' संकट आल्याशिवाय मनातील राष्ट्रीयत्व जागृत होत नाही – टिळकांचा अस्सल राष्ट्रवाद! – InMarathi

संकट आल्याशिवाय मनातील राष्ट्रीयत्व जागृत होत नाही – टिळकांचा अस्सल राष्ट्रवाद!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अमेय कुळकर्णी 

===

“Naturally, he was a great nationalist and he thought in terms of nationalism rather than the social movement of a subsequent day, but he was not a narrow minded nationalist. This is obvious. He did not think of a particular corner of India. He thought of the whole of India as his field of battle and as his field of achievement.”
-Jawaharlal Nehru

 

राष्ट्रीय एकात्मता

 

nationalism-inmarathi

 

विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात राष्ट्रवादाची निर्मिती करताना तसेच राष्ट्रीय एकात्मता साध्य करताना लोकमान्य टिळकांना प्राचीन कालखंडापासून चालत आलेल्या समाजजीवनाच्या वाटचालीची खूप मदत झाली.

आधुनिक जगाची जी मूल्ये आहेत, त्यांत राष्ट्रवाद हे एक मूल्य आहे. लोकमान्य टिळकांना आधुनिक काळातील राष्ट्रवादाची, राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना आणि भावना इथल्या समाजात घट्ट रुजवायची होती.

टिळकांना राष्ट्रवाद निर्माण करताना प्रत्येकाची अस्मिता राखून राष्ट्रवादाचा मजबूत पाया राष्ट्रीय एकात्मतेच्या आधारावर आणि धर्मनिर्पेक्षेच्या तत्वावर निर्माण करावयाचा होता.

अमेरिका या राष्ट्राचा उदय त्यांनी पाहिला होता. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मतेच्या आधारावर आधुनिक बलशाली व स्वावलंबी अशा भारत राष्ट्राची निर्मिती लोकमान्यांना करायची होती.

म्हणूनच पाश्चात्य विचारवंतांनी मांडलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेला छेद देऊन विविधता असलेल्या भरतभूमीसाठी राष्ट्रवादाच्या संकल्पनेची नव्याने मांडणी त्यांनी केली.

धर्म, वंश, जात, पंथ, भाषा इ. बाबतीत विविधता असणाऱ्या भारतीय समाजात, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होऊंन, एकतेची भावना दृढ़ होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी प्राचीन कालखंडापासूनच्या समजजीवनाचा विचार केला.

राष्ट्रीय एकात्मता दृढ़मूल होण्यासाठी व्यापक अर्थाने परकीय म्हणजे कोण, भारतीय कोणाला म्हणावे किंवा भारतीय म्हणजे कोण अशा महत्त्वाच्या मुद्यांवर विवेचन केले.

नगर येथे ३१ मे १९१६ रोजी व्यापारी मंडळातर्फे मानपत्र दिले त्याप्रसंगी लोकमान्य म्हणतात-

“पहिल्या पहिल्यांदा आमची समजूत अशी होती, की बोलून-बोलून इंग्रज सरकार परकीय आहे. त्यांना परकीय म्हणण्यात राजद्रोह नाही, ज्या परकीय गोष्टी आहेत त्या सांगणे ह्यात काही राजद्रोह नाही.

कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. परकीय पणाने होते काय? परकीय व आपल्यामधे भेद काय होतो, तर परकीयांची दृष्टी परकीय असते. परकीयांचे विचार परकीय असतात आणि परकीयांची एकंदर वागणूक अशा तऱ्हेची असते, की ज्यांना ते परकीय आहेत, त्या लोकांचे विशेष कल्याण करण्याकडे त्यांच्या बुद्धीची प्रवृत्ती होत नाही.

आपण असे समजू , की या ठिकाणी अहमदनगरला जे मुसलमान राजे होते- मी मुसलमांनांना परकीय म्हणत नाही – ते या देशात येऊन राहिले, येथे धंदे वाढावे अशी त्यांची बुद्धी तरी होती. धर्म निराळा असेल.

