' ‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ ! – InMarathi

‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : गोपाल श्रीनाथ तिवारी

===

कवी मित्र सत्यपालसिंग राजपूत काही कामानिमित्त औरंगाबाद येथे आलेला असताना माझ्याकडे मुक्कामी होता. कुणाही आप्तेष्टांची जी साधारण प्रवास योजना आपण विचारून घेतो त्यानुसार मीही विचारलं,

येथील काम संपल्यावर पुढे कुठे जायचे आहे का?

 

पुण्याला जायचंय, आपला एक मित्र एक डॉक्युमेंटरी करतोय, त्याच्याशी संबंधित काही रिसर्चचे काम आहे, काही लोकांच्या भेटीगाठी आणि मग पंढरपूरला जाऊन काही प्रत्यक्ष शूटिंग…

यावेळी अजातबद्दल प्राथमिक माहिती मिळाली. सत्यपालसिंग राजपूत म्हणजे अजात या माहितीपटाचा निवेदक.

त्यानंतर रात्री सत्यपालसिंगला बसमध्ये बसवून द्यायचं होतं. त्याचा एक मित्र कॅमेरा घेऊन जाण्यासाठी औरंगाबादमध्येच थांबला होता, आणि ते दोघे सोबतच पुण्याला जाणार होते. कॅमेरा आणायला मी त्या मित्राला गाडीवर घेऊन गेलो.

“नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीच्या भावविश्वात नदीम-श्रवण, कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे योगदान” हा त्यावेळी गाडीवर जातायेता आमच्यात झालेल्या धमाल गप्पांचा विषय होता. हा मित्र म्हणजे अरविंद गजानन जोशी. अजात या माहितीपटाचा दिग्दर्शक.

ajaat-marathipizza02

पुण्याला जाऊन हे लोक ज्याच्याकडे थांबले, तो सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेला मित्र हर्षल अलूरकर. हा अजातचा कार्यकारी निर्माता. हे सर्व सुरुवातीला मुद्दामहून सांगायचं कारण हेच की या मंडळींपैकी कुणीही व्यावसायिक रीतीने किंवा व्यावहारिकदृष्ट्या सिनेमा या माध्यमाचा रीतसर फारसा अभ्यास केलेला नसूनही साध्या सरळ पार्श्वभूमीतून येणारे हे तरुण सिनेमा या माध्यमातून दाखव ले जाणारे कथ्य आणि त्यामागे समोर येणारे तथ्य या दोघांचेही मापदंड कळत-नकळत पुनर्परिभाषित करणाऱ्या एका कामगिरीवर होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या गावात होऊन गेलेल्या गणपती महाराज बभूतकर यांच्या कार्याचा इतिहास आणि त्याचे वर्तमान याचा धांडोळा घेत आपण आपले भवितव्य कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत याकडे पाहण्यासाठी विचारप्रवृत्त करणारा माहितीपट म्हणजे “अजात”.

ajaat-marathipizza03

“अजात” या माहितीपटाबद्दल मी तीन टप्प्यात विचार करतो. प्रथमतः विषयवस्तु. १८८७ साली जन्म, १९१५ साली वारीच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरूवात, जातींचा त्याग करून अजात मानव म्हणून जगण्यासाठी लोकांना आंतरजातीय विवाहासाठी प्रेरित करून त्यासाठी अनेक कष्टांना झेलणे, खालच्या जातीतील लोकांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नसल्याने स्वतःच्या गावात सर्वांसाठी खुले असलेले विठ्ठल मंदिर बांधणे, नंतर तेच मंदिर बंदही करणे हे गणपती महाराजांच्या आयुष्यातील ठळक टप्पे आहेत.

