' मराठी खरंच नामशेष होऊ शकते का? – InMarathi

मराठी खरंच नामशेष होऊ शकते का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – आदित्य कोरडे

===

मराठी भाषेसमोर स्वत:चे अस्तित्व टिकवण्याचा, एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे असे बरेच भाषाभिमानी लोक बोलत असताना आपण ऐकतो. खरेच असे काही आहे की नाही ह्याचा वेध घ्यायचा मी केलेला हा प्रयत्न!

मराठी समोर नामशेष होण्याचा धोका खरेच आहे का? हे नक्की सांगता येणे तसे फार कठीण काम आहे. अहो साधं, मी मराठी भाषाभिमानी आहे की नाही, हे हल्ली हल्ली मला ठामपणे सांगता येईनासे झाले आहे.

मराठी भाषेचा अभिमान म्हणजे सध्या जो काही अर्थ प्रचलित होऊ पाहतोय तोच जर खरा अर्थ असे गृहीत धरले तर, भाऊ! आपण मराठी भाषाभिमानी नाही.

(तसेच आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे- शाळा, कॉलेज, मराठी वाहिन्या ते अगदी नवनव्या रेडियो चॅनेलवरती जे काही मराठी म्हणून ऐकू येते ते जर मराठी असेल तर आपण मराठी भाषकही नाही. भाषक आणि भाषिक ह्या दोन पूर्णपणे भिन्न शब्दांचा अर्थ तर आजकाल मराठी वृत्त वाहिन्यांना  माहिती तरी आहे की नाही, अशी दाट शंका येऊ लागली आहे.)

 

marathi-language-marathipizza02

 

अनेक मोठे मोठे साहित्यिक आणि मराठी भाषाभिमानी लोक हाती सतीचे वाण घेतल्याप्रमाणे मराठीच्या अस्तित्वाची काळजी/ चिंता वाहत गावभर बोंबलत फिरत असतात.

त्याच त्याच गोष्टी निरनिराळ्या प्रकारे सांगून, आपण काही तरी महान क्रांतिकारक बोलत असल्याचा आव आणत असतात. ते पाहता आपण मराठी भाषाभिमानी नाहीच असे मला वाटू लागलेय खास!

चांगला कीर्तनकार एकच आख्यान वर्षानुवर्षे त्याच त्या श्रोत्यांसाठी नव्या उमेदीने, नव्या जोमाने आणि क्वचित नवे दृष्टान्त देत लावत असतो. दर एक कीर्तनकाराचे ठराविक भक्त असतात. तेही दरवेळी नव्या चेवाने माना डोलावतात.

बुवांचा विस्मयचकित (“काय शब्द आहे…..खतरनाsssक!” असे प्रवीण तरडे नक्की म्हणाले असते.) नजरेने जयजयकार करतात, पायावर डोके ठेवतात आणि चालू पडतात.

“साहित्य संमेलनं आणि संमेलनाध्यक्षांची निवडणूक हा सर्व चोरांचा बाजार आणि बदमाषांचा गोंधळ आहे. या बाजारात चांगला माणूस निवडून येणे शक्यच नसते.” असे आपले स्पष्ट मत! (ह्या!…आपले कसले, हे तर गुरुवर्य भालचंद्र भाऊ नेमाडे ह्यांचे स्पष्ट मत. पहा -१९९१ मध्ये ‘टीकास्वयंवर’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दिलेल्या मुलाखती व भाषणे.)

आता य. दि. फडके किंवा रा. ग. जाधव यांच्यासारखे जे अध्यक्ष नेमाडे साहेबांच्या ह्या वक्तव्यानंतर साहित्य संमेलनांना लाभले, ते जर चोर आणि बदमाश असतील, तर तिथे माझ्या सारख्या सामान्य  किंवा अतिसामान्य बौद्धिक कुवतीच्या माणसाचे काय काम?

२०१७ साली डोंबिवलीत झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांचे भाषण वाचले. वाचले म्हणजे अक्षरनामात एक लेख जो आला होता- संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे काय बोलले, तुम्हाला काही कळले?” म्हणून त्यात त्यांच्या भाषणातले काही परिच्छेद दिलेले होते ते वाचले.

