' बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

बॉलिवूडच्या पार्ट्यांऐवजी रुईयाच्या मित्रांसोबत वेळ घालवणं पसंत करणारा दिग्दर्शक निशिकांत कामत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०२० हे वर्ष हे कुणीच विसरू शकणार नाही. कोरोना हे त्यामागे एक कारण आहेच. पण आणखीन एक कारण आहे ते म्हणजे ह्या वर्षात आपल्याला सोडून गेलेले हरहुन्नरी कलाकार!

सुशांत सिंग, इरफान, ऋषी कपूर, रत्नाकर मतकरी अशा काही दिग्गज कलाकारांनी ह्या वर्षी या जीवनाच्या रंगमंचावरुन एक्जिट घेतली. आणि त्यांचं हे जाणं प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलं!

राजेश खन्नाच्या आनंद सिनेमातल्या “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं” हा डायलॉग म्हणत ही लोकं जगली आणि आपल्यासारख्या कित्येकांच्या आयुष्यात ४ आनंदाचे क्षण देऊन गेली त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून!

आज सुद्धा अशाच एका मराठमोळ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टिवर सुद्धा थाटात राज्य करणाऱ्या दिग्दर्शकाने आपल्या सगळ्यांचा कायमचा निरोप घेतला, आणि त्या दिग्दर्शकाचं नाव म्हणजे निशिकांत कामत!

 

nishikant inmarathi
m.economictimes.com

 

११ ऑगस्ट ला त्यांना यकृताशी निगडीत काही त्रास होत असल्याने हैद्राबाद इथल्या एका खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्यांची प्रकृती नाजुक होती हे तेंव्हापासून सगळ्यांनाच ठाऊक होते. पण अखेर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले गेले!

मुंबई स्थित असलेले मध्यमवर्गीय कुटुंब, आई संस्कृतची शिक्षिका तर वडील गणिताचे शिक्षक, अशा घरात निशिकांत यांच्यासारखा टॅलेंटेड दिग्दर्शक कसा तयार झाला हे बऱ्याच लोकांना न उलगडलेलं कोडच आहे!

केवळ स्वतः बनवून दुसऱ्याला खाऊ घालायचे ह्या आवडीखातर निशिकांत ह्यांनी गोव्याच्या एका कॉलेज मधून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी मिळवली.

त्याच दरम्यान ह्या कलाक्षेत्राकडे ते आपसूक खेचले गेले आणि त्या कॉलेजचे कल्चरल सेक्रेटरी झाले. मुंबईत आल्यानंतर इथल्या प्रसिद्ध रुईया कॉलेजच्या कित्येक कल्चरल इव्हेंटस मध्ये तसेच नाटकं, एकांकिका हयात त्यांचा सहभाग असायचा.

तिथूनच खरंतर त्यांची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. नाटकं, एकांकिका इथून सुरुवात करत हळू हळू त्यांनी असिस्टंट डायरेक्टर, एडिटिंग याकडे मोर्चा वळवला.

अखेर २००५ मध्ये डोंबिवली फास्ट ह्या सिनेमाने निशिकांत कामत यांच्यासाठी इंडस्ट्रीची दारं उघडली. ह्या सिनेमातून त्यांनी मिडल क्लास नोकरदार वर्गाचा भ्रष्ट सिस्टिम विरोधातला राग मांडला. आणि तो लोकांना तितकाच भावला देखील!

 

dombivli fast inmarathi
mxplayer.in

 

सिनेमात संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर हे मुख्य भूमिकांमध्ये होते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, धगधगतं वास्तव त्यांनी त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.

मग तो नंतर मुंबई मेरी जान असो, जॉन अब्राहम बरोबर केलेला फोर्स असो, इरफान बरोबर केलेला मदारी असो, किंवा अजय देवगण चा सुपरहीट दृश्यम!

निशिकांत कधीच बॉलिवूडच्या फेअरी टेल टाइप कथांमध्ये रमले नाहीत. लै भारी सारख्या सिनेमातून त्यांनी कमर्शियल सिनेमाची सुद्धा हाताळणी केली.

पण मनोरंजनासोबतच लोकांच्या डोक्याला काहीतरी खाद्य पुरवणारे निशिकांत हे हुशार दिग्दर्शक. मराठी सिनेमापासून सुरुवात करून बॉलिवूड मध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण करणारे निशिकांत हे काही हातावर मोजता येणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक.

