पेस्ट कंट्रोलची चिंता नको: हे घरगुती उपायच झुरळं, पाली, मुंग्यांना पिटाळून लावतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपलं घर स्वच्छ, चकचकीत, टापटिप असावं असं सगळ्यांनाच वाटतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या घराची साफसफाई करणे हा मोठा उद्योग असतो ना मंडळी? ते होतंही मनासारखं!
खरं तर आपल्याकडे आधीपासूनच ही घराच्या स्वच्छतेची मोहिम आठवड्यातून १ दिवस (बहुतेकदा रविवारीच!) राबविली जातच असते.
आता कोरोनाच्या भीतीमुळे तर वारंवार साफसफाई केली जातेय. पण आपण राहतो त्या घरात आणखीही काही नको असणारे पाहुणे राहतात. ते नको असणारे पाहुणे म्हणजे म्हणजे पाली, झुरळं आणि मुंग्या!
आपल्यातल्या बहुतेक जणांना पाली, झुरळं अशा प्राण्यांची किंवा कीटकांची भीती वाटते. काहींना भीतीपेक्षा या जीवजंतुंची शिसारी येते, घाण वाटते.
जरा कुठे ह्यांना ‘संधी’ मिळाली की ते लगेच आपल्या घरात उच्छाद मांडायला सुरुवात करतात. बरं नुसता उच्छाद असता तर ठिक आहे पण, ह्या सगळ्यांमुळे रोगराई पसरते.
शरीरसाठी हे कीटक घातक आहेत. म्हणजे चुकून खाद्यपदार्थात पडले तर जीवावर बेतण्याची भीती असते.
म्हणजेच आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर केवळ साफसफाई करून उपयोगाचे नाही, तर ह्या नको असणाऱ्या पाली, झुरळं आणि मुंग्या ह्यांना घरातून बाहेर काढलं पाहिजे.
(साफसफाई केली तरी हे प्राणी घरात येतातच…..अगदी फिनाईल वगैरेने फरशी पुसली तरी मुंग्यांच्या रांगा लागतात काही वेळाने)!
अशा नको असणाऱ्या, रोगराई पसरवणाऱ्या, जीवघेण्या पाली, झुरळं आणि मुंग्या ह्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी, त्यांना आपल्या घरातून हाकलून देण्यासाठी काही औषधं बाजारात उपलब्ध आहेत. पण, ते फवारे किंवा ती औषधं पण विषारी असतात.
जी माणसे तब्येतीने नाजूक असतात त्यांना ह्या औषधांचा त्रास होऊ शकतो. अहो, नाजुकच काय काही काही वेळा निरोगी, सुदृढ लोकांना देखील ह्या औषधाच्या वासाने त्रास होतो.
मळमळ, उलट्या किंवा चक्कर येणे असे प्रकार होऊ शकतात अशा औषधांनी!
मग ह्यासाठी म्हणजेच ह्या प्राण्यांना, किड्यांना बाहेर घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, जे साधे सोपे आहेत आणि मुख्य म्हणजे त्याचा इतरांवर, घरातल्या माणसांवर विपरित परिणाम होत नाही.
चला तर मग आज आपण ते उपाय कोणते आहेत आणि ते कसे अंमलात आणायचे ते ह्या लेखातून पाहूया!
१) मुंग्या
मुंग्यांपासून सुटका हवी असल्यास त्यांच्या रांगेवर किंवा त्यांचे मूळ जिथे आहे (एखादे छिद्र किंवा लहानसे बिळ त्यांचे मूळ असू शकते) तिथे हळद पसरविणे!
हळद ही एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते आणि हा उपाय पारंपरिक आहे, शिवाय सगळ्यांच्या घरामध्ये हळद सहजरित्या उपलब्ध असते. हळदीमुळे मुंग्या येईनाशा होतात.
आपल्या घरात मुंग्या जिथून शिरतात, त्यांचे जे छिद्र किंवा मूळ आहे तिकडे काकडीचे छोटे तुकडे पसरवून ठेवावेत. काकडी कडू असेल तर तिचा जास्त परिणाम होतो.
काकडीचा गंध मुंग्यांना रोखण्याचे काम करतो. हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे ज्यामुळे आपल्या घरात मुंग्या येत नाहीत.
कडुनिंबाची पाने खूपच प्रभावी उपाय आहे मुंग्यांना पिटाळून लावण्यासाठी! कडुनिंबाच्या पानांचा रस मुंग्यांच्या रांगेवर फवारावा. १ किंवा २ वेळा हा उपाय केल्यानंतर मुंग्या कायमच्या येईनाशा होतात.
कुस्करलेली पुदिन्याची पाने, पुदिन्याच्या पानांचा रस किंवा पुदिना आणि बोरिक ऍसिड ह्यांचे मिश्रण हे मुंग्यांच्या विरोधात काम करते आणि ह्यामुळे घरातल्या व्यक्तींना त्रास देखील होत नाही, त्यामुळे हा उपाय करण्यास हरकत नाही.
