' लॉकडाउन : घरोघरी स्वयंपाकाचं काम करणारी महिला मालकाच्या मदतीने झालीये "बिझनेस वुमन"

लॉकडाउन : घरोघरी स्वयंपाकाचं काम करणारी महिला मालकाच्या मदतीने झालीये “बिझनेस वुमन”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साध्या सुध्या माणसांची स्वप्नं पण साधीशीच असतात. त्यांना कोट्यावधीची कमाई..बंगले गाड्या याचं अप्रूप खरंच नसतं. तुम्ही साधं गोड बोला त्यांच्याशी..आपलेपणानं बोला. बघा, ती माणसं कशी खुश होऊन जातात.

गरजेपुरता पैसा, साधा निवारा आणि चिंतारहीत शांत झोप एवढ्याच गोष्टींवर जगभरातील दौलत असल्यासारखे ते तृप्त दिसतात. त्यांना ना ब्रँडेड कपडे हवे असतात, ना दाग दागिने.

प्रामाणिकपणे कष्ट करुन मिळालेली मीठ -भाकरी पण हे लोक आनंदाने खात असतात. यांच्या कष्टाळूपणाचं प्रामाणिकपणाचं फळ त्यांना काही ना काही रुपात नक्की मिळतं.

ही साधीशी कहाणी आहे बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सरोजदिदींची. लाॅक डाऊन,कोविड-१९ या जगावर आलेल्या आपत्तीनं अख्ख्या जगाचं शटर बंद केलं. मोठे मोठे उद्योग स्लो मोशनवर आले.

कितीतरी लोकांना रोजगाराला मुकावं लागलं.

 

unemployment inmarathi 1
telegraph.com

 

“जगण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरवीसी जगदिशा” म्हणायची वेळ माणसांवर आली.

बंद उद्योग धंदे, शून्य मिळकत, कोरोनाचं भय, रिकामे खिसे हे सारं घेऊन कितीतरी जणांनी गाव गाठलं. वाहनं नव्हती तर पायी प्रवास करत लोक आपल्या गावाकडं गेले.

पण अशाही परिस्थितीत काही लोकांनी आपलं काम असं काही चोख केलं, की त्यांचा व्यवसाय सहजावारी सुपरहिट ठरला. सरोजदिदी अशाच एक!!!

 

saroj didi banglore inmarathi4
deccanherald.com

 

बंगळुरू येथे राहणाऱ्या सरोजदिदी स्वयंपाकाचं काम करतात. लाॅक डाऊन झालं आणि सरोजदिदींनाही काही काळ घरात बसावं लागलं. घरोघरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सरोजदिदींचं हातावरचं पोट. काम बंद झालं..

बहुतांश अपार्टमेंट या कंटेनमेंट झोन ठरल्यामुळे सील झाल्या होत्या. कामवाल्या बायकांना कुणीही अपार्टमेंटमध्ये प्रवेश देण्यास तयार नव्हतं. काम न करता कोणीही पैसे द्यायला तयार नव्हतं. लाॅक डाऊन पण संपेना.

बरं, रोजचं जेवणखाण निघेल इतपत पैसा तरी मिळवणं आवश्यक होतं. मग बहुतेक सर्वांनी काळजी घेत कामं सुरु करायची तयारी दाखवली. सरोजदिदी पण आपापल्या कामांवर हजर झाल्या.

अंकित वेंगुर्लेकर हे त्या मालकांपैकी एक जिथं त्या काम करत होत्या.

अंकित वेंगुर्लेकर यांनी सरोजदिदींना एक कल्पना सुचवली. “सरोजदिदी, तुम्ही स्वयंपाक छान करता तर तुम्ही जेवण बनवून द्यायला सुरुवात करा.”

 

saroj didi banglore inmarathi1
localsamosa.com

 

आता नुसती कल्पना सुचणं हाच खयाली पुलाव होता. त्यासाठी लागणारी जागा, गॅस, सामान हे कसं जमवायचं? अंकित मोठ्या मनाचा माणूस. त्यांनी आपलंच किचन वापरायला परवानगी दिली.

सतरा वर्षांपूर्वी सरोजदिदी आणि त्यांचा नवरा छोटासा फूड स्टाॅल चालवत होते हे अंकितला माहीत होतं. त्यादिवशी सरोजदिदींनी केलेल्या खेकड्याची करीचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला.

पहिल्याच दिवशी सरोजदिदींना ५ आॅर्डर आल्या. आणि दुसऱ्या दिवशी याच आॅर्डर होत्या १५.