अन्यथा संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण एक हाती वाचून काढायची आपली काही छाती नाही. हे अध्यक्ष महोदय गेली ३०-४० वर्षे निष्ठेने साहित्य समीक्षा करतात हेही त्या लेखावरूनच कळाले.

सरकारी नोकर जसे ३०-४० वर्षे नोकरी करून रिटायर होताना, त्यांच्या सेवेचा गौरव पूर्ण उल्लेख करायचा एक शिष्टाचार आहे तसाच काहीसा हा उल्लेख असावा.

 

sahitya-sammelna-marathipizza

 

अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यावर, त्यांच्या बरोबरच अर्ज भरणारे कविवर्य प्रवीण दवणे यांनी ‘अध्यक्ष म्हणून लेखक हवा, की समीक्षक ते ठरवा!’ असा सवाल केला होता.

तेव्हाच आम्हाला (देखिल) एक समीक्षकच अध्यक्ष म्हणून लाभणार ह्याचा अंदाज आला होता. (मोठे भविष्यवेत्तेच कि नाही! मोदी नोटाबंदी करून तोंडाला फेस आणणार, ह्याचा अंदाज बरा नाही आला तो…इति पत्नी!)

म्हणजे काय हो दवणे साहेब ? समीक्षक हा साहित्यिक नसतो का?

मागे एकदा पु.ल. देशपांडे हे विनोदी लिहिणारे असल्याने ते लेखक/ साहित्यिक नाहीत असा वटहुकूम काही समिक्षकांनीच काढला होता, असे आमच्या मातोश्रींनी कणिक तिम्बताना दात ओठ खात सांगितल्याचे मला अंधुक अंधुक स्मरते.

पण दस्तुरखुद्द समीक्षक हेच साहित्यिक आहेत की नाहीत, असा दावा कुणी करेल असे वाटत नव्हते. अहो आपल्या पायजम्याच्या नाड्या ज्यांच्या हाती त्यांच्या नाकापाशी तपकीर कोण धरेल? … असो..!

१८७८ साली लोकहितवादी आणि न्या. रानडे ह्यांना ही संमेलनाची कल्पना सुचली. तेव्हापासून मधली काही वर्षे वगळता हा वार्षिक गदारोळ अव्याहत चालू आहे.

त्यातून १९२६ साली पुण्याच्या तत्कालीन सुप्रसिद्ध (पुण्यात सर्व संस्था नुसत्या प्रसिद्ध नसतात तर त्या सुप्रसिद्ध असतात, जसे पुण्यातला प्रत्येक विद्वान हा महापंडित असतो नुसते पंडित हे आडनाव असते.)

अशा ‘शारदा मंदिर’ या साहित्य सेवक संस्थेच्या पहिल्या वार्षिक ‘शारदोपासक संमेलनाचे’ अध्यक्ष पद कधी नव्हे ते इतिसाचार्य राजवाडे ह्यांनी स्वीकारले आणि व्यासपीठावरून “मराठी हि मुमुर्षु भाषा आहे. (म्हणजे मरण पंथाला लागलेली भाषा आहे) तिचे सोहळे कसले करता”

असे म्हणून आयोजकांनाच खडसावले होते. त्या वर्षी त्यांनी जी ही तार छेडली, तीच धरून संमेलनाध्यक्ष दरवर्षी मराठीच्या अस्तित्वाचा कापूस पिंजत असतात.

 

dr-akshaykumar-kale-marathipizza

 

आता त्यांचे हे वाक्य बघा-

खेड्यापाड्यांतल्या, उपेक्षित वस्त्यांतल्या, कलाशाखेतल्या सतत हिणवले जाणाऱ्या, पोरक्या ठरू पाहणाऱ्या मराठी  माध्यमातील शिक्षणाकडे कानाडोळा करून इंग्रजी शिक्षणमाध्यमाच्या राजरस्त्यावरून विज्ञान, तंत्रविज्ञा, वैद्यक, व्यवस्थापन, विधी इत्यादी क्षेत्रांतील शिक्षण पूर्ण करून युरोपअमेरिकेची दारे ठोठावता येतात, याबद्दल पुरेपूर खात्री पटल्याने आमच्या केवळ उच्चभ्रू समाजानेच नव्हे, तर सर्व जातिगटांतील मध्यमवर्गीय समाजाने देखील मराठी माध्यमातील शिक्षणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून, त्याकडे कायमची पाठ फिरविली आहे.