मुंग्यांच्या रांगेवर किंवा त्या जिथून येतात तिथे पुदिन्याचा रस किंवा पुदिना रस आणि बोरिक ऍसिड ह्यांचे मिश्रण फवारल्यामुळे मुंग्या येत नाहीत.
मुंग्यांच्या वसाहतीत, छिद्रात किंवा त्यांच्या राहण्याच्या जागेत लवंगा टाकाव्यात त्यामुळे मुंग्या नष्ट होतात. हा देखील मुंग्यांना नष्ट करण्याच्या पारंपारिक उपायांपैकी एक प्रभावशाली उपाय आहे.
लिंबू आणि पाणी अनुक्रमे १:३ ह्या प्रमाणात घेऊन हे द्रावण मुंग्यांच्या रांगेवर आणि त्यांच्या मूळ वसाहतीवर, छिद्रावर फवारावे, ह्या उपायामुळे मुंग्या नष्ट होतात. हाही एक पारंपारिक उपाय आहे, जो घरातल्या व्यक्तींना अपायकारकारक नाही.
हे ही वाचा – लाल मुंग्या चावतात; पण काळ्या नाही! का? वाचा यामागचं खरं कारण…
२) झुरळं
साबण आणि पाणी हे द्रावण घराच्या कोपऱ्यात फवारले तर झुरळे घरात येत नाहीत किंवा घरात असतील तर ती नष्ट होतात. झुरळांसाठी अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय घरातल्या व्यक्तींना मात्र हानीकारक नसतो. त्यामुळे हा उपाय करण्यास काहीच हरकत नाही.
बोरिक ऍसिड, गव्हाचे पीठ आणि साखर ह्यांचे सम प्रमाणात मिश्रण घ्यावे आणि त्यांचे गोळे करण्यासाठी त्यात तेल मिसळावे.
त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते कपाटात ठेवावेत. ज्यामुळे झुरळ येत नाहीत आठवड्या- आठवड्याला हे गोळे बदलावेत.
काकडीचा उपाय झुरळांवर देखील लागू होतो. कडू काकडी असेल तर जास्त उत्तम. घराच्या कोपऱ्यात काकडीचे छोटे छोटे काप ठेवावेत जे झुरळांना घरात येण्यापासून रोखते.
अर्थातच हा उपाय घरातील व्यक्तींना हानीकारक नाही त्यामुळे जरूर करावा. काकडी देखील आपल्याला बाजारात सहजपणे मिळते.
३) पाली
कांद्याचे काप करून घ्यावेत आणि आपल्या घराच्या बाल्कनीत आणि खिडकीत ठेवावेत ज्यामुळे घरात पाली येत नाहीत. शिवाय पाणी आणि कांद्याचा रस मिसळून हे द्रावणा बाल्कनीत आणि खिडक्यांमध्ये फवारले तर पाली घरात येत नाहीत.
हा उपाय प्रभावशाली तर आहेच शिवाय आपल्या सगळ्यांच्याच घरात कांदा सहजतेने उपलब्ध असतो.
अंड्याची टरफले हा आणखी एक प्रभावशाली उपाय आहे ज्यामुळे घरात पाली येत नाहीत. आपल्या घराच्या खिडकीत अंड्याची टरफले ठेवावीत.
पाली घरात येऊ नयेत म्हणून एक प्रभावशाली उपाय म्हणजे तंबाखूची पाने आणि कॉफी! तंबाखूची पाने आणि कॉफी ह्याचे छोटे छोटे गोळे करून खिडक्यांच्या कोपऱ्यात ठेवावेत, ज्यामुळे पाली घरात येत नाहीत.
४) डास आणि माशा
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, त्यामुळे आपल्या परिसरात कोठेही पाणी साठू देऊ नये. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
लसणीचा रस आणि पाणी हे द्रावण अनुक्रमे १:५ घेऊन ते घरात सगळीकडे फवारावे, ज्यामुळे डास तसेच माशा घरात येण्यापासून प्रतिबंध होतो. लसून सगळ्यांच्याच घरात सहजतेने उपलब्ध होऊ शकते.
कडुनिंबाच्या पानांचा रस घरात सर्वत्र फवारावा, ज्यामुळे डास आणि माशा घरात येत नाहीत. हा प्रभावशाली उपाय आहे जो डास आणि माशांना घरात येण्यापासून तर रोखतोच शिवाय घरातल्या व्यक्तींना यापासून काहीही अपाय होत नाही.
हे ही वाचा – “डास मलाच का चावतात”, या प्रश्नाचं नेमकं वैज्ञानिक उत्तर वाचा
कापूर हा असा घटक आहे जो केवळ डास आणि माशांनाच रोखत नाही तर इतरही न दिसणाऱ्या हानीकारक जीवाणू-विषाणू यांनादेखील नष्ट करतो.
कापरामुळे हवा शुद्ध होण्यास खूपच मदत होते, त्यामुळे दिवसातून दोन वेळा तरी आपल्या घरात कापूर जाळावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.