ज्या मनुष्याला हिन्दुस्थानात राहावयाचे त्याची मुले-बाळे हिंदुस्थानात राहायला इच्छितात ते राहतील. त्या मुलाबलांचे, त्या मनुष्याचे आणि इतर हिंदुस्थानात राहणाऱ्या माणसांचे जेणेकरून कल्याण होईल, अशी ज्यांची इच्छा, ते परकीय नाहीत.

परकीय म्हणजे धर्माने परकीय मी घेत नाही. या देशात राहणाऱ्या लोकांचे जेणेकरून हित होईल असे जो करितो, तो मनुष्य मुसलमान अगर इंग्रज असला, तरी हरकत नहीं. तो परका नाही.”

अशा त्यांच्या विवेचनांतून भारतीयत्वाची बैठक ठरू लागली.

टिळक युगापूर्वी भारतीय राष्ट्रवादाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे स्वरूप

कायदेशीर मार्गाने लोकजागृतीचे कार्य करणाऱ्या तरुणांचा पक्ष या वेळी देशात उदयास येत होता. पण याच वेळी सशस्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणारेही काही लोक देशात होते. महाराष्ट्रातले वासुदेव बळवंत फडके हे त्याचे ज्वलंत उदाहरण होते.

पण या सांप्रदायाचा आश्रय घेऊन हिंदुस्थानात पुनः एखाद्या क्रांतीचा उठाव करण्याचा प्रयत्न करणारे अनेक अप्रसिद्ध लोक या वेळी देशात संचार करीत होते.

त्यांचा वेष संन्याशाचा होता, तथापि देशातील दरिद्री जनतेच्या उपासमारीने त्यांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. जनतेची मुक्ताता व आपल्या राष्ट्राचा उद्धार होण्यासाठी बंडखेरीज दूसरा कोणताच मार्ग नाही असे त्यांना वाटत होते.

संन्यासवेषाने देशात संचार करणाऱ्या या लोकांचा एक मोठाच दंगा हिंदुस्थानात होईल अशी भीती मि. ए. ओ. ह्यूम यांच्या सारख्या हिंदुस्थान सरकारातील गृहमंत्र्याच्या चिटणीसासही वाटत होती.

त्यांच्या चरित्रात ही माहिती विल्यम वेडरबर्न यांनी दिली असून त्या भीतीचे वर्णन ते पुढीलप्रमाणे करतात.

“स्वयंप्रेरित असे अत्याचार, दॄष्ट लोकांचे खून, सावकारांच्या घरी दरोडे, आणि बाजारांच्या लुटालूटी जिकडेतिकडे एकदम सुरु होतील. आज अगदी खालच्या वर्गातील लोक अर्धपोटी आहेत.

त्यामुळे पहिले काही गुन्हे होताच तशा प्रकारचे शेकडो गुन्हे जिकडे तिकडे पसरतील. त्यामुळे सार्वत्रिक बेबंदशाही माजून राज्यसत्ता लुळी पडेल व प्रतिष्ठित लोकांचे सर्व व्यवहार बंद पडतील.

एकाच पानावर पडलेले लहान लहान पाण्याचे थेंब एकमेकांशी मिसळून त्यांना लवकरच दुर्धर स्वरूप प्राप्त होईल. अशा वेळी सरकारविरुद्ध असणारे असमंजस वृत्तीचे काही सुशिक्षित लोकही त्यात सामील होतील आणि ठिकठिकाणी त्यांचे नेतृत्व स्वीकारून या दंग्यांचे संघटन करून त्याला राष्ट्रीय बंडाचे स्वरूप देतील.”

 

लोकमान्यांचे ‘राष्ट्रवाद-विषयक’ विचार

 

lokmanya tilak inmarathi
freepressjournal.com

 

लोकमान्य टिळकांना ‘भारतीय राष्ट्रवादाचे व राष्ट्रीय एकात्मतेचे जनक’ म्हणून संबोधण्यात येते. भारतीय समाजात एक राष्ट्रीयत्वाची भावना हा विचार मांडताना त्यांनी जे मुद्दे मांडले त्यातून त्यांचा भारतीय समाज मनाचा किती सुक्ष्म अभ्यास होता ते लक्षात येते.

