' इस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट! – InMarathi

इस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

“नरेंद्र मोदी २०१७ मधे इस्राएलला भेट देणार आहेत फक्त तारीख ठरलेली नाही” असं आम्हाला भारतीय राजदूत श्री पवन कपूर यांनी ६ फेब्रुवारीच्या भेटीत सांगीतलं होतं. त्याचवेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की, शक्य असल्यास आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे. त्यावेळी ते म्हणाले होते की पब्लीक इव्हेंट असेल पण प्रत्यक्ष इंटरॅक्शन होईल की नाही ते सांगता येत नाही. पुढे नमोंचा येण्याचे दिवस पक्के झाले आणि त्यासंबंधीच्या विविध बातम्या आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर एल्डॉसकडुन समजायला लागल्या.

मे च्या शेवटी नमोंच्या भेटी दरम्यान ५ जुलैला भारतीय समुदायासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झाले आणि खर्‍या अर्थाने नमोंच्या इस्राएल भेटीचे वारे आमच्यापर्यंत पोहोचु लागले. इस्राएलमधील भारतीय समुदायात: इस्राएलमधील भारतीय ज्यु, इस्राएलमधील वेगवेगळ्या विद्यापीठांत शिकणारे, संशोधन करणारे भारतीय विद्यार्थी, इस्राएलमधील कंपन्यांमधे काम करणारे भारतीय नागरीक आणि इस्राएलमधेच केअर टेकर म्हणून सेवा देणारे भारतीय नागरीक यांचा समावेश होतो.

अशातच एल्डॉसने मला संपर्क करून सांगीतले की, “मी हैफा विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करायचंय.” त्यासंदर्भातील संपर्कात त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी नमोंच्या भेटीचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी बातमी दिली. साधारण दोन जुलैच्या सुमारास त्या गोष्टीचं कंन्फरमेशन झालं. तेव्हापासूनच माझ्यात उत्साह संचारलेला होता.

तोपर्यंत इस्रायली वर्तमानपत्रांमधुन तुरळक बातम्या माहिती येत होती. अशा प्रकारे भारतीय पंतप्रधान प्रथमच इस्राएलला भेट देणार होते त्यामुळे सहाजिकच त्याअनुषंगाने बातम्या येत होत्या. या इस्राएल भेटीत नमो पॅलेस्टाईनला तसेच ऑक्युपाईड टेरीटरीजना भेट देणार नाहीत हे स्पष्ट झालं. खरं तर एक महिना आधीच पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांचं नमोंनी भारतात यथोचित आदरातिथ्य आणि स्वागत केलेलं होतं. पण इस्राएल-भारत संबंध यांना एक इतिहास आहे आणि तो पॅलेस्टाईनशी जोडण्यात अर्थ नाही हे नमोंनी ठासून सांगीतलं.

narendra-modi-marathipizza
livemint.com

विविध राजकीय कारणांनी भारत-इस्राएल संबंध एकतर अदृश्य राहिले किंवा बॅकफुटवर ठेवले गेले. १९९२ पासून नरसिंह राव सरकारने भारत-इस्राएल सहकार्याची सुरूवात केली तरी ते म्हणावे तितके वेगाने पुढे जात नव्हते. अरब आणि मुस्लीमांना नाराज करायचे नाही असे तत्कालीन सरकारमधील राज्यकर्त्यांचे धोरण. आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील शासनाला संपूर्ण बहुमत असल्याने नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कृतीला एक वेगळेच पाठबळ मिळते आणि त्यांचा कोणतेही निर्णय घेण्यामधील आत्मविश्वास वाढतो.

श्री कपूर यांच्या म्हणण्याप्रमाणे, “भारत आत्मविश्वासाने आपली भूमिका आता स्पष्ट सांगू शकतोय की पॅलेस्टाईनच्या प्रश्नांना जरी आम्ही मान्य करत असलो तरी इस्राएलशी आमचे संबंध हे आम्हाला फायदेशीर असल्याने आम्ही ते स्वतंत्रपणे पुढे नेऊ शकतो.” पॅलेस्टईनच्या नेत्यांनाही नरेंद्र मोदींनी इस्राएलला भेट देताना पॅलेस्टाईन भेट टाळणं अमान्य नाही. नरेंद्र मोदींच्या या आत्मविश्वासपूर्ण धोरणाने भविष्यात इस्राएल आणि भारत एकमेकांच्या समर्थनार्थ मतदान करू शकतात अशी परिस्थिती आहे.

