' कोरोनाच्या कृष्णछायेत : राजकारण, आरोग्य, विज्ञान अशा अनेक अंगांना स्पर्श करणारा उत्तम दस्तावेज – InMarathi

कोरोनाच्या कृष्णछायेत : राजकारण, आरोग्य, विज्ञान अशा अनेक अंगांना स्पर्श करणारा उत्तम दस्तावेज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : सौरभ गणपत्ये 

===

साहित्यनिर्मिती ही प्रक्रिया दुहेरी असते. त्यातही एखाद्या कालखंडाचा अहवाल असल्यासारखं लेखन जेव्हा येतं, तेव्हा त्यात हा दुहेरीपणा नक्कीच दिसतो.

डॉक्टर मृदुला बेळे यांच्यासारखी एक अस्वस्थ आणि काळाची गाढी जाणकार लेखिका आपल्या नजरेने आजूबाजूच्या गोष्टी टिपत असते, त्याचवेळी त्या काळाने व्यापलेला संपूर्ण परिसर आपली कथा उलगडून सांगत असतो.

जेव्हा हे दुहेरीपण अधिकाधिक टोकदार होतं त्यावेळी ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ सारखी कृती जन्माला येते.

 

coronachya krushnachhayet book review inmarathi

 

या पुस्तकाबद्दल काही गोष्ट नमूद करायला हव्यात, की जर अशी एखादी कृती इंग्रजीत जन्माला आली, तर त्यावर एखादी मोठी दमदार आणि उत्कंठावर्धक वेबसिरीज बनू शकते. आणि त्याचे अधिकाधिक उत्कंठावर्धक असे सीझन्स येतील हे नक्की.

दुसरं म्हणजे हे पुस्तक अनेक वाचकांच्या प्राधान्यक्रमात हे पुस्तक येऊ शकतं. ते कसं आणि का याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

पुस्तकाची सुरुवातच अर्थात लेखिकेच्या मनोगताने होते. हे मनोगत म्हणजे नकळतपणे आलेल्या एका रास्त विदारकतेची मांडणी वाटते.

भारतासारख्या देशात राजकारण, हिंदी सिनेमा आणि क्रिकेट या अशा गोष्टी आहेत, ज्यात प्रत्येकाला ‘आपल्याला यातलं खूप काही समजतं’ असं वाटत असतं.

कोरोना जेव्हा राजकारणाची जोड घेऊन येतो, तेव्हाच या देशात किमान काही कोटी डॉक्टर्स जन्माला आलेले असतात. “भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी”, या शीर्षकाखाली लेखिका आपलं मनोगत मांडते.

एक प्रकारचं वैफल्य, चीड आणि त्याचवेळी समाजाची असणारी काळजी मांडत वाचक आपली यात्रा सुरु करतो.

‘रात्रीच्या गर्भात’ या पहिल्या प्रकरणाची सुरुवात वुहान शहराच्या वर्णनाने होते. पुस्तकाचा एक भला मोठा भाग डायरी किंवा निव्वळ अहवाल असल्यासारखा लिहिला आहे.

सुरुवातच डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून होते. बा. सी. मर्ढेकरांची शहरी जाणिवांचं चित्रण असणारी साठोत्तरी कविता, किंवा आणीबाणीच्या सुमारास ‘जाहीरनामा’ मांडणारे नारायण सुर्वे यांच्याशी मिळत्याजुळत्या शैलीत वुहान शहर तिथली माणसं बाजार, कारखाने यांचं वर्णन सुरु होतं, पण ते तेवढंच.

कारण ‘लान’ हा त्या शहरातल्या बाजारातला एक विक्रेता आपल्या डोळ्यांनी धांडोळा घ्यायला लागला आहे. साधारणपणे काहीतरी चुकतंय याची जाणीव आपल्याला काही कारणांनी यायला लागते.

बाजारातली वयस्कर महिला काही दिवसांपासून आलेली नाही. आणि अचानक लोक आजारी पडू लागल्याच्या बातम्या यायला लागतात. एकदिवस लानही आजारी पडतो. अशा अनेक प्रकारच्या बातम्या यायला लागल्यावर यंत्रणेला जाग यायला लागते.