महाराज हे एक वाक्य आहे बरं का! अक्खा परिच्छेद नाही. वाचताना दम लागतो, अर्थ कधी लागायचा! काय ती भाषा! काय तो डौल! आता  अक्षरनामावरचे टप्पू सुलतान म्हणून कोणी आहेत, त्यांनी ह्या सगळ्याच भाषणाचा व्यवस्थित समाचार घेतलेला असल्याने मी परत त्या फंदात पडत नाही.

मला काय म्हणायचे आहे ते मी म्हणायला सरळ सुरुवात करतो.

कोणतीही जिवंत भाषा प्रवाही नदी प्रमाणे असते. तळयासारखी स्थिर नसते. नदी जशी वाहत जाताना प्रवाहातले थोडे पाणी आणि गाळ काठावर पसरवत आणि तिला येऊन मिळणाऱ्या पाण्याला, गाळाला सामावून घेत पुढे जात असते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणाहून नवनवे शब्दप्रयोग, संकल्पना घेत आणि देत भाषा वाहत असते.

जड झालेले, उपयोगातून बाद झालेले शब्दप्रयोग तळाशी साचतात, स्मृतीतून नाहीसे होतात.

आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे, कधी ना कधी, पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात.

सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते.

मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली, ‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही.

नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राटही गेले.

 

marathi-language-marathipizza

लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले. (काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चॅनेल ऐकताना RJ म्हणाला

हेल्लो पुनेकर, पुण्यात ( SORRY, पुन्यात) चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.

ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून, आता ह्या नव्या आया आल्यात – छळायला!

हिरवाई, निळाई, आणि सगळ्यात फेमस आणि डेंजरस तरुणाई) ह्याच्या सारखीच भाषा (परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार?

आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चॅनेल, डेंजरस असे शब्द वापरलेच की नाही. कोण वाचतय? हे जसं महत्वाचं तसंच जास्तीतजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल, असं बोलण लिहिणं महत्वाच! (त्यालाच साहित्य असे म्हणतात मामू!)

मराठी साहित्य आणि भाषा ह्याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की, बोली म्हणून मराठी खूप जुनी भाषा खचितच आहे. मराठी साहित्यालाही अगदी प्राचीन म्हणावा असा इतिहास आहे.

पण अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचे साहित्यच प्रसवत होती. पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव (!) वाढला, तसा कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागले.

अर्वाचीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणले हे खरे, पण हि परंपरा २००-२२५ वर्षांपेक्षा जुनी नाही.

पन्नास वर्षांपूर्वी बहुतेक प्रौढ स्त्रिया ‘लुगडे’ नेसत असतं, तरुणी ‘गोल पातळ’ नेसत आणि लहान मुली ‘परकर पोलके’ घालत. ‘साडी’ हा शब्द तेव्हा फारसा प्रचारात नव्हता.

‘लुगडे’ नेसणार्‍या स्त्रियांची पिढी काळाआड गेली आणि जाड्या भरड्या सुती कपड्या पासून बनलेल्या लुगड्या ऐवजी, नायलॉन वगैरे सारख्या पातळ कपड्याची ‘पातळं’ आली.

‘गोल पातळ’ जाऊन आलेली ‘साडी’ मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता ‘पंजाबी’ राहिला नाही, ‘सलवार कमीज’ किंवा ‘सलवार सूट’ या नावाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो.

फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात.

राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर दिसतो. नव्या पिढीतल्या मुली ‘फंक्शन’ किंवा ‘ऑकेजन’ च्या निमित्याने कधी कधी “साडीही” ‘घालतात’ (नेसत नाहीत).

आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नावाने साडी शिल्लक राहील, पण ‘नेसणे’ हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे.

 

marathi-language-marathipizza01

 

आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असताना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. आपले सांगणे ऐकणार्‍याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते.

