' नदीपात्राच्या बाजूला भक्कम उभा, ‘चोलटका रिव्हर ब्रिज’ शिकवतोय जीवनावश्यक धडा! – InMarathi

नदीपात्राच्या बाजूला भक्कम उभा, ‘चोलटका रिव्हर ब्रिज’ शिकवतोय जीवनावश्यक धडा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

एखाद्या नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असल्यास किंवा एखादी दरी ओलांडायची असल्यास आपण पुलाचा वापर करतो.

केवळ चालत जाता येईल अशा लहान पुलांपासून ते अगदी अवजड वाहनं सुद्धा जाऊ शकतील अशा भल्यामोठ्या आकाराचे अनेक पूल जगात अस्तित्वात आहेत.

जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं, तसतसं पूल बांधण्याची पद्धती सुद्धा बदलत गेली. अधिकाधिक उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून, अतिशय भक्कम पूल बांधले जाऊ लागले.

ऊन, पाऊस, वादळ, वारा अशा नैसर्गिक घटकांचा सामना करण्याची पुलांची क्षमता वाढू लागली.

 

howrah-bridge inmarathi
indianexpress.com

 

फारसे खांब उभे न करता, तारांच्या साहाय्याने अधांतरी पूल उभारण्याचे तंत्र सुद्धा विकसित झालं. अशा पुलाला, ‘सस्पेन्शन ब्रिज’ म्हटलं जातं.

जगभरात असे अनेक सस्पेन्शन ब्रिज दिमाखात उभे आहेत. मुसळधार पाऊस, वादळ, वारा अशा सर्व नैसर्गिक आपत्तींना पुरून उरण्याची क्षमता या पुलांमध्ये असते.

पावसानं कितिही थैमान घातलं, तरीही हे पूल मात्र भक्कमरित्या उभे असतात. प्रवाशांना, एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचे काम इमानेइतबारे करत असतात.

पण जर तुम्हाला असं सांगितलं, की जगात असा एक पूल अस्तित्वात आहे, जो तुम्हाला कुठूनही, कुठेही घेऊन जात नाही… आश्चर्य वाटेल ना?

‘कुठूनही, कुठेही नेत नाही असा ब्रिज कसा असेल?’ हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, खरोखरच असा एक ब्रिज अस्तित्वात आहे!!

अमेरिका खंडातील होंडुरस या देशात हा पूल उभा आहे. या देशातील चोलटका नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. ‘सस्पेन्शन ब्रिज’ या प्रकारातील हा पूल, आता प्रवासाकरिता वापरण्यासाठी निरुपयोगी ठरतो.

गमतीची गोष्ट अशी, की या पुलाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नसूनही, तो आता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.

 

suspension bridge inmarathi
medium.com

 

१९३० साली अमेरिकन सैन्याने सर्वप्रथम हा पूल बांधला. त्याकाळातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल बांधला गेला होता.

कॅरिबियन समुद्र आणि पॅसिफिक महासागर यांच्या सानिध्यात होंडुरस देश वसलेला आहे. येथील वातावरणात नेहमी बदल होत असतो. महासागरातील बदलांमुळे अनेकदा या देशाला वादळी हवामानाचा सामना करावा लागतो.

अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन, १९९६मध्ये या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली.

समुद्रीवादळ, चक्रीवादळ किंवा तत्सम कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पडणार नाही असा पूल बांधण्याचा निर्णय होंडुरस देशातील तत्कालीन सरकारने घेतला. यासाठी जगातील सर्वोत्तम आर्किटेक्ट बोलावण्यात आले. उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.

चोलटका नदीवर, एक अत्यंत मजबूत आणि टिकाऊ ब्रिज उभारला गेला. दुर्दैवाने, १९९८ साली होंडुरसमध्ये एक भयंकर वादळ आलं. पाचव्या श्रेणीतील, ‘मिच’ या वादळाचा तडाखा खूपच भयानक होता.

या वादळामुळे देशाचं खूप नुकसान झालं. अनेक इमारती, देशातील अनेक पूल उध्वस्त झाले.

 

mitch-hurricane inmarathi
independent.co.uk

 

मात्र असा हाहाकार होऊनही, चोलटका नदीवरील पूल मात्र तसाच उभा होता.

ब्रिजचे बांधकाम खरोखरच उत्कृष्ट होतं, याची पोचपावती मिळाली. मात्र ब्रिजचं कुठलंही नुकसान झालं नसतानाही तो त्यानंतरच्या काळासाठी निरुपयोगी झाला होता.

‘मिच’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून, चोलटका नदीची दिशाच बदलली. नदीचं पाणी, जे त्या पुलाखालून वाहत होतं, ते पात्र बदलून दुसरीकडून वाहू लागलं.

 

choluteca-river-bridge inmarathi
outes2resilience.org

 

मजबूत बांधकाम असलेला ब्रिज त्याच जागेवर व्यवस्थित उभा राहिला. मात्र चोलटका नदी त्याच्या बाजूने वाहू लागली.

