वर्षाला ५ कोटी रुपये कमावणाऱ्या “ज्योतिष” सांगणाऱ्याची कहाणी कित्येक गोष्टी शिकवून जाते…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

ज्योतिष सांगण्यासाठी काही विशिष्ट अभ्यास करावा लागतो. त्यातून ग्रहतारे यांची स्थिती, माणसाची जन्मतारीख, जन्मवेळ या सगळ्याचा मेळ घालून माणसाचं ज्योतिष वर्तवलं जातं.

कधीकधी देशात येणाऱ्या पिकपाण्याचं भविष्य सांगितलं जातं. हल्ली तर पृथ्वीचा अंत होणार असंही भविष्य मध्येमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतंच.

पण लोक मुख्यतः स्वतःचे भविष्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

 

puri bhaji inmarathi
indiatv.com

 

परीक्षेत किती मार्क मिळतील? नोकरी कधी मिळेल? कुठलं करिअर चांगलं? लग्न कधी होईल? मुलं कधी होतील? व्यवसाय चालेल का? अपयश संपेल का? हे पाहण्यासाठी ज्योतिषांकडे जाण्याचा कल वाढलेला आहे.

बरेच ज्योतिषी लोकांच्या या असहाय्यतेचा आणि हतबल असण्याचा फायदा उठवून त्यांना विविध उपाय सांगतात आणि भरपूर पैसे कमावतात.

म्हणूनच ज्योतिष सांगणं हे करियर जसे पैसे देणारे, मानसन्मान देणारे आहे तसेच लोकांची विश्वासार्हता नसलेले देखील आहे.

जे बुद्धिवादी आणि कामालाच देव मानणारे लोक असतात, त्यांचा मात्र ज्योतिषावर विश्वास नसतो. त्यांना या सगळ्या गोष्टी भंपक वाटतात. ते चुकूनही ज्योतिषाकडे जात नाहीत. आपलं भविष्य विचारत नाहीत.

पुनीतला देखील जे लोक भविष्य सांगतात त्यांच्यावर काडीचाही विश्वास नव्हता. तो स्वतः कुठल्याही ज्योतिष्याकडे गेला नाही. परंतु नशिबाचे फासेच असे पडले की ज्योतिष त्याच्याकडे येणार होतं. तेच त्याचं करिअर, त्याचं भाग्य होतं.

पुनीत गुप्ता सध्याच्या एस्ट्रोटॉक या भविष्य विषयक कंपनीचा संस्थापक आणि सीईओ. आज एस्ट्रोटॉक ही भविष्याबद्दलच्या प्रत्येक क्षेत्रात कन्सल्टेशन देते.

अशाप्रकारे ज्योतिषाबद्दल चालू झालेली ही पहिलीच अग्रगण्य कंपनी आहे. ज्यात ज्योतिषांना ग्राहक आणि ग्राहकाला ज्योतिषी दिला जातो.

 

astrotalk inmarathi
marketingmind.com

 

पुनीत या क्षेत्राकडे कसा वळला याची एक रंजक कथा आहे. एमबीए केलेला पुनीत आयुष्याच्या एका वळणावर नोकरी सोडून देतो. प्रेमात अपयश येते, पुढे काय करायचं याची कसलीही कल्पना नसताना अचानक त्याला एक ज्योतिषी भेटते. आणि तोच त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरतो.

आपलं ग्रॅज्युएशन बी.टेक मध्ये पूर्ण केल्यानंतर पुनीतने मुंबईतील नोमुरा या मूळच्या जपानी कंपनीत नोकरी धरली. तशी त्याची नोकरी व्यवस्थित चालू होती. पगारही ३७ हजार रुपये होता, त्यात तो समाधानी होता.

आता त्याच्या आयुष्यात आली एक सुंदर, श्रीमंत मुलगी. त्यामुळे पुनीत आनंदात होता. हवी तशी नोकरी आणि छोकरी मिळाल्याने आता आणखीन काय हवं! यातच तो खुश होता.

त्या मुलीला मात्र पुनीतने स्वतःचं राहणीमान सुधारावे त्यासाठी प्रयत्न करावेत असं वाटायचं. उच्चभ्रू घरातील असल्यामुळे तिच्या आवडीनिवडी देखील तशाच होत्या. पुनीतचं मध्यमवर्गीय राहणं तिला पसंत नव्हतं. परंतु पुनीतने ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही.

