बहावा, गौस आणि मी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक: विवेक देशपांडे, अहमदनगर

रविवार… दुपारचा एक वाजलेला….कामानिमित्त मोटरसायकलवरच गावात गेलो होतो, ट्रॅफिकमध्ये भर बाजारात फोरव्हिलरचा पार्किंग अन चालवण्याचाही त्रास नको म्हणून… दवाखान्यात १० ला गेलो की संध्याकाळी ६ ला, मावळतीला बाहेर पडणारा मी. ग्रीष्मदुपार काय चीज असते हे बरेच दिवसात न अनुभवल्यामुळं ही होरपळ बऱ्याच वर्षांनी चटके देत होती.

बाईक डांबरी रोडवरून पळत होती, समोर उन्हाच्या झळांनी मृगजळ हलतंय असा भास होत होता, डांबर पघळल्यानं गाडी पाण्यात किंवा चिखलात चालवल्यासारखी घसरत होती.

आधी हा रस्ता जेमतेम ३० फुट रुंद होता…काय गर्दी असायची, काय वर्दळ…कापड बाजारातून खरेदी करून आलेल्यांची आनंदी, उत्साही गर्दी, काॅलेज सुटल्यानं सायकलवर जाणारे मुलामुलींचे, नुकतीच तारुण्याची चाहूल लागलेले, आपल्याच विश्वात तरंगणारे…सळसळते, रंगीबेरंगी जत्थे, ऑफिस सुटल्यानं, घरच्या ओढीने वेगात जाणारे, सायकलच्या ‘हूक’ला भाजीची पिशवी लावलेले, थकलेले पण समाधानी पांढरपेशे लोक, करवंदांनी भरलेली एखादी हातगाडी मध्येच गाडीवाला हुशारीनं घुसवायचा..

 

market InMarathi

 

बरोबर काॅलेजची मुलं मुली येताना पाहून.. मग ट्रॅफिक जॅम, त्या करवंदांवर तरुणाईच्या उड्या पडत. अर्धा माल तिथेच संपून जाई.

लोकही त्रास झाला तरी खोळंबून ह्या घोळक्याकडे कौतुकानं पहात आपलं तरूणपण काही काळ जगून घेत असत.

मध्येच, दोन्ही हातांवर, खांद्यांवर, जवळच्या काठीवर भरगच्च शुभ्र असे मोगऱ्याचे गजरे लटकवलेला एखादा काळासावळा, तरतरीत अन हसरा माळ्याचा मुलगा एखाद्या स्कुटरवाल्याला आडवा यायचा. तो संतापला तरी पोरगा हसायचाच. त्याची बायको उतरून पाच सहा गजरे घेऊन केसात माळून गाडीवर बसूनही जायची, पोरगा हसत स्कुटरवाल्यापुढे हात करून पैसे वसूल करायचा.

बायकोला खूश करण्याची इतकी ‘सिंपल ट्रिक’ आपल्याला ‘आपण होऊनच’ का नाही सुचली? असं मनात येऊन तो ओशाळवाणं हसून पैसे देऊन पुढं जायचा.

गजरेवाला गायब झाला तरी सगळ्या गर्दीच्या चेहऱ्यावर मोगरा फुललेला असायचा. पुढे, महानगरपालिका काय झाली आणि या रस्त्याची शानच गेली. आता चारपदरी झालेल्या या रस्त्यात दुभाजकही बसला.

एकमार्गी वाहतुक सुरू झाली. एकाच दिशेने जाणाऱ्यांची, बाजूच्याला मागे टाकून पुढे जाण्याची रुक्ष स्पर्धा सुरू झाली. संवाद हरवले, एकमेकांना परिचित अशी आनंदी हाक मारणं, थांबून टाळ्या देणं, सगळं नाहीसं झालं.

आता क्वचित, एका बाजूने जाणारा, दुसऱ्या बाजूने येणाऱ्याला एक ओढग्रस्त, कसनुसं हसू देऊन हात उंचावतो. कधी प्रतिसाद येतो, बहुधा नाहीच….!

 

footpath InMarathi

 

तर, अशा आठवणी मनात घोळत आणि उन्हाने होरपळत मी त्या सुनसान रस्त्यावरून जात होतो.