 

corona virus 11 inmarathi
extra ie

 

हळूहळू आपल्याला डॉ. झांग झिशियान, डॉ. ली. वेंलीयांग, तसंच डॉ. आय फेन हे परिचयाचे होतात आणि हवेहवेसे वाटू लागतात. पण इथे यांचा सामना स्वतःशीच नाही, तर तो आहे एका आक्राळविक्राळ व्यवस्थेशी. त्यांना मान देऊन प्रसंगी त्यांच्याच व्यक्तित्वावर उठणारी अत्यंत महत्वाकांक्षी, अत्यंत सामर्थ्यशाली, सक्षम आणि तितकीच राक्षसी व्यवस्था.

आपल्याकडे चीनच्या प्रगतीचे गोडवे गाणाऱ्यांचा एक मोठा गट आहे. चीनने जगाला थक्क करणारी प्रगती केली आहे याबद्दल हा गट भरभरून बोलत असतो. अर्थात प्रगती हीच की जी चीन जगाला कळवेल.

चीनमध्ये गुगल चालत नाही. त्यांच्याकडे फेसबुक, whatsapp चालत नाही, ट्विटर नाही. गुगल नसल्याने अर्थातच youtube सारखे मंच नाहीत. वैबो अथवा वी चॅट सारखे त्यांचे समाजमाध्यमांचे मंच आहेत. पण त्यावर पूर्ण नियंत्रण राजकीय व्यवस्था ठेऊन आहे.

आक्षेपार्ह वाटणारे संदेश उडवले जातात. खाती संपविली जातात. आणि तसे संदेश टाकणाऱ्यांना समज दिली जाते किंवा अजून काही. डॉ. ली. वेंलीयांगसारख्या मोठ्या डॉक्टरांनां अश्याच दडपशाहीला सामोरं जावं लागलं.

त्यांच्याकडून काही प्रतिज्ञापत्र लिहून घेतली गेली जेणेकरून त्यांनी अशा आजारांची वाच्यता करू नये. हळू हळू या मुंगीपेक्षा १० लाख पटींनी लहान (हो १० लाख पटींनी) मुकुटधारी विषाणूचा थांगपत्ता लागायला लागतो, तोपर्यंत याने वुहान शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली असते.

नेमका हा चिनी नववर्षाचा सण होता. भारतीयासांठी दिवाळीचं महत्व तसंच महत्व चिनी समाजासाठी या सणाचं. या रात्रीच्या गर्भात उषःकाल नक्की नाही.

‘सावध ऐका हाका…’ हेही प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. या विषाणूचा थांग लागतो खरा, पण अनेकदा स्वतःमध्ये बदल करणारा हा विषाणू ताब्यात घेणं अशक्य आहे.

 

corona inmarathi

 

मृदुला बेळे स्वतः औषधनिर्माण शास्त्रात डॉक्टरेट आहेत. पेशाने शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास, व्यासंग आणि व्यवसाय एकत्र आलेला इथे जाणवतो.

आज आपल्याला त्रास देणारा कोरोना विषाणू ही त्याची खरंतर बरीच पुढची पिढी. याचं खानदान, त्यातले वेगवेगळे सुभेदार आणि त्यांच्या करामती प्रत्येकाचे उगम, प्राण्यांतून हे माणसांत कसे आले?, त्यांच्या रचना, त्यावर असणारं संशोधन त्यात येणारं यशापयश या सगळ्यांचा लेखाजोखा यात येतो.

त्याचवेळेस डॉ. मृदुला बेळे आपल्याला चिनी पारंपरिक औषधशास्त्र, चिनी समाजशास्त्र, अर्थकारण यांचा उलगडा करून देतात. एरवी चिनी समाज काहीही खाणारा म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांच्या या खाण्याला प्राचीन कारणं आहेत. आजघडीला त्याला आर्थिक सामाजिक आयाम आहेत.

पँगोलीन, मोर, वटवाघळं, मगरी हे प्राणी कत्तल करायला बाजारात आणले जातात. घाबरलेले प्राणी मलमूत्र विसर्जन करतात. त्यात ओली जमीन आणि या सर्वांच्या संपर्कात आलेले मनुष्य प्राणी. एकंदरीत उद्या जगाने कोव्हीड समस्येवर मात केली, तरी एखादी अशीच साथ ही घाला घालायला टपून बसलेली आहेच.