एकदा पाऊस पडत असताना मुंबईच्या रस्त्यावरून तो तिला बाईक वर घेऊन निघाला आणि रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी तिच्या पायावर उडालं. बस इतकंच कारण त्यांच्या दुराव्याला पुरेसे ठरले.

“तू साधी छोटी कार घेऊ शकत नाहीस का? माझे वडील मर्सिडीज मधून फिरतात आणि तुझ्या घरच्यांना कार कशी आहे हे ही माहीत नाही. नशीब समज, की मी अजुनही तुझ्यावर प्रेम करते.” हे तिचे उद्गार पुनीतच्या जिव्हारी लागले.

दुसऱ्याच दिवशी पुनीतने नोकरीचा राजीनामा दिला आणि तो पंजाब मध्ये आपल्या गावी गेला. तिकडे त्याचे आजोबा आयुर्वेदिक औषध द्यायचे. तोच आपण बिजनेस करूयात असा विचार पुनीतने केला.

 

aayurved inmarathi
patrika.com

 

परंतु आजोबांचे विचार आणि त्याचे विचार यामध्ये प्रचंड तफावत होती. पुनीतला कळून चुकले की, आयुर्वेदिक औषधांचा व्यापार तो करू शकणार नाही.

त्यानंतर पुनीत डिप्रेशनमध्ये गेला. जवळ जवळ सात आठ महिने तो त्यातच होता. दिवसेंदिवस फक्त भिंतींकडे तो पाहत बसायचा. काय करायचे काही कळत नव्हते, त्याचा काहीही प्लॅन त्याच्याजवळ नव्हता.

एका मित्राच्या सांगण्यावरून, त्याने एका स्टार्टअप कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली.  त्या कंपनीचा प्रोजेक्ट त्याला करायचा होता. त्यासाठी मुंबईला येणे भाग होते.

तो मुंबईला आला, परंतु कंपनीने अजूनही काही कागदपत्र सादर केली नव्हती. त्यामुळे ते काम पंधरा दिवस वाढणार होते.अशा वेळेस कुठे राहायचं हा ही प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. कारण तोपर्यंत त्याच्या सर्व मित्रमंडळींनी मुंबई सोडली होती.

मग एका मित्राने ओळखीच्या ठिकाणी त्याची राहायची सोय केली. तो त्या ठिकाणी राहायला गेला तर एका खोलीत दहा-बारा लोक राहत होते.शेवटी त्याला जमिनीवर झोपणे भाग पडले.

पैसे कमी असल्याने स्वस्त ठिकाणी त्याने जेवण घेण्यास सुरुवात केली. पंधरा रुपयात चार पुरी आणि भाजीचे जेवण मिळायचे. रात्री ब्रेड आणि दूध घेऊन तो झोपी जायचा. त्याही परिस्थितीत त्याने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला.

 

puri bhaji inmarathi
medium.com

 

प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर त्याने बीएनपी परिबास ही कंपनी जॉईन केली. परंतु आता परत, काहीतरी वेगळं करावं ही मनातील इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच वेळेस त्याला त्याचा कॉलेजमधला मित्र भेटला, ज्याने दिल्लीमधून आयआयटी केलेले होते.

आता दोघांनीही मिळून आयटी कंपन्यांना लागणाऱ्या काही सर्विस सेवा देण्यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू केला.

मग नऊ महिने अभ्यास केल्यानंतर त्याने बीएनपी परिबास मधली नोकरी सोडण्याचा विचार केला. त्याचा राजीनामा देखील लिहिला. परंतु आता तो ई-मेल ने पाठवावा की नाही, याच विचारात लॅपटॉप कडे शून्य नजरेने बघत होता.

त्याच वेळेस बीएनपी मधील त्याची एक महिला सहकारी त्याच्याकडे आली. त्याच्या अस्वस्थतेचं कारण तिने विचारलं. त्याने तिला राजीनामा दाखवला आणि ‘माझे नकारात्मक विचार मला हे पाठवायला नको म्हणत आहेत,’ असे सांगितलं.

त्यावेळेस तिने तुझं भविष्य मी पाहू शकेन, तुझ्या जन्माच्या सगळ्या डिटेल्स मला सांग असे सांगितले. या असल्या गोष्टीवर पुनीतचा विश्वास नव्हता.

