' भारताच्या सर्वात पहिल्या कसोटी सामन्याची रोमहर्षक गोष्ट प्रत्येकाला माहिती पाहिजेत! – InMarathi

भारताच्या सर्वात पहिल्या कसोटी सामन्याची रोमहर्षक गोष्ट प्रत्येकाला माहिती पाहिजेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेटचे तीन प्रकार. टेस्ट, वनडे आणि टी – २०. काळ जसा जसा पुढे गेला तसा क्रिकेटचा खेळ गतिमान होत गेला. आणि या तिन्ही प्रकारात भारतीय संघ हा अव्वल दर्जाचा आहे.

टेस्ट चॅम्पियनशिपची गदा, दोन वनडे क्रिकेट वर्ल्डकप, टी२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या सगळ्या स्पर्धेत टॉप परफॉर्म करून विजेतेपद पटकवल आहे.

नुकत्याच चालू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबल मध्ये पण भारत अव्वल आहे.

तर, २५ जून १९३२. भारतीय क्रिकेट चा पाया रचला गेला तो दिवस! स्वातंत्र्याच्या आधी १५ वर्ष आधी याच दिवशी टेस्ट क्रिकेट खेळण्याचा अधिकृत दर्जा भारताला मिळाला.

 

first indian test match inmarathi
cricktracker.com

 

इंग्लंड विरुद्ध क्रिकेट टेस्ट क्रिकेट खेळणारा अधिकृतरित्या भारत सहावा देश बनला. पहिल्या टेस्ट मध्ये काय झालं त्याच्याआधी पाहूया भारतीय क्रिकेटची सुरवात कशी झाली.

पहिले कर्णधार कर्नल सी के नायुडू :

कपिल, गांगुली, धोनी आणि विराट कोहली पर्यंत एक सो एक दिग्गज खेळाडूंनी भारताचं नेतृत्व केलं. पण याचा पाया घातला तेवढ्याच दिग्गज खेळाडूने, कर्नल सी के नायुडू यांनी.

१८९५ मध्ये नागपूरला त्यांचा जन्म झाला. वयाच्या २०व्या वर्षीच ते फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये उतरले. भारतीय क्रिकेटच्या उदयामागे त्यांच सर्वात जास्त योगदान आहे.

धोनीच्या रिटायरमेंटच्या चर्चा ज्या वयात सुरू झाल्या त्या वयात सी के नायुडू यांना भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले. वयाच्या ३७व्या वर्षी.

उंचपुऱ्या देहयष्टी असलेले नायुडू आपल्या सिक्स मारण्याच्या कौशल्यामुळे क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध होते.

 

c k nayudu inmarathi
latestly.com

 

१९३२ ला अधिकृत भारतीय क्रिकेट टीम नावारूपाला यायच्या आधी भारतात रिलीजन बेस क्रिकेट टीम होत्या. आणि त्यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने होत.

हिंदूज, पारशीज, ख्रिश्चन्स, मुस्लिम्स इत्यादी. त्यातल्या त्यात मुंबईत पारसी आणि हिंदू यांचे तर क्लब होते. इंग्रजी राजवटीमुळे भारतात क्रिकेट हळूहळू पाय पसरवायला लागले होतेच.

त्याचवेळेस ब्रिटिशांनी भारताकडून एक संघ ब्रिटनला क्रिकेट खेळण्यासाठी पाठवायचा निर्णय घेतला.

१९२६ मध्ये ब्रिटनच्या एमसीसी संघाने भारत दौरा केला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार आर्थर गिलीगन ज्याने अँशेस मध्ये सुद्धा इंग्लिश संघाचं नेतृत्व केलं होतं तोच या संघाचा कर्णधार होता.

सोबत अनेक माजी क्रिकेटपटू. एकूण २६ फर्स्ट क्लास मॅच हा संघ भारतात खेळणार होता. डिसेंबर मध्ये त्यांचा सामना तेव्हाच्या बॉम्बे जिमखान्यात हिंदुज सोबत होणार होता.

त्याच सामन्यात सी के नायडूनी ब्रिटिश गोलंदाजी फोडून काढत १३ चौके आणि रेकोर्ड ११ छक्के ठोकून १५३ धावांची दीड शतकीय खेळी केली.

मॉरिस एस्टल आणि टेट सारख्या तत्कालीन प्रसिद्ध गोलंदाज सुद्धा नायडुंसमोर हतबल झाले होते.

भारतीय क्रिकेटच्या उभारणीच्या हालचाली :

या सामन्यानंतर गिलीगनने क्रिकेट औथोरिटीशी भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलणी करायला सुरवात केली. आणि तेव्हा भारतीय क्रिकेट मध्ये दबदबा असलेले पटियालाचे महाराज भुपेंद्रसिंग यांच्या सोबत चर्चा करून भारतीय क्रिकेट बोर्डाची स्थापना करण्याचे सुचवले.

