' फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय? – InMarathi

फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका छोट्या राज्याचा वाटावा एवढा अवाढव्य आर्थिक पसारा मुंबई महा नगरपालिकेचा आहे. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं हे महत्व ओळखून शिवसेनेची पाळंमुळं मुंबईत घट्ट रोवून ठेवली आहेत. एक तर स्वतः बाळासाहेब हेच चमत्कारिक रसायन. त्यात त्यांना मिळालेली मुंबईतील मराठी सैनिकांची आजन्म साथ – ह्यामुळे “मुंबईत सेनाच!” हे ब्रीद श्वास होऊन बसलाय. इतका, की कट्टर भाजप समर्थक आणि इतर वेळी ‘स्थानिक पक्षांनी देशाचं नुकसान केलंय, देशात फक्त राष्ट्रीय पक्षच असावेत’ असं मत असणारे काही मुंबईकर, मुंबई मनपा निवडणूक आली की बरोब्बर, आपोआप ‘मुंबईत सेनाच!’ ची आरोळी ठोकतात.

balasaheb thakrey google search collage marathipizza

बाळासाहेबांची ही पुण्याई घेऊन उद्धव ठाकरे आता शिवसेना पुढे नेत आहेत. २०१४ लोकसभा निवडून ते आत्ताच्या २०१७ मुंबई मनपा निवडणूक – आतापर्यंत उद्धव ठाकरेंचं कौशल्य, वक्तृत्व उभा महाराष्ट्र आजमावत आला आहे. महाराष्ट्र विधानसभा, कल्याण डोंबिवली मनपा आणि आत्ताच्या मुंबई मनपा निवडणूक ह्या उद्धवजींच्या कौशल्याची चरम परीक्षा बांधणाऱ्या होत्या. त्यात ठाकरे उत्तीर्ण झाले किंवा नाही हे आपापल्या राजकीय ओढयानुसार ठरवलं जाईल. परंतु मुंबई मनपा निवडणूक शिवसेनेच्या वाघाच्या गळ्याशी होती – हे कुणीच नाकारू शकत नाही. आजच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेने ठाकरे ही लढाई जिंकलेत असं वातावरण सेना समर्थकांत दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा अशी आहे –

महापौर, उपमहापौरपदासह स्थायी, सुधार समित्यांसारख्या कोणत्याही महत्त्वाच्या समित्यांच्या तसेच बेस्टच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढणार नसून केवळ महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक होतो की नाही यावर नजर ठेवणार आहे.

महाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार :

भाजपच्या कोअर समितीची आज बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेनेला भाजपपेक्षा २ जागा अधिक मिळाल्या आहेत. जनतेच्या या कौलाचा भाजप अनादर करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पण – पुढे –

त्याच वेळी मुंबई महानगरपालिकेसाठी आयुक्तांसह एक स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

devendra fadnavis marathipizza

अनेक भाजप समर्थकांना हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचा “मास्टर स्ट्रोक” वाटतोय. त्यांच्या मते एकीकडे मुंबई मनपा वर आपला वचक ठेवण्याची आणि शिवसेनेच्या राज्यात सत्तेत असून विरोधी पक्षासारखं वागण्याच्या वर्तनावर उत्तर देण्याची ही युक्ती आहे.

अनेक कुटुंबांमध्ये साटंलोटं हा जो प्रकार असतो…तसंच काहीतरी.

साटंलोटं मध्ये ज्या घरातून आपल्या घरात सून आली आहे, त्याच घरात आपली मुलगी सून म्हणून पाठवली जाते. दोन्ही मुलींचे संसार सुखाने चालावेत ह्यासाठी ही युक्ती असते. तुम्ही आमची लेक खुश ठेवा…आम्ही तुमची सुखी ठेऊ…असा हा bargain असतो! 😀

अगदी हाच प्रकार मुंबईत झाल्याचं दिसत आहे. राज्यात त्रास दिलात तर BMC मध्ये त्रास देऊ…अशी ही तयारी फडणवीसांनी केली असल्याचं अनेकांचं मत आहे.

परंतु, ह्यात एक वेगळा, आणखी मोठा राजकीय डाव देखील असू शकतो.

