' पत्नीच्या प्रेमाखातर घराच्या गच्चीवर वेगळाच ताजमहाल उभारणारा असाही नवरा…! – InMarathi

पत्नीच्या प्रेमाखातर घराच्या गच्चीवर वेगळाच ताजमहाल उभारणारा असाही नवरा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..

तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं!!!

हे वाचायला किती छान वाटतं. प्रेम करणं सोपं असतं.. निभावणं फार कठीण. जोडीदाराचा वियोग सहन करत एकाकी जीवन घालवणं हे तर त्याहून अधिक कठीण आहे.

पण काही वेळा काही लोक आपल्या जोडीदाराच्या वियोगानंतरही असं काही काम करतात, की त्यांचं त्यांच्या जोडीदारावर असलेलं प्रेम अमर प्रेम होतं.

एर्नाकुलम येथील जोसेफ फ्रान्सिस यांची ही प्रेरणादायी कहाणी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या घराच्या गच्चीवर त्यांनी आंब्याची झाडं लावली. वेगवेगळ्या कलमांची लागवड केली आहे. त्यातील एका कलमाला आपल्या दिवंगत पत्नीचं नांव दिलं आहे- पॅट्रीशिया!!!

 

kerala man grow mangoes inmarathi
thebetterindia.com

 

आपण अंगणात, परसात झाडं लावतो.. झाडं लावताना ती झाडं लावणारे आजोबा आपली नातवंडे या झाडाची फळं खाऊ देत असा विचार करून झाडं लावतात.

पण जोसेफनी एक नाही तर कितीतरी झाडं लावली.. जगवली!!! तीही पूर्ण जागेच्या केवळ पाच टक्के भागात.. त्यांनी कलमं तयार केली. आणि हे दारात, अंगणात नाही तर घराच्या गच्चीवर.

१८०० स्क्वेअर फूटचा बंगला, त्यातील पाचच टक्के जागा वापरुन त्यांनी ही आपली आवड जोपासली. एक नाही दोन नाही तब्बल ४० आंब्याची कलमं त्यांनी तयार केली आहेत.

आजकाल जागेची कमतरता, प्रदूषित भाजीपाला फळे या सर्वांवर एक छोटासा उपाय म्हणून किंवा ज्यांना बागकामाची आवड आहे, ते हौस म्हणून गच्चीमध्ये भाजीपाला पिकवतात.

 

green-leafy-vegetables-diet InMarathi

 

घरीच फुलझाडं, फळभाज्या लावतात. जतन करतात. पण छोटी छोटी झाडं किंवा वेल वर्गातील वनस्पती यांच्यासाठी ही टेरेस गार्डनची संकल्पना चांगली आहे.

कारण मोठी झाडं लावली, तर त्यांची मुळं स्लॅबमध्ये शिरायचा धोका असतो. स्लॅबला चिरा पडून पाणी खालच्या खोलीमध्ये गळायची शक्यता असते. मग आपण छोटी छोटी झाडं, पालेभाज्या, फळभाज्या, फुलझाडं यांना प्राधान्य देतो.

फ्रान्सिसनी कसं जमवलं हे??

 

kerala man grow mangoes inmarathi1
divyabhaskar.co.in

 

जोसेफ फ्रान्सिस केरळमध्ये एर्नाकुलम येथे राहतात. व्यवसायाने एसी तंत्रज्ञ असलेले जोसेफ यांना शेतीची अतिशय आवड. लहानपणी ते सुट्टीला  आजोळी जात तिथेही सर्वांना ती आवड होती.‌

फ्रान्सिस यांच्या मामानं गुलाबाच्या कितीतरी जाती आणून त्यांची लागवड केली होती.

त्यावेळी कलमी गुलाब फक्त आणि फक्त बंगळूर येथे होते. केरळ चेन्नई मध्ये कलमी गुलाब जवळपास नव्हतेच. त्या काळात त्यांच्या मामाने कुठून कुठून हे गुलाब आणून लावले होते.

लहानपणी ज्या चांगल्या गोष्टी आपण अनुभवतो, त्याच पुढं आपल्या आवडीच्या गोष्टी होतात. फ्रान्सिसनापण त्यामुळं आपोआपच शेतीची गोडी लागली.

बरं, गोडी असणं वेगळं..पण त्यांचं प्रेम होतं शेती!!! आजकाल तर शिकलेल्या तरुणांपैकी खूप कमी मुलं शेती करायला धजावतात.

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार नी कनिष्ठ नोकरी असं मानलं जाई. पण बदलत्या काळात उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती असं मानलं जाऊ लागलं.