शिवाय चीनसह मलेशिया आणि थायलंडसारख्या देशांत या व्यापाराशी निगडित अर्थकारणामुळे नेमक्या कोणत्या उपाययोजना राबविता येतील याचीही शाश्वती कमी. जात जाता हे प्रकरण आपल्याला वटवाघुळांपासूनच हे विषाणू का येतात याची माहिती देतं.

प्रकरण तिसरं आहे ‘सत्य गाडण्याची किंमत’. आधीच्या प्रकरणात आपल्या भेटीला आलेला ली वेंलीयांग आता कोव्हीडग्रस्त झाला आहे.

हे प्रकरण तर प्रत्येक विचारी माणसाने डोळ्याखालून घालण्यासारखं. चीन या देशाची दोन रूपं हे प्रकरण आपल्यासमोर ठेवतं. त्याआधी आपल्यासकट जगभरात चीनबद्दल काही प्रवाद आहेत त्याबद्दल.

चीनची विस्मयकारक (आणि बहुतांश खरीखुरी) प्रगती चीनची कमालीची क्षमता आणि व्यवस्थात्मक सक्षमपणा याबद्दल जगभरात बोटं तोंडात घातली जातात. या प्रकरणात त्याचाच प्रत्यय येतो.

यंत्रयुग, करडी व्यवस्था, तन मन झोकून काम करणारी अत्यंत कष्टाळू माणसं, व्यावसायिक शिस्त, तंत्रज्ञान आणि अप्रतिम धोरणीपणा यांच्या बळावर चीनने आपल्याकडचा कोव्हीड नियंत्रणात आणला.

म्हणजे माणूस एखाद्या सरकारी किंवा खाजगी ठिकाणी गेला, तर त्याने गेल्या पंधरा दिवसांत कोणाकोणाला भेटी दिल्या याचा लेखाजोगा व्यवस्थेकडे आहे. आणि ज्यांना ज्यांना तो भेटला असेल त्यांना त्यांना जाऊन तिकडेच विलगीकरणात ठेवणं, हे चीनने अत्यंत सक्षमपणे केलं. अगदी प्रगत देशांनाही हेवा वाटावा असं हे.

चीन महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा ठेवतो, आणि त्याचबरोबर तेवढी पात्रताही बाळगतो हे या प्रकरणाच्या पहिल्या भागातून उमगतं. त्या देशाबद्दल आदराची भावना तयार झाल्याशिवाय राहत नाही.

पण जसजसा हा भाग पुढे जातो, तस तसं लोकशाहीचं महत्व समजायला लागतं, जी त्या देशात नावालाही नाही.

‘डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड’ ही तीन भारताची वैशिष्ट्य जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्यात अर्थातच एक टोमणा चीनला असतो. पण आत्तापर्यंत चीनच्या लोकशाही देश नसण्याच्या व्यवस्थेला जगाने खूप गांभीर्याने घेतलं नव्हतं.

 

modi 2 inmarathi
amnesty.org.uk

 

अरबस्तानातले देश असतो किंवा चीन, जोपर्यंत यांच्याकडून जगाच्या गरज भागतायत तोपर्यंत जगाला यांच्याशी उठाठेव नसते. व्यवस्थेच्या पोलादी पडद्यापायी चीनने जगापासून हा विषाणू लपवून ठेवला. चीनने अत्यंत क्रूरपणे आणि सर्व माहिती दडपली.

ज्या डॉक्टरांनी वाच्यता करायचा प्रयत्न केला त्यांना धमकावून गप्प करण्यात आलं. फॅंग बिन बिन आणि चेन किशी सारख्या सत्यासाठी भांडणाऱ्या पत्रकारांना अदृश्य केलं गेलं.

वुहानपासून चीन अंतर आहे ८३९ किमी. पण तिकडे कोरोनाचा प्रसार फार झाल्याचं अद्याप कानावर आलेलं नाही. परंतु वुहान पासून हजारो किमी दूर असणाऱ्या इटलीतल्या मिलानमध्ये मात्र हा विषाणू ऐसपैस पसरला.

