'तथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : "प्रोपागंडा" (भाग१)

तथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रोपागेंडा (Propaganda) अथवा  प्रचारशास्त्र हे राजकारणातील एक अत्यंत गरजेचे आणि प्रभावी अस्त्र आहे; ज्याला राज्यपद मिळवायचे आहे, अथवा टिकवायचे आहे, त्याची या तंत्रावर हुकुमत असणे अत्यंत गरजेचे आहे.  “प्रोपागेंडा” हा मुळ इंग्रजी शब्द  प्रचलित असल्यामुळे, ही काहीतरी अलीकडल्या काळातील भानगड असावी असे वाटण्याचा संभव आहे. पण प्रत्यक्षात राजकारणामध्ये प्रचारतंत्राचा वापर हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.  जगज्जेता अलेक्झांडर (इ. पूर्व चौथे शतक) ने त्याच्या जग जिंकण्याच्या मोहिमेमध्ये आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च राहावे आणि विरोधी राजांनी हतबल व्हावे म्हणून, आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त आहेत, देवी-देवता प्रसन्न आहेत अशा प्रकारचा सर्रास प्रचार केल्याचे उल्लेख आहेत. गेल्या दोन हजार वर्षात अशा प्रकारचे अनेक दाखले देता येतील.

propaganda-media-controls-us-marathipizza

स्रोत

मात्र प्रोपागेंडा हा शब्द खऱ्या अर्थाने (आणि मूळ इंग्रजी रुपात) चलनात आला तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात.

नाझी जर्मनी मध्ये, हिटलर ने आपल्या सरकारच्या विचारांचा प्रचार व्हावा म्हणून एक खास प्रचारमंत्रीच (Propaganda minister) नेमला होता. या खात्याचा कार्यभार सांभाळणारा डॉ जोसेफ गोब्बेल्स हा कुणी साधासुधा मनुष्य नव्हता. हिटलरच्या खालोखाल पक्षात ज्या दोघा-तिघांचा क्रमांक लागायचा त्यापैकी एक म्हणजे डॉ गोब्बेल्स. हिटलरने आत्महत्या केल्यानंतर एका दिवसासाठीच का होईना पण तो जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला होता! हिटलर च्या अनुपस्थितीतसुद्धा नाझी पक्षाच्या सभेला गर्दी खेचण्याचे सामर्थ्य एकट्या गोब्बेल्स कडे होते. या माणसाने प्रचारतंत्रात अनेक नवनवीन क्रांतिकारी बदल केले. आणि अशा कार्यक्षम माणसाला प्रचारमंत्री नेमून, प्रोपागेंडा हा आपल्या सरकारच्या वाटचालीसाठी  किती महत्वाचा कार्यक्रम असणार आहे हे हिटलरने दाखवून दिले.

joseph-goebbels-nazi-minister-marathipizza
हिटलर चा “प्रचार मंत्री” – गोबेल्स. स्रोत: europeanpost.co

पण केवळ नवनवीन मार्गांनी स्वत:च्या विचारांचा प्रसार करूनच नाझी पक्ष थांबला नाही; तर  सत्ता हाती आल्यावर काही दिवसांतच , पक्षाने आपल्या विचारधारेशी न मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या पुस्तकांची होळी – अगदी धार्मिक पुस्तके देखील – बर्लिन विद्यापीठाच्या चौकात साजरी केली.

इथून पुढे आपल्याशी विसंगत वाटणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचूच न देणे…दुसऱ्या शब्दात, लोकांनी काय विचार करावा आणि काय करू नये, याची सूत्रे आपल्या हातात घेणे. हा डॉ. गोब्बेल्स चा आणि त्याच्या प्रचार मंत्रालयाचा कार्यक्रम झाला. प्रोपागेंडा या शब्दाला काहीसे हिणकस स्वरूप आले आहे ते तेंव्हापासून.

हे सर्व इतके विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे – जरी गोब्बेल्सच्या कार्यपद्धतीचा जगातील सर्व मानवतेची मुल्ये जपणाऱ्या, शांतताप्रिय इ. इ. देशांनी मनसोक्त निषेध केला असला तरी देखील याच तंत्राच्या जोरावर नाझीपक्षाने एकसलग, बिनविरोध दहा बारा वर्षे  सत्ता अनुभवली हे वास्तव सराईत राज्यकर्त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते!

गोब्बेल्सचा विरोधकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचूच न देण्याचा प्रयोग हा इथून पुढे कमी अधिक प्रमाणात बहुतेक राज्यकर्त्यांनी आचरणात आणला. काही कम्युनिस्ट आणि/किंवा हुकुमशहांनी  उघडपणे हा उद्योग आरंभला तर इतरांनी तोंडात उदात्त भाषा ठेवून पडद्यामागे सुरू ठेवला. शेवटी एकहाती सत्ता प्रत्येकालाच हवी असते. या प्रयोगाला चालना मिळावी अशा दोन गोष्टी विशेषकरून या काळात घडल्या.