 

bhupinder singh inmarathi
pinterest.com

 

आणि भुपेंद्रसिंग यांच्या पुढाकाराने भारतीय क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली.

तेव्हा आजच्या सारखे मोठे मोठे स्पॉन्सर्स नव्हते. त्यामुळे बोर्ड चालवण्यासाठी देशातील राजे – महाराजे, नवाब यांचा आश्रय घ्यावा लागला. आणि इनडायरेक्टली क्रिकेट बोर्डाचे कंट्रोल त्यांच्याकडे गेले.

अन त्यामुळेचं अनेक वेळा क्रिकेट संघाचा कर्णधार हा कुठला तरी राजाच असायचा.

संघ उभारणीच्या वेळेस चर्चा करण्यात आली की सर्व धर्मीय खेळाडूंना एकत्र ठेवण्यासाठी कर्णधार हा इंग्रज असावा.पण ही सूचना सर्वसहमतीने नाकारली गेली.

भारतीय संघाचा पहिला ब्रिटन दौरा :

शेवटी ऑफिशियल भारतीय संघाचा इंग्लंड दौरा होणार ज्यात दोन डझन फर्स्ट क्लास आणि एक ऑफिशियल टेस्ट मॅच होणार अशा बातम्या निघू लागल्या.

आणि संघाचं कर्णधारपद कोण भूषवणार यावर शोध सुरू झाला.

सर्वप्रथम नवाब पतोडी सिनियर आणि राजा रणजितसिंह यांचा भाचा दिलीप सिंह यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

 

pataudi inmarathi
cricleofcricket.com

 

पण त्यावेळी हे दोघेही इंग्लंड कडून खेळत असल्याने कर्णधारपदासाठी पटियाला आणि विजयनगरच्या महाराजांशी चर्चा सुरू झाली.

पण हा दौरा एप्रिल ते ऑक्टोबर एवढा लांबलचक असल्या कारणाने राज्याची जबाबदारी जाणून दोघा राजांनी नकार दिला.

अंततः कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली ती पोरबंदरच्या महाराजांना. ही जबाबदारी त्यांना त्यांच्या खेळामुळे नाही तर त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे दिली गेली.

२ एप्रिल १९३२ ला बॉम्बेच्या बंदरावरून ‘स्थ्रेतनेवर’ या बोटीने भारतीय संघ आपल्या दौऱ्याला निघाला. ७ हिंदू, ५ मुस्लिम, ४ पारशी, २ शीख खेळाडूंचा या संघात सहभाग होता.

पण जसा संघ इंग्लंडमध्ये उतरला आणि पहिला प्रॅक्टिस सामना झाला तसं दिसायला लागलं की पोरबंदरच्या महाराजांना संघ सांभाळता येत नाही आहे.

त्यांची खिल्ली उडवताना लिहिले गेले, ‘पोरबंदरच्या महाराजांकडे रोल्स रॉईस जास्त आहे रन्स कमी.’

ऐतिहासिक टेस्टच्या आदल्या दिवशी पोरबंदरच्या महाराजांनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.आणि सोबत नायडुंना नवीन कर्णधार बनवण्याचा आपला मानस सोडला.

पण राजा आणि नवाब यांची चाकरी करणाऱ्या सामान्य भारतीय समाजातून आलेल्या खेळाडूंनी नायुडू यांचा कर्णधार म्हणून जाहीर विरोध केला.

पटियालाच्या महाराजांपर्यंत हा विषय गेला आणि त्यांनी इतर खेळाडूंना तंबी दिली की, नायडुंना जो विरोध करेल त्याला भारतीय संघात घेतलं जाणार नाही.

पटियालाच्या महाराजांच्या या आदेशानंतर सी के नायुडू अधिकृतरित्या भारतीय संघाचे कर्णधार बनले.

ऐतिहासिक दिन २५ जून १९३२ :

 

first test inmarathi
en.wikipedia.org

 

याच दिवशी सकाळी भारतीय कर्णधार सी के नायुडू ब्रिटिश कर्णधार डग्लस जॉर्डन सोबत पॅव्हेलीयन मधून बाहेर पडून ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात उतरले. नाणेफेक झाली.

ब्रिटिशांनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. आणि भारतीय संघाला अधिकृत टेस्ट संघाचा दर्जा मिळाला.

बॅटिंग करायला उतरलेल्या ब्रिटिश संघाला सुरवातीलाचं भारतीयांनी झटके दिले. पहिले तीन फलंदाज केवळ १९ रन असताना माघारी परतले.

