' कोरोनाच्या काळात पुण्यात फिरताना आलेले हे विचार प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करतात… – InMarathi

कोरोनाच्या काळात पुण्यात फिरताना आलेले हे विचार प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेले अनेक महीने कोरोना महामारीमुळे आपण सगळेच घरी अडकून पडलो आहोत. घरून काम सुरू असलं, तरीसुद्धा सगळं “नॉर्मल” कधी होणारे? हा प्रश्न जणू आता नित्याचाच झालाय.

अगदीच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यानंतर निर्जन रस्ते, स्टेशन पाहून अगदी “कसंतरीच” होऊ लागतं. एकेकाळी माणसांनी बहरलेले रस्ते ओस पडलेले पाहून मनात निरनिराळ्या विचारांचं काहूर माजतं.

पुण्यातल्या रस्त्यांवर फिरताना मनात आलेले हेच विचार, काही आठवणी इथे मांडल्या आहेत लेखिका विभावरी बिडवे यांनी

===

जग सुना सुना लागे रे….

बऱ्याच महिन्यांनी कोर्टात गेले. फायलिंग साठी इतकी सुसूत्रता कोर्टात आणि madam तर इतक्या मस्त माहिती सांगत होत्या. ठिकठिकाणी नोटीसा लावल्या होत्या. कमी गर्दीत त्यांनाही सुसह्य वाटत असावं.

वकिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहेच. माझ्यावर घर अवलंबून नाही पण ज्यांच्यावर आहे त्याचं काय चालू असेल? आणि खरोखर न्यायाची गरज आहे त्याचं काय? फक्त अर्जंट काम चालूय.

अर्जंट ह्याला काही व्याख्या नाही. ज्या महिला पोटगीशिवाय जगू शकत नाहीत त्यांचं कसं चालू असेल? आधीच वर्षानुवर्षे जातात केस लढवायची म्हटलं की त्यात अजून दोन वर्षे वाढवायला हवीत आता.

कारण आता स्पष्ट lockdown चं कारण सांगून मुदत वाढवून घेणार, पूर्ण कोर्ट सुरु झालं तरी! चेक bounce केसेस बाबतीत तर हे नक्कीच. फक्त instalments लावून घ्यायचे वकिलांकडून. आता तेच उशिरा उशिरा.

कोर्टात magistrate कडच्या केसेस maximum ह्याच. त्याचं decriminalize करण्यासाठी केंद्राने सूचना मागवल्या होत्या. करून टाकावं लवकर. सोपं होईल. कोर्टाचा भार कमी होईल.

 

court proceeding inmarathi
sultrakini.com

 

कॉर्पोरेशनजवळच्या कॉजवेवरून आल्यावर सिग्नलला सरकत्या पाटावर बसलेला तो अपंग भिकारी दिसला नाही आज. कुठे गेला असेल ह्या कोव्हीडच्या काळात. की मोकळ्या आभाळाखाली म्हणून बरा असेल?…

लोखंडे तालीमीचा हा बोळ इतका का आवडत असावा? बहुधा इथूनच शाळेत जायचो. आणि शाळेच्या प्रसन्न आठवणी. दुसरं म्हणजे जेव्हा कथा कादंबऱ्या खूप वाचायचो, तेव्हा इथल्या पुणे मराठी ग्रंथालयात यायचो.

ते associate झालं असावं. आणि आपलं लाडकं दुकान हस्तकला इथेच जवळपास. जावं की नको? नकोच दिवाळीपर्यंत तरी!

हे रस्ते असे सुनसान! हॉटेलवाल्यांचं किती नुकसान! लक्ष्मी रोड इतका मोकळा…. आणि ह्या रिक्षा थांबल्या तरी कोण बसत असेल ह्यांच्यात… पी वन पी टू मध्ये अडकलेली दुकानं. ठेवली उघडी तरी कोण जाणार!

सोनं पन्नास हजारांवर गेलंय तरी पीएनजी काही लॉस मध्ये नसावेत. मध्ये ह्या काळातही पौड रोडवरच्या दुकानात गुरुपुष्याला मोठ्ठी रांग होती.

पेटल्समध्ये एकजण दिसतेय खरी. इथे ड्रेसलाईनचे ड्रेसेस मस्त मिळतात. तिला ५० – ६० टक्के ऑफमध्ये मिळत असणार. biba आणि Cotton Cottageचे किती मेसेजेस येताहेत.

जाऊन बघावं पण अजून मार्च मध्ये घेतलेलेच कपाटात पडून आहेत. एवढं करून आपल्याला काही….. असो…

झेड ब्रिज किती किती जणांना मिस करत असेल? कुठे भेटत असतील मुलं मुली आत्ताच्या काळात? अशा विषयावर कोणाकडून छानसं वाचायला मिळालं नाही.

