'वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ।। : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १०

वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ।। : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १०

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ९

===

कालचा तुकोबांच्या कीर्तनाचा माहोल वेगळा होता आणि आजची परिस्थिती अगदीच वेगळी होती. काल देऊळ ओसंडून वाहात होते आणि आज तुकोबांसोबत त्यांच्या विश्वासातील अगदी मोजके लोक होते. गर्दीला करावयाचा उपदेश आणि मोजक्यांसमोर मांडायचा विषय यांत भेद कसा असावा, तसेच व्यक्तिगत पातळीवर कुणाला काय सांगावे आणि काय सांगू नये याबद्दल त्यांचा निश्चित विचार होता.

ते म्हणत –

सोनियाचे ताट क्षीरीनें भरले । भक्षावया दिलें श्वाना लागीं ।।
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ।।
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ।।
तुका ह्मणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तिचें महिमान साधु जाणे ।।

जो वेदपरायण आहे त्याने बधिरासमोर ज्ञान सांगत बसू नये! सोन्याच्या ताटात खीर वाढून शेवटी श्वानाला दिली तर त्याला त्याचे मोल काय? शेवटी ज्याला त्याला त्याचा विषय कळतो हेच खरे. भक्तिचे महत्त्व आणि महिमा कळायला साधुवृत्तीचा मनुष्यच हवा!

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबांनी मागे एकदा सांगितले होते,

अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावे ।।
मुंगीवरी भार गजाचे पाळण । घालिता तें कोण कार्यसिद्धी ।।
तुका ह्मणे फासें वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ।।

पारध्याच्या फासात वाघ अडकला तर त्या वेळी विशेष प्रसंग म्हणून पारधी कुऱ्हाडीचे हत्यार वापरतो. आपल्याला उपदेश करता येतो म्हणून कोणालाही काहीही उपदेश करावा हे योग्य नव्हे. आपला उपदेश समोरच्याला झेपेल इतपतच असावा. हत्तीचा सांभाळ कर असे मुंगीला सांगत नसतात! तसे केले तर कार्यसिद्धी दूरच राहणार!

आज तुकोबांनी आपणहून ‘काहीही विचारा’ असे आबाला सांगितले होते. तो काय विचारतो याची सर्वांनाच जशी उत्सुकता होती तसेच तुकोबा उत्तर काय देतात याचीही होती त्याचे कारण हेच!

देवळात आल्यावर तुकोबांनी पांडुरंगाला दंडवत घातले व नेहेमी जेथे कीर्तनाला उभे राहत तेथे जाऊन उभे राहिले. बाकीचेही विठ्ठलाला वंदन करून आले व नेहेमीप्रमाणे मागे जाऊन उभे राहिले. तेव्हा तुकोबा म्हणाले,

मंडळी, आज कीर्तन नाही हो. आज मी येथे बसतो आणि तुम्हीही माझ्यासमोर बसा. आज आबा काही विचारतील आणि पांडुरंग त्यांना उत्तर देईल.

याप्रमाणे आबासहित सारे समोर येऊन बसल्यावर तुकोबांनी आबास म्हटले,

आबा, आता अगदी मोकळेपणे बोला, मोकळेपणे विचारा. तुमचे समाधान करण्यास पांडुरंग समर्थ आहे. विचारा त्यास काहीही.

हे ऐकल्यावर आबाला किंचित हसू आले आणि तुकोबांच्या नजरेतून ते काही सुटले नाही. त्यांनी विचारले,

कां हो आबा, हसू का बरे आले?

यावर आबा म्हणतो,

मला म्हाईत आन तुमाला बी, म्या इचारनार तुमाला आनी त्येला तुमीच उत्तर देनार. तरी बी तुमी म्हन्ता पांडुरंगाला इचारा आनी त्योच उत्तर देनार. ह्ये कासं कळावं कुनाला?

