' अमेरिका विरुद्ध भारत : कोरोना काय करतोय? – हे शास्त्रशुद्ध विवेचन बरंचसं चित्र स्पष्ट करेल – InMarathi

अमेरिका विरुद्ध भारत : कोरोना काय करतोय? – हे शास्त्रशुद्ध विवेचन बरंचसं चित्र स्पष्ट करेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : डॉ अभिराम दीक्षित, एम. डी.

===

भारताची लोकसंख्या आणि गर्दी ( लोकसंख्येची घनता ) या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर भारत हे कोव्हीडसाठी मोकळे रान आहे. भविष्यात अमेरिकेपेक्षा जास्त करोना रुग्ण भारतात असू शकतात.

भारताच्या 1/4 लोकसंख्या असलेल्या अमेरिकेने २० लाखाचा आकडा पार केला आहे. लक्षणे न दाखवणारी आणि म्हणून टेस्ट न झालेली लोकसंख्या – पॉजिटीव्ह संख्येच्या दहा पट असेल असा अंदाज आहे.

एकूण दोन कोटी लोक अमेरिकेत बाधित असावेत. एक लाखाहून जास्त मृत्यू अमेरिकेत झालेले आहेत.

 

trump and corona inmarathi
amarujala.com

 

अनेक लोकांना कोरोना होतो पण प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोणतीही लक्षणे न दाखवता तो संपूर्ण बरा होतो. साहजिकच या लोकांना टेस्ट केले जात नाही ; त्यामुळे त्यांची पॉजिटीव्ह म्हणून गणना होत नाही.

कोव्हीड बाबत तीन संख्या महत्वाच्या आहेत . 1) टेस्ट पॉजिटीव्ह संख्या  2) टेस्ट न झालेल्या , लक्षणे न दाखवणाऱ्या अंदाजे पॉजिटीव्ह लोकांची संख्या 3) कोरोना चा मृत्युदर

मृत्युदर काढण्यासाठी नेमके किती लोक बाधित आहेत हे समजणे आवश्यक असते. सर्वाची टेस्ट करणे शक्य नाही म्हणून काही एपिडेमियॉलॉजी टेस्टिंग स्टडी करून हा आकडा पॉजिटीव्ह लोकसंख्येच्या दहा पट असावा असा संख्याशास्त्रीय अंदाज केला आहे.

म्हणजे अमेरिकेत वीस लाख पॉजिटीव्ह रुग्ण मिळाले असले तरी लक्षणे न दाखवणारे आणि म्हणून टेस्ट न झालेले लोक मिळवले तर हा आकडा दोन कोटी असावा. म्हणजे दोन कोटी लोकात १  लाख मृत्यू झाले आहेत.

काही मृत्यूचे कारण समजत नाही म्हणून कोरोनामुळे डिक्लेअर्ड मृत्यूच्या दुप्पट संख्या प्रत्यक्षात असावी (२ लाख ) असे शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. त्यानुसार अमेरिकेतील मृत्युदर येतो १% च्या आसपास .
——————————–
या संख्याशास्त्रीय पद्धतीनुसार, अमेरिकेत मृत्यदर पहिल्यापासून १ % ते १.४ % इतकाच राहिलेला आहे.
——————————–
आता यानुसार भारतात काय होईल? यावर अंदाज बांधता येतील.

भारतात कोरोनाची लागण उशिरा सुरु झाली म्हणून सुरवातीला संख्या कमी होती. आता भारतानेही २.७६ लाखाचा आकडा पार केला आहे. आणि ८ हजार पेक्षा थोडे कमी मृत्यू भारतात घडले आहेत.

 

corona dead bodies inmarathi
time

 

अमेरिकेत वापरलेले संख्याशास्त्र भारतात वापरले तर काय आकडे निघतात =? टेस्टिंग न झालेले पण रोग होऊन गेलेले रुग्ण २७ लाख असतील आणि कारण न समजलेले मृत्यू हिशोबात घेतले तर १६००० असतील. म्हणजे भारतातला मृत्युदर येतो 0.५ %.
——————————–
म्हणजे भारतातील मृत्युदर (0.५%) हा अमेरिकेतील (१ % ते १.४ %) मृत्यदाराच्या अर्धा आहे. भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतात मृत्युदर इतका कमी का? याबद्दल अनेक अंदाज करता येतील
——————————–
भारतातली आरोग्यव्यवस्था अमेरिकेच्या मानाने अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आहे. अमेरिकेत सरासरी प्रत्येक माणसावर (10000$) म्हणजे ७ लाख रुपये खर्च केले जातात.

भारतात दरडोई आरोग्यावरील खर्च. भारत सरकारचा आरोग्यावरील दरडोई खर्च १६०० रुपये आहे . तरीही भारतात कोव्हीड मृत्यूचे प्रमाण इतके कमी का?