माझे आईवडील ज्या (मराठी) बोलीत माझ्या लहानपणी बोलत असतं, त्या बोलीत मी माझ्या मुलीशी बोलत नाही. जरी ती मराठीच असली तरीही (तिची आणि तिच्या पिढीची भाषा मराठीसदृश कोणती तरी आहे, पण आम्हाला एकमेकांशी संवाद साधता येतो हे काय कमी आहे!).

‘फडताळ’, ‘शिंकाळे’, ‘सन्दुक’ असे जुने शब्द माझ्या बोलण्यात फारसे कधी येत नाहीत कारण, त्या वस्तू माझ्या घरात नाहीत, तसेच ‘ सीडी’ , ‘मॉल’ , ‘रिमोट’, ‘जॅम’, सॉस  आदि शब्द सतत येतात, कारण त्या वस्तू नुसत्या माझ्या घरात नाहीत तर सतत वापरात असतात.

आपले लेखन वाचणारे जे लोक असतात. (माझे लेखन लोक वाचतात अशी माझी आपली समजूत आहे… पण ते एक असो!) त्यांना आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच कळावा, यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते.

हे मला मान्य, पण त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत (म्हणजे नेमके काय?), संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत, की परदेशातून आले आहेत, यापेक्षाही किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असेही मला वाटते.

आकाशवाणी असे म्हटल्यावर कुणाला लगेच “म्हणजे काय?” असा प्रश्न पडणार नाही, पण म्हणून रेडियो हा शब्द वापरल्यावर लगेच विटाळ झाला असे समजून शहारायचीही गरज नाही. ईश्वरीय संदेश म्हणून जेव्हा आकाशवाणी हा शब्दप्रयोग केला जातो, त्याऐवजी कोणी रेडियो असा शब्दप्रयोग करणार नाही. केला तर ते हास्यास्पदच होईल.

जिवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे.

कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि ‘रन’, ‘सेव्ह’, ‘डिफॉल्ट’, ‘स्क्रॅप’ आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत.

चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो.

त्यांऐवजी मराठीत ‘धावा’, ‘वाचवा’ वगैरे म्हणतांना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्याच तंत्रज्ञानावर आधारलेली एखादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करताना ‘उचला’, ‘ठेवा’, ‘थांबा’, ‘चला’, ‘दाबा’, ‘सोडा’ अशा सोप्या मराठी शब्दांचा प्रयोग केला, तर त्या शब्दांचा उपयोग करायला कुणालाही मनापासून आवडेल.

पण सध्या तरी जी गोष्ट ज्या परक्या पण सहज सोप्या नावाने माझ्यापर्यंत पोचली त्या नावाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता, त्या नावाचाच मराठी भाषेत समावेश करावा असे माझे मत आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी बोलताना मातृभाषेतून शिक्षण हा आपल्याकडचा सर्वात महत्वाचा आणि बहुधा सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. (जणू मातृभाषेतून शिक्षण एवढा एक मुद्दा सोडला, तर दुसरे कोणतेही प्रश्न, आव्हानं शिक्षणक्षेत्रात नाहीत.)

जवळपास सगळे तथाकथित तज्ञ, सूज्ञ, शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे ह्या एका मुद्द्यावर  सहमत होताना दिसतात. कमीत कमी प्राथमिक शिक्षण तर मातृभाषेतूनच झाले पाहिजे ह्यावर तरी एकमत असतेच.

सर्वसाधारण मनुष्य सुद्धा बोलताना मातृभाषेतून शिक्षणाची भलावण करताना आढळतो. ह्यावर अगदी पु. लं. देशपांडे ते भालचंद्र नेमाडे, आणि इतर अनेक मान्यवर दिग्गजांनी अनुकूल अभिप्राय दिले आहेत.

तरीही आज मुंबई-पुण्यात तरी खाजगी मराठी शाळांची अवस्था काय आहे? ह्यावर मी वेगळे भाष्य करायची गरज नाही. कारण सरळ आहे, जे आपल्या मुलांना खाजगी शाळात पाठवू शकतात अशा मध्यम वर्गीय पालकांनी खाजगी मराठी शाळाकडे चक्क पाठ फिरवली आहे.

