'भारतीय फुटबॉल विश्वातला एक दुर्लक्षित तारा - जो चायनीज वॉल ह्या नावाने ओळखला जायचा! 

भारतीय फुटबॉल विश्वातला एक दुर्लक्षित तारा – जो चायनीज वॉल ह्या नावाने ओळखला जायचा! 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खेळ म्हटलं की क्रिकेट असं समीकरण भारतासाठी अत्यंत योग्य ठरेल. गल्लोगल्ली क्रिकेटचे सामने रंगलेले आपण पाहतो. फक्त मैदानावरच नाही, तर इमारतींच्या गच्चीवर सुद्धा क्रिकेटचे सामने रंगतात.

विराट, रोहित, बुमराह, चहल एवढंच काय, तर नुकताच निवृत्त झालेला धोनी ही सारी मंडळी रिअल लाईफ हिरोज ठरतात.

क्रिकेट भारतीयांच्या रक्तामध्ये इतकं भिनलंय, की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, हे सुद्धा विस्मरणात गेल्यासारखं वाटतं. मग तिथे फुटबॉलची काय गत!

 

football inmarathi
ommcomnews.com

 

गोवा, कोलकाता वगैरे अपवाद वगळता भारतात फुटबॉल खेळणारी तरुणाई दिसणं विरळच.. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके फुटबॉलचे चाहते भारतात पाहायला मिळतात. त्यातही बरेचसे फुटबॉल प्रेमी परदेशातील फुटबॉल लीग सामने आवडीने बघतात.

माझं मँचेस्टर युनायटेड, आपली चेल्सी, आमच्या बार्सेलोनाने कसला कमाल गोल केलाय वगैरे वाक्य कानावर पडतात.

मात्र ‘भारतीय फुटबॉल’ विषयी भारतीयांनाच फार काही ठाऊक नाही, ही सत्य परिस्थिती आहे. बायचुंग भुतिया आणि सुनील छेत्री ही दोन नावं माहित असतात. मात्र इतर भारतीय फुटबॉलर्सची नावं सांगणं सुद्धा अनेकांच्या आवाक्याबाहेरचं आहे.

आज सोशल मीडियाचा एवढा प्रभाव असताना आणि दरवर्षी ‘इंडियन सुपर लीग’सारखी फुटबॉलची स्पर्धा भारतात खेळवली जात असताना सुद्धा ही स्थिती आहे. त्यामुळे भूतकाळातील भारतीय फुटबॉल खळाडूंबद्दल फारशी माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

भारतीय फुटबॉल जगतात, एक अवलिया प्रसिद्ध होता… त्याचं नाव गोष्ठ पाल!

‘पाल नेमका कोण होता?’ असं विचाराल, तर गोष्ठ पाल आहे पहिल्या भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार!

सध्या बांगलादेशात असलेल्या फरीदपूर येथे गोष्ठ पाल यांचा जन्म झाला. कलकत्त्यात वाढलेल्या पाल यांनी वयाच्या ११व्या वर्षीच स्पर्धात्मक फ़ुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. कुमारतुली या संघाकडून त्यांनी स्पर्धात्मक सामने खेळायला सुरुवात केली होती.

उत्तम खेळाडू असणाऱ्या पाल यांनी अवघ्या ५ वर्षांत, वयाच्या १६व्या वर्षी मोहन बागान या प्रतिष्ठित संघात जागा पटकावली.

त्यांचा खेळ उत्तम होता. त्यांच्या खेळाची छाप सर्वांवर पडत होती. त्यांच्या खेळण्यातील चुणूक मोहन बागानच्या तत्कालीन संघातील दोन दमदार खेळाडूंना जाणवली होती. म्हणूनच डलहौसी विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरूनही राजन सेन आणि भूती सुकूल यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.

सुकूल यांनी तर त्यांच्यासाठी स्वतःची फिल्डवरील जागा बदलण्याची तयारी दाखवली.

 

gostha pal inmarathi
english.kolkata24*7.com

 

मात्र मोहन बागानकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर एक नाट्यमय प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. आईने लग्नाची गळ घातल्यामुळे, पुष्पा कुंदू यांच्याशी त्यांनी लग्न केलं. हे सगळं अगदीच अचानक आणि आईच्या मर्जीने घडलं.

‘संघसहकाऱ्यांना आपण लग्नाला बोलवू शकलो नाही’ याची खंत वाटतं असल्याने त्यांनी क्लबमध्ये जाणं बंद केलं.

मात्र क्लबचे सेक्रेटरी मेजर सुभेदार बोस यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी पाल यांना बोलवून घेतलं. दरम्यानच्या काळात मोहन बागान संघाने आयएफए शिल्ड जिंकली होती. संघातील खेळाडूंना देण्यात आलेल्या बॅजेसपैकी एक बॅज बोस यांनी राखून ठेवला होता.

लग्न झाल्याबद्दल गोष्ठ यांचं अभिनंदन करून, त्यांना रॉयल बंगाल टायगर असलेला खास बॅज दिला. त्यांचा योग्य तो सन्मान केला.

मोहन बागान या संघामुळे मला फार मानसन्मान मिळाला. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला असा मानसन्मान इतर कुठेही मिळाला नसता. असं गोष्ठ पाल नेहमी म्हणत असत.

