' पिस्ता हे फक्त श्रीमंतांचं खाद्य नाहीये…त्याचे हे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच! – InMarathi

पिस्ता हे फक्त श्रीमंतांचं खाद्य नाहीये…त्याचे हे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुका मेवा खायला कोणाला आवडत नाही.. असं सहसा होतच नाही. सुका मेवा न आवडणारा माणूस सापडणं तसं विरळाच.

काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, बेदाणे, मनुका, अक्रोड अशा गोष्टी आपण नुसत्याही खातो आणि विविध गोड पदार्थांत घालूनही खातो. खीर, शिरा, बासुंदी, श्रीखंड अशा पदार्थात सुका मेवा घातला की त्याची लज्जतच न्यारी.

आता काही जण म्हणतात की सुका मेवा उष्ण असतो, त्याचे अतिसेवन बरे नव्हे. पण मंडळी तसं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.

मात्र प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात खाल्ली तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.

या सुक्या मेव्याच्या पंक्तीमध्ये असा एक मेवा आहे ज्याचा आपल्या आहारात जर योग्य प्रमाणात वापर झाला तर आपलं आयुष्य नक्कीच निरोगी राहील.

 

dry fruits inmarathi
jabad.org.ar

 

जेणेकरुन आपल्याला सतत डॉक्टरांचे सल्ले घेत महागडी औषधे – गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही. हा पदार्थ आहे कोणता ते जाणून घेऊया सोबतच त्याचे काय आणि किती फायदे आहेत ते ही पाहुया.

काजू आणि बदाम यांच्यानंतर मानाचं तिसरं नाव म्हणजे पिस्ता. काहीसा हिरवट, पिवळसर आणि किरमीजी रंगाची झाक असणारा हा छोटासा पिस्ता एका टणक शेलमध्ये बंद असतो.

वापराच्या आधी ते कवच फोडून पिस्ता वेगळा केला जातो. याला स्वतःची म्हणावी अशी खास चव नाही, मात्र दुसऱ्या एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्यात याचा हातखंडा आहे.

आता पाहुया आपल्या आरोग्यासाठी हा कसा सर्वोत्तम गुणकारी आहे.

पिस्ताशियाच्या झाडाच्या या खाद्य बियांमध्ये म्हणजेच पिस्त्यामध्ये अत्यंत निरोगी फॅट्स, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात.

सोबतच वजन कमी करणे, आतड्यांचे आरोग्य आणि हृदयाचे बहुतांश विकार टाळता येण्यासाठी आवश्यक ते सर्व पौष्टीक घटक यात समाविष्ट असतात.

 

pista inmarathi
parenting.firstcry.com

 

याच्या सेवनाने पचनासंबंधीचे आजार, कॅन्सर तसेच रक्तदाबासारखा आजार नियंत्रीत होण्यास मदत होते. सोबतच शरीरातील अनावश्यक कोलेस्टेरॉल नष्ट होवून रक्तवाहिन्या, धमन्या आणि हृदयविकारांसारख्या व्याधी आपल्यापासून दूर राहतात.

पिस्ता खाल्ल्याने डोळ्यांचे आजारही सहज टाळता येतात. पिस्ता सेवनाचे काही अत्यंत महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे –

१ – पोषक तत्त्वांनी परिपूर्ण :

पिस्त्यामध्ये आरोग्यास आवश्यक पोषक तत्त्वे परिपूर्ण असतात. यात प्रामुख्याने व्हिटॅमिन बी ६ चे प्रमाण सर्वाधिक असल्याने ३ फायदे होतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादीत ठेवता येते, हिमोग्लोबिनची योग्य पातळी राखण्यास मदत होते आणि लाल पेशींमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित राखणे सहज शक्य होते.

आवश्यक घटक त्यातील प्रमाणासह – कॅलरी १५९, कार्ब ८ ग्रॅम, फायबर ३ ग्रॅम, प्रथिने ६ ग्रॅम, चरबी १३ ग्रॅम (९०% असंतृप्त चरबी), पोटॅशियम ६%, फॉस्फरस ११%, व्हिटॅमिन बी-6 २८%, थायमिन २१ %,  तांबे ४१%, मॅंगनीज १५%

२ – अँटीऑक्सिडेंट्स चे भरपूर प्रमाण :

पिस्तामध्ये अन्य सुका मेव्याच्या तुलनेत अँटीऑक्सिडेंट्स चे प्रमाण सर्वाधिक असते असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. एका अभ्यासानुसार, सलग एक आठवडा काही जणांना रोज किमान २ पिस्ते खाऊ घातले आणि काहींना अजिबात पिस्ता खाऊ दिला नाही.

 

 

pista 2 inmarathi
health.clevelandclinic.org

 

आठवड्यानंतर असे आढळले की, ज्या सहभागींनी दररोज दोन पिस्ते खाल्ले त्यांच्यात लुटेन आणि ओसी – टोकॉफेरॉलचे प्रमाण जास्त होते. त्या तुलनेत ज्यांनी पिस्ते खाल्लेच नाहीत त्यांच्यात हे प्रमाण बरेच कमी असल्याचे दिसले.