 

z bridge pune inmarathi
commons.wikimedia.org

 

कोणी आजकाल कविता वगैरे करत नाही बहुधा विरहाच्या बिरहाच्या! तो काळ गेला असावा. किती affairs होतात आजकाल आणि मुलं मुलीही पटकन बाजूला होतात – होऊ शकतात एकमेकांपासून..

गुडलकला काय गर्दी असायची. आज फक्त एका काचेच्या पेटाऱ्यात  काही सामोसे दिसताहेत, गरीब बिचारे. तेही फक्त पोलिसांसाठी असावेत. पोलीस चहा पिताहेत खरे पण किती धोका आहे. कोणते कप अन कसलं काय!

त्यांना रोडवरच राहावं लागतंय. traffic नाही, सिग्नल्स नव्हते. त्यांचीही बरीच कमाई कमी झाली असणार. ह्या रोडवर किती वेळा फिरलो असू. हा रस्ताही असा ओकाबोका.

नाही म्हणायला राख्या मांडून बसलेले दिसताहेत रस्त्यांवर. फेरीवाले आणि हातगाडीवाले ह्यांना पी वन पी टू चा नियम नाही. गजरेवाल्याकडून गजरे घ्यायला हवे खरंतर. पण नकोच. आपणही किती भूतदया दाखवणार. गजरे धुताही येणार नाहीत.

एकूण चितळेंनी मात्र दुकानात भारी व्यवस्था ठेवलीय. आणि त्याचा video वगैरेही केला. ह्याला म्हणायचं काळानुरूप बदल आणि गुणवत्तेबाबत नो तडजोड.

 

chitale pune inmarathi
sakaltimes.com

 

मग आनंदवन, हेमलकसा – आमटे प्रकल्पात काय चुकलं असेल? कोर्पोरेटकडे एखादा प्रकल्प नेणं चांगलं की वाईट? देव जाणे. म्हणूनच बघण्यातल्या संस्था मोठ्या झाल्या, तरी फार व्यावसायिकता बाळगताना दिसत नाहीत.

भाविसाचं पण आपण तसंच करत नाही आहोत ना? वाडेश्वरचं पार्सल एकदा आणायला हरकत नाही. इथल्या सुती दुकानात कधी जाऊन बघितलं नाही. बघायला हवं. कॉलेजमध्ये तर गवताचं रान झालेलं दिसतंय.

इथल्या संतोष बेकरीचे pattice मस्त असायचे. कोर्टातून घरी जाताना किती वेळा थांबायचो. इथे जवळच मैत्रीण राहते. घरी जावं का? पण नकोच, सध्या कोणाच्या घरी नको.

आईसक्रीम वाल्यांनाही ह्यावर्षी भरपूर नुकसान सोसावं लागलं. Naturals चं आईसक्रीम खाऊन किती महिने झाले! ह्याच रोडवर CAA समर्थनार्थ lockdown च्या काहीच दिवस अगोदर फिरलो होतो. किती गर्दी होती.

इथली सुप्रीमची पावभाजी…. डेक्कन आरचा पिक्चर…. इथून समज्ञाला घेतलेले uniforms तर न घालताच शॉर्ट होऊन जाणार आहेत. इतका वळसा मारून पलीकडे गेलो, अजून लकडी पूल दुचाकींसाठी ओपन केलाय हे लक्षातच राहत नाही.

नदीकाठचे रस्ते एव्हाना थरथरत असायचे. ढोल ताशाची पथकं कितीतरी आधीपासून इथे practice करायची.

 

dhol tasha pathak pune inmarathi
hindustantimes.com

 

आता खूपजण सामील होतील असं वाटत नाही. कदाचित परवानगीच मिळणार नाही. कदाचित लहान स्वरुपात होईल. कृपया रस्ते अडवू नका ह्यावर्षी तरी!

हा लाडका बालगंधर्व पूल असा निळ्या पिवळ्या जाळीने बांधून टाकलाय. लग्न ठरल्यावर बालगंधर्वपाशी कितीदा भेटायचो. कोर्ट जवळच होतं इथून. आणि त्याला कुठे काही कळायचं कुठे जावं असं! किती नाटकं इथे बघितली.

एकदा तर एका मैत्रिणीसोबत रात्री दोन पर्यंत गप्पा मारल्या होत्या एक चांगलं नाटक बघितल्यानंतर. आता ह्या पुलावरून वरून मेट्रो जाईल. सगळी मज्जाच गेली!

 

balgandharva pune inmarathi
lbb.com

 

मोदी दुसऱ्यांदा निवडून आले तेव्हा इकडे बापटांच्या घरावरून चक्कर मारली होती. मस्त स्क्रीन लावून भाषणं दाखवत होते. बापट काय करताहेत सध्या, कुठे आहेत. काही ऐकलं नाही त्यांच्याबद्दल.

