‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – वाचा बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
“मोगॅम्बो खुश हुआ” हा डायलॉग सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबरोबरच आठवतात ते अमरीश पुरी. उंचेपुरे व्यक्तिमत्व आणि धीरगंभीर, भारदस्त आवाज, तीक्ष्ण नजर ही त्यांची ओळख.
एकूणच व्यक्तिमत्व असं की बघितल्यावरच समोरच्याच्या मनात धडकी भरेल.
२२ जून १९३२ मध्ये त्यांचा जन्म पंजाब मध्ये झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतातली चित्रपट सृष्टी देखील बहरात होती. अनेकांना सिनेमा मध्ये जाऊन काम करण्याची इच्छा होती.

अमरिश पुरी देखील त्याला अपवाद नव्हते. १९५४ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी एक ऑडिशन दिली, परंतु त्यांचा चेहरा काही त्या दिग्दर्शकाला आवडला नाही.
तुझा चेहरा भावनाशून्य आणि ठोकळा आहे म्हणून त्यांना नाकारण्यात आलं.
पुढे मुंबईमध्ये त्यांनी विमा एजंटची नोकरी चालू केली. परंतु नाटक, सिनेमाची मुळापासून आवड असल्यामुळे ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं. परंतु या क्षेत्रात काही तरी करायची उर्मी काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
म्हणून मग त्यांनी आपला मोर्चा रंगमंचाकडे वळवला. इब्राहिम अल्काजी यांनी त्यांना रंगमंचावर आणले.
त्यांचं रंगमंचावर येणंच हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये काम करणे सुरू केले. तिथे ते भेटले रंगकर्मी सत्यदेव दुबे.

सुरुवातीला दुबे यांच्या हाताखाली काम करणे अमरीश पुरींना जड गेले. परंतु सत्यदेव दुबे दिग्दर्शक म्हणून काय आणि कसं काम करून घेतात ते पाहून मात्र त्यांनी दुबे यांच्याकडून शिकायला सुरुवात केली.
सत्यदेव दुबे यांना ते गुरु मानायचे. त्यातूनच हिंदी रंगमंचावर अमरिश पुरी यांची ओळख निर्माण झाली.
त्यांच्या नाटकातल्या कामाने त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश घडवून दिला. दिग्दर्शक सुखदेव यांनी त्यांना,’रेशमा और शेरा’ या सिनेमासाठी करारबद्ध केलं.
त्यावेळेस अमरीश पुरी ३९ वर्षांचे होते.
नाटकांमधील त्यांची ओळख बनत होती त्यांचं कामही वाढत होतं त्याच वेळेस त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवले होते. परंतु दुबे यांनी त्यांना थांबवलं होतं.
जेव्हा भरपूर सिनेमा हातात असतील त्याच वेळेस नोकरी सोड, असा सल्लाही दुबे यांनी दिला होता, आणि अमरीश पुरींनी तो मानला देखील.
नोकरीमध्ये एकवीस वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळेस ते मोठ्या अधिकारी पदावर होते.

पुढे त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम चालू केले. त्यावेळेस व्यवसायिक सिनेमांबरोबरच काही समांतर प्रायोगिक सिनेमे खूप चालायचे.
ज्यामध्ये निशांत,अर्धसत्य, मंथन, भूमिका, कलियुग, मंडी असे सिनेमे येत होते. या सिनेमांमधून त्यांनी काम केले.
परंतु त्यांची व्हिलन म्हणून खरी ओळख ही ‘ विधाता’ या सिनेमामुळे झाली. तो सिनेमा आला १९८२ मध्ये. त्यानंतर आलेल्या ‘हिरो’ ने तर अनेक लोकांच्या मनावर राज्य केले त्यानंतर अमरीश पूरींना मागे वळून पहावंच लागलं नाही.
मिस्टर इंडिया सिनेमातील मोगॅम्बोने त्यांना वेगळीच ओळख दिली. तो त्यांचा ड्रेस, बोलायची ढब सगळच लोकांना आवडून गेलं.