महानगर पालिकांच्या शाळांबद्दल न बोललेलंच बऱं, कारण तिथे सरकारी अनास्था, अनागोंदी आणि भ्रष्टाचार ह्यांचा फार जास्त प्रमाणात संबंध आहे आणि त्यावर बोलू जाणे म्हणजे विषयांतर होणे.

मुंबई-पुण्यात खाजगी मराठी शाळा विद्यार्थी नसल्याने बंद पडू लागल्या आहेत किंवा माध्यम बदलाकडे वळू लागल्या आहेत. मातृभाषेतून शिक्षणाच्या आग्रहामध्ये बऱ्याच जणांचा ‘त्यामुळे मुलांना विषय नीट समजतात’ या कारणाच्या आड, मराठी भाषेच्या संरक्षणाची काळजी आणि संवर्धनाची एक आस असते.

तसे असणे काही गैर नाही पण विषय मुलांच्या शिक्षणाचा आहे, भाषेच्या संवर्धनाचा नाही याचे भान बऱ्याचदा सुटलेले आढळते.

 

marathi-school-marathipizza

मी माझा अनुभव सांगतो- आमच्या कॉलनीमध्ये २७ बंगले आहेत. त्यामध्ये साधारण ४५-५० शाळेत जाणारी मुलं आहेत. ही मुलं विविध वयोगटातली आहेत, त्यामुळे अगदी अंगणवाडी पासून ९वी-१०वी पर्यंतची मुलं यात येतात. महाविद्यालयातली मुलं यात धरली नाहीत.

एक श्री. मुळे म्हणून आहेत, त्यांच्या नातीचा सन्माननीय (!) अपवाद सोडला तर सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळात जातात. तरीही ही मुलं आपापसात खेळताना अस्खलित मराठी बोलतात. त्यांना “मराठी की इंग्रजी” असा पेच पडत नाही.

त्यांचे आजी आजोबा लोक, जे मराठीच बोलतात, त्यांच्याशी संवाद साधताना ह्या मुलांना काहीही ‘प्रॉब्लेम’ येत नाही. ह्याचं कारण साधंसरळ आहे.

मुलांना आपण जरी शाळेत शिकायला पाठवत असलो तरी त्यांचं शिक्षण त्या आधीच सुरु झालेलं असतं आणि ते घर, आसपासचा परिसर त्याच्या मित्रपरिवाराकडून बरंच काही शिकत असतात. माझी मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि तिथे असलेल्या हिंदी भाषक मुलांच्या संगतीने तिच्या वयाच्या मानाने बरे हिंदी बोलते.

आम्ही गुजरात मध्ये राहत असतो तर तिला गुजराती सहजगत्या आले असते. ते कशाला? माझा मित्र बलराम छप्पर म्हणून एक कानडी आहे. त्याचा ८ वर्षांचा मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी अस्खलित बोलतो.

तेव्हा मातृभाषेतून शिक्षणाचा फार बागुलबुवा करायची गरज नाही.

आणि तसंही इंग्रजी माध्यमामुळे मुलांना मराठी नीट बोलता येत नाही, असे बोम्बलणाऱ्या लोकांना ‘म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?’ असे विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही.

मराठी बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची फार सरमिसळ होते, असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो. ठीक आहे, पण मग आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूर्वी वापरात होती काय? आणि १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं?

आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात? साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते?

आपण मोटार सायकल वरून (सांप्रत काळी तर बाईक वरून) नव्हे तर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? पेट्रोल टाकणे, स्पार्कप्लग बदलणे, पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय?

जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धा मराठी नसतात. जबाब, जबाबदारी, हरकत, घड्याळ हे शब्द काय मराठी आहेत की संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावल्यासारखे वाटत नाही. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा, आजच्या विषयांवर तर आपण मराठीत बोलूच शकणार नाही.

मोबाईल, सीडी, पेन ड्राईव, digital, analogue  यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला, ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय?

दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरु शकणार नाही atom हा लॅटिन आहे, तर theory ग्रीक आहे. सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे.

भाषा जिवंत असते म्हणजे तिच्यात सतत बदल घडत असतो आणि तिचा एकूण तोंडावळा तोच राहिला तरी स्वरूप मात्र बदलत असते. नव्हे तोंडावळा सुद्धा बदलतोच.