या आॅर्डर मिळण्याचं प्रमुख कारण होतं.. घरगुती पदार्थ!!! कारण घरगुती पदार्थ हे अतिशय निगुतीने आणि स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करतच केले जातात. या आॅर्डर दिवसागणिक वाढतच होत्या.

 

 

या वाढत्या आॅर्डर कशा पद्धतीने पुरवाव्यात ही चिंता अंकितला पण वाटू लागली. कारण त्यांची स्वतःची नोकरी चालूच होती. तो एकटाच रहायचा. ते घर, कंपनीची कामं हे सगळं जमवावं कसं हाच आता प्रश्न होता.

भले सरोजदिदी त्याला पदार्थ तयार करुन देतील, पण ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं? नोकरी तर चालू होती त्याची!!! ती तर सोडणं शक्य नव्हतं. मग आता करायचं काय?

अंकित ट्विटरवरुन सरोजदिदींच्या चविष्ट पदार्थांची जाहिरात करायचा. आणि तेथून त्याला फाॅलो करणारे लोक आॅर्डर देत किंवा मेनू, दर यांची चौकशी करत. पण ते वेळेत ग्राहकांना देणं हे ही तितकंच महत्त्वाचं होतं.

मग त्याचा मित्र अंकितच्या मदतीला आला. त्यानं एका वेबसाईटचं नाव सांगितलं, तिथं आपलं नांव नोंदवा हेही सांगितलं. म्हणजे आपल्याकडं जसे झोमॅटो, स्वीगी आहेत ना तशीच तिकडंही एक साईट आहे कोनोश.

ही वेबसाईट खास खाद्यपदार्थ बनवणाऱ्या लोकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये दुआ साधण्याचं काम करते. तिथं‌ अंकितनं सरोजदिदींचं नांव नोंदवलं आणि जे काम कसं करावं; हा यक्षप्रश्न वाटला होता तो चुटकीसरशी सुटला.

 

saroj didi banglore inmarathi2
www.iforher.com

 

कारण पदार्थ करणं हे एकवेळ…एकवेळच सोपं मानू. तसं ते सोपं नसतंच. उत्तम स्वयंपाक जमणं ही एक तपश्चर्या आहे. ती सरावानेच जमते, पण तो उत्तम जमलेला पदार्थ ग्राहकांना योग्य वेळेत, योग्य दरात पोचणं पण महत्त्वाचं असतं.

‘नाहीतर खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आना’ अशी गत होती. नवीन व्यवसाय जम बसेपर्यंत खर्चही आवाक्यातच ठेवणं आवश्यक असतं.

खूपदा नवीन उत्पादने बाजारात आणताना उत्पादक त्यांच्या किंमती सामान्य लोकांना परवडणाऱ्या भावातच देतात. फार महाग ठेवत नाहीत.

मग तो जर देताना वाहतुकीची सोय करताना जर जास्त प्रमाणात खर्च झाला, तर तो एका प्रकारे नुकसानीचा बाजार ठरतो.त्यांचा हा प्रश्न कोनोशने सोडवला.

सरोजदिदींचे खाद्यपदार्थ योग्य दरात ग्राहकाभिमुख केले. अंकितचाही प्रश्न सुटला. आॅर्डर घ्यायचं काम तो नीटपणे करु शकतो, तर बाकीचं काम जड नव्हतं. पण कोनोशकडं रजिस्टर झाल्यानंतर तेही काम हलकं झालं.

कोनोशकडूनच ग्राहक मागणी नोंदवतात, तर पुरवठ्याचं कामही कोनोशच करतं.

आता सरोजदिदींचा व्याप वाढू लागला आहे. ४८ वर्षांच्या सरोजदिदी आपला व्यवसाय वावण्याचा विचार करत आहेत. कारण अंकितचं किचन फक्त एकाच माणसासाठी योग्य आहे.

ट्विटरवर अनेक मोठ्या शेफकडून सुद्धा अंकितच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय.

 

saroj didi banglore inmarathi3
storypick.com

 

वाढत्या आॅर्डर मध्ये तिथं काम करणं सरोजदिदींना अवघड होईल त्यामुळं त्या आपल्या जागेत व्यवसाय सुरु करतील.

कारण खवैय्येगिरी करणाऱ्या लोकांना सरोजदिदींच्या हातची करी आणि माशांच्या कालवणाची चव इतकी आवडली आहे, की अजूनही काही वेगळं करा अशी मागणी करत आहेत ते.

हळूहळू इतरही डिश बनवल्या जाणार आहेत. त्यांची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

गुरु ठाकूरची कविता इथं सार्थ वाटते.. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?