वॅली हेमंड आणि कर्णधार जॉर्डन यांनी कमान सांभाळत संघाला १०० धावा पार करून दिल्या. अमर सिंह यांनी हेमंडला वयक्तिक ३५ धावांवर बोल्ड केले. अंततः २५९ धावांवर पूर्ण ब्रिटिश टीम पॅव्हेलीयन मध्ये परतली.

ब्रिटिश कर्णधार जॉर्डनची विकेट भारतीय कर्णधार नायुडू यांनी घेतली. या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात भारताच्या मोहम्मद निसार यांनी ५ विकेट घेतल्या.

भारताच्या या इंग्लंड दौऱ्यात निसार यांनी एकूण ७१ विकेट घेतले. त्यांची आणि अमर सिंह यांची जोडी या दौऱ्यामुळे कायम लक्षात राहिली.

भारताच्या डावाची सुरवात करायला उतरले जनार्दन नवले आणि नवोमल जिओमल. दिवस संपेपर्यंत दोघे पिचवर टिकून राहिले आणि धावफलकावर ३० धावा लावल्या.

२६ जूनचा दिवस रेस्ट डे होता. २७ जूनच्या दिवशी पुन्हा खेळ सुरू झाला. अन ३९ धावसंख्येवर जनार्दन नवले बाद झाले.

 

janardan navale inmarathi
crictracker.com

 

भारताची पहिली विकेट पडली. नवलेंनंतर सय्यद वजीर अली मैदानात उतरले. ६३ च्या धावसंख्येवर जिओमल वयक्तिक ३३ रन बनवून आऊट झाले. भारताचे दोन्ही ओपनर पॅव्हेलीयन मध्ये.

आता उतरले भारतीय कर्णधार सी के नायुडू. फिल्डिंग करते वेळी झालेल्या जखमेसोबत ते खेळायला आले. वजीर अली आणि नायुडू भारतीय डाव पूढे नेत गेले.

या दोघांचा जम बसलाच होता की वजीर अली ३१ रन बनवून आऊट झाले. भारताचा स्कोअर ११० वर विकेट.

अन संघाची धावसंख्या १३९ असताना नायुडू आऊट झाले ते देखील ४० रन बनवून. जखमी असताना त्यांनी केलेली फलंदाजी लाजवाब होती.

नायुडू आऊट झाल्यानंतर मात्र भारताचा डाव कोसळला. भारताचा फायनल स्कोअर होता ९३ ओव्हर मध्ये १८९ वर ऑल आऊट. ७० रनची लीड घेऊन पुन्हा ब्रिटीश फलंदाजीला उतरले.

आणि पुन्हा भारतीय गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवले. कर्णधार जॉर्डन आणि मधल्या फळीतील फलंदाज पेंटर यांच्या अर्धशतकाच्या बळावर २७५/८ धावसंख्येवर ब्रिटिशांनी डाव घोषित केला.

विजयासाठी भारतासमोर ३४६ धावांच टार्गेट. भारतीय ओपनर्सनी सावध सुरवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ४१ रन जोडले. वजीर अली ३९ धावा जोडून आऊट झाले.

त्यानंतर आलेले नायुडू सुद्धा १० धावांवर आऊट झाले. ८३ धावसंख्येवर अर्धा भारतीय संघ पॅव्हेलीयन मध्ये परतला होता.

१०८/७ धावसंख्या असताना लाडाभाई अमर सिंह यांनी एकट्याने संघर्ष केला. भारताकडून पहिली हाल्फसेंच्युरी ठोकणारे ते पहिले खेळाडू बनले. त्यांनी शानदार ५१ रन ठोकले.

 

amar singh inmarathi
mathrubhumi.com

 

पण त्यांची ही खेळी भारताचा पराभव रोखू नाही शकली. १८७ वर पूर्ण भारतीय संघ ऑल आऊट झाला अन ब्रिटिशांनी हा सामना १५८ धावांनी जिंकला.

पराभव होऊन सुद्धा ऐतिहासिक आहे ही तारीख :

५० वर्षानंतर याच मैदानावर १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक असा विजय नोंदवून भारतीय संघाने पहिला वर्ल्डकप आपल्या नावे केला होता.

ऐतिहासिक अशा त्या सामन्यात भलेही भारतीय संघ हरला होता. पण पूर्ण भारताचे प्रतिकात्मक रूप तेव्हा ब्रिटन मध्ये दिसत होते.

भारताच्या आजच्या सुवर्ण क्रिकेट इतिहासाची सुरवात त्या दिवसापासून झाली होती. त्यामुळे त्या टेस्टची कहाणी आजही भारतीय क्रिकेटला प्रेरणा देते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?