इस्राएल आणि सध्याचा भारत यांची निर्मिती होऊन जरी फक्त सत्तर वर्षे झाली असली तरी त्यांच्यातील मैत्रीच्या संबंधांना अतिशय प्राचीन पार्श्वभूमी आहे. जेव्हा संपूर्ण जगभरात यहुदींचा छळ चालू होता तेव्हा भारतात आश्रयास आलेले ज्यु मात्र अतिशय सुखात आपल्या धर्माचे पालन करत भारतात रूजले होते. भारतातच त्यांना आपलं घर सापडलं होतं.

सहिष्णु हिंदूंच्या बरोबर राहून त्यांची स्वत:ची अशी एक वेगळी मिश्र संस्कृती तयार झाली. ही संस्कृती इतर देशांमधील यहुदींच्या संस्कृती पेक्षा वेगळी होती. भारतातील सूफी संत बाबा फरीद यांनी १३ व्या शतकात जेरूसलेम मधील एका गुहेत अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. आज त्या गुहेचे तिर्थक्षेत्रात रूपांतर झालेले आहे. ही गुहा म्हणजे भारत आणि इस्राएल यांच्या ८०० वर्षांपूर्वीच्या नात्याची साक्ष देते.

ज्यावेळी इस्राएलची निर्मिती झाली त्यावेळी आपल्या ज्यु बांधवांच्या हाकेला साद देत इस्राएल या ज्यु राष्ट्रात हे भारतातील ज्यु दाखल झाले. या भारतीय ज्युंनी आपल्या बरोबर आपली मिश्र संस्कृती तसेच भारतीय परंपरांविषयीचे, भारताविषयीचे प्रेमही आणले. त्यामुळे भारत हा कायमच त्यांना आपला माहेरचा देश असेच वाटत आला आहे.

Bene-Israel-Jews-marathipizza
thejewsofindia.com

सुरूवातीला त्यांना इस्राएलमधे देखील इतर ज्युंनी स्विकारले नव्हते. आज मितीला इस्राएलमधे भारतीय मूळ असलेले एक लाखाहून अधिक ज्यु बांधव आहेत. इस्राएलमधे सफार्दी आणि अश्कनाझी ज्युंच्या तुलनेत भारतीय ज्युंची संख्या अत्यल्प असल्याने ते कायमच “इन्व्हीजीबल”….अदृश्य राहीले. नरेंद्र मोदींच्या इस्राएल भेटीने या भारतीय ज्युं मधे अतिशय उत्साहाचे वातावरण तयार झालं. नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे या भारतीय ज्यु समुदायाला स्वत:चं अस्तित्व दाखविण्याची मोठी संधीच मिळाली.

भारतीय आणि इस्राएली सहकार्याचे संबंध अत्यंत नैसर्गिक आहेत. दोनही देशांतील नेतृत्वाचे विचार आणि मनं जुळल्याने तसेच शासकीय स्तरावरील बांधिलकीमुळे दोनही देशांमधील प्रतिभावान व नाविन्यपूर्णतेचा ध्यास असलेल्या लोकांमधे सहकार्याचे संबंध भविष्यात अजुनच बहरतील यात शंका नाही. नरेंद्र मोदींच्या “मेक इन इंडिया”ला नेत्यानाहूंनी “मेक इन इंडिया विथ इस्राएल” असा प्रतिसाद देऊन दोनही देशांतील तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर वाढविण्यासाठी ४० दशलक्ष डॉलर्सचे सीड फंडींग उपलब्ध करून दिले आहे.

दोनही देशांमधे शेती, जलसंधारण, ऊर्जा, संरक्षण याच बरोबर इतरही अनेक क्षेत्रांत सहकार्याचे करार झालेले आहेत. नेत्यानाहू यांनी नरेंद्र मोदींच्या स्वागतपर भाषणात इस्राएल आणि भारत यांचे सहकार्याचे भविष्यातील संबंध कसे असतील आणि वाढतील हे थोडक्यात एका गणितीय समीक्रणाच्या स्वरूपात सांगीतलं.

हे समीकरण म्हणजे: “आय स्क्वेअर टी स्क्वेअर (इंडियन टॅलन्ट आणि इस्राएल ची टेक्नॉलॉजी)” म्हणजेच आय वर्ग टी वर्ग. याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी भारत एस्राएल संबंधांची भविष्यातील दिशाच दाखवून दिली. भारतीय टॅलन्ट आणि इस्रायली तंत्रज्ञान यांची सांगड घालतच या दोनही देशांचे संबंध पुढे जातील याची ग्वाहीच दिली.

