' मराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक! – InMarathi

मराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सुचिकांत वनारसे 

भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. श्री. पृथ्वीराज चव्हाण सर मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.

तुम्ही म्हणाल, “भारत सरकार कोण आपल्या मराठीला अभिजात दर्जा देणार? आपली मराठी आहेच अभिजात!” तर हा झाला पोकळ अभिनिवेश! असला अभिनिवेश बाळगून भाषेला काडीचाही फायदा होत नसतो…भाषेच्या विकासासाठी निधी लागतो! ज्यामुळे ठोस योजना आखता येतात.

आपल्या देशात असंख्य भाषा आहेत. त्यात केंद्र सरकार प्रत्येक भाषेची काळजी करत बसणार नाही; संबंधित भाषेच्या लोकांनी “आपल्या भाषेसाठी केंद्राकडे कोणती योजना आहे का?” हे बघायचं असतं आणि असे फायदे मिळवण्याकरता योग्य ती पावले उचलायची असतात.

 

bhasa_azaadi InMarathi

 

शिक्षणावर राज्याने जीडीपीच्या ६% रक्कम खर्च करणे अपेक्षित आहे; सद्य:स्थितीला महाराष्ट्र ती करू शकत नाही. मराठी भाषेसाठीदेखील महाराष्ट्र सरकार वर्षाला १५-२० कोटींच्यावर खर्च करत नाही.

अशावेळी “अभिजात दर्जामधून भाषेसाठी काही अनुदान उपलब्ध होऊ शकत असेल तर त्याचा लाभ मराठीसाठी का घेऊ नये?” – हा विचार सुज्ञ मराठीप्रेमींच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

आपण पूर्ण देशात सर्वाधिक कर भरणारे राज्य आहोत! हा कर अनुदानांच्या स्वरूपात आपल्याकडे परत वळवण्यात वावगे काय?

marathi-language-inmarathi

 

मराठीच्या अभिजात दर्जाला विरोध काही नवा नाही. जेव्हापासून प्रा. रंगनाथ पठारे समितीने अभिजात दर्जासाठी प्रयत्न सुरु केले तेव्हापासून काही विशिष्ट हितसंबंधी गट हा दर्जा मराठीला मिळू नये म्हणून सतत कार्यरत आहेत.

कोण आहेत हे लोक?

१. अंध संस्कृतप्रेमी : अर्थात जगातील सर्व भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या म्हणणारे!

२. न्युनगंडाने पछाडलेले : यांनी लढायच्या आधीच हाय खाल्लेली आहे. हत्यारे टाकली आहेत.

३. विरोधाला विरोध करणारा : हे लोक कोण (कोणत्या जातीचा/धर्माचा/विचारधारेचा/आपल्या जवळचा-लांबचा) या चळवळीचे नेतृत्त्व करतोय हे पाहून आपलं समर्थन किंवा विरोध ठरवतात.

४. अतिशहाणा : “आपण ज्या मार्गाने मराठीसाठी काम करतोय तोच यशाचा राजमार्ग आहे बाकी सर्व क्षुल्लक आणि निरर्थक आहेत” अशी यांची धारणा असते.

५. मेंढराप्रमाणे समोरचा विरोध करतोय म्हणून डोळ्याला झापडं लावून विरोध करणारा आणि प्रत्येक आंदोलन, प्रत्येक चळवळ ही पैसा लाटायलाच असते असे मानणारा! इत्यादी.

आजही तुम्ही गुगल केलं तर अभिजातच्या नावाने नकारघंटा वाजवणारे तीन ताजे-ताजे लेख तुम्हाला सोशल मिडीयावर आणि वेब पोर्टल्सवर सापडतील. अगदी न पटणारे युक्तिवाद चालू असतात. अजून काही वर्षांनी असले युक्तीवाद करणाऱ्यांना स्वतःच्याच बालिशपणावर हसू येईल. बुद्धीभेद करणे, मराठीप्रेमींना नाउमेद करणे, दांभिक युक्तीवाद करीत मराठीचे भले होऊ नये यासाठी नकारात्मकता पसरवणे एवढाच यांचा उद्देश आहे.