ज्या हेतूने ब्रिजचे सर्वोत्तम बांधकाम करण्यात आले, तो हेतू साध्य झाला. मात्र हा ब्रिज त्यापुढील काळासाठी फक्त आणि फक्त निरुपयोगीच ठरला!!

अर्थात त्याचे मूळ काम करण्यासाठी अकार्यक्षम ठरलेला हा ब्रिज, आजही चर्चेचा विषय मात्र आहे. त्यानंतरच्या काळात, ‘चोलटका रिव्हर ब्रिज’ हे रूपक अत्यंत प्रसिद्ध झालं.

शिक्षणव्यवस्था, बिझनेस, नेतृत्व अशा अनेक विषयांमध्ये ‘चोलटका रिव्हर ब्रिज’ हे उत्तम उदाहरण म्हणून वापरले जाऊ लागले.

१९३० मधील शिक्षणव्यवस्था, शिक्षणपद्धती आणि आजच्या काळातील शिक्षणपद्धती यात मोठा फरक आहे. एका काळात उत्तम असणारी गोष्ट ही बदलत्या काळासाठी उत्तम ठरेलच असे नाही.

बदलत्या परिस्थितीचा आढावा घेणे आणि त्यानुसार स्वतःमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. शिक्षणपद्धती सुद्धा अशाचप्रकारे बदलत गेली, असं म्हटलं जातं.

हा बदल स्वीकारला नाही, तर तुमची अवस्था ‘चोलटका रिव्हर ब्रिज’सारखीच होऊन जाईल.

 

bridge-to-nowhere inmarathi
imaginethatcreative.net

 

चोलटका नदीवरील हा ब्रिज एका ठिकाणी सुरु होतो, आणि दुसरीकडे जाऊन संपतो. मात्र याचा वापर करून किंवा न केल्यामुळे काहीही फरक पडत नाही.

कोणतेही नेतृत्व कधीही असे असू नये. दिशाहीन नेतृत्व नेहमीच अपयशाचे मोठे कारण ठरते. अर्थातच, कुठल्याही नेत्याचे नेतृत्व ‘चोलटका रिव्हर ब्रिज’सारखे असता कामा नये.

डोळे बंद ठेऊन, अशा नेतृत्वाचा स्वीकार करून आपलेच नुकसान होते. कुठलाही बिझनेस करत असताना, पुढे होऊ शकणाऱ्या बदलांना तोंड देण्याची तयारी असायला हवी.

बिझनेस मार्केटमधील नदीचा प्रवाह बदलला, तरीही तुमचा ब्रिज, ती दरी भरून काढण्यासाठी सक्षम ठरायला हवा. तरच, व्यवसाय क्षेत्रात अपयशी न ठरता, टिकून राहणं आणि कार्यक्षम राहणे शक्य होईल.

मायक्रोसॉफ्टसारखी मोठी कंपनी याचे उत्तम उदाहरण ठरतं. मार्केटचा बदलता प्रवाह योग्यप्रकारे ओळखणं, आणि त्यानुसार नवनवे ब्रिज उभारणं या बिग जायंटला नेहमीच जमलं आहे.

 

microsoft-inmarathi

 

उत्तम लेखक, मोटिव्हेशन स्पीकर आणि लीडरशिप गुरु प्रकाश अय्यर, ‘चोलटका रिव्हर ब्रिज’कडे आणखी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात.

त्यांचं असं म्हणणं आहे, की हा ब्रिज आपल्यासाठी एक फार मोठा मार्गदर्शक ठरतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना, बदलत्या स्थितीचा विचार करायला हवा.

आपल्या मार्गात उभा राहणाऱ्या समस्या पुढील काळात बदलू शकतात, याचाच विचार आपण बऱ्याचवेळा करत नाही. तुमच्या क्षेत्रातील नवीन शिक्षण घेताना, ते तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपयोगी ठरेल का, याचा विचार करायला हवा.

तुमचा व्यवसाय मोठा व्हावा, यासाठी नवीन पाऊल उचलण्याआधी पुन्हा विचार करा.

आपण करत असलेली कुठलीही गोष्ट येत्या काळात तशीच असेल, की बदलत्या कालानुरूप बदलेल याचा आपण विचार करत नाही, असं प्रकाश अय्यर म्हणतात.

आपल्यासमोर सध्या उभी ठाकलेली समस्या लक्षात घेऊन आपण उत्तरं शोधात असतो. मात्र, ही समस्याच बदलू शकते, याचा विचारच आपण करत नाही.

आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे, विशेषतः करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. परिस्थितीला जुळवून घेण्याची तयारी आपण ठेवायला हवी.

‘चोलटका रिव्हर ब्रिज’कडे पाहिलं, की या गोष्टीची जाणीव आपल्याला होत राहील, असं प्रकाश अय्यर यांचं म्हणणं आहे.

जगाचा बदलता प्रवाह समजून घेणं आणि त्यानुसार आपल्या आयुष्यातील ब्रिज बांधत राहणं हाच यशाचा उत्तम मार्ग आहे…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?