'भाजप विरोधक आणि विश्लेषकांना एकहाती धूळ चारणारा भाजपचा फड(णवीस)!

भाजप विरोधक आणि विश्लेषकांना एकहाती धूळ चारणारा भाजपचा फड(णवीस)!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

चित्रे खोटे बोलत नसतात असे म्हटले जाते. काल विजयानंतर मुख्यमंत्री व इतर भाजप नेत्यांच्या पत्रकारपरिषदेतील चित्रे बघितल्यानंतर यांच्यात किती समन्वय आहे? याची कल्पना सहज करता येऊ शकते. आणि याच समन्वयातून कालचा विजय साकारलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरून थेट सत्तास्थापनेच्या जवळ पोहचणे हे फक्त समन्वयातूनच साध्य होऊ शकते…! भाजप आपल्याला आवडो ना आवडो पण त्यांच्या संघटनात्मक कौशल्याला दाद द्यावीच लागेल. त्यांचे केंद्रीय नेतृत्व हे राज्यातील नेतृत्वाला पूर्ण मोकळीक देत असते. त्यांना सतत दिल्लीच्या दबावाखाली रहावे लागत नाही…या तुलनेने काँग्रेसची अवस्था खूपच वाईट झाली आहे. याला कारण तिची संघटनात्मक दुरावस्था तर आहेच त्याचबरोबर तिच्या नेत्यांमधील विसंवादही याला कारणीभूत आहे.

bjp modi shah fadnavis marathipizza

मुंबईसाठी निरूपम हे अगदीच निरूपयोगी होते. येथील स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोधही करून पाहिला, पण त्यांचे न ऐकता त्यांच्यावर निरूपमांना थोपण्यात आले होते. काँग्रेस सत्तेत असती तर हे एकवेळ चाललेही असते – पण सत्तेबाहेरील काँग्रेसला जवळ करणे उत्तर भारतीय मतदारांना परवडणारे नव्हते त्यामुळेच त्यांनी भरभरून भाजपला मत केले असण्याची दाट शक्यता आहे..अर्थातच याबाबतीत निवडणूक आयोगाने सविस्तर आकडेवारी जाहीर केल्यानंतरच अधिकारवाणीने बोलता येईल.

आजवर भाजपवर खूप आरोप केले गेले. आता त्यांच्या विजयानंतरही “यामुळे ते विजयी झाले, त्यामुळे ते विजयी झाले” अशाप्रकारच्या मखलाशा त्यांचे विरोधी करताना दिसत आहेत. यातही प्रामाणिकपणा असता तर त्यालाही मान्य करता आले असते. पण त्यात प्रामाणिकपणा नाही…पराभव नाकारण्याकडेच सर्व कल आहेत आणि यामुळेच या लोकांना आपल्या पराभवाचे खरेखूरे विश्लेषण करता येत नाही. ‘डिनायल मोड’मधेच राहिल्यामुळे भाजप का विजयी होतोय, त्याला कसे रोखावे – हे समजत नाही. किंवा त्यांनी ते समजून घेण्याची इच्छा शक्तीही गमावली असावी असे त्यांचे एकंदरीत वर्तन दिसते…!

फडणवीस पूर्ण महाराष्ट्राची धुळ छानत असताना त्यांचे तथाकथित मजबूत विरोधी हे आपापल्या बालेकिल्ल्यातच रममाण असल्याचे दिसून आले. पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर त्यांची उडविण्यात आलेली खिल्ली आठवा, आयात व गुन्हेगार यांना पक्षाने तिकिट दिल्यानंतर झालेली टिका आठवा…हे सगळे त्यांनी यशस्वीपणे परतवले आहे. समजा काल भाजप हरला असता तर त्याचं पूर्ण खापर मुख्यमंत्री यांच्यावरच फोडण्यात आलं असतं. त्यामुळे तो जिंकलाय तर त्याचं पूर्ण श्रेय मुख्यमंत्री यांचंच असेल.

PTI Photo

 

हळूहळू फडणवीस यांचा प्रवास हा विदर्भातील नेत्याकडून राज्याचा नेता याकडे जोरदारपणे होतोय. ज्या प्रमाणे गुजराथ, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये अनुक्रमे मोदी, शिवराज सिंग चव्हाण आणि रमणसिंग यांनी केले तेच भाजपसाठी महाराष्ट्रात करण्याचा मानस फडणवीस बाळगून आहेत असे त्यांचे एकंदरीत सर्व पावले पाहून अंदाज बांधता येतो. आणि महाराष्ट्रात भाजप जिथे मिळेल तिथे नेते, कार्यकर्ते यांना आपल्या झेंड्याखाली आणून आपला पक्ष ग्रामीण भागात विस्तारत आहेत. यासाठी मग त्यांना कुणीही वर्ज्य नाहीत. कारण त्यांना माहिती आहे – इथे मांजर काळे आहे का गोरे हे महत्त्वाचे नसते, तर ते उंदिर पकडते की नाही हे महत्त्वाचे असते…!

उदाहरण आमच्याच वसमत विधानसभा मतदारसंघाचे देता येईल.