१) माहितीतल्या त्रुटी :

पहिली शक्यता अशी की आपला डाटा चुकीचा आहे. खेड्यापाड्यातील, बिहार- युपी सारख्या मागास राज्यातील कोव्हीड रुग्नांची माहिती नीट गोळा केली जात नसावी. हे सोपे उत्तर आहे. पण सत्य नसावे. माझ्या आकलनानुसार, भारतात मृत्यू लपून राहणार नाहीत. भारतीय मृत्युदर कमीच असावा.

२) इतर देश :

चीनमध्ये सुद्धा मृत्युदर खूप कमी आहे, पण चीनची माहिती खोटी असणार.  तिथले हुकूमशाही कम्युनिस्ट सरकार कधीच खरी माहिती देत नाही. भारताशी गर्दीच्या दृष्टीने समकक्ष देश म्हणजे बांगलादेश, सिंगापूर वगैरे- तिथेही मृत्युदर कमी आहे. ते का ?

३) भारतातील लसीकरण आणि इम्युनिटी :

 

bcg vaccine inmarathi 2
khaleejtimes.com

 

भारतात BCG ही लस दिली असते, ती काही प्रमाणात करोनाविरोधी इम्युनिटी देण्याची शक्यता आहे. पोलियो लस फक्त भारतात देतात इतरत्र कमी. कदाचित यामुळे प्रतिकारशक्ती वाढत असेल.

मानवी पेशीत घुसण्यासाठी करोना ACE2 जो नावाचा रिसेप्टर वापरतो, तो रिसेप्टर भारतीय लोकात वेगळा आहे. ( अशाच वेगळ्या रिसेप्टर मुळे अंदमानातील काही आदिवासी प्रजातींना एड्स होत नाही! ) .

४) पुन्हा डार्विन :

कोरोनाच्या सुरवातीला जगभर गंभीर लक्षणे दाखवणारे रुग्ण प्रथम वेगळे केले गेले आणि त्यांना बरे केले. अतिधोकादायक कोरोना झालेले रुग्ण मरून गेले. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या ज्या प्रजाती खूप धोकादायक होत्या त्या नष्ट झाल्या.

 

corona in china inmarathi 1
financialtimes.com

 

आपल्या होस्टला लगेच मारून टाकणारे व्हायरस नष्ट होतात. रोगी जगला आणि इकडे तिकडे फिरला तर व्हायरसला पसरायला जास्त संधी मिळते. त्यामुळे काही काळाने कोरोना सौम्य झाला. भारतात करोना उशिरा आला.

धोकादायक स्ट्रेंन आधी मरून गेल्याने, हा भारतात पसरलेला कोरोना स्ट्रेन अधिक सौम्य असावा.

सर्व्हाव्हल ऑफ द फिटेस्ट . (Not powerful!) डार्विन बाबा की जय हो ! असे सुचवणारे काही सायन्स पेपर्स प्रसिद्ध झाले आहे.

५) आयुर्मान आणि इतर रोग :

अमेरिका आणि इतर प्रगत देशात चांगल्या सुविधांमुळे आयुर्मान जास्त आहे . अमेरिकेतील ६५ वर्षांवरील वृद्धांची संख्या १६% आहे . भारतातील वृद्धाची टक्केवारी ६% आहे. कोरोना ने वृद्ध पेशन्टचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होतात.

आधी भारतात म्हातारे पेशन्ट कमी त्यामुळे भारतात मृत्युदर कमी असावा. शिवाय लठ्ठपणा, डायबेटीस आणि हृदयरोग हे श्रीमंताचे आजार भारतात तुलनेने कमी प्रमाणात आढळतात. कोरोनाचा धोका या रोग्यांना जास्त आहे त्याचे प्रमाण अमेरिकेत जास्त आहे.

भारतात गर्दी आहे, दाट लोकसंख्या आहे, गरिबी आणि कुपोषणामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य ढासळलेले आहे. ऍनिमिया आणि व्हिटामिन डेफिशिअन्सी प्रचंड आहे त्यामुळे भारतातील जनरल रोगप्रतिकारशक्ती कमीच आहे.

भारतात आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक स्वच्छता याचा आभाव आहे. तरीही भारतात मृत्युदर कमी आहे!

पुन्हा पुन्हा डार्विन :

 

darwin inmarathi
medium.com

 

डार्विनच्या सिद्धांतानुसार, बाहेरच्या निसर्गातील परिस्थितीला जो अनुकूल असेल तो जगतो . सर्वशक्तिमान नव्हे. इतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.

उद्या अणुयुद्ध झाले तर पृथ्वीवर झुरळांचे राज्य येईल. अणुबॉम्बच्या किरणोत्साराने माणूस मारतो – झुरळ नाही. भारतीयांना झुरळ म्हणायचे कारण नाही. गेल्या लाख वर्षात माणूस नावाचा दुबळा प्राणी जगला. माणूस सुद्धा जगायला अनुकूल (फिट) होता म्हणून इथपर्यत जगला.

त्याच मोठं कारण म्हणजे माणसाची “सामूहिक बुद्धिमत्ता”. भारतीय लोक हे वर दिलेल्या ५ कारणांमुळे कोव्हीडशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करत आहेत.