 

marathi-language-marathipizza03

मराठी वर अतिक्रमण (!) करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो, तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही. जणू मराठीवर अतिक्रमण फक्त इंग्रजीचेच झालेले आहे.

बटाटा, टोमाटो, पगार, चावी, हरकत, इस्त्री, आजार इ. शब्द इंग्रजी नाहीत आणि ते मराठीही नाहीत.

मुळात इंग्रजी हा शब्दच इंग्रजी नाही तर फारसी आहे. गेल्या १००-१५० वर्षात मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला, म्हणून मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होते असा समज रूढ झाला आहे.

कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होतो. इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले. त्या त्या ठिकाणच्या भाषा, संकल्पना, शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली.

आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत पण त्यामुळे इंग्रजी मृतप्राय न होता उलट अधिक समृद्ध झाली आहे.

मनोरंजन म्हणून ह्या इंग्रजीत सामावले गेलेले काही भारतीय शब्द पाहू. –

ह्यातले काही फारसी आहेत, कारण राज्यव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषा अनेक वर्षे प्रचलित असल्याने सर्वच भारतीय भाषांवर फारसीचा प्रभाव होता. हे शब्द सामावून घेताना जे आपले गुलाम आहेत त्यांच्या भाषेतले शब्द आपल्या श्रेष्ठतर भाषेत कसे घ्यायचे असा विचार इंग्रजांनी केला नाही (अर्थात त्यांच्या मध्येही नेमाडेंसारखे महाभाग होतेच…!)

शर्करा हा मूळ संस्कृत शब्द अनेक रुपात फिरून शुगर म्हणून इंग्रजीत स्थिरावला. (शक्कर- फारशी, झुकेर– इटालियन, त्सुकर – जर्मन इ.) अल किंवा एल अशा तुकड्यांनी सुरु होणारे बरेच इंग्रजी शब्द मूळचे फारसी किंवा भारतातून फारसीत जाऊन मग इंग्रजीत गेले आहेत. राम बाण उपाय ह्या अर्थाने वापरला अक्सीर इलाज मधला अक्सीर हा इंग्रजीत Elixir म्हणजे अमृत म्हणून वापरला जातो. रसायनशास्त्र पूर्वी भारतात प्रचलित होते, जादू सारख्या वाटणाऱ्या ह्या क्रियांना सामान्य लोक किमया समजतं. तीच अरबांनी अल( दैवी) किमया केली आणि इंग्रजीत त्याची Alchemy झाली.

पूर्वी व्यापार करताना इकडून तिकडे नेताना बराचसा माल खराब होत असे. अशावेळी चांगला राहिलेला माल आणि खराब झालेला माल ह्यांची सरासरी काढून दर ठरवतं . खराब माल म्हणजे आवारा माल त्याची आणि उरलेल्या चांगल्या मालाची  सरासरी म्हणजे average.

बंगला म्हणजे बैठे घर, हा भारतीय शब्द पण इंग्रजीत  two stored bungalow कुणी चूक मानत नाही. शोरबा म्हणजे काढा किंवा अर्क त्यावरून syrup आला तर चंपी वरून shampoo. Tamarind म्हणजे चिंच! व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या अरबांना त्यांच्या खजूर आणि आपल्या चिंचेत काय साम्य जाणवले कुणास ठावूक? पण भारताचा खजूर असे तिचे त्यांनी तमार-इ-हिंद असे नामकरण केले, त्याची इंग्रजीत Tamarind झाली. कापूर (Camphor), चंदन (Sandal), पिप्पली-मल्याळी (Pepper), इंजीयर-मल्याळी(Ginger), असे कितीतरी इंग्रजी शब्द मूळ भारतीय आहेत.

बनिया, शिपाई, गुरु, बझार,कुली,असे शब्द तर जसे च्या तसे इंग्रजीत वापरले जातात. आपण भारतीय म्हणून आपल्याला हे माहित आहे पण  Window, porch, portico, mango हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत हे आपल्याला फारसे माहिती नसते. एव्हढच कशाला, आपण एखाद्या गोष्टीला काडीचीही किंमत देत नाही ह्या अर्थी इंग्रजी मध्ये I care a damn  असे जे म्हणतो त्यातील damn हा चक्क भारतीय मराठी शब्द आहे. दाम हे पूर्वी अत्यंत हलके नाणे किंवा चलन होते. छदाम म्हणजे ६ दाम म्हणजेच अर्धा पैसा इतके हलके, तेवढीहि किंमत आपण कशाला देत नाही ह्या अर्थी तो  I care a damn वापरला जातो.

