महाशिवरात्र – भगवान शंकर यांवरील “ही” कथा जीवनाला निश्चितच दिशा देऊ जाईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : योगेश देशपांडे

श्री गणेशाय नमः

भोळेनाथ आणि गणेश या पितापुत्रांची जोडी मला प्रचंड आवडते..

 

youtube

 

पुत्र म्हणजे बुद्धीची देवता, सर्व भक्तांची पापे पोटात घेतो, तर त्याचे पिता म्हणजे साक्षात देवाधिदेव, सर्व गुरूंचे महागुरू,

आमचे गुरू श्री बाबाजी त्यांचे गुरू महायोगी गुरू गोरक्षनाथ, त्यांचे गुरू मायावीदादा मच्छिंद्रनाथ, त्यांचे गुरू म्हणजे साक्षात महादेव.. या अर्थाने पण ते आमचे कुलगुरू होतात..

महादेव स्मशानवासी, विष कंठात धरून अंगाला भस्म लावून आपल्याच धुंदीत जगणारे दैवत.. उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थामधील लय अवस्था प्रकट करणारे दैवत..

त्यांच्या नावानेच आपण भस्म लावतो, ते भस्म आपल्याला सतत जाणीव करून देते की तू कितीही पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान कीर्तीच्या पाठीशी लाग, मायेच्या प्रभावात राहून जग पण अंती तुला भस्मच व्हायचं आहे..

तेव्हा तू संपूर्ण आयुष्यात जे जे कमावलं आहेस, त्यातलं काहीच घेऊन जाणार नाहीस, घेऊन जाणार आहेस ते म्हणजे तुझं कर्म, तेच सुधार, तेच शुद्ध ठेव म्हणजे अंताला तुला शिव भेटेल.

 

jokaba.in

 

नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण चातुर्मासमधील एक कथा आठवली..

आटपाट नगरात एक राजा होता, प्रचंड धार्मिक, प्रचंड यशस्वी पण किंचितसा गर्विष्ठ.. तो शिवभक्त होता..

एकदा त्याच्या मनात आलं, की गावातील शिवमंदिर संपूर्णपणे दुधाने भरून टाकावं.. त्याने दवंडी पिटवली, की उद्या सर्वानी आपापल्या घरातील सर्व दूध घेऊन शिवमंदिरात यावं, आणि त्यानं शिवलिंगाला अभिषेक घालावा. आपल्याला शिवमंदिर गाभारा दुधाने भरायचा आहे.

दुसऱ्या दिवशी सर्व नागरिक दुधाच्या हंड्या घेऊन आले.. प्रत्येकाने भरभरून दूध वाहिले पण गाभारा काही भरेना. राजघराण्यातील लोकांनी दूध वाहिले, खुद्द राजाने बरेच दूध वाहिले पण गाभारा किंचितही भरेना. राजाला गाभारा दुधाने भरण्याची युक्ती काही मिळेना.

 

sankara yatra

 

आता अजून काय करावं? याच विचारात असताना, मंदिरात एक अत्यंत गरीब आणि जक्ख म्हातारी आली. तिने एक लहानश्या तांब्यात दूध आणलं होतं.

ते बघून राजा कुत्सितपणे म्हणाला, इथं आम्ही घागरी भरून भरून दूध वाहील, तरीही गाभारा दुधाने भरला नाही, तुझ्या छोट्याशा तांब्यातील दुधाने गाभाऱ्याचा कोपरा तरी भरेल का म्हातारे?

म्हातारी म्हणाली, राजा तुझं बरोबर आहे. पण आताच माझ्या गायीला वासरू झालंय, त्याचं पोट भरल्यावर मी दूध काढते, घरात लहान लहान चार मुलं आहेत, त्यांचं पोट भरून जे शिल्लक आहे, तेच दूध मी आणलं.

 

 

तू सांगितल्याप्रमाणे मी दूध आणलं, त्याने गाभारा भरेल की भरणार नाही, हे महादेवालाच ठावूक..

अस म्हणत त्या म्हातारीने अत्यंत मनोभावे महादेवाची प्रार्थना करत ते दूध शिवलिंगाला वाहिलं, बघता बघता संपूर्ण गाभारा दुधाने भरून गेला. ते पाहून राजाचे गर्वहरण झालं आणि त्याने म्हातारीच्या पायावर मस्तक ठेवलं.

यातून नेमका काय बोध घ्यावा? बुद्धिजीवी, नास्तिक म्हणवून घेणारी जमात म्हणेल,

एकतर इतकं दूध शिवलिंगावर वाहायलाच कशाला हवं? देवाला काय गरज आहे? गरजू लोकांना द्यावं, परत म्हणतील, ही अंधश्रद्धा आहे, लहानश्या तांब्यातील दुधाने संपूर्ण गाभारा भरेल हेच मुळात तर्कविसंगत आहे. मग बोध काय घ्यावा?

श्रद्धाळू मनाने या कथेचे सार पाहावे. कुणालाही न दुखावता, प्रत्येकाचे पोट भरून, कोणावरही अन्याय न करता आणि शुद्ध सात्विक मनाने महादेवाला आपण जे अर्पण करू, तेच अनंतकोटींनी त्याला मिळतं.

थोडक्यात देव डामडौल किंवा झगमगाट यापेक्षा भावाचा भुकेला आहे. पवित्र आणि चांगल्या भावाने त्याला जे वाहायच आहे ते वहा. मगच ते पावेल. हेच यामाध्यमातून आपल्याला सांगायचं असत.

 

world vision

 

महाशिवरात्र म्हणजे रात्रभर देवाधिदेव महादेवाला आठवून महादेवाला अभिप्रेत अशी भावना मनात ठेवून, त्याची आळवणी करून त्याचा आशीर्वाद आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवून देण्याची प्रार्थना करण्याची रात्र.

सर्व लोकांना अत्यंत मनोभावे महादेवाची प्रार्थना करण्याची सद्बुद्धी होवो, आणि प्रत्येकाला जे जे हवे, त्यातलं  जे जे त्यांना, समाजाला, देशाला, धर्माला अनुकूल असेल ते ते त्यांना प्राप्त होवो. सर्वाना आपल्यातील शिव सापडो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना.

हर हर महादेव

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?