एका ठिकाणीतर ४ वर्षांपूर्वीचा लेख या २८ फेब्रुवारी-२०१८ रोजी प्रसारीत करण्यात आला. यावरूनच मराठी आणि मराठीच्या प्रश्नांवर किती अंध टीका होते हे लक्षात येईल.

आपण लक्षात घ्यायला हवं, “अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. इतर भाषांना किती फायदा झाला त्यावरून मराठीला किती फायदा होईल हे का ठरवता? आणि दर्जा मिळाल्यावर आपलं राज्य त्याचा फायदा करून घेत नसेल तर आपण सारे कशासाठी आहोत? दर्जामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा पैसा महाराष्ट्र सरकारला मिळणार आहे; ना पठारे समितीला, ना कोणत्या मराठीच्या सोशल मीडियावरील चळवळींना…त्याची विल्हेवाट कशी लावायची हा सरकारचा प्रश्न आहे.

अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत :

१. मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.

२. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.

३. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.

४. महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.

५. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.

– हे फायदे प्रशिक्षित मनुष्यबळाशिवाय अंमलात आणता येतील का?

– ते मनुष्यबळ मराठीत निपुण असण्याकरता कोणत्या माध्यमातून शिकलेले असणे गरजेचे आहे? म्हणजे शेवटी कुणाला नोकऱ्या मिळणे अपेक्षित आहे?

– यातून मराठीचा फायदा होणार नाही का? मराठीचे संवर्धन झाले, ती अधिक सक्षम झाली तर फायदा मराठी शाळांना होणार नाही का?

– मराठीच्या न्यूनगंडामुळे काही टक्के पालक जो मराठी शाळांपासून दूर गेला आहे, त्याला आश्वस्त करता येणार नाही का?

– मराठी साहित्यिकांना अभिजात दर्जामुळे प्रोत्साहन मिळणार नाही का?

आधीच नकारघंटा वाजवायला सुरुवात करणे सुशिक्षित आणि ज्ञानी समाजाला शोभत नाही!

अभिजात दर्जाबाबत नुसतीच नकारात्मकता नसून गेल्या २ आठवड्यात अभिजात दर्जासाठीच्या सोशल मिडीयावर प्रसारित केल्या गेलेल्या अवतारणांवरून आमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केलं गेलं. कारण होतं महाभारतातील मराठी शब्द आणि गाथासप्तशतीतील भाषा! – अर्थात मराठीची वेगवेगळी म्हटली जाणारी रूपे मराठीची नाहीतच हा विरोधकांचा दावा. यातील पहिला मुद्दा घेऊ.

 

marathi-language-marathipizza02

काही वर्षांपूर्वी ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकात श्री. अर्जुनवाडकर यांनी ‘महाभारतातील मराठी शब्द’ हा शोधनिबंध लिहिला. श्री. अर्जुनवाडकर हे जागतिक कीर्तीचे संस्कृततज्ज्ञ. स्वा. सावरकरांनी जसे इंग्रजीला मराठी प्रतिशब्द दिले तसेच श्री. अर्जुनवाडकर सरांनी अनेक इंग्रजी अभिवादनांना संस्कृत प्रतिअभिवादने दिलीत, उदा. Good morning=सुप्रभातम्, Good day=सुदिनम् इत्यादी. सर म्हणजे भाषाप्रभूच!

सरांनी भांडारकर संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सक प्रतीचा अभ्यास केला आणि त्यांना त्यामध्ये अनेक ‘मराठी’ शब्द आढळले. त्यावर त्यांनी एक निबंध लिहिला; जो प्रा. अशोक केळकर यांनी संपादित केला आणि छापला. याचा उल्लेख अनेकदा श्री. हरी नरके सर त्यांच्या भाषणांतदेखील करतात.

