' पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा! – InMarathi

पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सण-उत्सव आणि समारंभ यांचे भारतीय संस्कृतीशी फार म्हणजे फारच पुरातन नाते आहे.

अगदी प्राचीन काळापासून ते अर्वाचिन काळापर्यंत वर्षभर ऋतुमानानुसार आपली संस्कृती ही विविध सण आणि उत्सवांशी संबंधित आहे. त्यामुळे भारतीय समाजही उत्सवप्रिय असल्याचे दाखले फार पुरातन काळापासून आपल्याकडे उपलब्ध आहेत.

हे सर्व इथे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेला गणेशोत्सव.. यानिमित्ताने या उत्सवाच्या इतिहासात थोडेसे डोकावून पाहूया..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे सर्वांनाच माहित असते, पण पुण्यातील गणेशोत्सवाचा इतिहास त्या ही पेक्षा खुप जुना आहे हे तितकेसे ठाऊक नसते.

 

lokmanya tilak inmarathi1
asianvoice.com

 

यानिमित्ताने पुण्यातील गणेशोत्सव आणि जे मानाचे पाच गणपती आहेत, त्यांचा काय इतिहास आहे ते थोडक्यात जाणून घेऊ.

मध्ययुगात संपूर्ण हिंदूस्थानात ज्या मराठी सत्तेचा दबदबा होता, त्याचे प्रमुख कारभारी पेशवे. त्यांचं आराध्यदैवत गणपती.

शनिवार वाड्यातील गणेश महाल आणि एका इंग्रज चित्रकाराने काढलेलं पेशव्यांच्या दरबाराचं जे एकमेव पेंटिंग उपलब्ध आहे, त्यातील गणपतीची मूर्ती अगदी स्पष्टपणे दिसते.

ऐतिहासिक नोंदींनुसार थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपले शेवटचे काही दिवस हे थेऊरच्या चिंतामणीच्या पायाशी व्यतीत केले असे उपलब्ध आहे.

पेशवे अर्थातच पुणे. त्यामुळे पेशवाईच्या काळातच पुण्यात शनिवारवाड्यात गणपती उत्सव साजरा होत होता.

पुढे मग सवाई माधवराव पेशव्यांनी या उत्सवाला मोठे रूप दिले. जे नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या कामात आणखी व्यापक केले ते आजतागायत सुरू आहे.

बिपीनचंद्र पाल यांनी या उत्सवाविषयी म्हटले होते की, टिळकांचा हा उत्सव केवळ धार्मिक अनुष्ठान नसून स्वदेश सेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आहे.

तत्पुर्वीच तुर्कस्थानापासून हिंदुस्थानापर्यंत आणि हिंदुस्थान ते पूर्व आशियायी देशांपासून थेट जपान पर्यंत गणपती स्थानापन्न झालेला होता. जपान मध्ये गणपतीला ‘कांगि-तेन’ म्हणतात.

 

ganpati in japan inmarathi
livehistoryindia.com

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ सालापासून सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची ही परंपरा आज सुमारे १२७ वर्ष सातत्याने सुरू आहे.

आजच्या घडीला भारतात सर्वदूर साजरा केला जाणारा हा उत्सव पुण्यात तर विशेष प्रिय आणि मानाचा सुद्धा.. पण पुण्यात फार पूर्वीपासून काही गणपतींना विशेष मान होता आणि आजही आहे.

मेळ्यांचे कार्यक्रम…

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रारंभीच्या काळात मंडळांच्या गणपतींसमोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत.

शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग अशा कार्यक्रमांचा यात समावेश असे.

जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन्मित्र मेळा हे तत्कालीन प्रसिद्ध मेळे मानले जात होते. देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे पुण्यात संध्याकाळच्या वेळी होत असत.

पाच मानाचे गणपती…

 

pune manache ganpati inmarathi
medium.com

 

आपल्याकडील परंपरेनुसार, प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते तसेच ते पुण्याचेही आहे. कसबापेठेचा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. त्यामुळे याचा मान पहिला. त्यासह अन्य चार गणपती अग्रस्थानी आहेत.

