' नागपंचमी हा सण कोट्यवधी सर्प भस्मसात झाल्यानंतर सुरू झालाय – हे आपल्याला माहितीच नसतं…! – InMarathi

नागपंचमी हा सण कोट्यवधी सर्प भस्मसात झाल्यानंतर सुरू झालाय – हे आपल्याला माहितीच नसतं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

श्रावण हा मराठी महिन्यांमधील अत्यंत महत्त्वाचा, पवित्र मानला जाणारा महिना. या महिन्यात सणांची अगदी रेलचेल असते. श्रावणातला पहिला सण म्हणजे “नागपंचमी”.

आपल्या शेताचे रक्षण करणाऱ्या नागदेवतेची पूजा करण्याच्या हा दिवस. या दिवशी घरोघरी नागप्रतिमांचे पूजन केले जाते.

पण हा सण का सुरू झाला माहितेय? यामागे आहे एक पौराणिक कथा. जाणून घेऊया.

===

लेखक : चैतन्य देशपांडे

===

अभिमन्यूचा मुलगा परीक्षित शिकारीसाठी जंगलात खोलवर पोहचला होता. त्याला जंगला बाहेरच एक चांगलं तडफदार हरीण दिसलं होतं. त्याच्या मागावर तो तहानभूक विसरून आत आत जात गेला.

हरीण अत्यंत चपळाईने विजेसारखा सपासप आत पळत होतं. काहीवेळाने तो परीक्षिताच्या नजरेआड झाला. गमतीगमतीत परीक्षित आणि त्याचे सैन्य जंगलात बरेच आत येऊन पोहचले होते. पण इथे येऊनही हरीण नजरेआड झाला म्हणून तो चरफडला.

आता त्याला आता प्रचंड तहानही लागली. जवळचे पाणीही संपले होते. त्याने सैनिकांना जवळपास कुठे पाणी मिळतं का ते शोधायला पाठवलं. अतीव तहान लागल्यामुळे तोही इकडे तिकडे तळं, झरा शोधायला लागला.

शोधता शोधता त्याला एक छोटीशी पण टुमदार झोपडी दिसली. कुठलातरी आश्रम असावा. किमान इथेतरी पाणी मिळेल म्हणून आशेने परीक्षिताने बाहेरून आवाज दिले.

अनेक आवाज देऊनही कुणीही बाहेर न आल्याने तो स्वतः आत गेला. तिथे एक वृद्ध ऋषी ध्यान लावून बसले होते. परीक्षिताने आणखीन आवाज दिले पण ऋषी हू नाही की चू नाही. ते अत्यंत तन्मयतेने ध्यान लावून बसले होते.

परीक्षित आधीच तहानलेला. त्यात एवढा वेळ आवाज देऊनही साधू आपल्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणजे काय… त्याचा राग अनावर झाला.

रागाने तापलेला तो झोपडीच्या बाहेर आला, बाहेरच एक साप मारून पडला होता. त्याने त्या मेलेल्या सापाला तलवारीच्या टोकाने उचलले आणि त्या वृद्ध ऋषींच्या गळ्यात टाकून तो पुढे निघून गेला.

 

naagpanchami inmarahi1
bharatmarg.com

 

त्या वृद्ध ऋषींचे नाव होते शमीक, आणि त्याचा मुलगा होता शृंगी. शृंगी हे देखील अत्यंत तेजस्वी पण तापट असे ऋषी होते.

जेव्हा शृंगीला कळलं, की परीक्षिताने अत्यंत उद्दामपणे आपल्या वडिलांच्या अंगावर मेलेला साप टाकून त्यांच्या ध्यानसाधनेत व्यत्यय आणला, तेव्हा आधीच तापत असलेल्या त्याने रागा रागात परीक्षिताला श्राप दिला, की सात दिवसांच्या आत आतच तक्षक नावाच्या सापाचा दंश होऊन परीक्षिताचा मृत्यू होईल.

आणि झालेही तसेच. तक्षक हा सापांचा राजा. त्याच्या जहाल विषासाठी प्रसिद्ध. तक्षकाला नेमून दिलेलं काम त्याने चोख बजावलं. परीक्षित राजाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. परीक्षित राजानंतर त्याचा मुलगा जन्मेजय गादीवर आला.