मात्र मोहन बागानसाठी त्यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भक्कम बचावाच्या जोरावर मोहन बागानची कामगिरी अधिकाधिक उत्तम होत गेली. १९१४ साली कलकत्ता लीगच्या बी डिविजनचं जेतेपद मिळवलं. विभागून मिळालेल्या या जेतेपदामुळे त्यांना फर्स्ट डिविजनमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

१९१५ साली चौथ्या स्थानावर आणि १९१६च्या स्पर्धेत उपविजेतेपदावर मोहन बागानने नाव कोरलं. यात पाल यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांचा हा खेळ उत्तरोत्तर उंचावतच गेला. त्याकाळातील भारतीय संघात ते सर्वोत्तम डिफेंडर म्हणून प्रसिद्ध झाले.

त्यांचा हा बचाव इतका जबरदस्त असे, की त्यांना ‘चायनीज वॉल’ असं नाव पडलं होतं.

 

gostha pal inmarathi 2
gramho.com

 

ज्या काळात आक्रमक खेळ हीच भारतीय फुटबॉलसाठी महत्त्वाची रणनीती मानली जात होती; त्याकाळात अप्रतिम बचावाचा नमुना त्यांनी सादर केला.

त्यांच्या उत्तम खेळाचं फलित म्हणून १९२४ साली भारतीय संघाच्या कप्तानपदाची माळ सुद्धा त्यांच्या गळ्यात पडली. अनवाणी पायांनी खेळणारे पाल त्यानंतर सुद्धा त्यांचा करिष्मा दाखवत राहिले. १९३० सालानंतर त्यांच्या खेळण्यावर वयाचा परिणाम जाणवू लागला. वयोमानाने त्यांचा खेळ मंदावला.

असं असूनही, प्रेक्षकांवर त्यांचा करिष्मा कायम होता. त्यांचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी गर्दी करत असत.१९३३मध्ये त्यांनी श्रीलंका दौरा केला. हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा होता. अखेर १९३५मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली.

स्पर्धात्मक क्रिकेट सुद्धा खेळत असत पाल

फुटबॉलच्या बरोबरीने स्पर्धात्मक क्रिकेट सुद्धा पाल खेळात असत. त्यांच्या या क्रिकेट कारकिर्दीत एक गमतीशीर प्रसंग घडला होता. मैदानावर त्यांनी केलेला सत्याग्रह लोकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. १९२८ साली कलकत्ता क्रिकेट क्लब विरुद्ध झालेल्या या सामन्यातील हा प्रसंग!

सामना सुरु होण्याआधी अवघा थोडावेळ उरलेला असताना पाल मैदानावर पोचले. म्हणून त्यांनी धोतर न बदलण्याचा निर्णय घेतला. धोतर आणि शर्ट घालून ते सामना खेळायला उतरले.

अवघ्या ४ चेंडूंमध्ये २ गडी बाद करून त्यांनी उत्तम सुरुवात केली. असं घडल्यामुळे कलकत्ता क्रिकेट क्लबच्या संघाने त्यांच्या धोतर नेसण्यावर आक्षेप घेतला.

असं असताना त्यांनी धोतर बदलणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. संघाने सुद्धा त्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला. हा सामना तिथेच थांबवण्यात आला. एवढंच नाही, तर त्यानंतर तब्बल सहा वर्षे त्यांनी कलकत्ता क्रिकेट क्लबसोबत एकही सामना खेळला नाही.

हाच सर्वात मोठा पुरस्कार..

१९६२ साली गोष्ठ पाल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

 

gostha pal padmashree inmarathi

 

१९८४ साली कलकत्त्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ पुतळा सुद्धा उभारण्यात आला आहे. मात्र याहून मोठा असा एक पुरस्कार त्यांना मिळाला.

घडलं असं होतं, की १९४८ साली त्यांची आई त्यांना भेटायला येणार होती. या प्रवासाला सुरुवात करत असताना त्यांना तपासणीसाठी थांबवण्यात आलं. त्यांच्या सामानाची तपासणी करत असताना, पोलिसांना एक फोटो सापडला. तो फोटो दिसल्यावर मात्र पोलीस अवाक झाले.

गोष्ठ पाल यांचा फोटो पाहून, आणि समोर उभी असणारी स्त्री त्यांची आई आहे हे समजल्यावर पोलिसांनी त्यांना संपूर्ण सहकार्य केलं. त्यांचा प्रवास उत्तमरीत्या पार पडावा यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली.

निवृत्तीनंतर इतका कालावधी उलटून गेला असूनही, त्यांना मिळालेला मान, हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार ठरला, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

या घटनेनंतर ‘पोलीस सुद्धा तुला ओळखतात. तू नेमकं काय करतोस?’ असा प्रश्न त्यांच्या आईने त्यांना केला. प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘काही नाही फक्त चेंडूला लाथ मारतो’ असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं. यातून त्यांचा नम्र स्वभाव दिसून येतो.

अर्थात, स्वतःला सामान्य माणूस म्हणवणारा हा खेळाडू, एक उत्कृष्ट बचावपटू आणि भारतीय फुटबॉल विश्वातील एक झगमगता तारा होता, हे मात्र नक्की!!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?