पहिली म्हणजे  संदेशवहनाचा गेल्या शतकात झपाट्याने झालेला विकास – जसे की वृत्तपत्रे, रेडीओ, टीव्ही इ. यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवणे सोपे झाले.

television-influence-marathipizza

दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्यामुळे इथून पुढे समोरासमोर युद्धाची शक्यता कमी झाली आणि त्याची जागा शीतयुद्धाने घेतली!

जग कम्युनिस्ट आणि भांडवलशाही अशा दोन परस्परविरोधी विचारधारेत विभागले गेले. स्वत:च्या विचारधारेचे जगभरात पाठीराखे तयार करणे ही अमेरिकेची आणि सोव्हिएत रशियाची एक गरजच होऊन बसली! आजच्या जागतिकीकरणाच्या काळात  आपली उत्पादने जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचावीत यासाठी , ज्याप्रमाणे मार्केटिंग किंवा PR (Public relations) अशा नवीन शाखांची निर्मिती झाली आहे; त्याचप्रमाणे पन्नास-सत्तर वर्षापूर्वी आपले राजकीय विचार प्रभावीपणे लोकांपर्यंत नेऊ शकणाऱ्या एजंटांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले…अशा लोकांना आज आपण “बुद्धीवादी” या नावाने ओळखतो!!

भारत, बुद्धीवादी, पुरोगामी आणि प्रोपागेंडा :

जागतिक राजकारणाच्या प्रवाहात स्व-प्रचाराला आणि त्या योगाने बुद्धीवादी वर्गाला कसे महत्व प्राप्त झाले – हा इतिहासाचा एक भाग झाला. भारताचा राजकारणात या अनुषंगाने काय काय बदल घडले? बुद्धीवादी लोक स्वत:ला पुरोगामी का म्हणू लागले किंवा पुरोगामी लोक “आपणच काय ते बुद्धीवादी” असा अहंगंड का बाळगू लागले? या सगळ्याचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे.

भारतात ब्रिटीश सत्तेला सुरुवात झाली तसा पाठोपाठ ब्रिटीश प्रोपागेंडा देखील भारतात सुरु झाला. भारतीयांच्या प्रेरणास्थानांवर, श्रद्धास्थानांवर घाला घालणे, भारतीयांना स्वत:च्या रूढी-परंपरा-संस्कृतीची – थोडक्यात भारतीय असण्याचीच – लाज वाटायला लावणे यासारख्या अनेक गोष्टी ब्रिटिशांनी केल्या. भारतीय समाजात त्या काळी कित्येक भयानक रूढी, प्रथा परंपरा होत्या हे खरे. पण अशा अन्याय्य प्रथांचे निर्मुलन करणारे लोक देखील भारतीय समाजातूनच स्वयंप्रेरणेने पुढे आले हे ही तेवढेच खरे! त्यापैकी जे स्वत:ला सोयीस्कर  होते ते समाजसुधारक ब्रिटिशांनी उचलून धरले. एरव्ही  विचारस्वातंत्र्य इत्यादी लोकशाही मुल्यांचा उद्घोष करणारे ब्रिटीश, आपल्या राजसत्तेच्या विरोधी विचार लोकांपर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजी घेत.  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये लिहिलेल्या “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” या पुस्तकावर ब्रिटिशांनी प्रकाशनाच्या आधीच बंदी आणली होती, यावरूनच काय ते ओळखावे! प्रकाशनदेखील होण्याआधी बंदी आणण्याचे दुसरे उदाहरण मला तरी माहित नाही.

स्वत:ला सोयीस्कर विचारांचा प्रसार करणाऱ्यांना पुरस्कृत करणे, मानसन्मानाची पदे देणे या सारख्या गोष्टींना ब्रिटीश कारकिर्दीतच सुरुवात झाली होती. पण  उत्तरकाळात ब्रिटीशांची मुख्य अडचण ही होऊ लागली की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे नेते – नेहरू, आंबेडकर, बोस, पटेल, गांधी, टिळक – हे सगळे स्वत:च उच्चविद्याविभूषित होते! एकतर यातले बहुतेकजण लंडनला जाऊन बरीस्टर होऊन आले होते, तर सुभाषबाबू, अरबिंदो घोष हे आयसीएस पास झाले होते. त्यामुळे ब्रिटीश पुरस्कृत विद्वानाचे कार्यक्षेत्र हे मानसन्मान पदरात पाडून घेणे आणि शिक्षण-समाजकल्याण वगैरे खात्यात वर्णी लावून घेणे आणि तिथून मायबाप सरकारने दिलेला बरावाईट कार्यक्रम पार पडणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील जोवर नेहरू-आंबेडकर-डॉ राधाकृष्णन यांसारखे विचारवंत-राजकारणी जोवर सक्रीय होते तोवर बुद्धीवादी वर्ग आपल्या मर्यादेतच होता; आजच्यासारखा डोईजड झाला नव्हता.