आता वेळ होती बदल्याची. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला जन्मेजय घेतल्याशिवाय राहणार नव्हता. (ह्या घडामोडी बघून काही लोकांना गँग्स ऑफ वासेपुर आठवण्याची शक्यता आहे.)

जन्मेजयच्या डोक्यात भलतच विषारी प्लॅनिंग शिजत होतं. तो श्रावण महिन्यातल्या शुक्ल पंचमीला तक्षकाच्या राज्याच्या सीमेबाहेर पोहचला. तक्षकाचं राज्य म्हणजे राजस्थान मधलं सध्याचं हिंडौन.

तक्षकाच्या राज्याच्या म्हणजेच हिंडौनच्या सिमेबाहेर जन्मेजय सोबत शेकडो साधु, ऋषी, सोबत प्रचंड सैन्य असा फौजफाटा घेऊन पोहचला.

 

naagpanchami inmarahi2
youtube.com

 

तिथे तक्षकाच्या सीमेबाहेर त्याने “नागयज्ञ” आरंभला. ज्यालाच आपण “सर्पसत्र” म्हणून ओळखतो.

प्रचंड असा यज्ञ पेटला होता. भारावून टाकणारे मंत्राचरण होत होते. आणि त्या यज्ञात फळे, मध, तूप, काष्ट, विविध सामुग्रींसोबतच आहुत्या पडायला लागल्या त्या सापांच्या, नागांच्या..!!

शेकडो-हजारो नाग, साप मंत्रसामर्थ्याने यज्ञाकडे आकृष्ट होऊन भस्मसात होत होते. तो महाभयानक यज्ञ बघून तिथे उपस्थित असलेले सगळे साधू संत सैनिक थरारले. आपल्या मृत्यूचा हा असा बदला बघून वर स्वतः राजा परीक्षित देखील थरारला असावा.

 

naagpanchami inmarahi
scroll.in

 

पण जन्मेजय आता इरेला पेटला होता. पृथ्वीवरून सगळा सर्पवंश नष्ट करण्याचा जणू काही त्याने विडा उचलला होता. ऊन्हं डोक्यावर आली होती. कित्येक कोटी साप त्या यज्ञात पडून भस्म झाले असावेत.

आणखीन सर्पांना यज्ञात जागा करून देण्यासाठी ते भस्म यज्ञकुंडातून बाजूला करताना अनेकांची तारांबळ उडत होती. असच दिवसभर सुरू राहिलं असतं, तर खरच पृथ्वीवरून सर्पवंश नष्ट झाला असता. तेवढ्यात तिथे ऋषी आस्तिक पोहचले.

आस्तिक ऋषींची आई नागवंशीय होती. कदाचित नष्ट होण्याच्या भीतीने नागवंशीय लोकांनी आस्तिक ऋषींना वकील म्हणून जन्मेजयाकडे पाठवले असावे.

आस्तिक ऋषींनी आपल्या वाकचातुर्याने जनेमजयाची मनधरणी केली आणि सापांना निर्वंश होण्यापासून वाचवले. तोच दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो.

खाली दिलेले चित्र नागकाल शिल्पाचे आहे. जे सध्या चेन्नई मधल्या शासकीय संग्रहालयात ठेवलेले आहे. एखाद्या यंत्रासारख्या दिसणाऱ्या ह्या नागकाल शिल्पाचे पूजन दक्षिणेकडे घरोघरी केले जात होतं असं म्हणतात.

 

nagpanachami inmarathi

 

नाग, साप हा समृद्धतेचे प्रतीक आहे. जिथे समृद्धी असते तिथे साप असतो असं म्हणतात. समृद्धी म्हणजे पूर्वीच्या काळी धान्याने भरलेले कोठारं.

धान्याने भरलेली कोठार म्हणजे उंदरं आली आणि उंदरं आली म्हणजे त्यांना खाण्यासाठी साप. म्हणून साप समृद्धतेचे प्रतीक मानण्यात आला असावा.

कुठल्यातरी वाड्यात किंवा किल्ल्यात दडवलेल्या खजिन्याचा राखणदार म्हणून पण बहुतेककरून साप असल्याच्याच गोष्टी कथांमधून किंवा गप्पांमधून ऐकवल्या जातात.

===

आपण जे सण साजरे करतो, त्यामागच्या कथा, कारणं आपल्याला माहित नसतात. ही माहिती वाचल्यानंतर पुढील सणांबद्दल, त्यांच्या कथांबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला होईलच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?