' रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये! – InMarathi

रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक गोलंदाजी केली. संपूर्ण २० षटकं खेळून सुद्धा तीन आकडी तर दूर अवघ्या ९० धावा सुद्धा करणं कलकत्त्याच्या संघाला शक्य झालं नाही. यात सिंहाचा वाटा उचलला तो मोहम्मद सिराजने…

एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात २ निर्धाव षटकं टाकण्याची घटना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाली. ४-२-८-३ हा मोहम्मद सिराजचा स्पेल खूपच जबरदस्त ठरला.

 

mohammad-siraj-inmarathi

 

आयपीएलने अनेक नवोदित खेळाडूंना त्यांच्यातील कामगिरी सिद्ध करून दाखवण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिले आहे.

आयपीएलच्या गेल्या १२ सिजनमध्ये आपण असे कित्येक खेळाडू पाहिले, जे स्थानिक स्तरावर उत्तम खेळत होतेच पण त्यांच्या कामगिरीची दखल घेतली जात नव्हती.

परंतु आयपीएलने त्यांना क्रिकेटप्रेमींच्या समोर आणले आणि त्यांना प्रसिद्धी सोबत बक्कळ पैसाही मिळवून दिला.

कित्येक जणांनी तर या सुवर्णसंधीचा फायदा उचलत भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान पटकावले. नावे घ्यायचीच झाली तर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुम्रा, यांची नावे दाखले म्हणून घेतली जाऊ शकतात.

मोहम्मद सिराज याने सुद्धा भारतीय जर्सी परिधान करण्याची संधी मिळविलेली आहे. आजवर भारतीय संघासाठी फारशी छाप पाडू शकला नसला तरीही पुनरागमन करण्यासाठी तो मेहनत घेत आहे.

मध्यमवर्गीय घरातून वर आलेल्या यांसारख्या अनेक खेळाडूंना आयपीएलने तारले. त्यांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकले आहे.

 

bumrah-pandya-marathipizza

आयपीएलच्या १० व्या सिजनसाठी सुद्धा खेळाडूंचा लिलाव झाला होता. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा गरीब परिस्थितीतून क्रिकेट खेळत मोठ्या स्तरावर पोचलेल्या खेळाडूंना आयपीएलने रातोरात करोडपती बनवले.

या लिलावामध्ये एकीकडे तामिळनाडूमधील थंगरसू नटराजन या मजुराच्या मुलाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ३ करोड रुपयांमध्ये खरेदी केले तर –

सनरायजर्स हैद्राबाद संघाने मोहम्मद सिराज याला २.६ करोड रुपयांमध्ये खरेदी करत त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळवून दिले होते.

IPL 2018 मध्ये सिराज त्याच किमतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर साठी खेळला. तेव्हापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

 

mohammd-siraj-marathipizza03

मोहम्मद सिराज हा फास्ट बॉलर असून हैद्राबादचाच राहणारा आहे. गेल्या ४-५ वर्षांतील त्याची स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहून सनरायजर्स हैद्राबाद संघाने २.६ करोड रुपयांची बोली लावत त्याला करारबद्ध केले होते.

मोहम्मद साठी ही संधी म्हणजे एखाद्या लॉटरी पेक्षा कमी नव्हती. अतिशय गरीब परिस्थितीमधून त्याने क्रिकेटर म्हणून स्वत:ला घडवले आणि आता तो थेट करोडपती झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी जणू आभाळच ठेंगणे झाले.

 

mohammad-siraj-marathipizza01

या गोड बातमीमुळे त्याच्या आईवडीलांना देखील अश्रू अनावर झाले. मुलाने घेतलेल्या मेहनतीचे हे चीज असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी ह्या वेळेस व्यक्त केले.

या सोन्यासारख्या क्षणाबद्दल व्यक्त होताना मोहमद सिराज म्हणाला होता की,

जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी चांगला खेळ केला म्हणून, मला ५०० रुपयांचं एक बक्षीस मिळालं होतं. तेव्हा मी २५ ओव्हर मध्ये २० रन्स देऊन ९ विकेट घेतल्या होत्या.

माझ्या या कामगिरीमुळे खुश झालेल्या माझ्या मामाने मला ५०० रुपये दिले होते. तो आमच्या टीमचा कॅप्टन होता.

तेव्हा ५०० रुपये मिळाल्याचा तो क्षण आणि आता २.६ करोड रुपये मिळवून देणारा हा क्षण… या दोन क्षणांमध्येच मी घडलो. हे दोन क्षण माझ्या आयुष्यातील अमूल्य क्षण आहेत.

मोहम्मदचे वडील रिक्षा चालवतात. त्या मानाने घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण त्यांनी कधीही आपल्या मुलाला क्रिकेटपासून दूर केले नाही.

त्याला क्रिकेटर म्हणून घडवण्यासाठी जेवढा खर्च आला तो त्यांनी कसाबसा उचलला. जणू त्यांना देखील आशा होती की मोहम्मद पुढे जाऊन नक्कीच काहीतरी मोठं करणार!

आणि त्यांची ही आशा खरी ठरली…!

 

mohammd-siraj-marathipizza02

मोहम्मदने आजवर रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.

काल त्याने केलेली गोलंदाजी पाहता, तो लववकरच भारतीय संघात पुनरागमन करेल आणि बुमराह व शमीच्या खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना ‘पळता भुई थोडी’ करेल अपेक्षा करायला हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?