१९३५ नंतर पुढे दहा वर्षे म्हणजे मृत्यूपर्यंत गणपती महाराज बभूतकर हे एकांतात राहिले. त्यातही विशेषतः अखेरची चार वर्षे म्हणजे १९४० ते १९४४ पर्यंत कोणताही विशेष संवाद नव्हता. शेवटही गूढच. हा गणपती महाराजांच्या जीवनाचा प्रवास त्यांचे वंशज तसेच इतर अजात परिवारातील लोकांच्या बोलण्यातून उलगडत जातो. गणपती महाराजांच्या अभंगांची प्रसंगानुरूप पेरणी संपूर्ण माहितीपटासह वैचारिक मांडणीची पाठराखण करत असते. इकडे महाराजांच्या जीवनात विठ्ठलाच्या भक्तीचे आणि जातीभेद सोडून माणूस एकत्र येण्याच्या त्यांच्या कल्पनेचे महत्व आपण ऐकतो आणि त्यापाठोपाठ पंढरपुरात सध्या काय घडत आहे, तेथील वारकऱ्यांचे, मठाधीशांचे जातीव्यवस्थेबद्दल काय म्हणणे आहे हेही आपण पाहतो. कानावर गणपती महाराजांच्या अभंगाच्या ओळी पडत असतात,

गोपाळ हा नाटकी, पहा रे, गोपाळ हा नाटकी.

विचारांचा दुसरा टप्पा बनतो विविध विषयांवरील तज्ञ बोलतात तेव्हा. त्यात गणपती महाराजांच्या कार्याबद्दल संशोधन करणारे संशोधक, अभ्यासक, विद्यापीठीय आस्थापनांच्या माध्यमातून संतसाहित्य, सामाजिक शास्त्रे यांचा अभ्यास करणारी तज्ञ मंडळी बोलत असतात. अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठीतून सरळ सरळ भाकड धर्माविरुद्ध विद्रोहाची बोंब ठोकणाऱ्या विचारकांना माउली आणि जगद्गुरू या विशेषणामध्ये अडकवून आपण त्यांच्या ओव्या आणि अभंगांच्या मागील कोणत्या आधारभूत जाणीवांकडे दुर्लक्ष केले आहे याकडे लक्ष वेधणारा हा टप्पा आहे.

ajaat-marathipizza04

श्री. प्रवीण चव्हाण, श्री. सदानंद मोरे इत्यादी अभ्यासूंच्या दृष्टीकोनातून अजातचा प्रेक्षक जेव्हा संत परंपरेकडे पाहायला लागतो, तेव्हा संताच्या नावामागील विशेषणांचे मुखवटे गळून पडतात आणि भक्ताच्या आतमधील समानतेच्या कल्पनेसाठी झटणारा (कारण सत्यात तर ते काही अजूनही उतरलेले नाही) बंडखोर आपल्यासमोर स्पष्टपणे उभा राहायला लागतो. सातशे वर्षांच्या वारकरी परंपरेत केवळ चंद्रभागेच्या वाळवंटातच सर्वजण सारखे आहेत आणि गावात परतल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळे वाडे आहेत, वस्ती आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष मंदिरच जेव्हा सर्वांना आपापल्या पायरीने राहायला सुचवत असेल आणि पायऱ्यांना चढवलेला आख्यायिकांचा मुलामाच अधिक लोकप्रिय असेल तर जातीभेदाची ही कोंडी फोडायची तरी कशी असा प्रश्न मनात उपस्थित होतो. आणि या सर्व आजच्या बाबी आहेत, आजचा अभ्यास आहे, संशोधन आहे.

जेव्हा हे सर्व काही नव्हते त्या काळात

चल, माणूस म्हणून मैदानात ये. जात सोडून दे. आपण सर्व एकत्र जगूया.

असे आवाहन करणारा एक वारकरी म्हणून गणपती महाराजांचे व्यक्तिमत्व आपल्या समोर येते. रंगांना विशिष्ट ओळख देणाऱ्या समाजात सर्वसमावेशक असा पांढरा रंग त्यांनी निशाण म्हणून स्वीकारला. कुणाला कोणत्याही ओळखीसाठी कुठलाही रंग आवश्यक वाटू नये या आदर्श स्थितीकडे जाण्यासाठी सध्या उपलब्ध रंगांमध्ये पांढरा रंग त्यातल्या त्यात बरा वाटावा अशा त्यांच्या थेट कृती. सुमारे नव्वद वर्ष आधीच्या काळात ४०० आंतरजातीय विवाह लावून देणे ही सामान्य बाब नव्हती. एक शासन म्हणून ब्रिटिशांच्या व्यवस्थात्मक संरक्षणाचा त्यांना त्या काळात आधार होता, हे त्यांनी आपल्या अभंगांत नोंदवून ठेवले आहे.

