अहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका: सारिका वाघ

===

राजकारण आणि समाजकारण,धर्म आणि नीती,व्यक्तिजीवन आणि लोकजीवन यांचा सत्वपोषक मेळ घालणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. सदसदविवेकबुद्धीला कायम प्रमाण मानून त्यांनी राज्यकारभार केला.

होळकरांच्या वसुलाचे राज्याचा आणि खाजगीचा असे दोन भाग होते. अहल्याबाईंनी कटाक्षाने आपल्या खाजगी खर्चातूनच कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्या.

जो भाग दौलतीचा, तो दौलतीसाठीच खर्च केला. त्यातील एक पैसाही आपल्या आपल्या खाजगी खर्चात येऊ नये असा त्यांचा काटेकोर व्यवहार होता.

 

holkar-inmarathi
dabangdunia.co

 

अहिल्याबाईंच्या या प्रकारच्या स्वच्छ व्यवहाराच्या काही जनश्रृतीही आहेत. त्यांचे पती खंडेराव विलासी होते. त्यांचा वर्षाचा खर्च खाजगीतून नेमून दिलेला होता.

तो दोन महिन्यातच संपला तेव्हा मला पैसे हवेतच असे म्हणत हिशेबाची वही भिरकवणाऱ्या खंडेरावांना अहिल्याबाईंनी पैसे देण्यास सक्त नकार दिला आणि कारभारी गांगोबातात्यांना त्यांनी आदेश दिला की,

“खतावणीची बेअब्रू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या आणि त्यांना पंचवीस मोहरांचा दंड करा.”

बाजीराव पेशवे निधन पावले तेव्हा मल्हारराव होळकरांनी त्यांच्या नावे भरपूर दानधर्म केला. कारभाऱ्यांनी तो सर्व खर्च दौलतीच्या हिशेबी टाकल्याचे लक्षात आले तेव्हा अहल्या बाईंनी स्पष्ट सांगितले की,

“बाजीराव हे मामंजींचे शपथबंधू. यास्तव झाला खर्च खाजगिकडेच टाका. खाजगीतून एखादे दौलतीचे काम आले तर हरकत नाही, पण दौलतीचं पैसा कधीही खाजगीकडे येता कामा नये.”

अशा जनश्रृतींची ऐतिहासिकता प्रमाणित असो व नसो, पण अहल्याबाईंचा दौलतीसंबधीचा कटाक्ष त्यातून लक्षात येतो.

 

ahilyabai_holkar_inmarathi
bedhundlahari.com

 

अहिल्याबाईंच्या न्यायनिवाड्यातून आणि कार्यपद्धतीमधून स्त्रियांच्या विषयी विशेष सहानभूती आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता दिसते.

विधवेच्या संपत्तीची लुबाडणूक, तिच्या व्यावहारिक अज्ञानाचा गैरफायदा आणि तिचे शोषण सार्वत्रिक असण्याच्या काळात अहिल्याबाईंनी विधवांना अभय दिल्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत.

विधवेने दत्तक घेण्याचे मनात आणल्यावर त्यात अडचणी आणणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त करणे, भरमसाठ हुंडा मगणाऱ्यांना ताकीद देणे, कन्याविक्रयाला विरोध करणे अशा अनेक गोष्टी आहेत – काही लिखित आणि काही कथित…

===

संदर्भ : जाणिवा जाग्या होताना (अरुणा ढेरे.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?