हिंदुस्थानात अनेक धर्म, पंथ, असंख्य भाषा, विविध रुढी, परंपरा अस्तित्वात आहेत. निरक्षरपणा, मागासलेपणा, कर्मठपणा, रुढी परंपरांचा जबरदस्त पगडा समाज मनावर आहे.

या सर्वांवर मात करून टिळकांना भारतीय समाजात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून परकीय ब्रिटिश सत्तेविरोधातील आंदोलन तीव्र करावयाचे होते. त्या कार्यात टिळक यशस्वीही झाले.

सन १८८० ते १९२० हा कालखंड हिन्दुस्थानाच्या इतिहासात क्रांतिकारक करणारा ठरला. या क्रांतिकारक बदलास टिळकांचे राजकीय व राष्ट्रवाद विषयक विचार व कार्य कारणीभूत ठरले आहेत.

टिळकांनी राष्ट्रवादाची व राष्ट्रीय एकात्मतेची मांडणी, प्रचलित राष्ट्रवादाच्या विचारसरणीला, सिद्धांताला छेद देऊन नव्याने केली.

त्यांनी मांडलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत आधुनिक भारताच्या निर्मितीचा मुख्य उद्देश होता. पण त्याच बरोबर लोकशाहीप्रधान शासन व्यवस्था, आर्थिक जीवन आणि भेदभाव विरहित समाज निर्मिती असे उद्देश टिळकांच्या राष्ट्रवादाच्या सिद्धांतामधे आहेत.

टिळकांनी समाजात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी, समाज एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव सुरु केला. समाजात उत्सवप्रियता असल्यामुळे सर्व जाती -धर्माचा समाज एकत्र येऊ लागला.

या समाजातील स्वत्व, स्वाभिमान जागृत व्हावा व लोकांच्या अंगी जोम, उत्साह यावा या उद्देशाने शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. उत्सवांच्या माध्यमातून भारतीय समाजात राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न टिळकांनी केला.

या उत्सवावर अनेकांनी आक्षेप घेतले. अशाच एका आक्षेपाला उत्तर देताना टिळकांनी राष्ट्रातील एकराष्ट्रीयत्वासंबंधीचे व राष्ट्रवादाचे वर्णन केसरीच्या २३ एप्रिल १९०१ च्या अग्रलेखात केले आहे. ते राष्ट्रसंबंधी भूमिका मांडताना लिहितात…

“उत्सवाच्या आक्षेपांच्या विचारसरणीकडे पाहिले असता त्यांचे म्हणणे असे दिसते, की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे राजे होऊन गेले.

परंतु त्यांच्यानंतर आज तीनशे वर्षांनी सर्वच मनु बदलून गेल्यामुळे आमचे राष्ट्र म्हणजे ‘महाराष्ट्र’ एवढेच नसून, त्याची सीमा उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस केपकान्यकुमारीपर्यंत व पश्चिमेस बलुचिस्थानापासून पूर्वेस बंगालच्या उपसागरपर्यंत आहे, व यामुळे या एवढ्या प्रदेशांतील सर्व जातींच्या व धर्माच्या व सर्व भाषांच्या लोकांस समान असा जर एखादा उत्सव असेल तरच त्यास आम्ही हल्लींच्या काळी राष्ट्रीय महोत्सव असे म्हणू सकृतदर्शनी ही कोटी बरोबर दिसते.

परंतु थोडासा सूक्ष्म विचार केला असता वरील प्रकारची कोटी पुढे आणणाऱ्या लोकांच्या मनांत राष्ट्रीयत्व म्हणजे काय व त्याचा उदय कशा रीतीने होतो या तत्त्वाची बिलकुल कल्पनाही नाही असे कष्टाने म्हणावे लागते.”