झाले का सगळे रस्ते आणि पूल? हे शहर जिवंत आहे आपल्यासाठी. माणसांइतकंच त्याच्याशी attach आहोत आपण.

माणसं… हं…. randomly जाताहेत माणसं… काही logic नाही. म्हणजे तो गाडी fast चालवायचा म्हणून अपघाताने गेला वगैरे असं काही नाही.

अत्यंत चांगले लोक गमवावे लागताहेत. रक्ताचं काही नातं नाही, तरी ते जाणं सहन नाही होतेय. चार फुलं वाहायला झालं नाही. माणूस गेला की त्याला त्या फुलांचं काही नाही. पण आपणच थांबतो, नमस्कार करतो, श्रद्धांजली वाहतो…

सगळे आपल्याच मनाचे खेळ. पण असं पशु पक्षांसारखं जाण्यासाठी माणूस नाही. ही थांबण्याची, अश्रूंची संस्कृती त्यानं त्याच्या भावनांनी, बुद्धीने निर्माण केलीय.

किमान पायाला नमस्कारासाठी स्पर्श आणि चार फुलांची तर प्रत्येक व्यक्ती हक्कदार असावी.

काका, पर्किन्सन्सच्या त्रासातून सुटून गेलात तुम्ही, पण सगळ्या अंत्यसंस्कारांना, पासेस मिळवून देताना, इतर लग्न, वाढदिवस, अगदी मंगळागौरी, बघण्या दाखवण्याचे कार्यक्रम ह्यात सगळ्यात पुढे तुम्ही असायचात!

तुमचं घर सगळ्यासाठी खुलं. आमच्यासाठी रजा घेऊन पिकनिक्सना यायचात! आणि तुमच्यासाठी कोणी नव्हतं… कोणी नाही. हे भयानक आहे…

मी ह्या अपराधी भावनेतून सुटू शकेन असं वाटत नाही. ह्या साथीने तुमची अवस्था अगदी पु. ल.च्या नारायणसारखी करून टाकली. खूप भोगलंत….. आता तरी ह्या कर्मविपाकातून तुम्ही सुटला असाल का?

आपलं जिणं ज्यांच्याकडे बघून कवडीसारखं वाटावं असे ज्ञापु गेले. हे ठीक नाही चालूय… अजून किती losses? विचार केला तरी सुन्न व्हायला होतं.

अखेरीस तो भिकारी तसाच हाताने त्याचा पाट सरकवत पुढे जाताना दिसला खरा! थोडं बरं वाटलं. इथे जवळ दशक्रिया विधी चालू असतात. त्या ब्राह्मणांनीही ह्या काळात काय केलं असेल? आणि इथले कावळे?

 

dashakriya inmarathi
imageselect.eu

 

आत्ता तर पावसानंतर नदीजवळ गायी गुरं हिरवा पाला चरताना दिसताहेत, पण ह्यांचं एप्रिल मे मध्ये काय झालं असेल? कुत्री तर अगदी अशक्त दिसतच आहेत.

इथल्या प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या आठवणी, वेगवेगळ्या मैत्रांसोबत चहा पाणी आणि गप्पांचे फड. सगळं खंडर वाटतंय. घरीच जावं… घर… हं…

आषाढ लागताच कॅलेंडर कळत असावं अशा पद्धतीने माशा घरात येतात, मग आषाढ तळला, की मगच भोपळघारगे खाऊन जातात. त्यातली एकही ह्यावर्षी आली नाहीय. काय कारण असावं?

त्या आसावारी घारगेवाल्या आसावरीला डायरेक्टरने आता थोडी सुबुद्धी द्यावी. पटवर्धन आजोबांची सिरीयलच गेली असेल का पुन्हा येतील काही महिन्यांनी?

रिकाम्या रस्त्यांवर वेड्यावाकड्या गाड्यांसारखे धावणारे हे विचार. घराच्या वाटेवर सृष्टीसमोर अगदी रस्त्यावर नेहमी बसलेली जख्ख म्हातारी दिसली.

दात पडल्यामुळे हसली की मजेशीर दिसणारं तिचं तोंडाचं बोळकं दिसलं. आणि विचार कमी झाले. घरी आल्यावर लेक online शाळा attend करत होती. या कुन्देन्दु तुषारहार धवला….. वेगवेगळ्या सुरात ऐकलं… घरीच सुरक्षित वाटलं.

===

आपल्या प्रत्येकाच्याच मनी जणू असाच भाव आहे याचा प्रत्यय हे वाचून येईल.

बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे, मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात…या ओळी आजकाल प्रत्येकाला अनुभवता येत असतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?