इथून पुढे जागतिक राजकारणाचे प्रवाह भारतीय राजकारणाशी सुसंगत होतात! आधी सांगितल्याप्रमाणे हा कालखंड शीतयुद्धाचा आणि स्वत:ची  विचारधारा पसरवण्याचा आहे. या काळात अनेक कम्युनिस्ट राजवटी आल्या, अनेक नवीन हुकुमशहा (कम्युनिस्ट किंवा  बिगर कम्युनिस्ट) झाले. भारतापुरते म्हणाल तर  पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यकाळात एका छोट्या मर्यादेत हे दोन्ही प्रयोग झाले. इंदिरा गांधीनी आपल्या कार्यकाळात स्वत:कडे एकहाती सत्ता घेण्याचा प्रयोग करून बघितला आणि कोन्ग्रेस ला जरी कम्युनिस्ट बनवले नाही तरी त्यांच्या बरेच जवळपास नेऊन ठेवले.  यापूर्वीची कोन्ग्रेस ही डाव्या-उजव्या आणि इतर अनेक विचारसरणीची संमिश्र संघटना होती. तिचे हे सर्वंकष रूप इथून पुढे बदलले. (अधिक माहितीसाठी माझ्या ब्लॉग वरील हा इंग्रजी लेख नक्की वाचावा: An interesting, true story… about us )

या दोन्ही कामासाठी – म्हणजे हुकुमशहा बनण्यासाठी आणि विशिष्ट विचारसरणीचाच प्रसार करण्यासाठी – पोलिटिकल पी.आर. ची अत्यंत तीव्र निकड असते – ती या बुद्धीवादी वर्गाने तत्परतेने पूर्ण केली. आणि मग राज्यकर्ते डाव्या विचारसरणीचे – म्हणून बुद्धिवादी देखील डाव्या विचारसरणीचे किंवा “पुरोगामी” झाले.

propaganda-by intellectuals-02-marathipizza

 

propaganda-by intellectuals-01-marathipizza

 

propaganda-by intellectuals-03-marathipizza

बुद्धिवादी डाव्या विचारसरणीचा असायला हरकत नाही, पण इथे गम्मत म्हणजे – “जो पुरोगामी नाही बुद्धिवादी नव्हेच”असा उलटा पवित्रा आता बुद्धिवाद्यांनी घेतला.  त्याला विरोध म्हणावा असा कुणाचाच झाला नाही, कारण बुद्धिवाद्यांचे आणि राज्यकर्त्यांचे साटेलोटे. इथून पुढच्या काळातील पंतप्रधानांची नावे जरी पहिली तरी त्यामध्ये एखाद दुसरा अपवाद सोडून कुणी विशेष ‘थोर विचारवंत’ म्हणावे असे नाव दिसत नाही.  शिवाय राज्यकर्ते जेवढे नाकर्ते, तेवढी त्यांना राज्य टिकवण्यासाठी प्रोपागेंडा निर्माण करायची गरज अधिक. आणि म्हणून बुद्धीवादींवर भिस्त देखील अधिक!  हळूहळू राज्यकर्ते सत्तेची समीकरणे सांभाळण्यात गढून गेले आणि विचारनिर्मितीचा कार्यक्रम हा बुद्धीवाद्यांकडे ‘आउटसोर्स’ झाला!

विशेषतः गेल्या दशकाकडे पाहिल्यास ही बाब अजूनच अधोरेखित होते. एकीकडे युपीए सरकारचा दिशाहीन कारभार, दुसऱ्या बाजूने  तंत्रज्ञानाने घेतलेली झेप आणि तिसरीकडे 24 x7 प्रकारातील इलेक्ट्रोनिक मिडियाचे आत्मप्रौढीने भरलेले युग…या सगळ्यांचा परिणाम म्हणजे “मी म्हणेन तोच विचार आणि मी सांगेन तीच मुल्ये” अशा अहंकाराने भरलेला आजचा बुद्धीवादी-कम-पुरोगामी वर्ग तयार झाला. माझ्या पाहण्यातील बहुतेक पुरोगाम्यांना, पुरोगामी सोडून इतर सर्व लोक – पक्षी प्रतिगामी – हे ही बुद्धिवादी असू शकतात यावर मनापासून विश्वास ठेवणे कठीण जाते. चातुर्वर्ण्यव्यवस्थेला विरोध करता करता आपणच नवी वर्णव्यवस्था जन्माला घालत आहोत आणि त्यातील विचारांची ठेकेदारी स्वत:कडे ठेवत आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही!

बुद्धीजीवी वर्गावर एका विशिष्ट गटाची ही मक्तेदारी तशीच अबाधित राहिली असती. पण एका तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी ती हस्तगत केली (इलेक्ट्रॉनिक मिडिया) आणि दुसऱ्या तंत्रज्ञानाने (सोशल मिडिया) त्याला सुरुंग लावला!

(क्रमश:)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)

  • March 26, 2019 at 8:11 am
    Permalink

    ना काही पुरावे नाही कुठल्याच तथाकथित पुरोगामी लोकांचे objectionable विचार…. भरकटलेला लेख (किंबहुना त्याहून वाईट) वर्णन करावं लागेल या लेखांचे….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?