तीन दिवस इस्राएलमधे नरेंद्र मोदी, भारत-इस्राएल मैत्री यांचा सर्व माध्यमांत गजर चालू होता. ५ जुलैच्या समारंभात एकूणच ऊर्जा या शब्दाच्या व्याख्येची पुन्हा एकदा प्रचिती आली. त्यावेळी भारत-इस्राएल मैत्रीची पाळंमुळं किती खोलवर रूजली आहेत आणि पुढे तर ही वाढतच जाईल याची खात्रीच पटली. उपस्थित भारतीय ज्यु समुहात भारतातील विविध प्रांतांतून आलेले ज्यु दिसले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, मेघालय आदी राज्यांमधुन इस्राएलला आलेले ज्यु लोक दिसले.

नरेंद्र मोदींच्या सगळ्या भारतीय ज्युंना पीआयओ किंवा ओसीआर कार्ड देण्याची घोषणा असू देत किंवा भारत-इस्राएल संबंधांचे जुने संदर्भ असू देत याला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद भारतीय ज्यु समुदायाचे मोदींविषयी आणि भारताविषयीचे प्रेम दर्शवतो. आज मितीला इस्राएलमधे तेथील वृद्धांना नर्सिंगची सेवा देणार्‍या (केअर टेकर्स) भारतीय नागरिकांचा उल्लेखही नरेंद्र मोदींनी खूप कौतुकाने आणि अभिमानाने केला.

modi-netanyahu-marathipizza
ndtv.com

नमो अ‍ॅप वर त्यांच्या ५ जुलैच्या भाषणासाठी मुद्दे मागविण्यात आले होते. मी दोन मुद्दे त्यात लिहीले होते. एक म्हणजे इंटर्डिसीप्लीनरी रीसर्चचा मुद्दा आणि दुसरा केअर टेकर्सचा मुद्दा. त्यांच्या भाषणात या दोनही मुद्द्यांचा उल्लेख आहे. आता ते मुद्दे त्यांनी मी सुचविल्याने घेतलेत की आधीपासून त्यांच्या भाषणात होते याची कल्पना नाही.

इस्राएलचे पंतप्रधान श्री नेत्यानाहू यांच्या सर्व हालचाली, हावभाव, बोलणं याचप्रमाणे शिष्टाचाराच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदींचे त्यांनी केलेले आदरातिथ्य यासर्वांतून भारत आणि इस्राएलचे मैत्रीचे संबंध कसे दृढ आहेत आणि उत्तरोत्तर ते सर्वप्रकारच्या सहयोगातून वाढतच जातील याचे प्रात्यक्षिकच दिसले.

६ जुलैला प्रत्येक विद्यापीठातील निवडक भारतीय विद्यार्थ्यांसोबत नरेंद्र मोदींचा संवाद आयोजित केलेला होता. त्यासाठी जाताना मी सर्वसामान्य इस्राएली नरेंद्र मोदींच्या भेटी विषयी काय विचार करतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचा सूर एकच नरेंद्र मोदी एक चांगला माणूस आहे. खूप छान झालं त्यांनी इस्राएलला भेट दिली. आम्ही त्यांचं स्वागत करतो.

आम्ही साधारण दुपारी दोन च्या सुमारास तेल अविव मधील हॉटेल डान मधे पोहोचलो. सिक्युरीटी अतिशय कडक होती. आमची ओळख पटवुन घेऊन आम्हाला ज्या खोलीत नमोंबरोबर गप्पा होणार होत्या त्या खोलीत प्रवेश मिळाला. त्यांचं वेळापत्रक खूपच व्यग्र असल्याने आधी सांगीतलेल्या वेळेपेक्षा त्यांच्या बरोबरची दहा मिनीटे कमीच झाली.

प्रत्यक्ष ते आले त्यावेळी एकदम डोळ्यावर विश्वासच बसेना की आपण आपल्या पंतप्रधानांच्या समोर इतक्या जवळ उभे/बसलेले आहोत. पाचच मिनीटं नमो आमच्याशी बोलले. सुरूवातीला त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ इथे राहीलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि एक वर्षांपेक्षा कमी काळ राहीलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाणून घेतली आणि इस्राएल मधे इनोव्हेशन म्हणजे काय आणि आपण काय केलं पाहीजे याविषयी सांगायला सुरूवात केली.

नरेंद्र मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्यात इनोव्हेशन म्हणजे काय हे सांगताना इस्राएलचे उदाहरण दिले. इस्राएलमधे केवळ वैयक्तीक करीअर पुढे नेण्यासाठी संशोधन, इनोव्हेशन झाले नाही तर प्रत्येकवेळी आपल्या देशाला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचा प्रयत्न त्यामागे असायचा. परदेशात शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग भारतातील समस्या सोडविण्यासाठी इनोव्हेशनचा उपयोग करून करावा.

यावर माझ्या परिचित इस्राएली स्त्री ची प्रतिक्रीया फार बोलकी आहे. ती स्त्री म्हणाली, “अपर्णा, तुम्ही भारतीय खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला एक असा नेता मिळाला आहे जो आपल्या देशातील सुशिक्षीत वर्गाकडे एक दूत म्हणून पाहतो. ज्याला खात्री आहे की हा वर्ग आपल्या देशाच्या फायद्याच, देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम नक्की करेल.”

