मास्कबाबत जपानने लढवलीये अनोखी “तांत्रिक” शक्कल; पाहाल तर चक्रावून जाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. सगळीकडेच त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. त्यातली एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तोंडावर मास्क लावणे.

तोंडावर मास्क लावण्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही कमी होते, हे जसं लक्षात आलं तसतसे मास्कचे महत्व वाढत आहे. मास्क लावल्याने आपल्या बरोबरच इतरांचीही काळजी घेतली जाते.

तसं पाहिलं तर मास्कचे विविध प्रकार बाजारामध्ये येताना दिसत आहेत. परंतु कोरोनाच्या रुग्णांनी N-95 मास्क लावावा असं सांगितलं जातं.

अगदीच नाही, तर धडधाकट लोकांनी साधा मास्क तरी वापरावा अशी अपेक्षा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व्यक्त केली आहे.

 

mask inmarathi
Theprint.com

 

आपण पाहतोच, की भारतातही वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बाजारात आले आहेत. अगदी एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्नासाठी लागणारे पैठणीचे, जरीचे मास्कही बाजारात आले आहेत. मॅचिंग मास्क सध्या वापरले जात आहेत.

त्याचबरोबर हौसेखातर काहीजण सोन्याचे मास्क ही वापरत आहेत. मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानातून ही आपल्याला असे मास्क बनवून दिले जातील असं सांगितलं जात आहे.

 

golden mask inmarathi
thetribune.com

 

खेडोपाडी, गावोगावी आता मास्क घालणे लोकांना अनिवार्य करण्यात येत आहे. मास्क नाही लावला तर दंडही वसूल केला जात आहे.

तर अशा या मास्कच्या आपल्याला माहीत असलेल्या कहाण्या. जगभराही निरनिराळ्या देशात मास्कच्या वेगळ्या कहाण्या आहेत.

जपानमध्ये मात्र सध्या जो नाविन्यपूर्ण मास्क आला आहे, त्यातील कल्पकता पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तसं म्हणाल तर जपानमध्ये आधीपासूनच मास्क संस्कृती अस्तित्वात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

कारण तिथे आजारी लोकं, सर्दी खोकला झालेले रुग्ण हे तोंडावर मास्क लावूनच फिरतात. आपल्यापासून इतर कोणालाही आजार होऊ नये याची काळजी जपानी लोक आधीपासूनच घेतात.

आपल्याला माहीतच आहे, की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न जपान मध्ये पहिल्यांदा होतो. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींकरिता टेक्नॉलॉजी वापरायची त्यांची सवय आहे.

 

technology inmarathi
technews2day.com

 

आपल्या जवळ असलेली साधन संपत्ती आणि टेक्नॉलॉजी यांचा वापर ते आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच करतात. तसाच प्रयत्न त्यांनी आपल्या मास्कसाठी केला नसता तरच नवल होतं.

आता आलेला नवीन मास्क ही जपानच्या तंत्रज्ञानाच्या संस्कृतीला जागणारा आहे. तिथे आता टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार झालेला मास्क अस्तित्वात आला आहे.

जपान मधली स्टार्टअप कंपनी “डोनट रोबोटिक्स” या कंपनीने एक नवीनच मास्क सध्या विकसित केला आहे.

यामध्ये 3D टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आणि त्याद्वारे आपल्या कॉम्प्युटरवर अक्षरं उमटणार आहेत. हा मास्क ब्लूटूथ च्या साह्याने इंटरनेटशी जोडता येतो.

या मास्क ची वैशिष्ट्ये काय आहेत?

 

japan smart msk inmarathi
insider.com

 

हा एक पांढरा प्लास्टिकचा “सी मास्क” आहे. आपल्या नेहमीच्या मास्क वर हा मास्क बसवता येतो.

ब्लूटूथ च्या साह्याने हा मास्क इंटरनेटशी जोडता येतो.

हा मास्क आपला मोबाईल फोन लॅपटॉप किंवा टॅबलेटशी कनेक्ट करता येतो.

आपण जे बोलतो ते हा मास्क आठ भाषांमध्ये भाषांतरीत करू शकतो. ते भाषांतर आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये, लॅपटॉप वर, टॅबलेट वर दिसू शकते.

