' हॉटेल मध्ये जेवायला जाण्याआधी या ९ गोष्टींचा विचार करा व त्यानुसारच हॉटेल निवडा – InMarathi

हॉटेल मध्ये जेवायला जाण्याआधी या ९ गोष्टींचा विचार करा व त्यानुसारच हॉटेल निवडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

अलीकडे हॉटेलमध्ये जेवायला जायचं प्रमाण खूपच वाढलंय. कारणं देखील बरीच आहेत. प्रमुख कारण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना रोजच्या रुटीन मधून थोडासा आराम किंवा बदल हवा असतो.

कधी गृहलक्ष्मी थकलेली किंवा आजारी असते. रोजच्या त्याच त्याच जेवणाचा कंटाळा आलेला असतो. मुलांची इच्छा असते वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा करायचा. मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी हवी असते.

थोडक्यात काय तर कारणे अनेक इलाज एक..”हॉटेलात जेवायला जाणे”….  तसा  इलाज चांगला, पण थोडे डोळे उघडे ठेवून केला तरच.

 

indian restaurant inmarathi
kolamrestaurant.com

आपण जेवायला जातोय हॉटेलमध्ये तर खिसा पण बघावा लागतो.पण त्याहीपेक्षा ते हॉटेल कसे आहे? जेवणाचा दर्जा उत्तम आहे की नाही? हॉटेल स्वच्छ आहे की नाही? अशा सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागते.

तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जाताय त्या हॉटेलकडे बघितल्यावर काही गोष्टी ठळकपणे समोर दिसतात.

तुम्ही त्या गोष्टी नजरेआड केल्यात तर नुकसान तुमचंच आहे. कदाचित तुम्हाला ते इतके महागात जाते की कदाचित हॉस्पिटलचे तोंड देखील बघायला लागू शकते.

कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर दिसू शकतात त्या ९ गोष्टी, ज्या तुम्हाला दिसल्या तर समजा की इथलं अन्न खाण्याजोगं नाही!

१) तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर कोणी तुमच्या स्वागतास हजर नसणे.

काही गोष्टी दिसतात फारच छोट्या. पण दुर्लक्ष केलं तर महागात पडतात.

 

indian restaurant 2 inmarathi
Gallery | Indian & Bengali Restaurant Haymarket, Edinburgh

बऱ्याच हॉटेल्समध्ये विशेषतः स्टार रेटिंग असलेल्या किंवा “अ” दर्जा असलेल्या हॉटेलमध्ये त्यांचे स्वतःचे “हॉस्पिटयालिटी डिपार्टमेंट” असते.
हा विभाग गिऱ्हाईकांचे आदरातिथ्य बघत असतो.

तुम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केला की तुमचे “गुड मॉर्निंग सर/मॅडम” किंवा “गुड इव्हिंग” म्हणत स्वागत केले जाते. तुम्हाला डायनिंग टेबलपर्यंत आणून सोडले जाते.

वेटरला लगेच तुमच्यापर्यंत पाठवले जाते आणि हे सगळे सुस्मित चेहऱ्याने.

तुमचे जेवण पुर्ण होईपर्यंत त्यांचे तुमच्याकडे लक्ष असते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची ते पुरेपुर काळजी घेत असतात.

तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर तुमचे स्वागत करण्यास कोणी नसेल तर याचा अर्थ इथे तुमचे आदरातिथ्य व्यवस्थित होणार नाहीय,तुमचे टेबल तुम्हालाच शोधून काढावे लागणार.

इतकेच नाहीतर इथला वेटर बिझी असेल तर तुमची ऑर्डर घ्यायला देखील तो उशीर लावणार.

इकडे तुमच्या पोटातील कावळे नुसते काव काव करणार नाहीत तर ते कोलाहल करतील आणि परिणामी तुमचे डोके दुखायची शक्यता निर्माण होणार आणि तुमची चिडचिड होणार.

२) आता आणखी ध्यानात येणारी गोष्ट म्हणजे तुम्ही हॉटेलच्या डायनिंग टेबलवर बसल्या पासून पाच मिनिटांच्या आत वेटरने येऊन तुम्हाला काय हवंय नकोय याची चौकशी केली नसेल – किंवा

“सर/मॅडम, वेटर इतक्यात येईलच,तो पर्यंत आपल्याला काही कोल्ड्रिंक्स वगैरे हवे आहे का”? अशा प्रकारे कोणी काही विचारले नसेल तर पक्के समजा की येथील व्यवस्थापन सुमार दर्जाचे आहे.

ना यांना गिऱ्हाईकांचे आदरातिथ्य करता येत ना साधे शिष्टाचार पाळता येत. या बाबतीत त्यांचे प्रशिक्षण सुद्धा झाले नसावे हे कळून चुकते.
वेटरच्या न येण्याची सुरवात ही पुढील सेवा व्यवस्थित न मिळण्याची जणू खात्रीच.

 

indian restaurant 3 inmarathi
TripAdvisor

पहिली ऑर्डर उशिरा घेतल्यावर पुन्हा दुसरा पदार्थ मागवल्यावर तो आणखी उशिराने मिळणे हे ओघाने आलेच. थोडक्यात काय तर मनस्ताप वाढण्याची शंभर टक्के खात्री.

३) तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाताय तेथील पार्किंग आणि प्रवेशदारा बाहेरील भाग अस्वच्छ असेल तर आतील भाग देखील तसाच अस्वच्छ असू शकतो.

ही गोष्ट जरा काळजीपूर्वक बघा…लक्षात ठेवा.

हॉटेलचा दर्शनी भाग अस्वच्छ असेल,  खिडक्यांची तावदाने धुळीने भरलेली असतील,

किंवा दर्शनी भागात कचऱ्याची बादली किंवा डबा ठेवलेला असेल व त्यातून कचरा खाली पडला असेल किंवा सिगारेटची थोटके इतस्ततः विखुरलेली असतील,

 

 

indian restaurant 5 inmarathi
malaymail.com

तर अगदी खात्रीने समजून जा की इथे सर्वत्रच अस्वच्छता माजलेली असणार. हॉटेलची जमीन तसेच वॉशबेसिन,बाथरूम टॉयलेट हे सर्वच अस्वच्छ असणार. तेव्हा आत न जाण्याचा निर्णय घेणे तुमच्याच हातात असणारे.

४) तुमच्या समोर येणारे मेन्यूकार्ड डाग पडलेले किंवा अन्नाचे वाळलेले कण त्यावर चिकटलेले असतील तर नक्कीच स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.

तुमच्या हातात वेटर एक मेन्यूकार्ड देतो,त्यातून आपण पदार्थांची ऑर्डर देणार असतो.

हे मेन्यूकार्ड गचाळ असेल किंवा त्याच्यावर पदार्थ सांडल्याने तिथेच वाळून डाग पडलेले असतील किंवा पान उघडलं जात नसेल आणि त्याचे कारण तिथे अन्नकण पानाला चिकटलेले आहेत असे दिसले तर विचार करा की किचन किती अस्वच्छ असेल?

 

menu card inmarathi
TripAdvisor

वेटरने हात तरी स्वच्छ धुतलेले असतील की नाही? वॉशबेसिन देखील नक्कीच घाणेरडे असणार. अशा अस्वच्छ ठिकाणी भोजन घेणे म्हणजे आजारास आमंत्रण.

५) हॉटेलची बाथरूम किंवा टॉयलेट अस्वच्छ  असणे म्हणजे व्यवस्थापन सुद्धा तितकेच अस्वच्छ असणार.

तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर आधी हातसफाईसाठी बेसिन पाशी गेलात आणि ते पिवळे डाग असलेले असेल, त्यात खरकटे असेल पाणी साठलेले असेल तर एकदम किळसच येईल.

 

indian restaurant 4 inmarathi
malaymail.com

हॉटेल स्वच्छ असेल तरच अन्न खावेसे वाटते.गचाळ घाणेरड्या ठिकाणी अन्न खाण्यास मनच धजावणार नाही. विचार करा की इथले व्यवस्थापनच किती गचाळ असेल ते. तेव्हा लगेच पळ काढायची तयारीच ठेवा म्हणजे झाले.

६) डायनिंग हॉलमध्ये तुम्ही एकटेच आहात तर धोक्याची सूचना समजा.

तुम्ही दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेत गेला आहात आणि तुम्ही एकटेच आहात किंवा फारतर एखादे गिऱ्हाईक जेवायला आले आहे.

बाकी सर्व टेबल्स रिकामी दिसत आहेत तर याचा अर्थ होतो इथले जेवण चविष्ट नसणार किंवा शिळे जेवण गरम करून वाढले जात असणार.
बघा ना विचार करून.

जर जेवण चविष्ट असेल, ताजे असेल, व्यवस्थितपणे बनवलेले असेल किंवा एखादा पदार्थ त्या विशिष्ट “कुझीन” स्टाईलने बनवलेला असेल तर त्या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी व्हायलाच हवी.

जिथे पदार्थ चविष्ट आणि हॉटेल स्वच्छ तिथे गिऱ्हाईकांची गर्दी होणारच हे सूत्र ध्यानात ठेवले की वेगळे काही लक्षात ठेवायची गरज पडणारच नाही.

 

indian restaurant 6 inmarathi
TripAdvisor

तेव्हा तुम्ही एकटेच असाल तर पदार्थ मागवायचे की नाही याचा निर्णय तुमच्याच हाती. हॉटेलच्या भाषेतील “लेफ्ट ओव्हर्स” म्हणजेच आपल्या दृष्टीने उरलेसुरले शिळे पदार्थ छान सजवून तुमच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उठा पटकन आणि गुंडाळा गाशा.

७) तुम्ही हॉटेलमध्ये आल्यावर तुमच्या आवडीचे टेबल तुम्हाला मिळत नसेल तर याचा अर्थ व्यवस्थापनास तुमची पर्वा नाहीय.

तुम्ही डायनिंग हॉल मध्ये जाता, तुम्हाला कॉर्नरचे टेबल हवंय आणि तुम्ही मॅनेजरला सांगता की त्या टेबलवर आम्हाला बसायचंय.