यावर तुकोबा क्षणात उत्तरले,

आबा, तुम्हाला काय वाटते? मी माझ्या मनचे बोलतो? लक्षात ठेवा –

 

नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार । मी आहे मजूर विठोबाचा ।।
निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ।।
निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषे ।।
आता भय माझे नासले संसारीं । आलोंसें यावरी गगनाचा ।।
तुका ह्मणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलो आनंद प्रेमसुख ।।

 

आबा, आज तुम्ही येथे काही विचारायला आलात ह्याचे कारण मी नव्हे! मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? अहो, मी मजूर आहे! विठाबाचा मजूर! हे मी निश्चितपणे सांगतो की मी बोलतो ते शब्द माझे नाहीत….तो संतांचा म्हणजेच थोरांचा प्रसाद आहे. तो प्रसाद मला मिळालेला आहे म्हणून मी बोलतो. मी बोलतो त्याला गोडी कशाने आली आहे, आबा? अहो, मी ह्या विठ्ठलाचा अखंड नामघोष चालविला होता, त्याचे ते फळ आहे. त्याच्यामुळे माझ्या मनातले भय गेले, मी आंत आनंदी झालो आणि विठोबाच्या प्रेमसुखाचा अनुभव मला आला. तर आबा, माझी लाज राखणारा तो कृपाळू आहे. तो ऐकेल आणि तोच सांगेल. तुम्ही आता सुरुवात करा बरं!

तुकोबांनी आपली भूमिका इतकी निक्षून सांगितल्यानंतर आबा उभा राहिला आणि तुकोबांना आधी वंदन करून, विठ्ठलाच्या मूर्तीकडे राहून बोलू लागला –