कारण चीनने आपली देशांतर्गत विमानसेवा बंद ठेवली आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र चालू ठेवली. अतिप्रचंड वेगाने हजारो रुग्णांसाठीची इस्पितळे उभारणारा चीन खरा, की आपल्या आर्थिक नुकसानीच्या भीतीपोटी हा विषाणू जगात पोहोचवणारा चीन खरा हे दोन्ही प्रश्न सुटतात.

चौथं प्रकरण, ‘अंधार गडद होताना’ मुख्यत्वे जागतिक आरोग्य संघटेनच्या अकार्यक्षमतेवर प्रकाश टाकतं. ट्रम्पच्या काळातल्या अमेरिकेने जिकडून जिकडून आपलं अंग काढून घेण्याचा सपाट लावला तिकडे तिकडे ती पोकळी चीनने भरली.

डॉ. ट्रेड्रॉस घेब्रेयस यांची जागतिक आरोग्य संघटेनच्या अध्यक्षपदी निवड ही अशीच एक चीनच्या पुढाकाराने साकारलेली घटना. इथिओपियात येऊ घातलेली रोगराई लपविण्यात यांचा हात. पण ते चीनच्या आशीर्वादाने अध्यक्ष होतात आणि त्याचा व्यवस्थित लाभ चीन उचलतो.

चीनमध्ये मृतांची संख्या वाढू लागेपर्यंत हा अध्यक्ष हा रोग मानवाकडून मानवाला संक्रमित होऊ शकतो हेच जाहीर करत नाही. वर मिलानसारख्या शहरात चीनकडून येणाऱ्या व्हायरसच्या वार्ता पोहोचू लागल्यावर लोकांना समता आणि बंधुतेची गुटिका देऊन गप्पं बसवलं जातं आणि काळजी म्हणून चिनी लोकांपासून अंतर ठेवण्याला वंशवाद म्हटलं जातं.

‘हग अ चायनीज’ सारख्या मोहीमा सुरु होतात आणि जगाला एका अंधाऱ्या गुहेत अक्षरश: ढकललं जातं.   

पाचवं ‘प्रकरण’ खास भारतावरचं. आणि सहावं प्रकरण ‘चुकलेले आडाखे’ भारतातल्याच व्यवस्था नामक अवस्थेचं वर्णन आहे. आजच्या घडीला वरवर पाहता भारताने गुडघे टेकवायला सुरुवात केलेली आहे.

जगापेक्षा भारतात प्रसार जास्त आहे. पण पुस्तक लिहितेवेळी परिस्थिती नक्कीच वेगळी होती, त्यामुळे त्या नजरेतून हे प्रकरण पाहावं लागतं.

लेखिकेला सुरवातीला भारताने उचलेल्या पावलांचं कौतुक वाटतं. अर्थव्यवस्था मागे पडली, तरी चालेल पण माणसं जगायला हवीत हा भारत सरकारचा पवित्रा लेखिकेला भावतो.

पण म्हणून डॉ. बेळे आपल्या व्यवस्थेतल्या चुका मांडताना हात आखडता घेत नाहीत. ३० जानेवारीला भारतात पहिला रुग्ण सापडला. नंतर थेट मार्चमध्ये.

मधल्या काळात चीन आणि काहीप्रमाणात आग्नेय आशियातून आलेल्या प्रवाशांची तपासणी आणि विलगीकरण प्रक्रिया आपण सुरु केली. पण इतर जगभरातून आलेल्या प्रवाशांना तपासलंच गेलं नाही.

 

corona in india inmarathi
hindustantimes.com

 

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात चीनमधून युरोप अमेरिका किंवा आग्नेय आशियातून आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका आणि भारत असा प्रवास माणूस करू शकतो ही गोष्टच इकडच्या व्यवस्थेच्या ध्यानात आली नाही.

जगातली सगळ्यात कडकडीत टाळेबंदी आणि त्याचवेळी आजच्याघडीला कोरोना प्रसारात जगात नंबरही तिसरा असा विचित्र विक्रम भारताने नोंदवला आहे. पण त्याहीवेळी हे लक्षात घ्यायला हवं, की भारताचा रोगमुक्तीचा दरही उत्तमच आहे. आजच्या घडीला दोन दिवसांत जवळपास लाखभर लोक बाधित होत आहेत, तर तीन दिवसांत तेवढेच रोगमुक्तही होत आहेत.

