' ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी! – InMarathi

ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बस मध्ये, रेल्वे मध्ये किंवा अगदी रस्त्यावरही जर ही “वेगळी”(तृतीयपंथी) माणसं दिसली तर आपण लगेच रस्ता बदलतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा हे तृतीयपंथी टाळ्या वाजवत पैसे मागायला येतात तेव्हा तर त्यांना चुकवण्याकडेच आपला कल असतो.

पण ही लोक कसे राहात असतील? स्वतःची गुजराण कशी करत असतील? याची आपल्याला काहीच कल्पना नसते. आताशा काही कायदे येत आहेत त्यामध्ये तृतीयपंथीयांना काही हक्क देण्यात येत आहेत.

 

transgender inmarathi

 

यासाठी या लोकांना संघर्ष करावा लागला आहे. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. त्यांच्याकडेही एक माणूस म्हणून बघायला हवं हा दृष्टिकोन वाढत आहे.

आता तृतीयपंथीयांची एखाद्या प्रश्नावर एकजूटही होताना आपण पाहतो. अशाच काही तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन आपला एक व्यवसाय केरळ मध्ये सुरू केला आहे. ज्याला आता लोकांकडून प्रतिसादही मिळत आहे.

स्वाभिमानाने जगण्याचा एक मार्ग त्यांना आता सापडला आहे.

“ओरुमा” या नावाचं कॅन्टीन आता केरळ मध्ये पलक्कड येथे सुरू झालं आहे. सध्या तिथे दहा तृतीयपंथी लोकं काम करतात. ओरुमा या शब्दाचा अर्थ आहे एकी. हे कॅन्टीन याच तृतीयपंथीय लोकांनी काढलं आहे.

खरं तर हे कँटीन सुरू होऊन जेमतेम सात-आठ महिने झालेत. म्हणजेच डिसेंबर २०१९ मध्ये हे कँटीन सुरू झाले.

येथे काम करणारे हे दहा लोक हिरव्या रंगाच्या चेक्सच्या अँप्रन मध्ये ग्राहकांना जेवण द्यायला तयार असतात.

ओरुमा या कॅन्टीनमध्ये केरळ मधले वेगवेगळे प्रसिद्ध खाद्यपदार्थ मिळतात. ज्यामध्ये वेगवेगळे स्नॅक्स, पुट्टू, क्रिस्पी वडा, सांबर अवियल, कडला, मासे, वेगवेगळ्या भाज्या या डिशेस मिळतात.

कॅन्टीन मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून काम चालू होतं ते संध्याकाळी सहा पर्यंत चालतं. काम सुरू झाल्यापासून एक मिनिटही त्यांना विश्रांती साठी वेळ नसतो.

सकाळी हे सगळे लोक एकत्र आल्यावर त्यांचा दिवसभरातला मेनू ठरतो. आधी कोणताही मेनू ठरलेला नसतो. त्यांच्याकडे असलेलं सामान पाहून मेनू ठरवला जातो.

 

transgender canteen inmarathi

 

हे कॅन्टीन चालवते ती मीरा. तिच्याकडे तिने आत्तापर्यंत भोगलेल्या अनेक दुःखद गोष्टी आहेत. परंतु या कॅन्टीनमध्ये आल्यानंतर मात्र या सगळ्यांच्या बरोबर काम करताना, हसताना ती आपल्या दुःखाला विसरते.

आता कॅन्टीनची जबाबदारी तिच्यावरच आहे. त्यामुळेच तिथे बनणारी प्रत्येक डिश ही योग्य, स्वच्छ आणि पोषक असावी याबद्दल ती दक्षता बाळगते.

तिथे बनणारा प्रत्येक पदार्थ हा फ्रेश असावा आणि त्याला घरगुती चव असावी याची दक्षता घेतली जाते. विकतचे कुठलेही तयार पदार्थ तिथे आणले जात नाहीत. तिथे जे काही मिळतं ते या दहाजणी मिळूनच बनवतात.

विशेष म्हणजे लोकांना या कॅन्टीन विषयी माहिती व्हावी, तिथे कशा प्रकारचं काम चालतं हे कळावं यासाठी हे कॅन्टीन ओपन डोअरच आहे.

त्यामुळे तिथे असणारी स्वच्छता, पदार्थ बनवताना घेतली जाणारी काळजी हे येणाऱ्या ग्राहकांना दिसून येते. लोकांना आकर्षित करण्यासाठी हे असं करणं गरजेचं होतं असंही त्यांना वाटतं.