हे ईट्टला, आज मी तुला काई इचारनार हाय. मला कळतुया की जे ईचारायचे हाये ते इचारन्या इतका मोठा मानूस मी न्हाई. पन काय करू? मला ल्हानपनापासून येक प्रश्न पडला हाय. त्याचे उत्तर काई कुनी मला दीना. कुनी दिलं तर मला पटंना. ल्हानपनी माजे घरचे म्हनत द्येवाचं कर. द्येव कोपंल आसा वागू नगं. पूजा कर. धर्म कर. काय काय सांगत. म्या बी करीत हुतो. द्येवाला जात हुतो. प्रदक्षिना घालीत हुतो. काय काय करीत हुतो. पन जसा मोठा होऊ लागलो तसा मनात येक इचार यीऊ लागला. मी इचारू लागलो, द्येव कुटं आसतु? तर कुनी म्हनालं द्येवळात असतु. मग म्या म्हनलो, द्येवळात कुटं आसतु? तर म्हनले मूर्तीत आसतु. म्या म्हनलं, ह्या द्येवळाच्या मूर्तीत द्येव हाये आनी त्या द्येवळाच्या मूर्तीत बी द्येव हाये आसं कसं? मग कुनी म्हनालं, द्येव सगळीकडं आसतु. मग म्या म्हटलं, आसं असंल तर मूर्तीला नमस्कार का म्हनून? मी न्हाई द्येवळात जायचा. घरच्या देवान्ला बी मी नमस्कार न्हाई करायचा. मी आसं बोलू लागलो तवां माज्या घरचे लई घाबरले. म्हनले, आसं वागशील तर द्येवाचा कोप हुईल. त्ये आसं म्हनू लागले की म्यां म्हनू लागलो, जो द्येव हाये तो कोपतो मंजी काय? मग तो द्येव कसा? ह्ये आसं सारखं होऊ लागलं. लोक माजी समजूत घालाया लागले. आपुन नीट वागलं तर द्येव कोपत नसतु. तो दयाळू आसतु. मी म्हनू लागलो, दयाळू म्हनता तर साथीत लोक मरत्यात कशी? नदीला पानी आलं की वाहून कशी जात्यात? दुष्काळ पडतुया. भुकेनं मरत्यात लोक. तेव्हा हा द्येव कुटं असतु? मरनाऱ्या लोकांनी द्येवाचं केलेलं नसतुया का? त्ये सगळे वाईट असत्यात का? मी आसं काय काय बोलू लागलं तवा घरचे न् गावचे मलाच रागं भरू लागले. माज्यामुळं माझ्या घरचं न् गावचं वाटुळं होनार म्हनू लागले. तशेच काई दिस गेले आन् आमच्या गावच्या द्येवळात येक साधू आला हुता. त्येला समदं इचारलं. तवा तो म्हनला, तुला ह्ये कळायचं तर आदी गाव सोड. इतं ऱ्हाऊ नगं. तीर्थयात्रा कर. तुला कुटतरी गुरु भेटंल. त्यो तुजं समाधान करील. ह्ये ऐकलं आन् त्याच राती मी घरातून पळालो आन् हिंडत बसलो. गुरु काही भेटला नाई आनी प्रश्न बी कमी हुईनात. आनी जालं आसं की जिकडं फिरलो तिकडं दुःखच दिसलं. चोर, लबाड लोक दिसलं. म्या पुन्हा म्हनू लागलो, ह्यो द्येव असता तर ह्ये आसं कसं असतं? द्येव अासंल तर समद्यांस्नी खाया मिळालं आसतं. कपडा मिळाला आसता. ऱ्हायला इतभर जागा तरी मिळाली आसती. लढाया हुत्यात त्या जाल्या नसत्या. सारख्या लढाया हुतात. बाप्ये मरत्यात. त्येंच्या बायका पोरं अनाथ हुतात. भिकंला लागत्यात. त्या द्येवाला हे दिसत कासं न्हाई? माजी खात्री जाली की जगात द्येव नाही. आपुन उगीच द्येव द्येव करतो. आसं मी येकाला म्हनालो. तर तो म्हनला, द्येहूला जा. तितं तुकोबा आसतांत. त्येंना इचार. त्ये पांडुरंगाचे मोठे भक्त हायीत. त्ये सर्वांना द्येवाचं नाव घ्या म्हनून सांगतात. त्ये जर तुजं बरोबर म्हनले तर खरं. म्या मनात म्हटलं, इतकी गावं फिरलो तर शेवटचं द्येहूला बी जाऊ. म्हनून इतं आलु. आनी, द्येवा तुझ्या तुकोबांना जसं पाहिलं तसं मला कळलं की ह्येच माजे गुरु हैत. इतका फिरलो पर आसा मनुष्य मी कुटं नाई पाह्यला. इट्टला, तू द्येव हायीस की नाई ते येगळं पण तुकोबा द्येवमानूस हायीत. माला तसं का वाटतं त्ये माला न्हाई सांगता यायचं. त्ये म्हनतात त्ये गुरु हुनार न्हाईत. म्हनू द्येत. मी त्यांचा शिष्य हुनार. इट्टला, माजे गुरु म्हनतात तुला प्रश्न इचार. म्या ईचारतु. माला सांग, तुला द्येव म्हनतात त्ये बरोबर हाय का? जगात द्येव हाये का? मला वाटतुया की द्येव न्हाई आणि तुकोबा म्हनतात, तुजं नाव घ्या. माजा गोंधळ हुतो. तूच सांग, तू हायेस की न्हाईस? तू हायेस म्हनलास तर मी फुडं इचारतो, न्हाई म्हनलास तरी इचारतो.

इतकं बोलून आबा तुकोबांकडे वळला आणि म्हणाला,

द्येवा, ल्हान तोंडी मोटा घांस घेतला म्यां. पन रागावू नकासा. लेकरू म्हना आनी हा माजा गुंता त्येवडा सोडवून द्या.

हे सारे ऐकताना तुकोबांचा चेहेरा जरी शांत गंभीर होता तरी बाकीच्यांना मात्र जरा ताणच आला आणि आता तुकोबा आबाचे समाधान कसे करतात ते पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?