सर्वच बाबतीत विविधता, भिन्नत्व, असणाऱ्या भारतीय समाजात राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी, सर्वभारतीयांना एका सूत्रात बांधण्यासाठी विविध प्रसंगानुरूप आपली राष्ट्रवाद विषयक मते टिळकांनी मांडली आहेत.

त्यांच्या मतांचा विचार केला, तर पारतंत्र्यात राहणाऱ्या समाजात मग तो वंश, धर्म, भाषा. संस्कृती यात एकसारखेपणा नसली तरी त्यांच्यात ऐक्यभाव निर्माण होऊ शकतो.

समाजातील प्रत्येकाचे वेगळेपणाला धक्का न लावता अशा समाजाचे निर्माण होऊ शकते. त्यांच्यात राष्ट्रवादसंबंधीचे टिळकांनी विविध प्रसंगानुरूप मांडलेले राष्ट्रवाद विषयक काही विचार पुढीलप्रमाणे आहेत:

“आपली भिन्न भिन्न मते सोडून लोक एक होतात तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात.”

“राष्ट्रीयत्वाचा मुख्य समाहित तत्त्व हा असून हे जेथे सर्वात अधिक प्रमाणाने साध्य होईल। तेथेच परिच्छेदाची रेषा बरोबर पडेल.”

“संकटाच्या भावनेशिवाय राष्ट्रीयत्वाची कल्पना उत्पन्न होत नाही.”

त्याग व परोपकार भावना

स्वार्थत्याग हा राष्ट्रवादाचा एक घटक आहे. राष्ट्रवादाच्या कार्यासाठी स्वार्थत्यागाच्या भावनेतून “डेक्कन एजुकेशन सोसायटी” या शिक्षण संस्थेची स्थापना झाली खरी; पण पुढे हे तत्त्व बाजूला गेले व या इतर काही कारणांमुळे टिळकांनी डे.ए.सोसयटीचा राजीनामा दिला.

टिळक हे फक्त विचारवंतच होते असे नव्हे, तर आपल्या विचारांना व तत्त्वांना कृतीची जोड देत होते. स्वार्थत्याग हा राष्ट्रवादाचा घटक होऊ शकतो असे विचार मांडून ते थांबले नाहीत, तर आपल्या कृतीतून ते त्यांनी दाखवून दिले.

 

राष्ट्रीय उत्सव

 

lokmanya tilak inmarathi1
asianvoice.com

 

विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात एकराष्ट्रीयत्वासाठी, राष्ट्रवादी भावनेसाठी टिळक विविध मार्ग अनुसरत होते. त्यांच्या समोर पहिला मोठा प्रश्न होता तो लोकसंघटनाचा.

लोकांच्या मनात स्वत्वाची भावना जागृत करणे हे मोठे आव्हानाचे काम होते, हे काम टिळकांनी दोन उत्सव सुरु करून केले. एक म्हणजे गणेश उत्सव व दुसरा म्हणजे शिवजयंती उत्सव.

राष्ट्रीय उत्सवांची आवश्यकता काय असते, त्यातून काय साध्य करावयाचे असते, राष्ट्रवादासाठी राष्ट्रीय उत्सवांचा उपयोग कसा होतो, याबाबतचे विचार टिळकांनी अनेक प्रसंगी मांडलेले आहेत. ते खालीलप्रमाणे:

“खरा उत्सव म्हणजे ज्यापासून आपल्या प्रगतीला मदत होते तो. मोठ्या लोकांचे जे उत्सव होतात, ते त्यांच्या गुणांचा प्रसार व्हावा म्हणून होतात.”

वृत्तपत्रातून राष्ट्रवादाचा प्रसार व राजद्रोहाचा खटला

 

lokmanya tilak inmarathi2
twitter.com

 

पारतंत्र्यात जीवन जगणाऱ्या समाजातील वृत्तपत्रांची भूमिका ही समाजप्रबोधन, अन्याय-अत्याचार याविरुद्ध लोकमत जागृत करणे, समाजात ऐक्यभाव निर्माण करून राष्ट्रवादी भावना जागृत करणे आणि राज्यकर्त्यांना जनतेच्या दुःखाची माहिती करून देणे इ. सारख्या स्वरुपाची असते.