तांबडी जोगेश्वरी हा दुसरा, श्री गुरुजी तालिम तिसरा, तुळशीबागेचा चौथा आणि केसरीवाड्याचा गणपती हा मानाचा पाचवा गणपती.

मानाच्या गणपतींचा थोडक्यात इतिहास

कसबा पेठ

 

kasaba peth ganpati inmarathi

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा पेठेचा गणपती प्रसिद्ध आहे.

येथील मूळ मूर्ती स्वयंभू असून प्रारंभीच्या काळात ती केवळ तांदळाएवढी होती. आाता सातत्याने शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडे तीन फुट उंचीची झाली आहे असे सांगितले जाते.

शहाजी राजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला, त्यावेळी जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करुन इथं दगडी गाभारा बांधला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला निघण्यापूर्वी नेहमी या गणेशाचे दर्शन घेऊनच निघत असत.

दरवर्षी याच गणपतीपासून पुण्यातील सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुकीचा प्रारंभ होत असतो.

मानाचा गणपती असुनही दरवर्षी अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि कोणताही डामडौल, गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात या मंडळाचा हातखंडा आहे. साधी पण नेमकी आणि नीट नेटकी सजावट हे देखील याचं खास वैशिष्ट्य.

तांबडी जोगेश्वरी

 

tabadi jogeshwari inmarathi
latestly.com

 

हा मानाचा दुसरा गणपती. हे देऊळ मूळचे दुर्गादेवीचे असून ते पंधराव्या शतकात बांधले असल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात.

इथं दुर्गादेवीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, जी स्वयंभू असून तिला ग्रामदेवीचा मान आहे. सोबतच गणपतीची मूर्ती आहे.

इथल्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं आणि दरवर्षी उत्सवात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. याच्या उत्सवाची सुरुवातही १८९३ साली कसबा गणपती सोबतच झाली.

बुधवार पेठेतील या गणेशोत्सवास श्री. भाऊ बेंद्रे यांनी प्रारंभ केला. इथल्या पितळी देव्हाऱ्यात गणेशाची स्थापना केली जाते, तसेच चार युगांतील बाप्पांची रुपं इथं पहायला मिळतात.

गुरुजी तालीम मंडळ

 

guruji talim mandal inmarathi
youtube.com

 

श्री गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखला जातो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून याची ओळख आहे.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी सुमारे सहा वर्षे म्हणजेच १८८७ सालापासून या गणेशाच्या उत्सवास सुरुवात झाली. भिकू शिंदे, उस्ताद नलबान, नानासाहेब खासगीवाले आणि शेख कासम वल्लाद यांनी मिळून या उत्सवाचा पाया रचला.

सुरुवातीला येथे असलेल्या तालमीतच गणपतीची प्रतिष्ठापना केली जायची, मात्र आता ती तालीमच अस्तित्त्वात नाही.

 

श्री तुळशीबाग गणपती

 

tulshibag ganpati inmarathi
esakal.com

 

पुण्यातील सुप्रसिद्ध आणि सातासमुद्रापार ज्याची ख्याती आहे, अशा तुळशीबागेचा गणपती मानाचा चौथा गणपती.

पुण्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी दरवर्षी सर्वोत्कृष्ट देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा तुळशीबागेचा गणपती.

येथील प्रसिद्ध दीक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या ठिकाणी मूर्ती स्थापन करुन उत्सवाची सुरुवात केली.

१३ फूट उंचीची ही मूर्ती पूर्णत: फायबरची आहे. सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री. डी. एस. खटावकरांनी अनेक वर्षे या गणपतीची आरास करण्याचा मान मिळवलेला आहे.

श्री. केसरीवाडा गणपती

 

kesarivada ganpati inmarathi
punetourism.co.in

 

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे हा केसरीवाड्याचा.

टिळकांच्या केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ सालापासून सुरू झाला. त्यावेळी टिळक विंचूरकर वाड्यात राहात होते. मात्र १९०५ पासून टिळक वाड्यातच केसरी संस्थेचा गणेशोत्सव होऊ लागला.

उत्सवादरम्यान इथं टिळकांची व्याख्याने नियमित होत असत. आजही याची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. १९९८ मध्ये येथील गणेश मूर्ती ही संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तयार करण्यात आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?