– (संदर्भ: संकलन ले. श्री. बा. जोशी)

भाषाशुद्धीच्या नावाने जशी ओरड मराठीत चालू आहे, तशी इंग्रजीतही झाली. तो सगळा इतिहास मोठा रंजक आहे. जिज्ञासूंनी यु ट्यूब वर बीबीसी ने ह्याविषयावर केलेली ८ भागांची प्रदीर्घ documentary आवर्जून पहावी. ही त्याची लिंक:

 

 

मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न सावरकरांनीही केले. महापौर, स्थानक, दिनांक असे अनेक पर्यायी शब्द त्यांनी रूढ केले, पण चावट लोकांनी जड जड लांबलचक संस्कृत प्रचुर शब्द मुद्दाम वापरून त्याची हुर्यो केली आणि तो एकूण उपक्रमच हास्यास्पद झाला.

जड जड शब्द अर्थ न कळल्यामुळे हास्यास्पद वाटतात हे खरेच! पण मग विद्यमान अध्यक्षांच्या भाषणातले खाली आलेले हे काही शब्द पहा.

आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्व , साहित्यशास्त्रीय संज्ञाबोध, कल्पनात्मक प्रतिक्रियांतील निर्जीव आवर्तितता आणि अंतर्निष्ठ अनुभवविस्तृततेचा अभाव, समकाळाशी सहकंप पावणारे व्यापक जीवनानुभव, जीवनाचा पृथगात्म साक्षात्कार, शैलीसंपन्न रूपसौष्ठवाने नटलेला आविष्कार व त्याची आस्वाद्यमानता…  इ. (हुश्श)!

अहो हे काय आहे? कुणाला समजावे म्हणून हे लोक असे लिहितात, बोलतात? साहित्य प्रेमी मराठी भाषक अशामुळे साहित्याच्या जवळ येईल की दूर जाईल? डोक्यावरच्या विद्वत्तेच्या पगड्या आणि डोळ्यावर चढवलेले मराठीच्या भविष्याबद्दलच्या चिंतेचे काळे चष्मे काढा आणि बघा. मराठी is doing fine…!

मराठीत खूप दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकते, नव्हे होतेच आहे. तिची चिंता सोडा आणि आपल्या परीने तिच्या समृद्धीत भर टाकायचा प्रयत्न करा. उगाच गळे काढून आमच्या कानाचे पडदे फाडणाऱ्या किंकाळ्या ठोकू नका.

साधारण १२ कोटी लोक मराठी भाषक आहेत. त्यातले ८०% किमान साक्षर तरी आहेतच. मराठी भाषा समजणारे, बोलणारे लोक जगभर पसरले आहेत.

मराठीच्या ज्ञात अशा ४२ बोली आहेत. दर १२ कोसावर आपला पोत लहेजा बदलणारी ही भाषा जवळपास सव्वा दोन हजार वर्ष जुनी आहे. इंग्रजी पेक्षा ८०० वर्षे जुनी!

पण ह्या सृष्टीतला आश्चर्य आणि विलोभानियतेने नटलेला खजिना त्यापेक्षा खूप खूप मोठा आहे. त्याला गवसणी घालण्याचे, ते सौंदर्य आपल्यात व्यक्त करण्याचे सामर्थ्य ह्या भाषेत नक्कीच आहे.

त्या दृष्टीने प्रयत्न करा, जमत नसेल तर गप्प बसा आणि इतर लोक जे हा प्रयत्न करताहेत त्याचा, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्या. मनावरची आणि बुद्धीवरची मरगळ जरा झटकली जाईल!

मराठी भाषेचा आणि साहित्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ देदीप्यमान तर आहेच पण भविष्यकाळ ही उज्वलच आहे.

काळजी नसावी. लोभ असावा,

कळावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?