टिळक केसरी-मराठ्यामधून वरील भूमिका बजावत असल्यामुळे राष्ट्रीय चळवळीला, स्वातंत्र्य लढ्याला लढाऊ आक्रमक स्वरूप प्राप्त होत होते.

ही बाब ब्रिटिश साम्राज्याला, त्यांच्या हितसंबंधाला बाधा आणणारी असल्याने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरणे आणि त्यांना कारागृहात पाठविणे हे इंग्रजांच्या दृष्टीने अनिवार्य होऊन बसले.

केसरी-मराठा वर्तमानपत्रांतून जे लेख प्रसिद्ध होत होते, त्यामुळे भारतीय समाजात दिवसेंदिवस राष्ट्रवादी भावना वाढीला लागून असंतोष वाढत होता.

प्रचलित कायद्यांचे उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून सरकारला कोंडीत पकडून त्यांच्या ध्येय धोरणावर व कारभारावर कठोर टिका टिळक करीत असत.

जनतेच्या प्रश्नांचा सार्वजनिक स्वरूपात लेखणीच्या माध्यमातून प्रसार करणे हे टिळकांच्या वृत्तपत्र साहित्याचे मुख्य अंग केले होते. हिंदुस्थानातील साम्राज्याला ओहोटी लागेल याची भिती सरकारला वाटत होती.

टिळकांना तुरुंगात पाठविणे हा एकमेव मार्ग इंग्रज सरकारने स्वीकारून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. राजद्रोहाचा खटला भरताना टिळकांवर वृत्तपत्र साहित्य हा एक महत्वाचा पुरावा न्ययालयापुढे मांडण्यात आला होता.

टिळकांनी आपली बाजू स्वतः न्यायालयात मांडली. राष्ट्रीयत्वाची भावना नसलेल्या समाजात राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रातील साहित्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते असे टिळकांचे मत होते.

राष्ट्रवादाविषयक भूमिकेतून टिळकांनी इतिहासाची केलेली मांडणी

राष्ट्रवादी भावनेचा आणि इतिहासाचा अगदी घनिष्ठ संबंध असतो. इतिहासाच्या माध्यमातून समाज जीवनात चैतन्य निर्माण करता येते. समाज जीवनात अनेक घडामोडी, बदल, परिवर्तन घडून येत असतात.

भारताचा विचार करता राष्ट्र्वादाच्या प्रक्रियेत टिळकांचे साहित्यिक योगदानातील महत्त्वाची बाब म्हणजे इतिहासविषयी त्यांची त्यांची असणारी भूमिका. इतिहासाचा आणि इतिहास काळात होऊन गेलेल्या चांगलीच मदत होते.

इतिहासाचा आणि इतिहास काळात होऊन गेलेल्या थोर पुरुषांचा, व प्राचीन साहित्याचा राष्ट्रवादाशी संबंध टिळकांनी लावला. टिळक इतिहासाचा आणि राष्ट्रवादाचा संबंध जोडताना व इतिहासविषयी आपले मत प्रकट करताना म्हणतात,

“इतिहास हा देशाच्या अवनत स्थितीमध्ये लोकांस समाधानवृत्ति प्राप्त करून देण्यास व पुढील काळ चांगला येईल या आशेवर दिवस कंठणयाचे सामर्थ्य आणण्यास एक प्रकारची शक्ति आहे.”

“कोणत्याही उदयोन्मुख राष्ट्राला आपल्या इतिहासाचे संशोधन करणे हे पाहिले काम असते.”

“तरुण पिढी तेजस्वी निपजण्यास जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने खऱ्या इतिहासाचा फार उपयोग होतो.”