उन्हाच्या तलखीनं सगळं गाव होरपळून मुकाट झालं होतं, रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं.सगळी दुकानं बंद होती. कायम अवर्षणाचा शाप असलेल्या या गावात वस्ती तरी का झाली असेल बरं एवढी? मी तरी इथं का बरं आलो असेन व्यवसायासाठी?दुसरी संपन्न गावं नव्हती???

निझाम, इंग्रजांनी आक्रमण केलेल्या पण स्वातंत्र्यानंतर एकसंध भारताचा भाग झालेल्या या शहरात, जुन्या राजवटींचे अवशेष, महाल, किल्ला, बगीचे, लष्करी तळ, मिशन हाॅस्पिटल…सगळं सुस्थितीत आहे.

नवीन आलो, मिशन हाॅस्पिटलमध्ये कामाला लागलो, रुळलो अन् मग रमलो इथेच.. झालं! वरून डोकं सूर्यानं भाजून काढलं होतं, अंगातून घामाच्या धारा वहात होत्या, पघळलेल्या डांबरात बाईक घसरत जात होती, चप्पल गरम झाली होती, असं वाटत होतं की, डांबरी झळांनी पिंढरीवरचे केसही जळून जातील. अंग उकडलेल्या रताळ्या-बटाट्यासारखं गदगद झालं होतं.

उमेदवारीच्या काळात, २५ वर्षांपूर्वी या रस्त्यावरून असाच स्कूटरवर मी ‘काॅल’ला जात असे. तेव्हा दुतर्फा घनदाट झाडी होती. ब्रिटिशांनी त्यांच्या काळी दूरदर्शीपणा दाखवून ह्या रस्त्यावर वडाची झाडं लावली होती. ती मोठी होऊन त्यांचा अफाट विस्तार झाला होता.

शंभर फुटांचा परीघ असलेली अन सगळीकडे खांबासारख्या जाड पारंब्या जमीनीत शिरवून स्थीर झालेली ती वडाची हिरवीगार झाडं, ते हिरवे मांडव.. हे फार मोठं वैभव होतं इथलं!

 

banyan tree

 

इंग्रज आणि वड यातलं एक साधर्म्यही लक्षात आलं. इंग्रजांनीही हळू हळू मुलुख काबीज करत त्यांच्या पारंब्या खोलपर्यंत रुजवल्या अन् दीर्घकाळ राज्य केलं…!

तर..

२५ वर्षांपूर्वी मी असाच, दुपारच्या उन्हात ह्या रस्त्यावरून काॅलेजला जायचो,येताना एका प्रचंड वडाखाली थंडगार लिंबू सरबत प्यायचो. पारंब्यांच्या मंडपात त्या ठेलेवाल्याचं छान चाललं होतं.

जसं इंग्रजांचं उच्चाटन झालं तसंच…एके दिवशी, रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली, दुतर्फा उभी असलेली ही संपन्न, वडिलधारी वृक्षसंपदा, एका रात्रीत महापालिकेनं तोडून टाकली. सारं गांव हळहळलं! लोकांचा विरोध टाळण्यासाठी ‘रात्री’ हे खून पाडले गेले.

आधी इंग्रजांनी देशाला लुटलं, आता राजकारण्यांनी गावाला लुटलं. भरपाई म्हणून कुणीही पुन्हा रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली नाही. कितीतरी दिवस त्या वडांची ४-५ फूट रुंदीची खोडं विधवेच्या कपाळासारखी दिसत होती.

नंतर, हळूच एका रात्री असेच ५-६ जे सी बी लावून पालिकेनं ती खोडं जमीनीतून समूळ उपटून रस्त्याच्या कडेला फेकली अन खड्डे बुजवून टाकले! पुढे कितीतरी दिवस त्या उलट्या पडलेल्या खोडांच्या मुळ्या आकाशाकडे केविलवाणे हात पसरल्यासारख्या दिसत होत्या. पुढे, झोपडपट्टीवाल्यांच्या चुलीत त्यांचंही दहन झालं.

आज हे आठवलं कारण ह्या निर्मनुष्य अशा ‘रुंदीकरण’ केलेल्या रस्त्यावरून भर दुपारी, गरम डोक्याने जाताना, मेंदूतले सगळे इलेक्ट्राॅन्स वेगाने फिरत ह्या स्मृती वर घेऊन आले. रस्त्यावर एकही माणूसच काय, गाय, म्हैस, कुत्रं…कुणीच नव्हतं.

