'अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या "इको बाबा" सारखं प्रत्येकाने व्हायला हवं...पण...!

अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या “इको बाबा” सारखं प्रत्येकाने व्हायला हवं…पण…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या लॉकडाऊन मुळे प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने एकंदरच पर्यावरणात होणारे बदल आपण बघत आहोत!

पर्यावरण किती महत्वाचे आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर किती मोठा प्रभाव असतो हे सगळं आपण कित्येक दिवसात अनुभवतोय. आज एक व्हायरस साऱ्या जगाला आपल्या तालावर नाचवतो आहे!

आता आपल्याला प्रत्येक गोष्ट इको फ्रेंडली मिळते अगदी घालायच्या कपड्यांपासून ते सजावटीच्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्ट पर्यावरणाची काळजी घेऊन बनवली जात आहे.

बलबीर सिंग – ज्याला लोक आता इको-बाबा या नावाने ओळखतात. त्यांनी १६० किमी लांबीची नदी स्वच्छ केली. त्यासाठी त्याने स्वयंसेवकांची मदत घेतली. लोकांकडून फंड गोळा केले.

बलबीरसिंग सिच्चेवाल हे पंजाबचे रहिवासी असून ते पर्यावरणहितकारी म्हणून तिथे ओळखले जातात. आणि त्यांना इको बाबा म्हटले जाते.

 

balbir singh inmarathi
thebetterindia.com

 

खरंतर भारत हा देश, या देशात वाहत असलेल्या अनेक नद्यांमुळे सुजलाम् सुफलाम् म्हणून जगभर ओळखला जात होता.

मात्र साधारण गेल्या तीस चाळीस वर्षांपासून ठिकठिकाणच्या या नद्यांमध्ये गटारचे सांडपाणी, घनकचरा, कारखान्यांतील रसायने इत्यादी सोडले जाऊन या नद्या प्रदुषित झाल्या.

यातील पाणी पिण्याच्या तर कामाचे नाहीच राहिले, उलट ते घातक ठरू लागले. जिथे तिथे नद्या आटू लागल्या. नैसर्गिक झरे कचऱ्यांच्या ढिगाखाली दबले गेले. प्रवाह खुंटला.

त्यामुळे जराशा पावसातही नद्यांना पूर येऊ लागले आणि किनाऱ्यावरील गावांना नुकसान होऊ लागला. अर्थात ही सगळी करणी मानवाने पर्यावरणाची केलेली उपेक्षा आणि दुर्लक्ष यामुळेच निर्माण झाली.

ही व्यथा कुणा एका नदीची नाही. देशातील बहुतांश नद्यांची आहे. यात अगदी गंगा यमुनासारख्या महानद्या देखील वाचल्या नाहीत. प्रदुषित झाल्या आहेत. छोट्या नद्यांची कथा तर विचारूच नका.

एकेकाळी छोट्या छोट्या गावांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करत, गावची शोभा आणि जीवनदायिनी म्हणून वाहत असलेल्या या नद्या मृतवत झाल्या, घातक झाल्या.

अशीच एक छोटीशी नदी म्हणजे पंजाबमधील काली बिन नदी. बियास नदीची उपनदी. मात्र तिला संजीवनी देणारा एक माणूस भेटला तो म्हणजे बलबीरसिंग उर्फ इको बाबा.

 

eco baba inmarathi
brightvibes.com

 

सन २००० साली त्यांना आपल्या परिसरात वाहणाऱ्या काली बिन या प्रदुषित झालेल्या नदीसाठी काहीतरी करायला हवं असं वाटू लागलं.

ही नदी बियास या नदीची उपनदी आहे. ती १६० किमी लांबीची असून मधल्या काळात ती कारखान्याचे पाणी आणि इतर गाळकचरा यामुळे खूपच प्रदुषित झाली होती.

खरंतर ती एक पवित्र नदी म्हणून ओळखली जायची. पण आता प्रदुषणामुळे तिचं स्वरूप नदीचं उरलं नव्हतं, तर त्याला एका नाल्याचं स्वरुप आलं होतं. काही ठिकाणी तर तिचा प्रवाह आटून गेला होता.

त्यामुळे त्या भागातल्या लोकांना गावात नदी असूनही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते.

या सगळ्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा असं त्यांना वाटलं. बलबीर सिंग यांनी त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि काही स्वयंसेवकांची फौज गोळा करून कामाला सुरूवात केली.

या सगळ्या फौजेसह त्यांनी नदीकिनाऱ्यावरील गावा गावात जाऊन लोकांचे प्रबोधन केले, जागृती केली. नदीच्या शुद्धीकरणाचे महत्त्व समजावले आणि त्यांच्याकडून त्यासाठी वर्गण्या गोळा केल्या.