पठारे समितीने त्या निबंधाचा अभिजात दर्जासाठीच्या अहवालासाठी उपयोग केला. या निबंधाच्या संदर्भात पठारे समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांची प्रा. केळकर आणि प्रा. अर्जुनवाडकर यांच्याशी चर्चा झालेली होती. आता तुम्हीच सांगा, यामध्ये कसला आलाय खोटारडेपणा?

गाथासप्तशतीची भाषा :-

प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे. १९३२ साली प्रसिद्ध विद्वान श्री. पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील ३ नावे आहेत हे सिद्ध केलं आहे. त्यानुसार गाथासप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतातील अर्थात मराठीतीलच ग्रंथ आहे.

महाराष्ट्री आणि मराठीच्या संबंधांवर जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. ए. एम. घाटगे यांनीही लिहिलेले आहे. हरीभद्राच्या अभिजात लेखनाचा त्यांनी निर्देश केलेला आहे. : “महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदू : |” ही उक्ती प्रसिद्धच आहे. महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलतः ही भाषा महाराष्ट्रीच, हे निःसंशय! शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते आणि साम्य आहे हे अनेक उदाहरणांवरून व व्युत्त्पत्त्यांवरून सिद्धही होते.

“भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे” हा अभिजात दर्जासाठीचा निकष देखील आपली मराठी भाषा इथे पूर्ण करते.

असो! एका सुप्रसिद्ध वेबपोर्टलवर एका भाषावैज्ञानिकांचा लेख प्रकाशित झालेला आहे. ते संस्कृतचे कडवे अभिमानी दिसतात. आम्हाला संस्कृत भाषेबद्दल नितांत आदर आहे. आमचा विरोध वर्चस्ववादी संकुचित वृत्तीला आहे. त्यांनी मराठी अभिजात नाही असे मत मांडलेले आहे. मराठीप्रेमी उत्सववेडे असतात, अभिजात दर्जा मिळाल्यावर तो आपल्याला साजरा करायचा आहे वगैरे आरोप लावून त्यांनी एकांगीपणे मराठी प्रेमींवर चौफेर टीका केलेली आहे.

मराठीच्या अभिजात दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे तज्ज्ञ कधीही, ‘संस्कृत जगातील सर्व भाषांची जननी आहे’, ‘संस्कृत संगणकासाठी सर्वात उपयुक्त भाषा आहे’, ‘संस्कृत देववाणी आहे’ वगैरे दाव्यांचे खंडन करताना दिसत नाहीत, अशा खोट्या प्रचारासमोर हे लोक मूग गिळून गप्प बसतात.

 

bhasha 2 inmarathi

 

संस्कृतवाल्यांचा एक सनातनी गट असा आहे की त्याला थेट संत एकनाथांनीच चपराक लगावलेली आहे. ते म्हणतात, “संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत [मराठी] काय चोरापासोनी झाली?” या संस्कृतच्या वर्चस्ववादी मानसिकतेला मराठीचा अभिजात दर्जा सहनच होत नाहीये. त्यासाठी दुटप्पी युक्तीवाद चालूयत.

मराठी निकष पुर्ण करीत नाही असे म्हणत ‘तिच्या आधुनिकतेचा गौरव करा’ असा चतुर युक्तीवाद करणारे हेच लोक तमीळ, संस्कृतला अभिजात दर्जा मिळाल्याने त्यांचा अनादर करू लागलेत का? दर्जाने फायद्याऐवजी नुकसानच होते तर मग तुम्ही तमीळ -संस्कृतचा हा दर्जा रद्द व्हावा यासाठी का झटत नाही?