 

road 1 InMarathi

 

रसवंत्या, चहाच्या टपऱ्या, पानपट्ट्या…सगळं सुनसान होतं.

एक हातगाडीवाला तर, पाण्याने ओलं केलेलं पोतं अंथरून त्याच्या गाडीखालीच ओलं मुंडासं बांधून गाढ झोपला होता. उन्हामुळे एखादी माशी देखील त्याच्या अवतीभोवती फिरकत नव्हती.

फार झटकन मनात उदासी चढली. खिन्न होऊन एका वळणावरून पुढं चाललो होतो…अभावितपणे थबकलो! ह्या ओसाड, निर्जन रस्त्यावर एकच मोठं झाड दिसलं.भरगच्च पिवळ्याधमक फुलांच्या घोसांनी लगडलेलं ते ‘बहाव्याचं’ झाड पाहून मी एकदम हरखलो, सुखावलो.

 

bahawa-marathipizza
flickr.com

थबकून, गाडी वळवून त्या झाडाखाली आलो, बाईक स्टॅंडवर लावली, गाडीवर बसून त्या बहाव्याचे फोटो काढले. ह्या वैशाखवणव्यात ते निष्पर्ण पण इंच न इंच सोनपिवळ्या फुलांनी बहरलेलं झाड, हा चमत्कार बघून माझी मरगळ कुठल्याकुठे पळून गेली. कुणी त्याला ‘सोनमोहर’ म्हणतं, कुणी ‘गोल्डन शाॅवर’ म्हणतं. दोन्ही नावं सार्थ आहेत.

सोन्याचा लखलखाटही मी अनुभवला अन् तेजस्वी पिवळ्या फुलांचे ते खाली, जमीनीकडे झुकलेले, हवेत झुलणारे ते मोठमोठे घोस.. जणू वाऱ्याची झुळूक येऊन हा प्रपात कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर कोसळेल असं वाटून अंगावर रोमांच उभे राहिले.

बहावा हा मध्यम उंचीचा वृक्ष, साधारण कडूलिंबाच्या झाडाएवढा वाढतो. पावसाळ्यात भरघोस लांबसडक हिरवी पानं येतात, हिवाळा संपता संपता पानगळ होते. भर उन्हाळ्यात, सोनं लगडल्यासारखे हे फुलांचे घोस लटकतात. याला अत्यंत कमी पाणी लागतं. माझ्या अंगणातही बहावा आहे, पण, पाणी मी भरपूर घालतो म्हणून सध्या खूप हिरवी पानं अन क्वचित काही ठिकाणी फुलांचे घोस लटकतात.

लोक म्हणतात, “पाणी तोडा, फुलं वाढतील!” माझ्याच्यानं पाणी तोडवत नाही. त्याला उन्हाळ्यात लांबसडक शेवग्याच्या शेंगेसारख्या… पूर्वी काॅफीच्या तपकिरी रंगाच्या वड्या मिळत असत… त्या रंगाच्या शेंगा लागतात. उन्हाळा संपताना त्या वाळतात. त्यातल्या बिया, वारा सुटला की खुळखुळ्यासारख्या मंजुळ नाद करतात. पिवळे घोस अन तपकिरी शेंगा..फार लोभस दृश्य असतं. बहाव्याचं बी आयुर्वेदात जुलाबांवर व पचनविकारांवर वापरलं जातं असं म्हणतात.

शरबत लोंगे साहब?

 

lemon juice InMarathi

 

मी चमकून डावीकडे पाहिलं. एक १५-१६ वर्षांचा, स्वच्छ पांढरा लखनवी कुर्ता पायजमा घातलेला, कपाळावर झिपऱ्या आलेला, हसऱ्या चेहऱ्याचा प्रसन्नचित्त मुलगा मला दिसला.

बहाव्याच्या अन लगतच्या गुलमोहराच्या जुळलेल्या सावलीत विजेच्या खांबाला टेकून त्याची छप्पर असलेली हातगाडी होती. चारही बाजूने काचेची फ्रेम केलेली, आत स्टीलचा चकाकणारा टेबलटाॅप, तिन्ही बाजूंना स्टीलच्या रॅक, त्यातील ठराविक अंतरावर पत्रा गोल कापलेल्या आडव्या स्टीलच्याच पट्ट्यांमध्ये विविध रंगाच्या सरबताच्या अर्काच्या बाटल्या मांडल्या होत्या.

