'राहुल द्रविड आणि सौरव गांगुली - या जोडगोळीने घडवलेल्या एका जबरदस्त चमत्कराचा किस्सा

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली – या जोडगोळीने घडवलेल्या एका जबरदस्त चमत्कराचा किस्सा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

वर्ष १९९९…

तसं १९९६ च्या वर्ल्डकप नंतर पुढचा वर्ल्डकप २००० साली होणार होता, पण शतकातला शेवटचा वर्ल्डकप असल्या कारणाने आयसीसीने जरा नरमी चे धोरण अवलंबले होते आणि तिसऱ्याच वर्षी म्हणजेच १९९९ साली वर्ल्डकप चे आयोजन केले.

भाग घेणारा प्रत्येक संघ विजेता बनण्याच्या तयारीत होता. शतकातला शेवटचा वर्ल्डकप म्हणजे त्याचे आयोजन पण भव्यच असणार होतं. आयोजन केले गेले क्रिकेटच्या जन्मभूमीत अर्थात इंग्लंड मध्ये !

दिनांक २६ मे १९९९. भारत विरुद्ध श्रीलंका. भारतीय उपखंडातील दोन दिग्गज देश.

श्रीलंका म्हणजेच १९९६ चा वर्ल्डकप जेता संघ आणि १९९९ च्या वर्ल्डकप मधला डार्क हॉर्स भारतीय संघ मैदानात भिडणार होते.

 

cricket inmarathi 1
uk.news.yahoo.com

 

तत्कालीन लंकेत चालू असलेल्या गृहयुद्धात भारत सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सुद्धा चांगलेच ताणले गेले होते. त्यामुळे त्याचीच झलक मैदानात दिसते की काय याची सगळ्यांना उत्सुकता होती.

तसं पाहायला गेलो तर श्रीलंका आणि भारत हे तत्कालीन क्रिकेटच्या युध्दातले दोन टक्करचे देश. हत्याराने सुसज्ज!

श्रीलंकेकडे जयसूर्या, आटापट्टू, डिसिल्वा, वास आणि मुरली सारखे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू तर इथे भारताच्या ताफ्यात सचिन, गांगुली, द्रविड,अजहर, कुंबळे आणि श्रीनाथ सारखे धडाकेबाज खेळाडू होते. मॅच तुफान होणार हे अलिखित सत्य होतं.

श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याने टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय हा योग्य ठरवला तो चामिंडा वासने.

वास ने पहिल्याच ओव्हर मध्ये भारतीय ओपनर सदागोपालन रमेश याची विकेट उडवून भारताला पहिला धक्का दिला. रमेश मिडल स्टम्प डिफेन्ड करायच्या प्रयत्नात असताना वास त्याचा ऑफ स्टंप घेऊन गेला.

भारताची धावसंख्या, ६ धावा १ विकेट. पुढचा फलंदाज राहुल द्रविड!

‘राहुल द्रविड’ हे नाव सुरुवाती पासून वनडे क्रिकेट मध्ये फिट बसत नव्हत, आज तो बट्टा पुसून काढायचा याच इराद्याने द्रविड मैदानात उतरला.

 

rahul dravid inmarathi
www.mykhel.com

 

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी त्यानंतर जो पराक्रम मैदानात घडवला तो खेळ नव्हता कर्तब होता. कर्तब..! कमाल..!आश्चर्य..! तोंडात बोट घालायला लावणारी विश्वविक्रमी खेळी!

त्या दोघांचं खेळणं क्रिया नव्हे तर विशेषण बनलं होतं. असं विशेषण जो क्वचितच कोणता श्रीलंकन खेळाडू काय दर्शक सुद्धा विसरला असेल. द्रविड आणि गांगुलीची पार्टनरशिप ३१८ रन्स!

 

dravid and ganguly inmarathi
sportskeeda.com

 

पहिली विकेट पडली ६ धावांवर तर दुसरी पडली ३२४ धावांवर. पहिली विकेट पडली ती पाहिल्या ओव्हर मध्ये तर दुसरी पडली सेहेचाळीसाव्या ओव्हरला.

त्यादिवशी द्रविड आपली डिफेन्ड करण्याच्या इमेजच्या अगदी विरुद्ध वेगात खेळत होता. आणि गांगुली त्याच्या विरुद्ध.अगदी आरामात.