पण मॅनेजर लक्ष देत नाहीय किंवा त्या टेबलवरील टेबलक्लोथ बदलून बाकी व्यवस्था करून देत नसेल किंवा सरळ दुर्लक्ष करत असेल आणि बहाणे बनवत असेल तर याचा अर्थ उघड आहे की व्यवस्थापकास तुमची काहीच पर्वा नाहीय.

“जेवायचं असेल जेव्हा नाहीतर फुटा”.असा न बोलता दिलेला संदेश असू शकतो इतकंच लक्षात ठेवा. महत्वाचे म्हणजे जणू एखादी गर्भित धमकी सारखं “आम्ही देऊ ते मुकाट्याने खा”. वाटावं तेव्हा आपली ते हॉटेल सोडायची वेळ आलीय हे गृहीतच धरा.

 

indian restaurant 7 inmarathi
romewise.com

न जाणे आपण विचार करतोय तसेच “कसलेही” जेवण पदरात पडू शकते. जिथे गिऱ्हाईकांची काळजी घेतली जात नाही तिथे पाऊल न ठेवणेच योग्य.

८) बऱ्याचदा आपण गुगलवर सर्च करून हॉटेल शोधतो आणि त्यांचे रिव्ह्यू बघून जातो पण त्यात फसगत होऊ शकते.

अलीकडे हॉटेल शोधण्यासाठी गुगलवर सर्च करून हॉटेल निवडले जाते. त्यासाठी तुम्ही त्या हॉटेलच्या जेवणावर गिऱ्हाईकांनी काय प्रतिक्रिया नोंदवल्यात हे बघता.

 

indian restaurant 8 inmarathi
caorda.com

चांगल्या प्रतिक्रिया वाचल्यावर तुम्ही देखील प्रभावित होता. पण बघा हं इथे तुमची फसगत होऊ शकते. कसे ते समजावून घ्या.

सोशल मीडियावर काय आणि किती खरे किंवा खोटे असू शकते हे सांगता येत नसते. ह्या प्रतिक्रिया व्यवस्थापनाने खोट्या नावाने दिलेल्या असू शकतात.

प्रतिक्रिया चांगल्या म्हणजे हॉटेल किंवा तिथं मिळणारी वागणूक किंवा जेवण हे उत्तम दर्जाचे असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.
तेव्हा तिथं गेल्यावरच कळू शकतं.

९) तुमच्या मेन्यूकार्डवर ढिगाने पदार्थांची यादी दिसत असेल पण स्पेशल काही दिसत नसेल तर फसू शकता.

बऱ्याच मोठ्या चांगल्या हॉटेल मध्ये पदार्थाच्या नावाखाली त्यातील घटक पदार्थ व चवी बाबत लिहिलेले असते.याचा अर्थ तो पदार्थ बनवणाऱ्या शेफला काय बनवायच आहे हे माहिती असते आणि तो तो पदार्थ तसाच बनवतो.

बऱ्याच हॉटेल मध्ये पदार्थांची यादी लांबलचक असते आणि मागवल्या गेलेल्या बहुतेक पदार्थांची चव सारखीच असते कारण एकच मसाला सर्व पदार्थाना सारखाच वापरलेला असतो.

अलीकडे बरीच शेफ मंडळी हॉटेलच्या किचनमधे काय काय गैरप्रकार चालू असतात या विषयी उघडपणे बोलू लागली आहेत.

 

indian restaurant 9 inmarathi
morningadvertiser.co.uk

फ्रिज मधील नॉनव्हेज खराब झाल्यावर देखील फेकून न देता मसाल्यांचा जोरदार वापर करून कसे खपवले जातात आणि व्यवस्थापन ते करण्यास कसे भाग पाडते या विषयी उघडपणे लिहू लागलेत.

व्यवस्थापनाचा कल गुंतवलेले पैसे जास्तीत नफ्यासह पदरात कसे पडतील या कडे असतो. गिऱ्हाईकांचे हित जपण्याकडे नसतो.
तेव्हा आम्ही ज्या ९ धोक्याच्या सुचनांकडे तुमचे लक्ष वेधून घेतलंय ते अजिबात विसरू नका.

हॉटेल स्वच्छ नसेल तर फिरकू सुद्धा नका कारण ते अन्न खाण्यायोग्य नसणार. त्यापेक्षा “अ” दर्जा किंवा स्टार रेटिंग असणारी हॉटेल्स निवडा.
त्यांच्याकडे हॉस्पिटयालिटी डिपार्टमेंट असते. स्वच्छतेवर भर दिलेला असतो.

कर्मचारीवर्गावर त्यांचा वचक असतो,हॉटेलचे किचन स्वच्छ आणि अन्नपदार्थ ताजे आहेत ना इकडे लक्ष पुरवलेले असते.

तेव्हा “हॉटेलिंग” करा पण डोळ्यांसमोर दिसणारे धोके लक्षात घेऊनच हॉटेलची निवड करा नाहीतर मनस्ताप आणि डोकेदुखी स्वतःच्याच पैशाने विकत घेतलीत याचा अनुभव घ्यावा लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?