२-३ मिक्सर्स व स्टीलची भांडी नीट लावलेली होती. प्रचंड मोठे अर्धा लिटरचे, डझनभर काचेचे ग्लास हारीनं मांडले होते. टेबलटाॅपच्या खाली, अंधारात बर्फाची लादी ठेवलेली होती. बाजूच्या टायरच्या दुकानातून वीज घेतलेली दिसत होती.

सगळं चकचकीत स्वच्छ! कुठे डाग, ओघळ, माश्या, चिलटं नव्हती. माझा खुललेला चेहरा पाहून तो हसून म्हणाला,

बेफिकर रहो साहब, बरफ भी घरसे फिल्टरके पानीका बनाया है, ओर शरबतका पानी भी बिसलरीके ड्रमसे लेता हूं.

ह्या मलूल करणाऱ्या दुपारी त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य अन त्याच्या सचेत हालचाली बघून मला त्याचं कौतुक वाटलं.
मी म्हटलं,

हॉं, लेंगे नं, क्या बनाएगा?

सबकुछ बनेगा साहब, निंबूपानी तो सब लेते है, कैरी बनाऊँ ? या फिर रूह-अफजा, खस, ठंडाई, मस्तानी.. या फालुदा?

मी म्हटलं,

तुझे जो अच्छा लगे वो बना दे बस… ख़ुश कर दे. क्या नाम तेरा ?

चेहऱ्यावर स्मितहास्य दर्शवत तो उत्तरला,

गौस.

गौसनं रूह-अफजा बनवायला सुरूवात केली. साबणाने दोन मोठे ग्लास धुतले, जर्द लाल, शाही गुलाबासारखा अर्क असलेल्या बाटलीतून भरपूर अर्क एका ग्लासात ओतला. बर्फ किसून घेतला, त्याच्या लांबसडक ओंजळभर काड्या ग्लासात टाकल्या, थोडा ‘सब्जा’ टाकला, मोठ्या चमच्यानं सगळं बराच वेळ ढवळलं, बिस्लेरी ड्रममधून थोडं पाणी टाकलं. मग सगळं काही मनाजोगतं जमल्यावर, सरबताच्या ग्लासवर तेवढाच मोठा दूसरा ग्लास पालथा ठेवला.

 

lemon juice 1 InMarathi

 

मग दोन्ही हातांनी तो ते एकमेकांवर ठेवलेले ग्लास दाबून, वाळूच्या घड्याळासारखे उलटे-सुलटे फिरवू लागला. ते रंगीबेरंगी मिश्रण, त्यातून डोकावणारा सब्जा, हे पाहून मी कोरड्या ओठावरून अधीरपणे जीभ फिरवली.

जसं मिश्रण एकजीव होत गेलं तसा त्याला बहारदार गुलाबी रंग आला. सब्जा मोत्यासारखा चमकू लागला. म्लान चेहऱ्यानं मी शेजारच्या बाकावर बसलो होतो. उन्हाच्या तलखीने कावलेल्या माझ्या मनाला ते सरबत पाहूनच गारवा वाटायला लागला. हलकेच वाऱ्याची झुळूक आली अन् पाठीला घामाने चिकटलेल्या शर्टमधून तो गारवा झिरपला.

मी असा घामाने भिजून कुठल्या गावी बसस्टॅंडच्या बाकावर बसलो असतो तर क्षणार्धात झोपलो असतो. त्याचं सरबत घुसळणं चालूच होतं.

खुशीत येऊन तो म्हणाला,’

ये पेड है ना साहब, इसके वजहसे मेरा धंदा बोत अच्छा चलता है। अब्बू इस वक्त रोटी खाने जाते है घरकू, दोपहर मै संभलता हूँ गाडी। अच्छा धंदा होता है दिन ढलते ढलते। सुबू इस्कूल रहेता है.. अब्बी छुट्ट्या लगेले है।

मी उन्हानं करवादलो होतो म्हणून नुसतं ” हूँ ” केलं. तो बिचारा मला उल्हसित करायला धडपडत होता.