इतर भाषांना काही फायदा झाला नाही, आपल्याला पण होणार नाही असा त्यांचा नकारात्मक सूर आहे. त्यांनी या दर्जासाठी लढणाऱ्यांना “आंधळे भाषाभिमानी” म्हटले आहे, पदलालसेपोटी ही सर्व खटपट चालू आहे असे थेट हेत्वारोप केले आहेत. अशी सगळी द्वेषपूर्ण टीका करणारे धारूरकर स्वतःच वैयक्तिक आकसाने, अहंकाराने बरबटले असल्याचे जाणवते.

त्यानंतर ते “महाराष्ट्रीचा आणि मराठीचा काहीही संबंध नाही” आणि “केवळ अभिजात दर्जासाठी ओढूनताणून असा संबंध लावला जात आहे” अशी टीका करतात. अहो, तुम्ही जसे भाषातज्ज्ञ आहात; तसे पठारे समितीत देखील प्रा.कल्याण काळे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. आनंद उबाळे, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. श्रीकांत बहुलकर, प्रा.मधुकर वाकोडे, परशुराम पाटील असे तज्ज्ञ आहेत. त्यांनी भांडारकर संस्थेत अभ्यास करून मते मांडली आहेत. साहित्य अकदमीच्या सर्व भाषातज्ञांनी या अहवालाला लेखी मान्यताही दिली.

मतभिन्नता आम्हाला समजू शकते. पण प्रा. पठारे समितीतील विद्वानांना चुकीचे, धडधडीत खोटे बोलणारे म्हणणे, त्यांच्यावर व्यक्तीगत आरोप करणे हा अधिकार या भाषावैज्ञानिकांना कोणी दिला? तुम्ही चक्क हेत्वारोप करताय, खिल्ली उडवताय. कोट्यावधी मराठीप्रेमींच्या भावना दुखावताय. ज्ञानक्षेत्रात दुसरीही बाजू असू शकते की नाही? संशोधनात अंतिम शब्द तुमचाच कसा असेल? बरं असली एकांगी टीका करणाऱ्या लेखनाला संशोधनपर लेखनतरी कसे म्हणावे?

गाथासप्तशती तिसऱ्या शतकातील ग्रंथ आहे, त्यानंतर श्रवणबेळेगोळचा शिलालेख, नंतर संतसाहित्य असा मराठीचा प्रवास सर्वांना परिचित आहे; मग मधल्या सात-आठशे वर्षात कोणते ग्रंथ निर्माण झाले, असे हे हुशार भाषावैज्ञानिक विचारतात. त्यांनी स्वतः भांडारकर संस्थेमध्ये संशोधनपर कार्य केले असल्याचे कळते. हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरीभद्र, उद्योतन सुरी असे अनेक मराठे लेखक मधल्या काळात झालेले आहेत. अभिजात अहवालामध्ये या संदर्भग्रंथ, हस्तलिखितांची प्रमाणे दिलेली आहेत, याची त्यांना कल्पना नसावी याचे आश्चर्य वाटते.

गेल्याच महिन्यात संस्कृती मंत्री डॉ. महेश शर्मां यांनी अभिजात मराठीबाबतचा साहित्य अकादमीच्या तज्ञांचा शिफारस करणारा अहवाल आल्याचे लोकसभेला सांगितलेय. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी मराठी ही, जगातील ६ व्या क्रमांकाची समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे असे परवाच बेळगाव तरूण भारतमध्ये आवर्जून नमूद केलेले आहे.

 

mahesh-sharma InMarathi

तिच्या प्राचीनत्त्वाचा पुरावे देणारे राजाराम शास्त्री भागवत, डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर, दुर्गा भागवत, आदी सारेच लोक स्वार्थी, भाबडे, धोरणी, उत्सवी आणि खोटारडे लोक होते किंवा आहेत काय?

