नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपण लहानपणापासूनच शिकत आलोय रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे खूपच आवश्यक असते. काहींची तब्येत खूपच नाजूक असते. जरा हवामान बदललं, ऋतु बदलला किंवा जागा/शहर बदललं की त्यांना लगेच त्रास सुरू होतो.
सर्दी, ताप, खोकला इत्यादी छोटे-मोठे आजार उद्भवतात.
मग त्यांची ‘इम्युनिटी’ कमी आहे, त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची गरज आहे असे डॉक्टर्स् सांगतात, इतरही असंच बोलतात की, फारच नाजूक तब्येत आहे ‘रेझिस्टंस पॉवर’ वाढवायला हवी.
आता ह्या कोविड-१९ च्या महामारी मुळे तर खरंच हे पटलंय की रोगप्रतिकारक शक्ती असणं खूप आवश्यक असतं, ह्या रोगावर ठोस लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे त्यावर औषध किंवा उपाय म्हणजे त्याची लागण होऊ न देणं!
ते शक्य आहे केवळ आणि केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यानंतरच!

आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आणि ती वाढवणाऱ्या पदार्थांची माहिती विज्ञानातून दिली जाते.
अपल्या शरीरात नको असणार्या विषाणूंचा, सूक्ष्मजीवांचा हल्ला होतो त्यांचा प्रभाव किंवा ते विषाणूच नष्ट करण्याची क्रिया शरीराकडूनच होते त्यालाच प्रतिकारक शक्ती म्हणतात!
जी केवळ शरीरातील एकच घटक नाहीये तर संपूर्ण शरीरांतर्गत प्रणाली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ म्हणजे लिंबूवर्गीय फळे (व्हिटॅमिन सी), लाल सिमला मिरची, लसूण, आलं, पालक, दही, बदाम, पपई आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दूध!
दूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच मदत करते. पण, एकटं दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घातले तर त्याचा परिणाम जास्त आणि अधिक जलद होतो.

त्या जाहिरातीत नाही का ती बाई म्हणते ‘कॅल्शियम के लिए क्या देती हो?’ दुसरी उत्तरते ‘दूध’ ‘हां, पर कॅल्शियम के लिए क्या देती हो?’
म्हणजेच नुसतं दूध पिण्यापेक्षा त्यात काही तरी घालून, मिसळून दिले तर त्याचा प्रभावी आणि जलद परिणाम होतो.
चला तर मग कोणते घटक आहेत जे दूधात मिसळून घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते ते आज आपण ह्या लेखातून पाहूया!
१. हळद :

हळद ही बहुगुणकारी आहे. हिचा छान पिवळाजर्द रंग पदार्थाला दर्शनीय तर बनवतोच शिवाय अनेक गुण असण्यामुळे हिचा वापर पचन सुधारण्यास मदत करतो.
ह्याशिवाय जर ती दूधात मिसळून ते दूध जर प्यायलं तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी, खोकला ह्यासारखे आजार होत नाहित.
हळदीमध्ये ऍलर्जी विरोधी आणि दाह शांत करणारे घटक असतात. शिवाय ह्यामध्ये जंतुनाशक शक्ती असते आणि जी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पूरक असते.
म्हणजेच हळद-दूध पिणे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात हातभार लावते.
२. खजूर :
खजूर हा एक असा घटक आहे की, तो नैसर्गिक ‘स्वीटनर’ म्हणून वापरणं साखरेपेक्षा जास्त फायदेशीर असतं.
खजूर हे फायबरयुक्त असतात, शिवाय त्याच्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स्, प्रोटिन्स् असतात जी दूधामध्ये मिसळली तर त्याचा परिणाम जास्त लवकर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूपच मदत होते.
त्यामुळे दूधातून खजूर जरूर सेवन करावे.
३. मध :

जीवनसत्त्व आणि खनिजे ह्यांनी समृद्ध असणारा मध हा असा घटक आहे जो आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो.
खूप जुना इतिहास असणारा हा मध भारत, ग्रीस, इजिप्त आणि इतर बर्याच देशांनी ह्याचा खूप वर्षांपासून वापर केल्याचे उल्लेख आढळतात.
ह्याच्या सेवनाने त्वचा उजळते, केसांना पोषण मिळते एव्हढेच नव्हे तर मधाचा मुख्य गुणधर्म म्हणजे दूधातून ह्याचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती जलद गतीने वाढते.
४. अंजीर :