बोत लोगां आते साब ये पेड देखने, तुमारे जईसे फोटू बी खिचते। कालीजके लडके-लडक्या सेल्फी भी खिचते। कालीज चालू होना बस…धंदा दुगना होता है।

कौतुकानं बहाव्याकडं बघत तो म्हणाला. मी पण पुन: निरखून बहावा पाहू लागलो. नखशिखांत पिवळ्या फुलांनी डवरलेला तो वृक्ष फारच राजस दिसला. एकही प्रौढ किंवा पिकलं पान दिसत नव्हतं. नाही म्हणायला थोडी कोवळी, पोपटी पालवी नीट निरखून पाहिल्यावर दिसत होती.

इतकं प्रसन्न पिवळंरंजन दृश्य मी कधीच पाहिलं नाही. बहावा हा तसा दुर्लक्षित वृक्ष, कमी पाण्यावर वाढणारा, डोंगरा- माळरानात फोफावणारा. पानगळ होऊन हिवाळा संपेपर्यंत त्याकडे लक्षही जात नाही.

मग हे पिवळं लेणं फुलतं.मग असा काही दिमाख असतो याचा, की, दुसऱ्या झाडांकडे बघावसंही वाटत नाही. मी आणि गौस त्याच्याकडे भान हरपून पहात होतो. त्याच्या तपकिरी शेंगा त्या पिवळ्या फुलांवर पहारा करत होत्या. वाऱ्याने हेलकावे खात होत्या.

ये लो साहब, आपका शरबत।

गौसनं अदबीनं स्टीलच्या चकाकणाऱ्या थाळीत तो भलाथोरला तुडुंब भरलेला ग्लास ठेवून सरबत पेश केलं.  दोन तीन घुटके मी घाईनं घेतले. पोटात उतरून तो गुलाबी गारवा डोळ्यातही चढला, भर दुपारी हा उन्हावरचा उतारा मला फार भावला.
मी बाकावर हातपाय पसरून प्रशस्त बसलो. सरबताच्या गाडीला टेकून गौस उत्साहाने मला सांगत होता,

साहब, ये सेंग है ना, ये जब बूढी हो जाती है, तब तेज हवासे इसके अंदरवाला बीज खुलखुलेजैसा बजता है, इस बेरहम धूपमें रास्ते सुनसान रहते है.. कभी गिऱ्हाईक नै ऱ्हयता और मै अकेला गाडीपे ऱ्हयता तब ये सेंगकी आवाज सुनते रहता हूँ .. वक्त मस्त कट जाता है, भोत मजा आता है।

और पता है साहब,

जब पहली बारिश जमकर बरसती है…फूल गिरने लगते है…पूरी जमीं पीली हलदीजैसी बन जाती है.. और पता है? ये सेंग पानी पीकर फुल जाती है और टूटकर अंदरके बीज चारोओर गिर जाते है। दो तीन बारिशमे तो इसके कईं पेडॉं खिल उठते है।

मी म्हटलं,

फिर क्यों नही दिखते बाकी पेड़ ?

तो कायम हसरा गौस म्हणाला,

कैसे रहेंगे, आप जैसे कईं शौक़ीन है इस शहरमे, वो निकालके ले लिजाते वो पौधे। बस्स.. एक बात है..।

तो दोन्ही हाताचे पंजे डोक्यामागे धरून गर्वाने मान वर करून बहाव्याकडे पहात म्हणाला. मी म्हटलं,

कौनसी बात?

तो झाडाकडेच पहात स्वगत म्हणाला,

इस पेडकी ‘पीली रौनक़’ इसके बच्चों में नही आती।

मी म्हटलं,

खरंय तुझं गौस, मी असाच प्रेमाने, पाणी, खत घालून बहावा वाढवलाय माझ्या घरी, पण भरपूर पानं अन् कमी फुलं आहेत त्याला. तसंच इतरांचंही होत असावं. ह्या झाडाला बघ, पाण्याचा ताण नैसर्गिकरित्या बसतोच, जवळ कुठेही पाणी नाही, मग पानं लवकर गळतात, शुष्क जमीनीतून शोषलेल्या, खोलवरच्या दुर्मिळ पाण्यावर ह्याचा फुलोरा बहरतो.. काय चमत्कार आहे निसर्गाचा?