भारतीयांची आंतरिक प्रतिकारक्षमता, राहणीमान, बीसीजी डोस यांच्या साहाय्याने भारत तुटपुंज्या साधनांसहित कोरोनाशी युद्ध करत आहे.

भारतातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण यावर या प्रकरणात झोत आहे. गुंतागुंतीच्या आणि अत्यंत अंतर्विरोध असणाऱ्या पण प्रचंड परस्परावलंबी असणाऱ्या भारत देशाचं कोव्हीडशी युद्ध रेखाटणाऱ्या या प्रकरणाचं नाव आहे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’.

आजच्या घडीला असलेले संदर्भ बदललेले वाटतील. उदा. केरळ रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर होता, पण नंतर अत्यंत सक्षमपणे केरळने तो रोग काबूत आणला होता. आजघडीला सर्वाधिक सक्षमता दिल्ली दाखवत आहे त्या खालोखाल तामिळनाडू, त्याखालोखाल गुजरात आणि मग बंगाल.

त्याचवेळी धारावी सारख्या ठिकाणी जिकडे विदारक परिस्थिती होती तिकडे आता परिस्थिती काबूत आलेली आहे. एक काळ असा आला, की कोव्हिडचं खापर पूर्ण मुसलमान समाजावर फोडलं गेलं. आज मुसलमान समाज संख्यने अधिक असणारी उत्तरप्रदेश बिहारसारखी राज्य चांगली कामगिरी करत आहेत.

धर्मातीत दृष्टीकोनाची गरज अशा स्वरूपाच्या लेखनात असते. ती इथे जाणवते.

प्रकरण सातवे आहे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’. आपल्याला रोगाशी लढायचंय रोग्यांशी नाही हा सुविचार फक्त कागदावर राहिला. प्रत्यक्षात रुग्णाला अक्षरशः बहिष्कृत करण्याच्या घटना घडल्या.

पुण्यासारख्या ठिकाणी तर परदेशातून आलेल्या घरमालकालाही सोसायटीत प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या देशात कामगारांना घरी जायची इच्छा उत्पन्न झाली.

राज्य सरकारांनी त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण दाटीवाटीने लहान खोल्यांमधून राहणारे कामगार घराच्या ओढीने निघाले. रोगाने गाठलंच तर घरचे बरोबर असताना आत्मविश्वास वाढेल आणि शिवाय गावाकडे मोकळी जागा मुबलक असल्याने विलगीकरणाची वेळ आलीच, तर त्यालाही वाव या भावना कामगारांच्या स्थलांतरामागे होत्या.

 

corona breakdown inmarathi
outlookindia.com

 

मजुरांना रोजगार नसल्याने आत्मविश्वासही राहिला नव्हता. अशा मजुरांच्या व्यथेला यात वाचा फोडली आहे. वर्तमानपत्रांत येणाऱ्या मजुरांच्या अपघातांच्या मन विषण्ण करणाऱ्या बातम्या आपल्याला समीक्षेसकट पुन्हा दिसतात. हे पुस्तक हा कोव्हीडयुद्धाचा लेखाजोखा असल्याने हे नैसर्गिक आहे.

‘या ट्रॅजेडी ऑफ एरर्स’ हा भाग खऱ्या अर्थाने कोरोनाला जागतिक संकटाच्या रूपात पेश करतो. धर्मावर आधारित देश आणि व्यवस्था या आपल्या मर्यादाच घेऊन जगत असतात.

शाळेच्या पुस्तकात डार्क एजेसच्या संकल्पनेवर मात करणारा प्रबोधनाचा काळ आपल्यासमोर धर्माची झापडं जाऊन खुला आणि शास्त्रीय विचार युरोपात कसा रुजला हे दाखवतो. पण प्रबोधनपूर्व काळ म्हणजेच आजचा इराण हे या प्रकरणात समजतं.

धर्म, मग तो कोणताही असो, एकदा त्याने मेंदूचा ताबा घेतला आणि देव नावाच्या संकल्पनेला बागुलबुवा बनवून मानगुटीवर बसवलं, की विवेकाला फाटा मिळतो. मग भर रोगराईच्या काळात भरणाऱ्या इरांमधल्या मशिदी असोत अथवा दक्षिण कोरियातले ख्रिस्ती संमेलन समारंभ.