हा डाव असेल –

“मुंबईत सेनाच!” — चा अदृश्य उपप्रमेय — “सेना मुंबईतच!”

uddhav-thackeray-marathipizza

ह्या तर्काचा आधार आहेत, नुकत्याच पार पडलेल्या महानगर पालिक आणि जिल्हा परिषदांचे निकाल.

अभ्यासूंसाठी दैनिक लोकमत ने प्रसिद्ध केलेले निवडणूक निकाल पुढे देत आहोत –

Corporation Election 2017 Results Lokmat 01 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 02 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 03 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 04 marathipizza
सौजन्य: लोकमत

सर्वच आकड्यांवरून दिसतंय की भाजपचा वारू चौफेर उधळत आहे. मुंबईत देखील उधळलाच, फक्त “शतप्रतिशत” होऊ शकलं नाही. पण इतर मनपा आणि जि प बघता, भाजपचा शतप्रतिशत अश्वमेध योग्य दिशेने दौडत आहे असं दिसतं.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख विरोधी पक्ष हळूहळू अस्ताला लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात, आजपर्यंत “नैसर्गिक मित्र” असलेला शिवसेना हळूहळू नैसर्गिक प्रतिस्पर्धी दिसतोय. त्याला प्रतिस्पर्धी म्हणून हरवायचं असेल, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपलं स्थान बळकट करणं आणि शिवसेनेचं खच्चीकरण करणं ही खेळी उपयुक्त ठरते. ते करण्यासाठी सेनेने समाधानी रहात मुंबईत गुंतून रहाणे भाजपच्या कधीही पथ्यावर पडणार आहे. म्हणूनच हा सेनेचा महापौर होऊ देण्याचं पाऊल.

केंद्रात मोदी सरकारने हीच खेळी अरविंद केजरीवालांबरोबर खेळली. आणि ती कमालीची यशस्वी झाल्याची दिसून येतीये.

२०१४ निवडणुकांपूर्वी – दिल्लीच्या निवडणूक झाल्या. दोनदा. पहिल्यांदा केजरीवालांनी ४९ दिवसांचं सरकार चालवलं…काँग्रेसच्या साथीने. नंतर ७० पैकी ६७ जागा जिंकून दणक्यात निवडून आले. हे सर्व घडलं फेब्रुवारी २०१५ मध्ये.

arvind-kejriwal-aap-leaders-celebrate_delhi victory marathipizza

 

हा अरविंद केजरीवालांचा मोठा विजय होता. परंतु त्या नंतरचं राजकारण बघितलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री होणं हे केजरीवालांसाठी लॉन्ग टर्म लोढणं होऊन बसलं.

दिल्लीची जबाबदारी घेऊन बसलेल्या केजरीवालांना दिल्ली विरुद्ध केंद्र अशी लढाई समोर वाढून ठेवली गेली. शिवाय लोकसभा निवडणुकीत, नुकतेच मुख्यमंत्री झालेले केजरीवाल आता पंतप्रधान होऊ इच्छितात…ह्यांची क्रेडिबिलिटी काय आहे…आधी ४९ दिवसांचं सरकार चालवलं, आता मुख्यमंत्री होऊन स्वतःला सिद्ध करायचं सोडून पंप्र होऊ इच्छितात – हा त्यांच्याविरुद्धचा मजबूत युक्तिवाद वापरला जाऊ लागला. वापरणारे होते, अर्थातच, स्वतःचं कर्तृत्व वाजवून वाजवून सांगणारे नरेंद्र मोदी.

अश्या प्रकारे केजरीवालांना दिल्लीत अडकवून, मोदींनी आपल्याविरुद्ध देशपातळीवर उभा राहू शकेल असा सक्षम विरोधी संपवून टाकला होता – तेवढ्या पुरता तरी.

आपल्यापेक्षा फक्त २ जागा अधिक असलेल्या ठाकरेंना, विना लढत मुंबई महानगर पालिका देण्यात, फडणवीसांचा हाच लॉन्ग टर्म प्लॅन दिसत आहे.

“मुंबईत सेनाच” – चं हळूहळू “सेना फक्त मुंबईतच” — असं होईल काय – हे येणारा काळ ठरवलेच.

पण तसं होऊ नये असं वाटत असेल तर सेना नेतृत्वाला फार सावधगिरीने पावलं उचलावी लागतील हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?