खरं तर सिक्युरीटी वाल्यांनी आमचे मोबाईल फोन्स काढून घेतल्यामुळे आम्हाला सेल्फी वगैरे काढता आले नाहीत. सिक्युरीटीवाल्यांच्या दृष्टिने त्यांचं बरोबर आहे. लोकांच्या हातात मोबाईल असले की प्रोटोकॉलचा विसर पडतो आणि पंतप्रधान बोलत असताना देखील लोक फोटो घेत राहतात.

भारतीय दूतावासाने, पंतप्रधान कार्यालयाने स्वतंत्र फोटोग्राफर्स ठेवलेले होते. नमोंशी पाच मिनीटांच्या गप्पा झाल्यानंतर फोटो सेशन झाले. फोटो सेशन संपल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांच्या अधिकार्‍यांना सांगीतलं की अरे हे फोटो लगेचच फेसबुक आणि ट्विटरवर गेले पाहिजेत.

modi-visit-marathipizza

येवढ्या सगळ्या घाई गडबडीत त्यांचे विद्यार्थ्यांच्यावरचे प्रेम आणि त्यांच्या भावना समजुन घेऊन फोटो सोशल मिडीयावर जातील याची खात्री करून घेणं हे त्यांच्या कार्यशैलीची झलक दाखवणारं होतं. आम्हाला वाटलं की भारतीय दूतावासाकडून आम्हाला फोटो मिळतील त्यानंतर आम्ही ते आमच्या मित्रमंडळींना दाखवु शकु. तर तासाभरात आम्ही तेल अविव स्टेशन वर पोहोचे पर्यंत आमचे फोटो पीएमओच्या वेबसाईटवर आणि पंतप्रधानांच्या फेसबुक पेजवर झळकलेले आम्हाला इतरांकडुन समजायला सुरूवात झाली.

माझ्या मते नरेंद्र मोदींची प्रखर देशभक्ती, सतत देशाचाच विचार करणारी “नेशन फर्स्ट” ही भावना आणि प्रसंगी देशहितासाठी कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा कणखरपणा या गुणांचे इस्राएलच्या गुणांशी साम्य आढळते. म्हणूनच भारत -इस्राएल संबंधांची पुढची दिशा ही संरक्षण यंत्रणा, शेती, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्णता याबरोबरच प्रखर राष्ट्रवादाची भावना यावर आधारित असणार यात तीळमात्रही शंका नाही.

फक्त या प्रयत्नांना भारतातील लोकांकडुनही योग्य साथ मिळायला हवी. आपल्याकडे परदेशातून शिकुन परत येऊ इच्छिणार्‍या अनेकांना योग्य तो रिस्पॉन्स मिळत नाही. कारणं काहीही असतील पण जर परदेशात शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांनी भारतात येऊन इनोव्हेशन्सचा वापर करून भारताला भेडसावणार्‍या समस्यांचे समाधान करावे अशी अपेक्षा असेल तर किमान त्यांना पाय रोवण्यासाठी सुयोग्य वातावरण आपल्याकडील शैक्षणिक संस्थांमधे उपलब्ध करून देणे हे भारतातील राज्यकर्त्यांचे, शैक्षणिक नेतृत्वाचे काम आहे.

इथे इस्राएलमधे आल्यापासून मी पहाते आहे की इस्राएलमधील अ‍ॅकॅडमीशीअन्स आपल्या देशातील विद्यार्थ्यांचा, त्यांच्या वेळेचा खूप आदर करतात. त्यांच्यातील हुशारीचा आपल्या देशाला कसा उपयोग होईल यावर त्यांचा भर अधिक असतो. त्यामुळे कोलॅबोरेशन्स करताना देखील त्यांचा कल हा बाहेरच्या देशातील ज्यु संशोधकांकडे अधिक असतो. बाहेरच्या देशातील ज्यु संशोधक, इंडस्ट्रीयॅलीस्ट इस्राएलमधे संशोधनासाठी आपले पैसे गुंतवण्यास उत्सुक असतात.

आपल्याकडेच अनेकदा भारतीय विद्यार्थ्यांना फारशी किंमत दिली जात नाही किंवा केवळ आयआयटी सारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच किंमत दिली जाते. यात बदल झाला पाहिजे. इतर संस्थांमधील चांगलं काम करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशासाठी काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे असं मला वाटतं. तरच खर्‍या अर्थाने नमोंचे “डेव्हलप्ड इंडीया”चे स्वप्न कमी कालावधीत साकार होईल.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?