एकदा शास्त्रीय विचारला तिलांजली मिळाली आणि पुढे कोरोनाला मुक्त संचार मिळाला. इराण आणि दक्षिण कोरियातले काही गट धार्मिक बाबींत फसले तर अति आत्मविश्वास आणि अति पुरोगामीत्वाने इटलीला खोल गर्तेत नेलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या मोठ्या चुका झाल्या त्याचा लेखाजोखा यात आहे.

अनेकदा मोठमोठे हरले आणि छोटे पुढे सरले अश्या स्वरूपाच्या घडामोडी घडतात. संपूर्ण जगाने हाय खाल्ली., पण याही काळात एका देशाने या विषाणूंचा अभ्यास केला, तो जागतिक आरोग्य संघटनेला दिलाही, शिवाय आपल्या देशातल्या प्रादुर्भावावर विजयही मिळवला.

पण जागतिक आरोग्य संघटनेच्या लेखी त्या देशाचीच किंमत शून्य असल्याने या देशाने दिलेले इशारे वाया गेले. आणि एक भली मोठी चूक अंतरराष्ट्रीय पातळीवर घडली. तैवान हे या देशाचं नाव. नवव्या प्रकरणात ‘…तेथे लव्हाळे वाचती!’ या शीर्षकातच याचा परामर्श आहे.

‘सरणार कधी रण?’ या दहाव्या प्रकरणात प्रामुख्याने कोरोनाच्या औषधांना धरून जे राजकारण झालं त्याचा मागोवा घेतला गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची साथ ही स्वतःच कर्तृत्व दाखवायची संधी मानली आणि औषधांना प्रमाणपत्र वाटत सुटले.

‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’ ही गोळी ट्रम्प यांनी ‘गेमचेंजर’ म्हणून गौरवली, अचानक भारतातून या गोळ्यांचा पुरवठा सुरु झाला.

 

corona medicine inmarathi
losangelestimes.com

 

हे प्रकरण औषधनिर्मितीशी निगडित आहे. विषाणूंचा अभ्यास होतो पुढे औषधांची निर्मिती होती. पण निर्मिती झाली म्हणून लगेच ती देता येत नसतात. औषधांना प्रत्येक टप्प्यावर चाचणीला समोर जावं लागतं.

तीन टप्प्यांमध्ये याची मानवी चाचणी विशिष्ट (डबल ब्लाईंडेड रॅण्डमाईझ्ड कंट्रोल्ड टेस्टिंग) होते. एकूणच हजारो लोकांवर याची चाचणी झाल्यावर त्यांना रोगावर उतारा पडतो आहे का, त्या औषधाचे दुष्परिणाम किती (प्रत्येक औषधाचे साईड इफेक्टस असतातच) आणि त्यांचं निवारण कसं होतं? याचा आढावा या प्रकरणात आहे.

‘लॅन्सेट’ नावाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मासिकात हायड्रॉक्सिकोरोक्वीनच्या बाबतीत ही चाचणी अपयशी ठरल्याची माहिती आली. आणि या प्रकरणावर पूर्णविराम पडला. परंतु ‘लॅन्सेट’ने तो लेख मागे घेतला आणि राजकारणाला तोंड फुटलं.

डॉनाल्ड ट्रम्पना खोटं पाडायचा डाव इथून ते सरळ नव्या औषधांच्या फायद्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची बदनामी असे वेगवेगळे प्रवाद आले. पण झाल्या प्रकरणात ‘लॅन्सेट’ची नाचक्की दुःखदायक होती.

अस्त्राजेनेकाने ऑक्सफर्डबरोबर मिळून औषध शोधलंय ज्याच्या चाचण्या सुरु होणार आहेत. आधीच्या चाचण्या यशस्वी होत्या हे लॅन्सेटने सांगितलं, पण आज याचाही विचार करताना मनात शंका येऊ शकते इतका आधीचा प्रकार धक्कादायक होता.

अकरावं प्रकरण आहे, “नॉट सेलिंग इन द सेम बोट “. नावाप्रमाणेच, “डायमंड प्रिन्सेस” या बोटीच्या कथेची यात मांडणी आहे.