“तुमच्यासारखे शिकलेले लोकचं अंधश्रद्धा निर्माण करत आहेत” असं तो तिच्यावर ओरडला. त्यावर ती म्हणाली,’ तुझा त्रागा करून झाला असेल तर मला तुझे डिटेल्स दे.’ शेवटी ती कंपनीत त्याच्यापेक्षा वरिष्ठ होती. त्याने त्याचे डिटेल्स तिला सांगितले.

तिने पुढचं भविष्य संगण्याआधीच राजीनामा सेंड केला. तिने जसे कॅल्क्युलेशन चालू केले तशी याच्या मनात थोडीशी उत्सुकता निर्माण व्हायला लागली.

तिने त्याच्या मागच्या आयुष्यातील घटना बरोबर सांगितल्या. त्याचबरोबर, “तू ज्योतिषपासून जितका लांब जाशील तितकं ज्योतिष तुझ्याजवळ येत जाईल” हेही सांगितलं.

“तू ज्योतिष निवडले नाहीस तर ज्योतिष ने तुला निवडलं आहे. आता हा जॉब सोड आणि तुला जे करायचं आहे ते चालू कर”,असा सल्लाही दिला.

त्यानंतर मित्राबरोबर त्याने २०१५  मध्ये कोडयेती (codeyeti) नावाची एक आयटी सर्विसेस स्टार्टअप कंपनी नोयडा मध्ये चालु केली. लगेचच ४५ एम्प्लॉईज त्यांनी रुजू करून घेतले.

यामाहा, ग्रीन प्लाय हे त्यांचे कस्टमर होते. कंपनी फायद्यात आणि सुरळीत चालू होती. परंतु २०१७  मध्ये त्याच्या पार्टनरने ती कंपनी सोडली.

त्याने परत बीएनपी परिबास मधील त्या महिला सहकार्यास फोन केला. ती म्हणाली, की आता तुला तुझं भविष्य पाहायचं आहे का? आणि मग त्याने सांगितलं की, “मी माझ्या कंपनीतच भविष्याविषयी काहीतरी चालू करतो आणि तुझा पहिला कस्टमर होतो.”

त्यातूनच पुढे ‘एस्ट्रोटॉक'( Astrotalk) ही कंपनी २०१७ मध्ये सुरू झाली. केवळ एक वर्षाच्या आतच ही कंपनी नफ्यात आली. ऑनलाईन ज्योतिषविषयक सल्ला देणारी ही अग्रगण्य कंपनी आहे.

 

astrotalk inmarathi1
astrotalk.com

 

आता या कंपनीचा टर्नओव्हर वर्षाकाठी पाच कोटी रुपये आहे. आता एस्ट्रोटॉक मध्ये अनेक अभ्यासू ज्योतिषी आहेत. लोकांच्या ज्या गरजा आहेत त्यांना ऑनलाइन सुविधेद्वारे भविष्य विषयक मार्गदर्शन केले जाते.

सगळ्या कंपन्या ग्राहकाला राजा म्हणतात, परंतु पुनीत म्हणतो आम्ही ग्राहकांना राणी समजतो आणि त्यांचे सगळे नखरे झेलतो. त्यांना जे हवे आहे त्याच संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन करतो. ग्राहकांचे म्हणणं ऐकून घेतो. मुख्य म्हणजे ज्योतिष सांगण्याचा हा व्यवसाय प्रामाणिकपणे करतो.

पूनीतच्या म्हणण्यानुसार, केवळ पैसा हे सुखाचे साधन नाही तर चांगले काम करून मिळणारे समाधानच हे सुख देऊन जाते.

“मी माझ्या सुरुवातीच्या ३७ हजाराच्या पगारातही खूप सुखी होतो. परंतु माझ्या आयुष्यातील केवळ एका घटनेनेच मी आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो. त्या दिवशी मी तिला गमावलं, परंतु तिनेच मला जे स्वतःला हवं होतं ते मिळवून दिलं.

ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं की काही लोक हे तुमच्या आयुष्यात केवळ तुम्हाला धडा शिकवण्यासाठीच येतात, त्यांचं काम झालं की ते निघून जातात. माझ्याबाबतीत तर हेच झालं.”

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?