' स्क्रीनचा वापर - मुलांना वाढवण्याबाबत "गोंधळलेल्या" पालकांनी हे वाचायलाच हवं!

स्क्रीनचा वापर – मुलांना वाढवण्याबाबत “गोंधळलेल्या” पालकांनी हे वाचायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका : अनिता कहाते

===

सध्या मुलांना ऑनलाईन शाळा, क्लासेस याला पर्याय नसल्याने एकीकडे त्याचा वापर तर करायचा पण दुसरीकडे हे सगळं किती हानिकारक आहे याच्या चर्चा करायच्या असं चित्र दिसतंय.

पण या सगळ्याचा सारासार विचार केल्यास काय करता येऊ शकतं या विचारातून हा लेख जन्माला आला. हळूहळू स्क्रीन हवा की नको हा प्रश्नच बाद होणार आहे.

तुम्ही कुठल्याही प्रकारचे कलाकार असाल तर लोकांपर्यंत सर्वदूर पोहोचायला समाजमाध्यमं वापरण्याला पर्याय नाही. तुम्ही रचनाकार असाल तर असंख्य पर्याय निर्माण करून त्यातील एक निवडायची सोय म्हणून सॉफ्टवेअर/स्क्रीनला पर्याय नाही.

 

social media inmarathi
bristol-marketing.com

 

तुम्ही कुठल्याही वयोगटासाठी शिकवत असाल तर उपलब्ध माहितीतून नेमकं उपयुक्त साहित्य शोधणं, त्यायोगे संकल्पना किती नेमक्या आणि स्पष्ट पोहोचवता येतात हे मान्य करणं याला पर्याय नाही.

तुम्ही नवीन काही निर्माण करू पाहताय तर ते असंख्य वेळा करून बघणं, खोडणं, पुन्हा करणं यासाठीची साधनं वापरणं यालाही पर्याय नाही.

या सगळ्यापलीकडे आवडीनुसार आणि सवडीनुसार नवनवीन गोष्टी, भाषा, कला, शिकणं, शिकवणं, मनोरंजन, वाचन, संशोधन अशा भल्या मोठ्या यादीसाठी स्क्रीन वापरण्याशिवाय पर्याय नाही.

मग इथे ‘ज्याला पर्याय नाही त्याचा स्वीकार आणि त्यात जे माझ्या नियंत्रणात आहे ते करणं’ या साध्या, सरळ तत्त्वज्ञानाचा उपयोग करायला काय हरकत आहे?
आपण काय करू शकतो?

तर तंत्रस्नेही होण्यासाठी एक एक पाऊल पुढे नक्कीच टाकू शकतो. ते जमलं की मग प्रत्येक माध्यम वापरताना काय धोके आहेत हे स्वतः समजून घेऊन मुलांना समजेल असं सांगू/पटवून देवू शकतो.

काय करायचं, काय नाही यापेक्षा ते का करायचं, का नाही? कुठल्या वयात करायचं? त्यायोगे कुठली जबाबदारी येते ही सगळं छान पोहोचवू शकतो.

उदाहरणार्थ : तुम्हीच एक डमी प्रोफाइल बनवून मुलांशी ईमेल, फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे मैत्री करू शकता. त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारू शकता आणि मग काही काळाने “तो मीच” असं सांगून, असं करण्यात काय धोके आहेत ते समजावून सांगू शकता.

कुठल्याही वयाची व्यक्ती स्वतःला तरुण भासवू शकते, खोटं प्रोफाइल करून तुमची किती विविध प्रकारे फसवणूक होऊ शकते, खोट्या लिंक्स पाठवून तुमची माहिती, फोटो चोरले जाऊ शकतात, खरे चोरटे/भामटे असतात तसेच ऑनलाईनही असतात हेही दाखवून देऊ शकता.

आभासी मैत्री ही ‘अतिशय मोकळ्या’ पातळीवर नेऊन ठेवू शकते कारण त्यात व्यक्ती समोर उपस्थित/दिसत नसते हेही सोदाहरण सांगू शकता.

 

virtual friendship inmarathi
therampageonline.com

 

स्क्रीनसमोर बसून होणाऱ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यापासून सुटका हवी तर रोज व्यायामाला १ तास देणे आणि दिवसभरात स्क्रीनसमोर असताना मधून अधून करायचे असंख्य व्यायाम नेटवर उपलब्ध आहेत, ते बघून आपण करतो का हा खरा प्रश्न आहे.

डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी डोळे सर्व दिशेत फिरवणे, झाडांकडे बघणे, दूरवर आणि मग जवळ बघणे, डोळ्यात थंडावा देणारे नैसर्गिक थेंब घालणे, डोळ्यांवर थंड दूध, पाणी याच्या पट्ट्या ठेवणे असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करतो का?