अडीच हजार प्रवासी घेऊन हि बोट जपानला परतणार होती. पण पुढे वाढून ठेवलेल्या संकटाची कोणालाही चाहूल नव्हती. (या बोटीवरच्या लोकांची कहाणी उलगडताना लेखिका आपल्याला चौदाव्या शतकात घेऊन जाते. क्वारंटाईन या शब्दाचा अर्थ येथे उलगडतो.)

२०२० च्या जानेवारीमध्येच हळू हळू COVID ने प्रवाश्यांचा कब्जा घेतला. त्याचबरोबर मेडिकल आयसोलेशन किंवा विलगीकरण यांसारखे पर्याय राबवले गेले, पण त्यासाठी एवढ्या माणसांना बोटीवर जागा नव्हती.

माणसं सगळीकडे सारखीच याचा प्रत्यय याही प्रकरणात येतो, एन-९५ मास्क चा परिचय आपल्याला इथे होतो. त्या काळी हे मास्क फक्त वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठी होते.

 

corona suit inmarathi
jewishtelegraphicagency.com

 

बोटीवर प्रवाश्याना सामान्य खबरदारीचे उपाय योजायला सांगितले गेले. परंतु ते पुरेसे नव्हते आणि परिस्थिती गंभीर होऊ लागली. मात्र हळू हळू परिस्थिती कठीण होऊ लागली आणि मोठ्या प्रमाणात कोरोना चा उद्रेक झाला.

भारतीय कर्मचारी सोनाली ठक्कर हिचा परिस्थिती सांगतानाच विडिओ भारतात व्हायरल झाला. आणि भारतात चक्र हलू लागली. १० जणांना झालेली बाधा ७०० जणांना आजारी पाडून आणि ७ जणांना मृत्युमुखी धाडून थांबली.

फसलेल्या क्वारंटाईनचा हा एक उत्तम नमुना. त्याचबरोबर विशिष्ट गुणसूत्रांच्या रचनेमुळे तसंच धूम्रपानाची सवय कमी असल्याने स्त्रिया या पुरुषांपेक्षा जरा अधिक सक्षम आहेत हे जग समजू लागले.

“बदललेली समीकरणं ” हे बारावं प्रकरण आंतरराष्ट्रीय संबंधांवर भर देणारं आहे. एखाद्या वेगाने चालणाऱ्या गाडीच्या चाकाखाली एखादा दगड यावा आणि गाडीचा तोलच जावा तसं जगाचं या टीचभर विषाणू ने केलं.

जगभरात राजकारण, व्यापार आणि भू राजकीय संबंध बदलायला लागले. थोडक्यात, शीतयुद्धाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन भारताच्या परराष्ट्र धोरणावर मृदुला बेळे येतात.

अमेरिका चीन संबंध हा त्यातला एक मुद्दा. ट्रम्प च्या हाताखालील अमेरिकेचा आत्ममग्नपणा आणि त्याचबरोबर अंगावर आल्यावर शिंगावर घेणारा चीन असं हे भावी शीतयुद्ध आणि सर्वात मोठा साथीदार विरुद्ध सर्वात मोठा आणि बलाढ्य शेजारी या कत्रीतला भारत अशी हि मांडणी आहे.

चीनच्या डोक्यावर सकल उत्पनाच्या ३०० टक्क्याहून अधिक कर्ज आहे (आणि आता चीनच्या बँकांनीही मान टाकायला सुरुवात केलेली आहे). युरोपियन युनियन किंवा युरोपियन समुदाय कसंही करून टिकवायचं आव्हान आहे.

त्याच वेळेला जगभरातल्या टाळेबंद्या आणि तेलाची घटलेली मागणी यामुळे मध्य पूर्वेतलं अर्थकारण डबघाईला आलेलं आहे. आफ्रिकेत ना अंतर्भान पालन शक्य ना स्वच्छता! तर रशिया कोरोना समोर नामोहरम झालेला!

थॉमस होब्स या विचारवंतांची लोकांनी एकत्र येऊन बनवलेल्या लेवीयाथन सरकारची आठवण इकडे येते. म्हणजे सरकार लोकांनी निवडलेलं, पण लोकांवर मोठा नियंत्रण ठेवणारं. जगभरात उदयाला आलेले राष्ट्रवादी नेते हे जमवू शकतात.