या पिढीला नोकरी करताना दरमहा मिळणारा ठराविक रकमेचा पगार हा शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त बरा वाटू लागला. शिक्षणानं श्रमप्रतिष्ठा कमीच झाली. बहुतेक जणांनी शेतीकडं पाठच फिरवली.

पण अशाही काळात एक माणूस हौस म्हणून शेती करायची इच्छा ठेवतो.. हे औरच आहे ना!!!हो.. फ्रान्सिस शेतीच्या प्रेमातच होते. शेती करणं हे त्यांचं आवडतं स्वप्न होतं.

त्याच स्वप्नासाठी प्रथम त्यांनी मशरूम आणि गुलाब यांची शेती केली. नव्या घरात आल्यानंतर तिथंच ते पिकवायचा विचार पक्का केला आणि त्या कामात त्यांची पत्नी पॅट्रिशिया यांनीही त्यांना मदत केली.

 

mushroom farming inmarathi4
ypard.net

 

तऱ्हेतऱ्हेच्या गुलाबाची झाडं फ्रान्सिस यांच्याकडं होती. मशरुम पिकवणं फार घाणेरडं वाटू शकतं. कारण ते पिकवताना इतका वास येत असतो. पण पॅट्रिशियांनी त्यांना साथ दिली!!!

अचानक एक दिवस फ्रान्सिस यांच्या मनात विचार आला, जर ही झाडं इथं चालतात तर आंब्याची झाडं का चालू नयेत?

आपण वडाची झाडंही बोन्साय करतोच ना? मग, त्यांची मुळं कुठं घराला त्रास देतात? आंब्याच्या बाबतीत काय करता येईल? बघूया तरी लावून…

तेव्हा आंब्याची कोय पुरली, तर ती रुजवण्यासाठी प्लास्टीक पिशव्या वापरल्या जात. पण फ्रान्सिसनी पीव्हीसी चे मोठे ड्रम घेतले म्हणजे ते एकीकडून दुसरीकडे सहजावारी हलवता येतील.

बरं‌ नुसते ड्रम आणले नी रोपं लावली की संपलं असं नसतं. त्या रोपांची काळजी घ्यावी लागते. योग्य प्रमाणात पाणी, खत, माती बदलणं, कीड लागू नये म्हणून औषधं.. थोडक्यात एक झाड सांभाळणं हे एक मूल सांभाळण्यासारखंच आहे.

ज्या प्रकारे आपण मुलांची काळजी घेतो त्याच पद्धतीने झाडांचीही काळजी घ्यावी लागते. फ्रान्सिस आणि पॅट्रिशिया यांनी ते सारं काही केलं!!! आणि जवळपास ४० आंब्याची कलमं त्यांनी ‌ तयार केली.

आज त्यांच्या घराच्या गच्चीवर अल्फोन्सो हापूस, नीलम, मलगोबा अशी ४० हून अधिक आंब्याची कलम केलेली झाडं आहेत आणि त्यांपैकी काही कलमं तर वर्षातून दोनदा फळ देतात.

 

mangoes inmarathi
thefinancialexpress.com

 

मध्येच पॅट्रिशियांनी त्यांची साथ सोडली. दूरच्या प्रवासाला त्या निघून गेल्या. त्या गेल्यानंतर त्यांच्या आठवणीसाठी फ्रान्सिसनी एक नवीन कलम बनवलं आणि त्याला नांव दिलं- पॅट्रिशिया!!!

फ्रान्सिस सांगतात, सर्व कलमांपेक्षा या कलमाचे आंबे फार गोड आहेत.. का असू नयेत सांगा बरं..त्यात त्या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम मिसळलं आहे!!!

फ्रान्सिस यांची गच्चीवरील आमराई इतकी प्रसिद्ध झाली आहे की, शनिवार रविवार लोक निव्वळ ती आमराई बघायला येतात. एक कलम फ्रान्सिस २५०० ते १००००पर्यंत विकतात.

फ्रान्सिस यांनी आपल्या गच्चीवर केवळ आंबाच नाही, तर फणस, चिक्कू, पपई, कोबी, भेंडी, टोमॅटो, कारली यांचीही लागवड केली आहे.

जिथं इच्छा असते तिथं मार्ग सापडतोच. आवड असली की सवड मिळते हे म्हणतात ते फ्रान्सिसनी खरं‌ करुन दाखवलं आहे. आपण शेतीसाठी जागा नाही म्हणतो तर त्यांनी गच्चीवर आमराई उभारली.

चांगल्या गोष्टी लोक आनंदानं विकत घेतात. आपल्या आवडीतून अर्थार्जन कसं करता येतं याचं हे जिवंत उदाहरण आहे.

तरुणाईने खरोखर आदर्श घेऊन आपला ठसा उमटवावा असं सांगणारी फ्रान्सिस यांची ही प्रेरणादायी कहाणी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?