'चित्तथरारक, नेत्रदीपक '१० रोप-वे' सफरींबद्दल वाचा, आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्या!

चित्तथरारक, नेत्रदीपक ‘१० रोप-वे’ सफरींबद्दल वाचा, आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पर्यटनाला आपण सगळेच जातो, अशावेळी एखाद्या उंच ठिकाणी जाऊन सभोवतालचे विहंगम दृष्य पहाण्याची इच्छा करतो.

बरेचदा अशा उंच जागी जाण्यास रस्ता किंवा वाहन उपलब्ध नसल्यास, ट्रेक करणे हाच एकमेव पर्याय उरतो. पण मग ज्यांना ट्रेकिंग शक्यच नाही अशांनी काय करायचे?

त्यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी आता रोप-वे ची सोय करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नाही, तर जगात अनेक ठिकाणी अति उंचीवर सहज, कमी वेळात अनेक माणसांना एकाच वेळी घेऊन जाणारे रोप-वे आहेत.

ट्रॉली, गंडोला, रोटायर केबलकार, स्काय ट्राम्स, फुनिक्युलर अशा शब्दांनी रोप-वे प्रचलित आहेत.

तर आज आपण अशाच काही भव्य, उंच, लांबचे अंतर पार करणाऱ्या चित्तथरारक रोप-वेज बद्दल माहिती करुन घेऊ. सुरुवात अर्थातच आपल्या महाराष्ट्र आणि भारतापासून….

 

रायगड रोप-वे, कोकण, महाराष्ट्र

 

rope way inmarathi6
youtube.com

 

महाराष्ट्रात आदरणीय शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर जाण्यासाठीच नेहमीच सारेजण उत्सुक असतात.

काही कारणाने ट्रेकिंग शक्य नसलेल्यांसाठी आता काही किल्ल्यांवर प्रशासनाकडून रोप-वेची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. यापैकीच एक म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड.

रायगडावर रोप-वे सेवा १९९६ सालापासून सुरू आहे. गडाच्या पायथ्यापासून थेट वरपर्यंत ही सेवा आहे.

७६० मीटर लांबीच्या या रोप-वे तून प्रवास करताना आसपासच्या परिसरासह कोकणाचे विहंगम दर्शन होते. एकाला एक जोडलेल्या तीन ट्रॉली एकाचवेळी वर-खाली जाऊ शकतात त्यामुळे जास्त प्रवाशांना एकाच वेळी वाहून नेता येते.

 

गुवाहाटी शहर रोप-वे, पूर्वोत्तर भारत, आसाम राज्य

 

rope way inmarathi8
indiatvnews.com

 

गुवाहाटी शहराच्या जवळून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्र नदावर (याला नद असेच म्हणतात) आसाम सरकारने नुकताच एक रोप-वे बांधून पूर्ण केलाय.

नदीवर जसा ब्रीज बांधतात, तशीच याची बांधणी आहे. १.९ किलोमीटर लांबीचा हा रोप-वे असून, ब्रम्हपुत्र नद ओलांडून जातानाचे अतिशय विहंगम दृष्य पहायला मिळते. साडे आठ मिनिटांत हा प्रवास पूर्ण होतो.

याविषयी ट्विट करताना आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल म्हणतात, “स्थानिक लोकांच्या वेळेची बचत करतानाच राज्यातील पर्यटनालाही यातून गती दिली जाईल.”

 

औली केबल कार, जोशीमठ, उत्तराखंड

 

rope way inmarathi7
euttaranchal.com

 

उत्तराखंड राज्यातील जोशीमठपासून वर औली या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी इथे रोप-वेची सोय केली आहे. ४ किलोमीटर लांबीचा हा रोप-वे सध्या भारतातील सर्वाधिक लांब रोप-वे आहे.

औली हे ठिकाण १०,७०० फुट उंचीवर वसलेले असून, जोशीमठ ते औली या एका बाजुच्या प्रवासाला १५ मिनिटे लागतात. हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे येथे जाणारा रस्ता जवळपास बंद होतो त्यावेळी केवळ रोप-वे सेवेचा एकमेव पर्याय उपलब्ध असतो.

जसजसे वर जाऊ तसतसे आसपासच्या नंदा देवी रेंजमधल्या २३ ते २५ हजार फुटांवर असलेल्या हिमशिखरांचे दर्शन होते.

 

पिक टू पिक गंडोला, व्हिसलर, कॅनडा

 

rope way inmarathi
whistlerblackcomb.com

 

हा जगातील असा एकमेव रोप-वे आहे जो दोन पर्वतांची शिखरं जोडतो. एका शिखरावरुन थेट दुसरे शिखर. मध्ये कुठेही या रोप-वेला सपोर्ट नाही.

साडे चार किलोमीटर लांबीचा हा रोप-वे २००८ मध्ये पर्यटकांसाठी खुला झाला. जमिनीपासून ४३६ मीटर इतक्या उंचीवरुन हा प्रवास होतो.

 

विंग्ज ऑफ ततेव, अर्मेनिया

 

rope way inmarathi9
tatever.am

 

जगातील जे डबल ट्रॅक रोप-वेज आहेत त्यापैकी एक म्हणजे अर्मेनियातील विंग्ज ऑफ ततेव. ५.७ किलोमीटर लांबीचा हा रोप-वे २०१० साली सुरू झाला. एका केबलकारमध्ये ३० प्रवासी बसू शकतात.