यामुळे परदेशात गेल्यावर या मास्कचा वापर सुपर मार्केटमध्ये स्थानिक लोकांशी बोलताना सहजपणे होईल.

सध्या मास्क मध्ये बोलताना बरेचदा काय बोललो आहे हे समजत नाही. परंतु हा मास्क लावून बोलल्यास त्याचे व्यवस्थित भाषांतर आपल्याला दिसेल, तेही आपल्या भाषेत.

मास्कद्वारे कोणालाही कॉल करता येऊ शकतो. मास्क वापरकर्त्याच्या संदेशाचे भाषांतर सध्या तरी आठ भाषांमध्ये करता येते ही एक उपयुक्त गोष्ट आहे.

सध्या, भाषांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, मंडेरियन, कोरियन, बहासा इंडोनेशियन, स्पॅनिश, रशियन आणि व्हिएतनामी भाषांचा समावेश आहे. पुढे यात वाढ होऊ शकते.

 

japan smart msk inmarathi1
luxurylaunches.com

 

डोनट रोबोटिक्सचे चीफ एक्झिक्यूटिव्ह ‘तैसूके ओनो’ याविषयी सांगताना म्हणतात की,

“गेली अनेक वर्ष आम्ही अशी टेक्नॉलॉजी वापरून एक रोबो तयार करत होतो, जो आवाज ओळखेल. आणि इतर भाषांमध्ये त्याचं भाषांतर करेल. तीच टेक्नॉलॉजी आम्ही मास्क मध्ये वापरली.”

कोरोना ही जागतिक महामारी सुरू झाली आणि संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटले.

केवळ आरोग्यविषयक समस्या नाही,  तर संपूर्ण जगात त्याचे नकारात्मक आर्थिक परिणामदेखील दिसून येत आहेत. अनेक छोटे-मोठे उद्योग सध्या बंद आहेत.

 

unemployment inmarathi 1
telegraph.com

 

डोनट रोबोटिक्सही या परिस्थितीला अपवाद नव्हती. या जागतिक महामारीचं संकट आपली कंपनी कसे झेलेलं याचा विचार करताना त्यांना या मास्कची कल्पना सुचली.

खरंतर त्यांचे हे रोबोट्स विमानतळांवर भाषांतर करण्यासाठी मदत करणार होते. परंतु आता विमानसेवा खंडित झाली आहे. आणि सुरू होईल तेव्हाही ती पूर्वीइतकी मोठ्याप्रमाणावर असणार नाही हेही खरंच आहे.

त्यामुळे कंपनीचे झालेले सगळे व्यवहार सध्या ठप्प झालेत. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागणार होता. त्यातूनच कंपनीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

त्याच वेळेस त्यांच्या इंजिनिअर्सनी हीच टेक्नॉलॉजी वापरून मास्क बनवता येतील का असा विचार केला, आणि त्यादृष्टीने काम सुरू केले त्यात त्यांना यश आले. आता तसे मास्क तयार झाले आहेत.

येणाऱ्या सप्टेंबर मध्ये कंपनीचे पहिले ५००० सी मास्क विकले जाणार आहेत. सध्या त्यांनी एका मास्कची किंमत ४० डॉलर इतकी ठेवली आहे.

 

japan smart msk inmarathi2
interestingengineering.com

 

चीन, अमेरिका आणि युरोप मधील देश याठिकाणी हे मास्क सुरुवातीला पाठवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. थोड्याच दिवसात मास्कचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचा कंपनीचा विचार आहे.

तसेच जगातील इतर देशांनाही अशा प्रकारचे मास्क पुरवता येतील का? याची चाचपणी ते करणार आहेत. गेल्या वर्षापर्यंत असं काही उत्पादन आपण करू याचा विचारही कंपनीने कधी केला नव्हता.

कोरोनामुळे संपूर्ण जगाचीच घडी विस्कळीत झाली आहे. त्याचा प्रभाव जगातील प्रत्येक ज्ञात-अज्ञात क्षेत्रावर थोड्याफार प्रमाणात होत आहे.

आरोग्याच्या समस्या बरोबरच आर्थिक समस्या आणि सामाजिक समस्याही उत्पन्न होत आहेत. परंतु या संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे डोनट रोबोटिक्स या कंपनीने आपल्या कल्पनापूर्वक मास्कचे निर्माण करून दाखवून दिले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?