' शिष्याला शिष्य राहू देणारा तो गुरु कसा असेल? : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ९ – InMarathi

शिष्याला शिष्य राहू देणारा तो गुरु कसा असेल? : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ९

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ८

‘मला शिष्य करून घ्या’ अशी आबा पाटलाने केलेली विनंती ‘गुरुशिष्यपण हे तो अधमलक्षण’ असे म्हणत तुकोबांनी झिडकारली तरी रोज प्रश्नांना उत्तरे देईन असे तुकोबांनी आपणहूनच कबूल केल्याने झाल्या गोष्टीचा आबाला फार त्रास झाला नाही. कान्होबांना मात्र काही सुचेना. एक तरूण बाहेरगावाहून येतो, तुकोबा त्याला आपल्या घरी ठेवून घेतात आणि त्याला शिष्य करून घ्यायला सर्वांसमक्ष नकार देतात याचे त्यांना फार आश्चर्य झाले.

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

दुसऱ्या दिवशी आबा आसपास नाही असे पाहून कान्होबांनी तुकोबांना गाठले आणि विचारले,

दादा, काल तुम्ही असे कसे केलेत?

 

“काय केले?”

 

तुम्ही आबाला शिष्य करून घेण्यास नकार दिलात! मला आधी वाटले तुम्हाला शिष्य म्हणून तो पसंत नाही. प्रत्यक्षात कुणी गुरु असू नये आणि कुणी शिष्य बनू नये अशी भूमिका तुम्ही मांडलीत!

 

कान्होबा, तुम्हाला पटले नाही का ते?

 

कसे पटेल? दादा, तुमचीच रचना आहे –

 

देवा ऐसा शिष्य देई । ब्रह्मज्ञानी निपुण पाही ।।
जो कां भावाचा आगळा । भक्तिप्रेमाचा पुतळा ।।
ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचे ठाणे ।।
ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ।।

 

दादा, गुणी शिष्य मिळावा अशी इच्छा तर तुम्हीच व्यक्त केली होती! तो कसा असावा हे ही तुम्ही सांगितले होते. भावभक्तिवैराग्यसंपन्न शिष्य मिळाला तर त्याचे निंबलोण उतरीन, त्याची दृष्ट काढीन आणि त्याला स्वीकारीन असेच ना तुम्ही म्हणत होता?

 

दादा, आबा ह्या कसोटीला उतरणारा असेल वा नसेल, त्याची परीक्षा कदाचित तुम्ही केलीही असेल. कदाचित त्यात तो उत्तीर्ण झालाही नसेल पण काल तुम्ही सांगितलेले कारण वेगळे होते. ते अजून मला पुरते कळलेले नाही. सहज पाहता वाटतंय की तुमच्याच रचना एकमेकांविरोधी जात आहेत. माझा गोंधळ होतो आहे. एक नक्की सांगा दादा, तुम्हाला शिष्य हवाय की नको?

हे ऐकून तुकोबा म्हणतात,

कान्होबा पुन्हा ऐका, भगवंताजवळ पूर्वी केलेली मागणी मी पुन्हा करतो-

 

कृपा करावी भगवंते । ऐसा शिष्य देई मातें ।।
माझे व्रत जो चालवी । त्यासी द्यावें त्वां पालवी ।।
व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ।।
तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या दारी ।।

 

कान्होबा, माझे कार्य पुढे नेणारा शिष्य मला जरूर हवा आहे. तो इतका बलवान होवो की त्याचे नांव त्रिखंडात गाजो. तसा शिष्य मला मिळो असेच मागणे आहेच माझे!

 

दादा, जर शिष्य असेल तर गुरुही असेलच ना? तुम्ही तर गुरुशिष्याचे नातेच नाकारता आहात! गुरु व्हायचे नाही आणि शिष्य हवा म्हणायचे हे कोणाला कसे समजेल?

 

कान्होबा, असे गोंधळू नका. थोडा विचार करा. तुम्हाला माझे म्हणणे पटेल. ह्या गुरुशिष्याच्या नात्यावरील पहिला विचार अगदी प्राथमिक पातळीवरचा करा. जगात स्वतःला गुरु म्हणविणारे आणि शिष्य म्हणविणारे कसे वागतात ते तुम्ही पाहता ना? ते पाहून तुम्हीही म्हणाल –

 

जळोजळो ते गुरुपण । जळोजळो ते चेलेपण ।।
गुरु आला वेशीद्वारी । शिष्य पळतो खिंडोरी ।।
काशासाठी जालें येणें । त्याचे आलें वर्षासन ।।
तुका ह्मणे चेला । गुरु दोघे हि नरकाला ।।

 

कान्होबा, जगात गुरुशिष्य असे वागताना दिसतात. गुरुपाशी काही विद्या आहे असे शिष्याला वाटते आणि त्या गुरुलाही वाटते! मग देवघेव सुरु होते आणि त्याची प्रथा बनते. सर्वत्र असे चाललेले पाहून आबासारख्यांना तेच बरोबर वाटते. आपण त्याला पाठिंबा नाही द्यायचा.