पिस्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सपैकी दोन गट हे सर्वाधिक सक्रीय असतात. पॉलीफेनोल्स आणि टोकोफेरॉल. यामुळे कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयरोगापासून आपला बचाव होऊ शकतो.

३ – वजन कमी करण्यास उपयुक्त :

पिस्तामध्ये फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते ज्यामुळे त्याचे कमी सेवन केले तरी लवकर पोट भरते आणि अति खाण्यावर आपोआपच प्रतिबंध येतो. त्यातील फायबर आपल्या चयापचय क्रियेला चालना देण्यासही मदत करते.

योग्य प्रमाणात पिस्त्याचे सेवन केल्याने आपले वजन नियंत्रित करण्यास किती उपयोग होतो हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अभ्यासपूर्ण रिसर्च करण्यात आले आहेत.

त्यातून आलेले निष्कर्ष हे फारच सकारात्मक आहेत.

१२ आठवड्यात वजन कमी करणे या अभ्यासानुसार दुपारच्या नाश्त्यासाठी ५३ ग्रॅम पिस्ते ज्यांनी सेवन केले त्यांच्या बी.एम.आय. मध्ये म्हणजेच बॉडी मास इंडेक्स मध्ये दोनदा घट झाल्याचे दिसले.

दुसरीकडे त्याचवेळी काहींना ५६ ग्रॅम प्रिट्झेल खायला दिले होते, त्यांच्यात मात्र फार काही फरक दिसला नाही.

आणखी एका अभ्यासानुसार साल काढून खाल्लेले पिस्ते आणि सालासकट खाल्लेल्या पिस्त्यांमुळे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. सालासकट पिस्ता खाल्ल्यास तो जास्त परिणामकारक दिसल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे.

४ – आतडे निरोगी राखण्यास उपयुक्त बॅक्टेरियांची वाढ :

अन्न जठरातून आतड्याकडे जाताना जी पचनाची प्रक्रिया होते त्यात सर्वाधिक मदत होते ती फायबरची.

चांगल्या प्रतिचे फायबर हे पिस्त्याच्या माध्यमातून मिळत असल्याने तसेच आतड्यात उपयुक्त अशा बॅक्टेरिया म्हणजेच जिवाणूंची वाढ करण्यास या फायबरचा उपयोग होतो.

५ – रक्त वाहिन्या, रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर गुणकारी :

 

blood pressure inmarathi
diabetes.co.uk

 

पिस्त्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण सर्वाधिक असल्याने कोलेस्टेरॉलची योग्य पातळी राखण्यास मोठी मदत होते. सहाजिकच हार्ट अटॅक येण्याची संभावना बऱ्याच प्रमाणात कमी होते.

यातील मोलेक्युले आणि व्हिटामिन बी – ६ च्या योग्य प्रमाणामुळे रक्तातील लाल पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन खेळता राहतो परिणामी रक्तवाहिन्यांनाही त्याचा लाभ होतो. जेणेकरुन रक्तदाबासारखे आजार होण्यास मज्जाव होतो.

यात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे असले तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने पिस्ता खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

एका १२ आठवड्यांच्या अभ्यासानुसार दररोज २५ ग्रॅम पिस्ते सेवन करुन सकाळी उपाशीपोटी केलेल्या फास्टिंग ब्लड शुगरच्या अहवालात ९ टक्क्यांची घट दिसून आली.

६ – डोळे निरोगी ठेवण्यास मदत :

पिस्त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात असणारे व्हिटॅमिन ई हे डोळ्यांच्या आरोग्यास प्रोत्साहित करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. यात कॅरोटीनोईड्स देखील असतात जे डोळ्यांचे मोतीबिंदूपासून संरक्षण करतात.

यातील लुटेन आणि झेक्सॅन्थिन ही दोन अँटिऑक्सिडेंट आपल्या डोळ्यांसाठी उत्कृष्ट मानली जातात.

७ – पिस्त्याचे दुध पिणे सर्वाधिक आरोग्यवर्धक :

 

pista milk inmarathi
foodofinternet.com

 

आपण वरती पाहिलेला सर्व गूण संपन्न असा पिस्ता. याचे दूध पिणे हे आपल्या शरिरास सर्वात लाभदायक ठरते. हे दूध कॅरोटीनोईड्स आणि फायटोस्टेरॉल सारख्या अँटिऑक्सिडेंट पोषक द्रव्यांसह अतिशय समृद्ध असते.

यामुळे केवळ एंटीऑक्सिडेंट्सच नव्हे तर अँटीकँसर आणि एक उत्तम रिज्युविनेटर म्हणून या दूधाचा शरिराला उपयोग होतो.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जे लॅक्टोज इंटॉलरन्ट असतात म्हणजे गाय किंवा म्हशीच्या दुधाची अँलर्जी असणे. अशांसाठी देखील पिस्त्याचे दूध हे एक वरदान आहे.

कमीत कमी वेळात आणि अगदी मोजके पदार्थ वापरून घरच्या घरी अगदी सहजपणे हे दूध तयार करता येते.

तर मंडळी आता तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात या पिस्त्याचा वापर करण्यास सुरुवात करू शकता. अर्थात कोणत्याही पदार्थाचे कसे, कधी आणि किती मात्रेत सेवन करायचे हे आपल्या तज्ज डॉक्टरांना विचारुनच करावे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?