नसल्यास स्क्रीनमुळे डोळे दुखतात याची रडगाणी आणि स्क्रीनचा वापर दोन्हीही चालूच राहील हे आपण जाणतो का? फक्त स्क्रीनसमोर बसल्याने चष्मा लागू शकतो का?

हे डोळ्यांच्या डॉक्टरना विचारल्यास विविध उत्तरं मिळतील पण तो टाळायचा कसा किंवा लागलाच तर काय काळजी घ्यायची हे आपण समजून घेतो का?

डोकेदुखी फक्त स्क्रीनमुळे होते की अति आणि चुकीच्या खाण्यामुळे, व्यायाम/हालचाल न केल्याने, खाल्लेलं न पचल्याने याचा कोणी विचारच करत नाही अशी सद्य परिस्थिती आहे.

गेली १५/२० वर्ष स्क्रीन समोर विविध कामांसाठी रोज जवळपास किमान ८ ते १० तास बसूनही इतर विकार तर सोडाच चष्माही नसलेले कितीतरी जण माझ्या आजूबाजूला आहेत, तुमच्याही असतील.

 

indian girl on mobile inmarathi
entertales.com

 

त्यांच्याशी बोलून ते करतात ते सगळं किती जण करतात हा खरं तर विचार करायचा मुद्दा आहे.

स्क्रीनचा वापर किती वेळ आणि कशासाठी याची कुटुंब पातळीवर नियमावली करणे आणि सर्वानी ती पाळणे ही शिस्त गरजेची आहे. स्क्रीन वापरताना सर्वांसमक्ष वापरला पाहिजे/कोणी आजुबाजुला असल्यास लपवाछपवी करावी लागेल असं नको यावर एकमत आणि ठामपणा हवा.

याला ‘स्पेस देणं’ असं गोंडस नाव देऊन गुपचूप काही करता येईल असं वातावरण देणं ही गडबड आहे.

सध्या मला आजूबाजूला स्क्रीन वापराबाबत साशंक पालक दिसतात त्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की ते स्क्रीन वापराबाबत गोंधळलेले पालक नसून एकूणच मूल वाढवण्याबाबत गोंधळलेले आहेत.

स्वतः ची प्रत्येक गोष्ट समाजमाध्यमांवर शेअर करणारे; पण मुलं मात्र शाळेच्या ऑनलाईन वर्गांसाठी सुद्धा स्क्रीनसमोर नको असा आग्रह धरणारे पालक आहेत.

एकीकडे मूल जन्माला येतानाच स्वतंत्र व्यक्ती म्हणून येतं असं मानून, तसंच स्वातंत्र्य देवून वाढवणारे पालक; चुकांमधून मूल उत्तम शिकतं यावर ठाम विश्वास असणारे पालक, इंटरनेटचा वापर करतानाचे धोके माहीत असल्याने ‘आता बंधन कसं घालू?’ या विचाराने गोंधळलेले दिसतात.

आत्तापर्यंत कायम तुला हवं तसं कर हे स्वातंत्र्य देणारे पालक हवं तसं करण्यातली जबाबदारी नीट पोहोचवू शकले नसतील, मुलं ती नीट समजू/पेलू शकत नसतील तर त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न ही गंभीर बाब आहे.

 

indian parents inmarathi
varnam.my

 

“त्याचं खापर स्क्रीनवर नाही तर तुमच्यावरच फोडा” हे त्यांना कोण सांगणार? अशाही पालकांनी हतबल न होता आधी स्वतः वापरा आणि मग मुलांशी बोला हे धोरण अंगीकारलं तर नक्कीच सुवर्णमध्य साधता येईल. माध्यमांशी मैत्री केल्याशिवाय त्यातल्या खाचा खोचा कशा कळतील?

माझ्या ज्या मैत्रिणींनी हे समजून घेतलं त्या आत्ता आपापल्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करत आहेत. त्यायोगे दूरवर, सातासमुद्रापार पोहोचत आहेत.

लॉकडाऊनकडे तंत्रज्ञान शिकण्याची आणि वापरण्याची सुसंधी म्हणून बघणाऱ्या सख्या स्वस्थ आणि आनंदी आहेत आणि इतर काही जणी तंत्रज्ञान, स्क्रीन, समाजमाध्यमं कसं वाईट, त्यात किती धोके वगैरेंची चर्चा याच माध्यमातूनच करत आहेत.

आरसा तोच चेहरा मात्र वेगळा. आपण कुठला चेहरा शोधायचा त्यावर सगळं ठरतं.

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?