 

कालही तुम्ही ऐकले असेल तर त्याने मला त्याची सेवा देऊ केली. पडेल ते काम करायची त्याची तयारी आहे. त्याची चूक नाही, त्याने जे पाहिले त्यानुसार तो बोलला. त्याला वाटते काहीतरी माझ्याजवळ असे आहे की त्याला ते मिळावे. खरी गोष्ट अशी आहे की जे माझ्याजवळ आहे ते त्याच्याही जवळ आहेच. खरोखर त्याच्यामाझ्यात काही भेद नाही. तुमच्या माझ्यात काही भेद नाही. मी कवित्व करतो आणि तुम्ही करीत नाही ही काही मोठ्या फरकाची गोष्ट नव्हे. मला कळले ते मी ह्या मार्गाने लोकांना सांगतो इतकेच. ते मिळविण्यासाठी त्याने माझे पाय धरण्याची गरज नाही.

 

चित्त शुद्ध करीत न्या असे मी सारखे सांगत असतो. ह्याहून अजून सांगणे नाही. ज्यांची ज्यांची चित्ते शुद्ध झाली त्यांच्यात मग फरक तो काय राहिला? त्यांच्यात गुरु आणि शिष्य असा भेद करील तो गुरु नव्हे! “

 

दादा, तुम्ही म्हणताय ते कळतंय थोडं थोडं. पण तुम्ही तसे भोंदू गुरु नव्हत आणि तुम्हाला शोभेसा शिष्यही असेलच की कुणीतरी.

असे बोलून कान्होबा काहीसे थांबले आणि म्हणाले,

इतके विचारले आता अजून एक अवघड प्रश्न विचारतो. मी खूप विचार केला पण उत्तर सापडले नाही. तुम्ही म्हणता,

 

देवा ऐसा शिष्य देई । ब्रह्मज्ञानी निपुण पाही ।।

 

दादा, तुम्हाला ब्रह्मज्ञानी शिष्य हवा आहे! तुम्ही देवापाशी मागत आहेत की माझ्यासाठी ब्रह्मज्ञानी शिष्य पाहा!

 

दादा, जो ब्रह्मज्ञानी झाला तो शिष्य होण्यासाठी तुमच्याकडे कशाला येईल? तोच आता गुरु नाही का झाला? गुरु म्हणजे मोठा ना? ब्रह्मज्ञानी म्हणजे मोठ्यातला मोठा ना? असो जो असेल त्याचे आता काय शिकायचे राहिले? तरी तुम्ही म्हणता की मला ब्रह्मज्ञानी शिष्य हवा!

 

कान्होबा, तुम्ही असा बारकाईने अभ्यास करता हे मला फार आवडते. असा विचार करता करताच प्रश्न सुटतात. आताही, प्रश्न विचारता विचारताच तुम्ही उत्तराच्या जवळ आला आहात. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही तेथे स्वतः पोहोचाल तर अधिक चांगले.

इतके बोलून तुकोबांनी विषय संपविला. कान्होबांच्या मनातील विचारचक्र मात्र चालत राहिले. त्यांना तुकोबांची एक रचना आठवली. त्यात तुकोबा म्हणतात –

जेणें वाढे अपकीर्ति । सर्वार्थीं तें वर्जावें ।।
सत्य रूचे भलेपण । वचन ते जगासी ।।
होइजेत शुद्ध त्यागें । वाऊगें तें सारावें ।।
तुका ह्मणे खोटे वर्म । निंद्यकर्म काळिमा ।।

कान्होबा मनात म्हणू लागले,

आपली अपकीर्ती होईल असे तुकोबा कधी वागायचे नाहीत.

आपण शिष्य स्वीकारतो असा डंका चहूंकडे एकदा झाला म्हणजे त्याला असा प्रतिसाद मिळेल की त्यातून पुढे जे होईल ते अनावर असेल. तुकोबांना शिष्य हवा अाहे पण गुरुपण नको आहे. गुरुपणातून येणारे दोष ते नाकारीत आहेत. स्वतःला शुद्ध करीत जाताना आपल्याला काळिमा लागेल असे वागू नका हे ते नेहमीच सांगतात. जे जे गैर आहे ते दूर सारा, त्याग करून शुद्ध व्हा असे सांगणारे तुकोबा सहज मिळणाऱ्या गुरुपणाचा त्याग करीत आहेत. जगाला योग्य तेच सांगावे आणि आपणही तेच आचरावे असे तुकोबांचे वागणे असते.

कान्होबांच्या मनात पुढे विचार आला,

गुरुत्व भावनेचा त्याग हा तुकोबांचा विचार आता आपल्या बराच ध्यानी आला.

तुकोबा म्हणतातच,

त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ।।
मग जैसा तैसा राहें । काय पाहे उरलें तें ।।
अंतरीचे विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ।।
तुका ह्मणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ।।

सहज मिळणारे गुरुत्व नाकारणारे तुकोबा सर्वांसाठीच शुद्ध मनाचा आग्रह धरीत आहेत. ज्यांचे मन शुद्ध झाले त्यांच्यात कोणताही भेद मानण्यास तुकोबा राजी नाहीत.

कान्होबांना वाटले,

दादा किती विचारपूर्वक बोलतात! स्वतःचे गुरुपण नाकारताना शिष्याचे शिष्यपण जावे असे ते म्हणत आहेत. व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ।। असे म्हणणारे तुकोबा शिष्याचे नाव मात्र जगभरांत होवो अशी कामना करीत आहेत! हा खरा गुरु! आपले गुरुपण आणि शिष्याचे शिष्यपण नाकारणारा!

शिष्याला शिष्य राहू देणारा तो गुरु कसा असेल?

हा विचार मनात आला तसे कान्होबांचे पुरे समाधान झाले आणि आता संध्याकाळी देवळात आबा कोणता प्रश्न विचारतो ह्याचे त्यांना वेध लागले.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?