फक्त दिग्दर्शन नाही तर त्यांनी कित्येक सिनेमात अभिनय देखील केला आहे. विक्रमादित्य मोटवाने ह्यांच्या नुकत्याच आलेल्या भावेश जोशी ह्या सिनेमात त्यांनी निगेटिव्ह रोल केला होता.

दृश्यम हा सिनेमा साऊथकडच्या सिनेमाचा रिमेक. तरीही केवळ दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोरावर तो सिनेमा मूळ चित्रपटापेक्षा जास्त हिट झाला ह्याचं श्रेय जातं ते निशिकांत यांनाच!

 

drishyam inmarathi
filmibeat.com

 

हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये इतकं घवघवीत यश मिळवून सुद्धा कधीच त्याचा त्यांनी गर्व केला नाही.

“फिल्म इंडस्ट्री हे माझं आयुष्य नसून ते माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.” इतकं स्पष्ट बोलणारा बहुदा एकमेव मराठी दिग्दर्शक!

फिल्म इंडस्ट्री मधलं स्टारडम, ती चंदेरी दुनिया पाहून कित्येक लोकांच्या टॅलेंटचं वाटोळ झालं. पण या सगळ्यात सुद्धा समतोल राखून स्वतःची छाप लोकांवर पाडणारे निशिकांत सारखे दिग्दर्शक वेगळेच!

एका मुलाखतीत त्यांनी हे कबूल केलं की, बॉलिवूडच्या ऊंची पार्ट्यांमध्ये जण्याऐवजी ते त्यांच्या रुईया कॉलेजच्या मित्रांसोबत चहा पिऊन, माटुंगाच्या उडपी हॉटेलात काहीतरी खात गप्पा मारणं जास्त पसंत करायचे. 

इथंच ह्या दिग्दर्शकाचा साधेपणा आणि सच्चेपणा दिसून येतो!

बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिग्दर्शकाच हे स्वप्न असतं की एकदातरी शाहरुख, सलमान, आमिर ह्यांच्यासोबत सिनेमा करता यावा. पण निशिकांत ह्यांना कधीच त्या गोष्टीचं आकर्षण नव्हतं.

एका मुलाखतीत ते म्हणाले होते की,

“सिनेमाची कथा ही सर्वात जास्त महत्वाची आणि सगळ्याच्या वरती असते, जर कथेची गरज असेल तर मलाही आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. पण केवळ त्यांच्या इमेज ला भुलून मी सिनेमा ऑफर करणार नाही!”

 

nishikant kamat 2 inmarathi
daily-bangladesh.com

 

खरंच सिनेमाशी आणि स्वतःच्या कामाशी इतका प्रामाणिक दिग्दर्शक आपल्या कोणाच्याच पाहण्यात आला नसावा!

खरंतर ते आजारी होते तेंव्हाच त्यांची तब्येत नाजुक असल्याचे समजत होते. शिवाय आज सकाळी सुद्धा ते व्हेंटीलेटर सपोर्ट वर असताना बऱ्याच बड्या बड्या न्यूज चॅनल्स च्या माध्यमातून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या गेल्याचं आपण पाहिलं!

त्यानंतर त्यांचा मित्र आणि अभिनेता रितेश देशमुख ह्याने ट्विटरच्या माध्यमातून ते व्हेंटीलेटर वर असल्याचं सगळ्यांना सांगितलं. आणि आत्ताच काही वेळापूर्वी त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंट वरुन निशिकांत ह्यांच्या निधनाची बातमी कन्फर्म केली!

 

ritesh tweet inmarathi

 

अशा ह्या हरहुन्नरी मराठमोळ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा गाजवणाऱ्या निशिकांत ह्यांची चाललेली मृत्यूशी झुंज अखेर संपली.

सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजनाचं माध्यम न मानता त्याचा समाजासाठी सुद्धा तितक्याच कौशल्याने वापर करणाऱ्या निशिकांत कामत सारख्या जाणकार दिग्दर्शकाची आपल्याला नितांत गरज होती!

पण काळापूढे कुणाचे काय चालते असं स्वतःला समजवायचं आणि शो मस्ट गो ऑन म्हणत पुढे चालत राहायचं.

निशिकांत कामत ह्यांच्या कारकिर्दीला सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून सलाम, आणि इनमराठी टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?