पुढील काळामध्ये चीन वरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आत्मनिर्भरची हाक त्याचसाठी. पण ही आत्मनिर्भरता ‘थिंक ग्लोबल अँड ऍक्ट लोकल’ अशी हवी; केवळ स्वदेशी हे सर्वस्व नको.

 

aatmnirbhr bharat abhiyan inmarathi
sarkariyojana.com

 

लेखिका ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारला नाही असं म्हणतात, प्रत्यक्षात तो मोदींच्या काळात १३० वरून ६३ वर आला आहे. पण तरीही आपल्याकडे जटील कायदे आणि झारीतल्या शुक्राचार्यांसारखी नोकरशाही, तसेच बिजली -सडक- पाणी हे मुद्दे यामुळे भारतासमोर संधी आणि आव्हानं दोन्ही प्रचंडच आहेत.

अशाअनेक गोष्टींचा परामर्श यात घेतला गेला आहे.

शेवटी “सर्वस्पर्शी… सर्वव्यापी… ” – लेखिका पुन्हा माणूस या विषयावर येतात. जगाचा माणसावर आणि माणसांचा जगावर परिणाम यामध्ये मांडला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम, याचाही लोकांवरचा परिणाम यात येतो.

शिक्षण देण्यातली आणि घेण्यातली आव्हाने यात येतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तेवढे परिणामकारक नसतील, पण समर्थ पर्याय नक्की आहेत. आगामी काळात “वर्क फ्रॉम होम” हि संस्कृती रुजेल ज्यात कंपन्या आणि कर्मचारी या दोघांचाही फायदा होईल.

 

online learning inmarathi2
omidyarnetwork.in

 

सोबतीला पर्यावरण रक्षण. नाती बदलतायत, काही ठिकाणी कौटुंबिक अत्याचार वाढतायत तर काही ठिकाणी नव्याने प्रेम फुलतंय. एकंदरींतच कोरोनाने जगावर परिणाम केलाय जे बंदिस्त हि झालंय आणि जवळही येतंय.

मानवी आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, रसायनशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, जीव शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, आतंरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि सार्वजनिक आरोग्य तसंच एकूण प्रशासन आणि एकूणच राज्यकारभार या अंगांना स्पर्श करायचा लेखिकेचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

त्यामुळे पुस्तक बहुमितीय झालं आहे, पण हे सर्व विषय सेंद्रिय पद्धतीने एकमेकांमध्ये गुंफले गेले असल्याने एक हत्ती आणि काही आंधळे अशी कोरोनाबाबत वाचकांची परिस्थिती राहणार नाही असा मोठा प्रयत्न यात आहे.

अश्या प्रकारच्या कृतींची आणि लेखन शैलीची दोन वैशिट्ये असतात. रोचक शैली आणि सत्यकथांममुळे एका बैठकीत पुस्तक संपविण्याकडे वाचकाचा कल असतो.

दुसरं म्हणजे असं पुस्तक एकदाच वाचून आपल्याला बरंच काही ज्ञान प्राप्त झालं असाही भ्रम वाचकाला होऊ शकतो. पण तो भ्रमच होता हे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा वाचून कळतं.

लेखिकेने पुस्तकासाठी भले कितीही कष्ट घेतलेले असतील, पण वाचक तितका सर्वज्ञ असण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ. त्यामुळे पुस्तक वाचून व्यक्त होताना वाचकानेही काळजी घ्यावी.

यूपीएससीच्या विध्यार्थ्यांना मात्र आकाशाखाली पांढऱ्यावर जे काही समजणारं काळं आहे, ते वाचायची गरज आणि समज असते. त्यांच्यासाठी मानवी आरोग्य, विज्ञान, रसायनशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, जीव शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, आतंरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि सार्वजनिक आरोग्य तसंच एकूण गव्हर्नन्स याविषयावर एक उत्तम दस्तावेज उपलब्ध झाला आहे.

 

coronachya krushnachhayet book review inmarathi1
akshardhara.com

 

या पुस्तकाचा दुसरा भाग आला तर तो ही तितकाच परिणामकारक असेल.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?