तहलका हा सिनेमा देखील मल्टीस्टारर असूनही अमरीश पुरी यांचा डाँग लोकांच्या लक्षात राहिला. श्रीदेवीचा ‘नगीना’ हा सिनेमा सगळ्यांनाच आठवत असेल.
यामध्ये श्रीदेवी ही एक नागिन असते आणि तिला आपल्या कह्यात ठेवण्यासाठी जो सपेरा, गारुडी असतो ती भूमिका अमरिश पुरी यांनी केली होती.
तो धारदार डोळ्यांचा, अंगात काळा झगा घातलेला, चित्रविचित्र माळा घातलेला सपेरा कायमच लक्षात राहिला.
दामिनी मधील त्यांचा कावेबाज धूर्त वकील कुणाच्या लक्षात नसेल.
वकील चड्डा हे कॅरेक्टर त्यांनी इतकं मनापासून केलं आणि प्रत्येक वेळेस जजकडे पुढची तारीख मागायचं काम देखील असं केलं की ते खरेच वकील आहेत असं वाटायचं.
खरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं. सनी देओल बरोबरची त्यांची सिनेमातील खडाजंगी लोकांच्या लक्षात राहिली.

तसंच नायक सिनेमातील त्यांचा भ्रष्टाचारी नेता देखील लोकांच्या लक्षात राहिला.
बादल, कोयला, चायना गेट, कालापानी, दिलजले, विजेता, अजूबा, बेनाम बादशाह, त्रिदेव, शहेनशहा, तमस, तेरी मेहरबानिया, कसम पैदा करने वाले की, अंधा कानून, दोस्ताना, लक्ष्य, शरारत, बधाई हो बधाई ….
सिनेमांची किती नाव घ्यायची या सगळ्या सिनेमांमधून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.
त्यांची मुख्य ओळख ही व्हीलन म्हणूनच लक्षात आहे. परंतु चाची ४२० या सिनेमात मात्र त्यांनी एक वेगळीच भूमिका केली आहे.
वरकरणी कडक शिस्तीतील वडील, परंपरा जपणारा, मुलीची आणि नातीची काळजी घेणारा एक कुटुंबवत्सल माणूस त्यांनी उभा केला.
त्याचबरोबर आपल्या बायको सारख्या दिसणाऱ्या बाईच्या प्रेमात पडणारा एक हळवा, रंगतदार माणूसही दाखवला.
करण अर्जुन मधला दुर्जन सिंह लोकांच्या अजूनही लक्षात आहे. खरंतर आपल्या सगळ्या सिनेमांमधून अमरीश पुरी यांनी आपला वेगळा ठसा चित्रपट सृष्टीवर उमटवला.

आपल्या या प्रवासाविषयी बोलताना अमरीश पुरी म्हणायचे की,
सिनेमा सृष्टीतील माझी ओळख तयार करणे हे वाटतं तितकं सोपं होतं नव्हतं. फक्त इतकंच माझ्या बाबतीत झालं की घरच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला.
मला व्हिलन म्हणूनच काम मिळणार हे जेव्हा समजून आलं तेव्हा मात्र मी ते प्रत्येक कॅरेक्टर माझ्या पद्धतीने केलं. प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःची ओळख दिली.
आपले आजोबा सिनेमासृष्टीत व्हीलनचे काम करायचे म्हणून माझ्या मित्रांना माझ्या घरी पाठवण्यास त्यांचे आई-वडील तयार नसायचे. असं त्यांचा नातू वर्धन पुरी यांनी एकदा हसत सांगितलं होतं.
नॅशनल जिओग्राफी आणि ॲनिमल प्लॅनेट हे चॅनल पाहायला अमरीश पुरींना आवडायचे.
त्यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांना मिळालेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा एक माईल स्टोन ठरला. परंतु त्यासाठी देखील त्यांनी तितकीच मेहनत घेतली होती.

त्यातले संवाद पाठ करणे त्यांची रिहर्सल करणे हे ते घरी येऊन देखील करायचे. असं वर्धननी सांगितलं. या सिनेमातील कॉस्च्युम देखील त्यांनी स्वतः ठरवले होते.
डीडीएलजे म्हणल्यानंतर अत्यंत कडक शिस्तीचा पिता, परंपरांचा अभिमानी माणूस आठवतोच.
त्याचबरोबर शेवटी आपल्या मुलीच्या सुखासाठी, तिच्या आनंदासाठी,” जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी ” असं सांगणारा एक कणखर आणि हळवा बाप एकाच वेळेस आठवतो.
कदाचित हीच त्यांची ओळख होती.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.