अशी जवळपास २४ गावे होती, ज्यांनी आपल्या या नदीसाठी मदत केली. कधी पैशाच्या स्वरूपात तर कधी प्रत्यक्ष मदतीच्या स्वरूपात.

 

eco baba project river inmarathi
thebetterindia.com

 

सगळ्यांनी मिळून ठिकठिकाणचा नदिकिनाऱ्यावरचा कचरा, गाळ, घाण साफ केली. एवढंच नाही, तर ते किनारे निरनिराळी झाडे लावून शोभिवंत केले.

काही ठिकाणी आंघोळीसाठी छानसे घाट बांधले. तिथे पोचण्यासाठी रस्ते नीट केले.

यापुढे नदीत घाण, कचरा, गटारीचे पाणी कधीच सोडायचे नाही याबाबतही त्यांनी लोकांची मने वळवली. त्यांना जागृत केले. त्याऐवजी वेस्टेजची विल्हेवाट कशी लावायची याचे पर्यायही सुचवले. अंमलात आणून घेतले.

या सगळ्या प्रयत्नांमुळे नदी स्वच्छ झाली. नदीकाठचे नैसर्गिक झरे पुन्हा मोकळे झाले, वाहू लागले, आणि नदी पुन्हा भरण्यास सुरूवात झाली.

या नदीच्या किनाऱ्यावरील गावातील सांडपाण्याची विल्हेवाट नदीत न लावता परस्पर लागावी यासाठी मग बलबीर सिंग यांनी सरकारची मदत घेऊन अंडरग्राऊन्ड गटारांची व्यवस्था करून घेतली.

त्यासाठी प्रयत्न, संघर्ष केला. हे पाणी नदीत न सोडता ते एका ठिकाणी तलावात साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती आणि इतर बाह्य कारणांसाठी वापराची सोय करून घेतली.

या कामासाठी बलबीर सिंग यांचे राज्यात आणि देशातही खूप कौतुक झाले. एवढेच नव्हे, तर त्याच्या कामाची दखल बाहेरच्या देशांतही घेतली गेली.

 

balbir singh 2 inmarathi
prokerala.com

 

बलबीर सिंगने केवळ पर्यावरणाचे संगोपन करण्याचेच काम केले असे नाही, तर याच वेळी त्याने गावागावात शाळा आणि महाविद्यालये उभी केली.

त्यांनी स्थापन केलेल्या अशाच एका तंत्रमहाविद्यालयातील मुलांनी या वर्षाच्या फेब्रुवारीत घनकचऱ्याची विल्हेवाट लावणारे मशीन तयार केले आहे.

ह्या मशीनमुळे घनकचऱ्यातील प्लास्टिक, काच आणि धातूच्या वस्तू वेगळ्या करता येतात. हे मशीन अत्यंत स्वस्तात बनत असून त्याची कार्यक्षमता तपासली गेली आहे.

आता त्यांनी सतलज नदीवर देखील असंच काम करण्यास सुरूवात केली आहे. या नदीत साठलेल्या गाळामुळे पावसाळ्यात या नदीला पूर यायचा. किनाऱ्यावरील गावांचे नुकसान व्हायचे. शिवाय हे पाणीही दुषित होते.

या नदीतील सगळी माती, सगळा गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या गाळातून निघणारी प्रचंड माती याच नदीवर धरण बांधण्यासाठी वापरली जाते. आणि रस्ते बांधण्यासाठी वापरली जातेय.

या प्रकल्पामुळे सतलज नदिच्या किनाऱ्यावरील पाचशे गावांना त्याचा फायदा होणार आहे.

प्रत्येक गाव आणि त्या गावची प्रदुषित झालेली छोटीशी नदी यांना अशाप्रकारे संजीवन देणारा बलबीर सिंग उर्फ इको बाबा या प्रत्येक गावात उभा राहायला हवा.

 

eco baba 2 inmarathi
thebetterindia.com

 

तर भारतातील सर्व नद्या पुन्हा जिवंतपणे खळाळू लागतील, सुंदर होतील., पवित्र होतील. त्यासाठी गरज आहे ती लोकांमध्ये जागृतीची, थोडी मेहनत घेण्याच्या तयारीची.

ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे गावची नदी, पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.

त्यासाठी सरकार येऊन काही करेल म्हणून हातावर हात धरून बसून चालणार नाही. सरकारने काही केलं, तरी आपण जोपर्यंत आपल्या सवयी आणि वृत्ती बदलत नाही तोपर्यंत त्याचा उपयोगही होणार नाही.

चला तर आजपासून निदान इतकी तरी निश्चय करू की आपण अशा नैसर्गिक जलस्त्रोत आणि इतर पर्यावरणाला नुकसान पोहोचेल अशी कोणतीच कृती करणार नाही.

आपल्या सांडपाण्याची व्यवस्था आपण लावू. त्यासाठी सरकारची मदत घेऊ. इतरांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न करू.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?