सुक्या मेव्यामधील एक घटक अंजीर पचनाला खूपच मदत करतात. अंजीर दूधामध्ये मिसळून त्याचे सेवन केल्यास अनेक रोगांचे मूळ असणारी बद्धकोष्ठता नष्ट होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ह्याची खूपच मदत होते, त्यामुळे दूध आणि अंजिर ह्यांचे एकत्रितपणे सेवन करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.
५. तुळस :

आपल्या बागेतील तुळस अत्यंत गुणकारी असते. हिच्या नुसत्या सेवनाने सर्दी, खोकला ह्यांसारखे आजार दूर होतात. तुळशीचा काढा करून घेणे तब्येतीसाठी खूपच फायदेशीर असते.
अत्यंत औषधी असणारी ह्या तुळशीची पाने कुस्करून गरम दुधात घालून त्याचे सेवन केले तर निरोगी राहण्यास मदत तर होतेच शिवाय श्वसनाचे विकारही संभवत नाहीत.
६. मनुका :

मनुकांना बऱ्याच ठिकाणी काळ्या मनुका असेही म्हणतात. काळ्या द्राक्षांपासून बनलेल्या मनुका शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात.
४, ५ मनुका रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी त्या मनुका पिळून घ्याव्यात आणि गरम दूधात मिक्स करून त्या दूधाचे सेवन करावे.
त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगाशी किंवा विषाणूंशी लढा देण्यास शरीर सक्षम बनते.
७. आले :

आपण चहा मध्ये आले घालून नेहेमीच पितो ते आपल्या सवयीचे देखील झाले आहे, त्यामुळे दूधातून आल्याचे सेवन करणे हे जरा आश्चर्यकारक वाटेल पण तुम्हाला माहितेय?
आले चहापेक्षा दूधातून जास्त फायदेशीर आणि आरोग्यदायी ठरते. आले हे हळद आणि वेलची प्रमाणेच गुणधर्म असणारे आहे. ह्यामध्ये अनेक शक्तीदायी, मसालेदार आणि फायदेशीर घटक आहेत.
आल्यामध्ये अशी अनेक बायोऍक्टिव्ह संयुगे आहेत, जी मानसिक आणि शरीरिक आरोग्यास मदत करतात.
हे आले वाळलेल्या, चूर्ण केलेल्या म्हण्जेच सुंठ रूपात देखील तितकेच गुणकारी असते. त्यामुळेच दूधातून आल्यापेक्षा सुंठीचे सेवन केले जाते. ज्यामध्ये ऍंटीओक्सिडंटस् असतात.
आले किंवा सुंठ घातलेले दूध शरीराची इम्युनिटी वढविण्यास मदत करतात.
८. बदाम किंवा बदामाची पूड :

सुक्या मेव्यातील अजुन एक बहुगुणकारी, अत्यंत आरोग्यदायी असणारे बदाम दूधातून जर सेवन केले तर त्याचा अत्यंत फायदा होतो.
बदाम हे बुद्धिवर्धक असतात शिवाय शक्तीदायक असतात. दूधातून जर ह्याचे नियमितपणे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
बदाम पूड आणि दूध ह्यांच्या नियमित सेवनाने शारीरिक आणि मानसिक तब्येत (मेंदुचा विकास, स्मरणशक्ती वाढणे) सुदृढ राहते.
९. केशर :

केशर हे थोडा महाग असणारा असा एक घटक आहे जो आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. सध्या ह्या महामारीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा उपाय महाग असला तरी करणे आवश्यक आहे.
ते म्हणतात ना ‘जान है तो जहान है’ एक पेला गरम दूध घेऊन त्यात २ काड्या केशर पुरेसे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ह्याचा खूपच उपयोग होतो.
१०. मसाला दूध :

सुका मेवा (बदाम, काजु पूड), केशर, वेलची, चारोळ्या दूधामध्ये घालून हे दूध खूप वेळ आटवायचे, नंतर त्यात अंदाजे साखर घालायची.
अशा रितीने तयार केलेले दूध शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.
आपल्याकडे सण-समारंभ, कोणी पाहुणे येणार असतील, हळदी-कुंकू समारंभ असेल किंवा गणपती उत्सवात हे मसाला दूध देण्याची पद्धत आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ह्याचा खूपच उपयोग होतो.
ह्यातील एक जरी पदार्थ मिसळून दूधाचे सेवन केले तर पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स्, प्रोटिन्स् इत्यादी पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.