दोघांनी हळूहळू पार्टनरशिप करत श्रीलंकेच्या बॉलिंग लाईनअप वर कंट्रोल आणायला सुरवात केली.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर द्रविड ने १०० च्या स्ट्राईक रेट ने आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या मागून ११९ बॉल मध्ये गांगुली ने आपलं शतक पूर्ण केलं. शतक झाल्या नंतर मात्र गांगुलीने आपली खेळी चेंज केली,

शतक पूर्ण करायला ११९ बॉल घेणाऱ्या गांगुलीने पुढचे ८३ रन फक्त ३९ बॉल मध्ये  काढले. 

 

ganguly inmarathi
cricketcountry.com

 

हा तो दिवस होता, जेव्हा वास सोबत मुरली सुद्धा मार खात होता.

राहुल द्रविड नेहमीच्या आपल्या प्रतिभेच्या विरुद्ध खेळत १२९ बॉल मध्ये १४५ धावा ठोकून रन आऊट झाला. जलद धावा बनवायच्या भानगडीत सचिन, अजहर आणि जडेजा सुद्धा आपली विकेट टाकून पॅव्हेलीयन मध्ये परतले.

दुसरी बाजू धरून ठेवत मात्र गांगुली पन्नासाव्या ओव्हर मध्ये बाद झाला. बाद व्हायच्या आधी त्याने १५८ बॉल १८३ धावा चोपल्या होत्या.

खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या होती निर्धारित ५० ओव्हर मध्ये सहा विकेट गमावून ३७३ धावा!

प्रति उत्तर द्यायला मैदानात उतरलेल्या लंकेच्या संघाला पूर्ण ५० ओव्हर देखील खेळता नाही आले. ४२.३ ओव्हर मध्ये संपूर्ण लंका टीम २१६ वर ऑल आऊट झाली.

 

ganguly inmarathi1
imdb.com

 

या सामन्यात द्रविड आणि गांगुलीने अनेक विक्रम बनवले आणि तोडले. तत्कालीन ३१८ धावांची ही पार्टनरशिप क्रिकेटच्या वन-डे खेळ प्रकारातली सर्वोच्च संख्या होती.

याआधी भारताचाच अजहरुद्दीन आणि जडेजा यांच्या केनिया विरुद्ध च्या २७५ धावांच्या पार्टनरशिपचा विक्रम या दोघांनी मोडीत काढला.

गांगुलीची १८३ धावांची खेळी ही वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरी बेस्ट खेळी होती. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन याची १८८ धावांची खेळी होती.

३७३ ही भारताची वर्ल्डकप मधली सर्वोच्च धावसंख्या होती. पुढे २००७ च्या वर्ल्डकप मध्ये बर्म्युडा विरुद्ध ४१३ रन ठोकून भारताने स्वतःचीचं धावसंख्या मागे टाकली.

एक गंमत सांगायची म्हणजे, गांगुलीच्या याच १८३ धावांच्या खेळी नंतर भारतीय संघात योगायोगांची मालिका सुरू झाली. वन-डे मध्ये १८३ धावा ठोका आणि भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद मिळवा.    

कर्णधारपद मिळवायच्या आधी महेंद्रसिंग धोनीने श्रीलंके विरुद्ध १८३ धावा ठोकल्या होत्या. कालांतराने राहुल द्रविड नंतर त्याच्याकडे वनडेचं कर्णधार पद चालून आलं.

 

virat ms dhoni

 

 

त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध १८३ धावा ठोकून सध्याचा कर्णधार विराट कोहली सुद्धा या रांगेत आला. आता याला गंमत म्हणा किंवा योगायोग.

त्याच वर्षी हैद्राबाद मध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा विश्वविक्रमी भागीदारी झाली. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांमध्ये.

मागची आपलीच रेकॉर्ड पार्टनरशिप मागे सोडून द्रविडने सचिन सोबत ३३१ धावांची भागीदारी केली होती.

१९९६ मध्ये लॉर्ड्स वर कसोटी सामन्यात आपलं नाणे खणखणीत वाजवणाऱ्या द्रविड-गांगुली या जोडगोळीने वन-डे मध्ये सुद्धा आपली दखल घ्यायला भाग पाडायला सुरवात केली होती.

टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून नेहमी उल्लेख केला जाणाऱ्या द्रविडने सगळ्यांना आपल्या खेळीने तोंडात बोट घालायला भाग पाडले आणि गांगुली नावाच्या सूर्याचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय होतांना दिसत होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?