त्यांनी निधीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. लेखात ते “निधी मिळत नाही” असाही दावा करतात आणि “मिळाला तरी लोक पैसे खातात” असे ठासून थेट विधान केलेले आहे. आपल्याकडे संशोधन करू शकतील असे मनुष्यबळ नाही, तज्ज्ञ नाहीत, तसे अभ्यासू विद्यार्थी नाहीत हे त्यांचे तर्कट तर आमच्या काळात अतिशय दर्जेदार शिक्षक असायचे या पठडीतले आहे. म्हणजे “मराठी लोक काहीच करू शकत नाहीत”, ते जन्मजात ‘ना’-लायक आहेत असा ठपका ते ठेवतात. जाऊ द्या. असतात काही मायबोलीचा आणि भावंडांचा तेजोभंग करणारे महाभाग.

अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठीचे भले होईल का? असा त्यांना प्रश्न पडतो. हे म्हणजे पौष्टिक अन्न खाऊन, व्यायाम करून मला फायदा होईल का? मी आजारी तर पडणार नाही ना? – अश्या धाटणीचा प्रश्न आहे. आणि “तरीही आजारी पडलो तर उगाच पौष्टिक खाण्यासाठी पैसे खर्च केले, उगाच एवढा व्यायाम केला” असे म्हणण्यासारखे आहे.

या हुशार भाषावैज्ञानिकांचा लेख केवळ चालत्या गाडीला खीळ कशी घालायची या हेतूने लिहिलेला आहे. पण आता खीळ घालायची वेळदेखील निघून गेली आहे याची त्यांना कल्पना नाही…त्यांचे घोर अज्ञान म्हणजे, उडीयाला हा दर्जा मिळाला याचा त्यांना पत्ताच नाही. त्यांचे म्हणजे वरातीमागून घोडे आणि नको तिकडे दौडे!

अभिजात दर्जासाठीच्या अहवालाला खोटा म्हणणे म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्र शासन खोटारडेपणा करत आहे असे म्हणणे होय.

bhasha 3 inmarathi

मी या लेखावर प्रतिक्रिया दिली कारण भाषावैज्ञानिकाने तमाम मराठीप्रेमींचा अपमानतर केलाच आहे शिवाय अशामुळे लाखोंच्या घरात जी अभिजात दर्जासाठी मागणी होत आहे त्याला १% देखील नुकसान होऊ नये असे मला वाटते.

यापुढे देखील मराठीच्या अभिजाततेचे अनेक पुरावे आहेत जे आम्ही वेळोवेळी सोशल मिडीयावर प्रसिद्ध करणार आहोत, त्यामुळे आम्हाला अनेकवेळा प्रतिवाद देखील करावाच लागेल.

पण आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की, टीकाकारांनी स्वतःचे ज्ञान जरा अद्ययावत करावे आणि उडिया भाषेसकट ६ भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे हे आपल्या आगामी लेखांमध्ये नमूद करावे, त्याचसोबत मधल्या काळात एकही ग्रंथ नाही म्हणून तक्रार न करता भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला भेट देऊन तिथे उपलब्ध असलेल्या अनेक अभिजात मराठी पोथ्यांचा अभ्यास करावा; म्हणजे पुढच्यावेळी लेख लिहिताना नवीन मुद्दे मिळतील.

मराठीला अभिजात दर्जा मिळू नये म्हणून नकारात्मकता पसरवणार्‍या कु्र्‍हाडीच्या या दांड्यांना शुभेच्छा!

बाकी या मराठीदिनाच्या दिवशी TWITTER करांनी #अभिजातमराठी ला दिलेल्या उदंड प्रतिसादाकरता शतशः आभार.

#अभिजातमराठीचे ट्वीटस आम्ही २० लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचवले असून ट्विट इम्प्रेशन्स १.३४ कोटी इतके आहेत.

संदर्भ :-

महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला प्रा. रंगनाथ पठारे समितीचा ‘अभिजात मराठी भाषा समिती अहवाल-२०१३’ या लेखासाठी प्रमुख संदर्भ म्हणून वापरला गेला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?