तिसरं असं की एवढं प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन सामाजिक सुधारणेचं कार्य आपल्याकडे झालं. आपण काय केलं? एक समाज म्हणून, एक स्टेट म्हणून, एक सिस्टीम म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण काय करायचं होतं? आपण सर्वांनी अजात व्हायला हवं होतं का? की आपण सर्वांनी जात नसलेले, नाकारलेले लोक असू शकतात हेच मुळात मान्य केलेलं नाहीये? सरकारी कागदावर जातीच्या कॉलममध्ये अजात लिहून आपल्या नोकरशाहीने काय मिळवलं किंवा काय गमावलं हा प्रश्न आपल्याला पडणार आहे की नाही? आजही अनेक आंतरजातीय विवाह होतात, सामाजिक व्यवस्थेचा विरोध पत्करून प्रेम विवाह होतात. त्यांच्या अपत्यांची जात कुठली? माझी, तुझी, याची किंवा त्याची जात माणूस सोडून अन्य काही आहे का? ज्याच्या जन्माचे डीटेल्स माहित नाहीत त्याला जात असते का? आणि जात असावीच लागते का? जात नसेल तर काय होतं? ज्यांना जात नसते ते कसे जगतात?

या प्रश्नमालिकेतील शेवटचे दोन प्रश्न म्हणजे अजात चळवळीचा स्वीकार केलेल्या पूर्वजांच्या वंशजांची जिवंत गोष्ट आहे. त्यांना शैक्षणिक, आर्थिक इत्यादी लाभ शासकीय पातळीवरून मिळण्यासाठी कागदोपत्री तरी का असेना, जात लागतेय. जे जन्माने, जातीने अजात आहेत, त्यांचे लग्न इतर अजात लोकांशिवाय अन्य कोणाशी होणे कठीण आहे. स्टेट याबद्दल उदासीन आहे. आणि स्टेटची संकल्पनासुद्धा प्रश्नचिन्हांकित असू शकेल असा काळ आहे. विदर्भाऐवजी गणपती महाराज पश्चिम महाराष्ट्रात असते तर त्यांच्या कार्याची ऐतिहासिकदृष्ट्या संदर्भपूर्ण सार्थकता आणि समाधी संस्थानाची आर्थिक बाजू नक्कीच अधिक भक्कम असली असती का? आणि जनप्रबोधनार्थ ईश्वराच्या सामर्थ्याला स्वीकारणारा तसेच नाकारणाराही स्वतःच पूजला जावा हे तर आपले व्यवच्छेदक लक्षण आहेच.

ajaat-marathipizza05
या सर्व गोष्टी डोळ्यात अंजन घालावे तितक्या स्पष्टपणे आणि कमालीचा कलात्मक तटस्थपणा बाळगून मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. प्रतिमा किंवा प्रतीके अनेक आहेत, पण त्यांचा अनावश्यक भडिमारही नाहीये. संकलनासाठी विशेष दाद. काही जागी गोंगाटसदृश्य मोजके अपवाद वगळता ध्वनी योजनाही कमी साधनांत उत्तमपणे हाताळली आहे. ज्या मित्रमंडळींनी अश्या वेगळ्या धाटणीच्या निर्मितीसाठी निधी उभा केला त्यांचे विशेष अभिनंदन करायला हवे.

अनेक महोत्सवात नावाजलेल्या या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात चर्चा होणे स्वाभाविक होते. टीका आणि प्रश्नही स्वागतार्ह असतात. परंतु आपण आपल्या आत न डोकावता हे सर्व करणार असू तर हा माहितीपट पाहणे हे दरवर्षी पंढरपूरची वारी करण्याइतकेच व्यर्थ ठरेल यात अजिबात संशय नाही.

उत्सुकता शिगेला पोहोचली असल्यास या माहितीपटाचा ट्रेलर नक्की पहा…

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com . तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?