किती यथार्थ विचार आहेत पहा. आजच्या उदयोन्मुख, तरूण भारतासाठी तर कृतीत आणायलाच हवेत असे विचार शंभर वर्षांपूर्वीच टिळकांनी मांडून ठेवले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत टिळकांचे साहित्य आणि भारतीय राष्ट्रवाद

वृत्तपत्रांतून लेखणीच्या माध्यमातून राष्टवाद निर्मितीसाठी ज्या घडामोडींचा परिचय टिळकांनी भारतीय समाजाला करून दिला त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय घटनांचा भारतीय राष्ट्रवादासाठी करून घेतलेला वापर.

टिळकांनी आंतरराष्ट्रीय घटनांचे विश्लेषण, जगभरातील घडामोडींचा, अन्य देशात घडणाऱ्या घटनांचा भारतीय राष्ट्रवादाच्या भावनेसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून उपयोग करून घेतला.

जगात घडणाऱ्या विविध घटनांचे विश्लेषण वृत्तपत्रातून ते करीत असत. त्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:

(अ) कार्ल मार्क्सचे साम्यवादी विचार टिळकांनी हिंदुस्थानात प्रथमः भारतीय समाजसमोर ठेवले. टिळकांनी कार्ल मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताची ओळख प्रथमः भारतीय समाजाला ८ मे १८८१ च्या ‘मराठा’ या इंग्रजी मध्यमाच्या वृत्तपत्रातून करून दिली होती.

(ब) आयर्लंडमधील राष्ट्रीय चळवळीचा संदर्भ भारतीय राष्ट्रीय चळवळीशी जोडताना टिळकांनी केसरीत ता. ३० जानेवारी १९०६ मध्ये ‘आमचेच पण कळेल केव्हा- १’ या अग्रलेखात आपले विचार मांडले आहेत.

(क) टिळकांनी रशियातील झारशाही विरुद्धच्या संघर्षाचे उदहारण भारतीयांसमोर ठेवून भारतीय राष्ट्रवादाला चालना दिली.

रशियातील घडामोडींचा लेखाजोखा भारतीयांसमोर ठेवताना केसरी ता. २८ मे १९०७ ‘मेल्याखेरीज स्वर्ग दिसत नाही’ या अग्रलेखात आपले विचार टिळकांनी मांडले आहेत.
_______________________________________________________________________
टिळकांचा राष्ट्रवाद हा अस्सल देशी होता. त्यात कोणताही अहंभाव नव्हता. आपल्या देशाचे दुर्दैव असे की, त्याकडे पाहणारे आजच्या घटकेलाही वेगळ्या चष्म्यातून पाहात असतात. त्यांना लावणारे निकष हेही आजच्या पातळीवरचे असतात.

ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत असताना त्यांनाही अशा अनेक अडथळ्यांना ओलांडून जावे लागले.

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी जे बहुविध पैलू राष्ट्रीयत्व भावनेसाठी निर्माण केले, उलगडून दाखविले, त्यामुळे राजकीय ऐक्यासोबतच आर्थिक, सामाजिक, संस्कृतीत, धार्मिक एकात्मता निश्चितपणे निर्माण झाली.

ही एकात्मता भारताला चिरंतर मार्गदर्शक आणि प्रेरक ठरेल अशीच चिरस्थायी आहे. म्हणूनच आजच्या परिस्थितीत अनेक संकटे सोडवण्याकरता ती मार्गदर्शक ठरू शकते आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांचे इतिहासातील राष्ट्रीय नेता म्हणून अढळ स्थान राहील.

संदर्भ:
(१) समग्र लोकमान्य टिळक खंड: ३, ४, ५, ६, ८
(२) टिळक सूक्ति साग्रह : सदाशिव विनायक बापट
(३) आधुनिक भारत – शं. द. जावडेकर
(४) लोकमान्य टिळक लेखसंग्रह: लक्ष्मणशास्त्री जोशी
(५)”भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते” (राष्ट्र विषयक केलेले चिंतन संग्रह): मुंबई तरुण भारत, २०१९
(६) टिळक भारत: शी. ल. करंदीकर
(७) Lokmanya Tilak: A Study- D.P. Karmarkar

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?