त्यातली काही कारणे राजकीय सामाजिक आहेत ( पोलियो, बीसीजी लस ) , काही कारणे जेनेटिक आहेत ( ACE रिसेप्टर ) आणि काही कारणे अपघाती आहेत ( सौम्य स्ट्रेन , कमी आयुर्मान ).

त्यात “सामूहिक बुद्धिमत्ता ” प्रयत्नपूर्वक आणली तर आपण अमेरिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोरोनाचा मुकाबला करू शकतो. समूहाच्या बुद्धिमत्तेबद्दल सर्वात शेवटी बोलू .

=======================

कोरोनाबद्दल पुरेशी माहिती शास्त्रज्ञाना नाही. हा लेख १० जून ला रात्री लिहिला आहे. अजून १०  दिवसात हा लेख आऊटडेट होईल -इतक्या वेगाने शास्त्रीय संशोधन चालू आहे.

 

corona israel scientist inmarathi
newyorkpost.com

 

नवी औषधे आली सुद्धा, अनेक लसी येणार आहेत मात्र त्याला दीड वर्ष लागेल. तोपर्यत सौम्य करोनाचा प्रसार होऊन हर्ड इम्युनिटी सुद्धा वाढली असेल. एकदा करोना होऊन गेला की पुन्हा गंभीर स्वरूपात होणे जवळ जवळ अशक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
=======================

करोना लगेच संपणार नाही. काही वर्ष तो आपल्या बरोबर राहणार आहे. तो हळूहळू डार्विन कृपेने (!) सौम्य होत जाणार आहे. त्याच्याशी सतत लढत रहावे लागणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्याकडून प्रयत्न करत आहेत. फालतू राजकारणात न पडता सामूहिक शहाणपणा आणि सामूहिक बुद्द्धीमत्ता दाखवायची ही वेळ आहे.

——————–
सामूहिक शहाणपणा
——————–

गर्दी, राजकीय आंदोलने, मोर्चे , धार्मिक कार्यक्रम टाळले पाहिजेत. अमेरिकेतील उजव्या गटाच्या दीडशहाण्यांनी करोना पार्टी आयोजित केल्या होत्या. बंदुका घेऊन लॉकडाऊन विरुद्ध आंदोलने केली.

 

protest inmarathi
.bangkokpost.com

 

ऑस्ट्रेलियात डाव्यांची अक्कल सुद्धा जास्त चालली – त्यांनी अमेरिकेत घडलेल्या सामाजिक अन्यायाचा निषेध ऑस्ट्रेलियात केला! त्यासाठी हजारोच्या संख्येने डावी जमात ऑस्ट्रेलियातल्या रस्त्यावर उतरली. हा परदेशी उजव्या डाव्याचा सामूहिक गाढवपणा आहे.

भारतात आर्थिक कारणामुळे हळू हळू लॉकडाउन  उघडते आहे. आर्थिक कारणासाठी ते आवश्यक आहे. मोर्चे आंदोलने टाळून भारतीय लोकांनी सामाजिक शहाणपणा अजुनपर्यत तरी जपला आहे. या बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण नको.
——————-
शेवट आणि तात्पर्य   
——————-
भारताची लोकसंख्या अफाट आहे. आपण चीन प्रमाणे माहिती लपवत नाही.  लॉकडाउन उघडतो आहे. टेस्टिंग जोरात सुरु आहे. त्यामुळे भारताचा आकडा वाढणार आहे.

=======================
भविष्यात अमेरिकेच्या पुढे जाऊन – सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात असतील असा अंदाज आहे . पण पण पण ….

एकूण कोरोना रुग्नांची संख्या खूप वाढली तरी आपल्याला मृत्युदर कमी ठेवणे हे टार्गेट आहे. कोरोनाची बाधा म्हणजे मृत्यू नाही. कोरोना झालेले ८०% रुग्ण कोणताही त्रास न होता आपोआप बरे होतात.

 

corona test inmarathi
businesstoday.com

 

बरे झालेल्याना करोना पुन्हा होण्याची शक्यता नगण्य आहे. त्याशिवाय भारताकडे काही पॉजिटीव्ह पॉईंट आहेत –

कमी आयुर्मान, ACE चा वेगळा रिसेप्टर, लसीकरण आणि सौम्य जातीचा करोना अशा अनेक कारणामुळे भारतातील मृत्युदर कमी आहे. मृत्युदर असाच कमी ठेवायचा असेल तर याला सामाजिक सामूहिक शहाणपणाची जोड दिली पाहिजे.

गर्दी , राजकीय आंदोलने, मोर्चे , धार्मिक कार्यक्रम टाळले पाहिजेत. ते प्रयत्न मन लावून केले तर कदाचित आपण करोनाचा मृत्युदर खूप आटोक्यात ठेऊ शकतो – अमेरिकेपेक्षा खूप जास्त चांगल्या प्रकारे !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?