 

टिटलिस रोटायर, एंगलबर्ग, माऊंट टिटलीस, स्वित्झर्लंड

 

rope way inmarathi1
titlis.ch

 

हा जगातील पहिला आणि एकमेव स्वत: भोवती फिरणारा गोंडोला आहे. म्हणूनच याला रोटायर केबलकार म्हणतात. माऊंट टिटलीस हा समुद्रसपाटीपासून ९९१० फुट उंचीवर आहे. एंगलबर्ग येथून निघाल्यानंतर वाटेत एके ठिकाणी ट्रॉली बदलावी लागते.

रोटायर केबलकारमध्ये एकाचवेळी ६० ते ७५ जण उभे राहू शकतात.

या प्रवासातील सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे पर्वतशिखरावर पोहोचण्यापूर्वी सर्वत्र पसरलेल्या आल्प्स पर्वतांतील हिमनद्या आणि ग्लेशिअर्स यांचे अप्रतिम दृष्य.

 

मी टेलिफेरिको, ले पाझ, बोलिव्हिया, लॅटिन अमेरिका

 

rope way inmarathi5
lapazlife.c

 

ले पाझ या शहरापासून उंचीवर असलेल्या एल. ऑल्टो या जिल्ह्यापर्यंत नागरिकांची सहज ने-आण करता यावी म्हणून स्थानिक प्रशासनाने या केबलकार मार्गाचे डिझाईन केले होते.

११ किलोमीटर लांबीचा हा गोंडोला २०१४ साली प्रवाशांसाठी सुरू झाला. सध्या जगातील सर्वाधिक उंच आणि लांब असा शहरी गोंडोला म्हणून याची ओळख आहे.

याच्या विलक्षण स्पीडमुळे एका तासात १८००० प्रवाशांची ने-आण करता येते. या प्रवासादरम्यान दिसणारे अँडिज पर्वतरांगांवरील बर्फ़ाच्छादित शिखरांचे अप्रतिम सौॆदर्य हीच याची विशेषता आहे.

 

शुगरलोफ माऊंटन गोंडोला, रियो दि जानेरियो, ब्राझिल

 

rope way inmarathi2
twistedsifter.com

 

शुगरलोफ पर्वतांच्या शिखरावर जाण्यासाठी १९१२ साली येथे केबलकारची सोय केली गेली. हा प्रवास चार-चार मिनिटांच्या दोन टप्प्यात विभागलेला आहे. एका ट्रॉलीत ६५ प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतात.

अनेक चित्रपट आणि टेलिफिल्म्समध्ये या गंडोलाला चित्रीत केले आहे. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या मुन्राकेर या बॉण्डपटाचा काही भाग या गंडोलामध्ये चित्रीत केला आहे.

ब्लेम इट ऑन लिसा या टीव्ही सिरिजमध्येही कि़डनॅपिंगच्या काही सिन्सचे चित्रीकरण याच गंडोलामध्ये केले आहे.

आत्तापर्यंत ३७ दशलक्षांहून अधिक नागरिकांनी यामधून प्रवास केला आहे.

 

बा ना हिल्स केबलकार, दा नांग, व्हिएतनाम

 

rope way inmarathi3
theculturetrip.com

 

पाच किलोमीटरहून अधिक लांब अशी ही केबलकार २०१३ मध्ये सुरू करण्यात आली. बा ना टेकड्यांच्या पायथ्यापासून सुरुवात करुन व्होंग नुग्वेटच्या शिखराला जोडणारा दुवा म्हणून या गंडोलाची ओळख आहे.

स्विडन, स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथून आणलेले विविध भाग जोडून याची निर्मिती करण्यात आली.

ज्या ठिकाणावरुन हा गोंडोला प्रस्थान करतो ते सगळ्यात मोठे स्थानक असून त्या संपूर्ण परिसराच्या इतिहासाचे एक म्युझियम म्हणून देखील या स्थानकाची ख्याती आहे.

 

स्कायलाईन क्विन्सटाऊन, न्यूझिलंड

 

rope way inmarathi4
wheelchairjimmy.com

 

दक्षिण गोलार्धातील सर्वात वेगवान गोंडोला अशी याची ओळख आहे. क्वीन्सटाउन शहारातून बॉब पर्वताच्या शिखरावर प्रवासी घेऊन जाण्यासाठी याचा वापर होतो.

समुद्रसपाटीपासून याची उंची ४५० मीटर आहे. १९६६ साली याचे बांधकाम सुरू झाले आणि १९६७मध्ये सर्वांसाठी हा गंडोला खुला झाला.

२०११ पासून, बॉब पर्वतांवर जे साहसी पर्यटक माऊंटन बाइकिंग करण्यास येतात, त्यांच्यासाठी बाईक फेरी कॅरिअर म्हणूनही याचा वापर होतो.

आपल्या दुचाकी या गंडोलामधून बॉब शिखरावर घेऊन जातात आणि तेथे पार्क करण्याची सोय आहे.

वरील माउंटन बाईक पार्क – आणि त्यांच्या दुचाकी चालविण्याकरिता या केबिनचा वापर न्यूझीलंडची पहिली गोंडोला दुचाकी लिफ्ट म्हणून केला जात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?