हे कँटीन उघडण्यात आले होते, ते केरळ सरकारच्या कुडुंबश्री या योजनेअंतर्गत. महिला सक्षमीकरण आणि गरिबी दूर करण्यासाठी ही योजना आहे. म्हणजे या अशाच लोकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी ही योजना केरळ सरकारने काढली आहे.

या दहा जणांना ट्रेनिंग ही देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेचा या योजनेला पाठिंबा आहे. सध्या तरी फक्त पलक्कड मध्येच या योजनेला मान्यता मिळाली आहे.

कदाचित ओरुमाच्या यशस्वीतेनंतर केरळ मधल्या इतर जिल्ह्यातही ही योजना लागू केली जाईल. ओरुमा सुरू झाल्यापासूनच त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.

 

oruma inmarathi

 

तशी या कॅन्टीनची जागा छोटी आहे पण पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या दक्षता तिथे घेतल्या गेल्या आहेत. पूर्ण स्वच्छता पाळण्यात येते. मुख्यतः लोकांच्या डोळ्यासमोर तिथे पदार्थ बनत आहेत.

शिवाय पदार्थांसाठी ठेवलेली किंमत ही सगळ्यांना परवडेल अशीच आहे. अगदी दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच हे पदार्थ मिळतात.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायच्या आधीपासून हे कँटीन सुरू झालं होतं. त्यामुळे तिथे जाणारे तिथले नियमित कस्टमर नितीन मॅथ्यू म्हणतात की –

तिथे मी रोजच चहा घेत होतो. तशी जागा छोटी असल्यामुळे पदार्थ मिळण्यासाठी वाट पाहावी लागते पण पदार्थ खूपच चविष्ट असल्यामुळे त्याचंही काही वाटत नाही.

अगदी या लॉकडाउनच्या काळातही काही सरकारी कार्यक्रमांसाठी, खाजगी कार्यक्रमांसाठी ओरुमा या कॅन्टीन मधून पदार्थ मागवले गेले. त्यामुळेच या लॉकडाउनच्या काळातही हे कॅन्टीन कमी प्रमाणात का असेना पण चालू होतं.

त्यामुळेच आम्हाला आता खूप प्रोत्साहन मिळाले आहे असं तिथली सलमा म्हणते. इथे काम करणाऱ्या या महिलांना आधी अनेक अपमान सहन करावे लागले आहेत. घरातूनही त्यांना विचित्र वागणूक मिळाली आहे.

काही जणींना तर घरही सोडावे लागले आहे. काहीना उपजीविकेसाठी सेक्सवर्कर म्हणूनही काम करावे लागले आहे. पोट भरण्यासाठी पैसेही मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे.

याशिवाय समाजातील अवहेलना तर त्यांना चुकलेली नाही. परंतु आता कॅन्टीनमुळे त्यांना त्यांची ओळख निर्माण करता येत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कॅन्टीन साठी ही जागा दिली आहे.

 

oruma hotel inmarathi

 

त्यांच्या कॅन्टीन मधील पदार्थांची विक्री दिवसाला नऊ हजार ते दहा हजार रुपये इतकी आहे.

या कॅन्टीन मुळे आम्हाला आता आमची ओळख मिळत आहे, असं तिथे काम करणारी सलमा म्हणते. आता लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हे लक्षात येतं असंही तिचं म्हणणं आहे.

त्यामुळे आमच्याही मनाला आता शांतता मिळत आहे, समाधान मिळत आहे. आणि आता आपणही स्वयंसिद्ध होत आहोत याचा अभिमानही वाटत आहे असे एकूणच तिथे काम करणार्‍या त्या १० व्यक्तींचे म्हणणे आहे.

आता लॉक डाऊन संपला आहे, जीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे आता आमच्या कॅन्टीनलाही चांगले दिवस येतील हा विश्वास त्यांना वाटत आहे. हे कॅन्टीन फक्त केरळमधील आदर्श उदाहरण ठरणार नसून संपूर्ण देशभरातच हे उदाहरण लागू पडू शकते.

म्हणूनच हे कॅन्टीन व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव त्या दहा जणांना आहे.

हे असे अनेक उपक्रम राबवले तर नक्कीच तृतीयपंथी लोकही देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील आणि इतर सर्व लोकांप्रमाणेच कामही करतील.

वर्षानुवर्ष तृतीयपंथीयांची झालेली अवहेलना, अन्याय यामुळे नक्कीच दूर होईल. कितीही झालं तरी सन्मानपूर्वक जगणं कोणाला आवडणार नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?