गौस देखील उत्तरला

सच बोले साहब।

सरबत संपतच नव्हतं, मलाही गौस बरोबर गप्पा माराव्याशा वाटत होत्या. तोही भांडी विसळत गप्पा करण्यात दंग झाला होता. इतक्यात… मागे, ‘धप्प’ असा आवाज आला! पाहतो तर, गुलमोहरावरून की बहाव्यावरून, उन्हाच्या काहिलीने झांज येऊन एक पोपट चक्कर येऊन जमीनीवर कोसळला होता, पाय झाडत आचके देत देत शांत होत होता.

हातातली भांडी तशीच टाकून गौस पळत गेला अन ओंजळीत पोपटाला अलगद उचलून घेऊन आला. गाडीखालच्या एका माठाच्या फुटक्या खापरात त्यानं रांजणातलं पाणी घेतलं, त्या पाण्यात चोंच बुडेल इतपत पोपटाची मान त्यानं सोडली अन खापरावर पोपट आडवा टाकला. तो तिथेच बघत नि:शब्द उभा राहिला.. मी ही उभा राहिलो.

अर्धा-एक मिनिट झाला.. काहीच हालचाल नाही. गौस खिन्न झाला. मग पोपटाचं पोट थरथरलं. मग मान वळली. मग दोन्ही पाय लांब.. ताठ झाले…बहुतेक सारं संपलं…मग चोंच हलली, मग जीभ बाहेर आली…मग, एक .. दोन .. तीन.. सावकाश पोपटाने पाण्याचे घोट घेतले. मग भराभरा पाणी संपलं, गौसने पुन: ओतलं. मग तो पाण्यात धडपडत बसला, पुन: पाणी प्याला. त्याचे झोक जात होते, मग गौसने त्याच्या अंगावर पाण्याचा एक जोरदार शिपका मारला.

मग तो ताठ उभा राहिला. खापरातच पंख फडफडवले. उठाबशा काढाव्यात तसे पाय वरखाली केले अन् तेजतर्रार असा तो पोपट पटकन उडून परत गुलमोहरावर जाऊन बसला. उडत्या पोपटाकडे खुशीने बघतबघत गौसने ग्लास विसळायला घेतले.

ऐसा बोत बार होता साहब, अपनी तकदीर जिसको बचा सकती है…बचा लेता हूँ ।

ग्लास विसळणारा गौस बहाव्याकडे पहात स्वत:शीच बोलत होता. तळपत्या पश्चिमेकडच्या सूर्याची किरणं बहाव्यामागे थांबली होती. त्याच्या पिवळ्या फुलांच्या पाकळ्यान् पाकळ्यांमधून ते मृदु झालेले उन हळदीसारखे अंगावर पडले होते. गौसच्या डोळ्यांतही ती पिवळी चमक नाचत होती.

ह्या भाजून काढणाऱ्या उन्हात, ह्या गौसने जपलेलं त्याचं हिरवं, टवटवीत मन मला दिसलं. रखरखीत दुपार…पिवळा बहावा…चुणचुणीत गौस..देहाला शीतल करणारं रूह अफजा सरबत…मला खूप काही मिळालं आज!

मला सरबत पाजून माझी काहिली शमविणारा हा तरतरीत गौस..

कुटुंबासाठी राबणाऱ्या बापाला आराम मिळावा म्हणून, बापाच्या नकळत धंद्याचं कसब आत्मसात करून एखाद्या देवघरासारखी स्वच्छ अन नीटनेटकी सरबताची गाडी सजवून धंदा करणारा अन बापाला चार पैसे मिळवून आनंद देणारा गौस..

मरगळलेल्या गिऱ्हाइकाला सुहास्य मुद्रेनं सामोरं जाऊन, आग्रहानं सरबत प्यायला उद्युक्त करण्याचं कसब अंगी असलेला, गिऱ्हाईकाचं मन चटकन काबीज करणारा गौस..

फारसं शिक्षण नसताना, ज्या झाडाने आपल्याला रोजगार दिला, त्याची स्वत:च्या कुवतीप्रमाणे पण अचूक माहिती माझ्यासारख्या चिकित्सक वृत्तीच्या माणसाला पुरवून त्या झाडानं त्याच्यावर केलेल्या उपकाराचं काही अंशी ऋण फेडणारा गौस.. अन्

पडलेल्या पोपटाला धडपडत जाऊन पकडून आणणारा अन बळजबरीने पाणी पाजून त्याला जीवदान देणारा
सऱ्हदय गौस..

मला एक फरिश्ता वाटला…मला वेगळाच गौस गवसला…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?