानंतर मात्र कसून मेहनत केली. त्यांची ही मेहनत २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी दाखवून दिली. त्याच मेहनतीचे त्यांना फळ मिळाले.

 

england inmarathi
Inkhabar.com

बेन स्टोक्स म्हणाला की, “गेली अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर अखेर आता आमच्या संघाला विश्वचषक पटकावण्यात यश मिळाले आहे. चार वर्ष आम्ही कसून मेहनत केली त्याचे फळ आम्हाला मिळाले.

आम्ही विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न बघितले होते ते अखेर साकार झाले. आणि हा अटीतटीचा सामना ज्याप्रकारे आम्ही जिंकलो आहोत,मला नाही वाटत की असा सामना ह्या आधी कधी झाला असेल.”

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. ओव्हरथ्रोची घटना घडली नसती तर खरं तर न्यूझीलंडचा संघच विजेता होता.

त्याला ह्या बक्षिसाचा आनंद झाला पण विश्वचषक गमावल्याचे दुःख त्याला जास्त आहे.

तो म्हणतो की, “हा अंतिम सामना गमावल्यानंतर आमचे खेळाडू फार निराश झाले आहे, त्यांना दुःख झाले आहे. पण आम्ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे. जे झाले ते चुकून झाले. त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते.

अश्या मोक्याच्या वेळी असे व्हावे असे कुणाचीही इच्छा नसते. आपण कारण मीमांसा करू शकतो पण कदाचित ह्यावेळी विश्वचषक आमच्या नशिबातच नव्हता असेच म्हणावे लागेल.”

 

Kane-Williamson-inmarathi
World Biography News

अश्या काही घटना बघितल्या की खरंच नशीब, लक ह्यावर विश्वास ठेवावासा वाटतो आणि आदल्या दिवशी सगळं गुडलक इंग्लंडच्या बाजूने होतं.

प्रचंड थरारक सामन्यात इंग्लंडने विश्वचषक जिंकला पण न्यूझीलंडने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली,आणि ह्याप्रकारे २०१९चा विश्वचषक सुफळ संपूर्ण झाला….

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?