हा पारंपारिकपणे सेना वा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. 1990 पासून ते 2014पर्यंत हा मतदारसंघ युती असल्यामुळे सेनेकडे होता. पहिले पंधरा वर्षे सेनेचा आमदार होता. मागील दहा वर्षे राष्ट्रवादीचा आमदार होता, आता परत सेनेचा आमदार आहे. भाजप कुठेही पिक्चरमध्ये नव्हता. पण काल पंचायत समितीत 16 पैकी 15 भाजप उमेदवार निवडून आलेत. हे आमदाराच्या गावात घडलंय. तर जि.प.ला भाजपचे सहा व राष्ट्रवादी सहा असे आलेत. थोडक्यात, आता सेना पिक्चरमधून आऊट व्हायची वेळ आली आहे. विधानसभेला ते तिसऱ्या क्रमांकावर होते, याला कारण भाजपने संघटना उभारणीकडे दिलेले लक्ष तर सेनेने केलेले अक्षम्य दुर्लक्ष हे होय. हे एक प्रातिनिधिक उदाहरण मात्र आहे. या भाजपच्या ग्रामीण महाराष्ट्रातील फैलावास आमच्या एका मित्राने फारच चपखलपणे नोंदवले आहे. त्यांच्या सहमतीनेच ते इथे लिहतोय.

ते म्हणतात –

राजकारणात तुम्हाला स्टॅंड घ्यायला जमत नसेल तेव्हा एक युक्ती असते…दिसेल त्या चुलीत एक लाकूड सरकवत जायचं…कुठंतरी ढणाणा जाळ लागतोयच…! भाजपाने हीच पॉलीसी वापरलीय सगळीकडे. लोक अन आघाड्या हाताला लागतील तसा मेळ घातलाय. प्रवेश सुकर करुन घेतलाय जिल्ह्यातला…!

यालाच म्हणतात –

दाखवताना कुलकर्णी सरकवताना पाटील…!

हेच धोरण भाजप निवडून आले तेव्हापासून राबवत आहे. कारण त्यांना उरलीसुरली कसर भरून काढायची आहे. आणि यात त्यांचे विरोधी हेही त्यांना आपल्या निष्क्रिकेतेने मदतच करत आहेत. फडणवीस पुढील विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचे एकछत्री राज्य आणण्यात यशस्वी होतील काय – याचे उत्तर तर काळ देईलच पण ते महाराष्ट्रात भाजपला मोठी शक्ती म्हणून प्रस्थापित करण्यात नक्कीच यशस्वी झाले आहेत.

राजकारणाचा एक विद्यार्थी म्हणून लोकसभा निवडणूकीनंतर जवळजवळ सर्व निवडणूका बारकाईने निरिक्षण करताना, झालेल्या सर्व निवडणुकात त्यांचे विरोधी भाजपला नेहमीच अंडरमाईन करत आलेले दिसतात. पण जेव्हा निकाल येतात तेव्हा भाजपा विजयी झालेला असतो किंवा ठीकठाक जागा मिळवून विरोधात बसलेला असतो. याला फक्त आणि फक्त दिल्ली अपवाद ठरली होती. महाराष्ट्रात, विधानसभा निवडणुकीतही त्यांना असेच अंडरमाईन करण्यात आले, नंतर झालेल्या नगरपालिकांच्यात नोटबंदीनंतर त्यांना असेच अंडरमाईन करण्यात आले. त्याआधी केडिएमसीतही हीच चूक पुन्हा करण्यात आली होती. आता या जि.प. आणि महानगरपालिकेतही हेच पुन्हा घडताना दिसले…हे सगळे द्वेषामुळे वारंवार होतंय.

द्वेषामुळे actual जे विश्लेषण व्हायला हवे ते होत नाही…विश्लेषणाच्या नावाखाली आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या जातात. यामुळेच मग निकालानंतर अनेकदा अनेकांना तोंडघशीही पडावे लागले आहे.

यावरून काही शिकण्याऐवजी परत ये रे मागल्या सुरू आहे. मुंबईत भाजप लिंबूटिंबू होती पण सर्व लक्ष तिच्यावरच केंद्रित केल्यामुळे भाजप वीनाकारण सत्तास्पर्धेत येऊन शिवसेना विरोधी मतदारासमोर पर्याय म्हणून स्थापीत झाला होता, ज्याचा लाभ त्यांना मिळाला…! आता हे सेना-भाजप यांच्या अंतर्गत सहमतीमधून करण्यात आले की काय – याविषयी आपण फक्त अंदाज बांधू शकतो. पण या स्मार्टखेळीमुळे त्यांनी मुंबईतील मुख्य स्पर्धक व सत्ता दावेदार काँग्रेसला जवळजवळ चर्चेतून बाहेर काढलेच होते आणि निकालानंतर जमीनीवरूनही बाहेर काढण्यात ते यशस्वी ठरले आहेत असं दिसतंय. लोकांच्या, म्हणजे त्यांच्या मतदारांच्या (उत्तर भारतीय…!) मनातून काढून तिथे भाजपला बसविण्यात हे लोक यशस्वी ठरले आहेत .

आशा आहे तथाकथित विचारवंत व विश्लेषण करणारे ही नवीन वास्तविकता समजून घेऊन विश्लेषण करतील. अन्यथा आपल्या मनातील पूर्वग्रहांना मध्यवर्ती ठेवून नेहमीप्रमाणे दूषित विश्लेषण करून पुन्हा पुन्हा भाजपला विजयी होण्यास मदत करतील.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?