' सापशिडीचा खेळ नव्हे; तर महाराष्ट्रातल्या या गावातील घराघरांत खरंच खेळतात साप – InMarathi

सापशिडीचा खेळ नव्हे; तर महाराष्ट्रातल्या या गावातील घराघरांत खरंच खेळतात साप

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साप हा शब्द ऐकला तरी घाबरगुंडी उडणारे लोक आहेत. साप चावला तरी आजही लोक निव्वळ भितीने अर्धमेले होतात. तो विषारी की बिनविषारी ही तर नंतरची गोष्ट. पण तो साप आहे हे जास्त भयंकर वाटतं ना?

लहानपणी  नाग घेऊन आलेला गारुडी आठवतो का? त्यानं त्याच्याजवळ असलेल्या बुट्टीचं झाकण काढलं की एकदम नाग फणा काढून उभा राहीलेला पाहून पोरा टोरांची भितीने गाळण उडालेली आठवते का?

 

irula snake-inmarathi
indianexpress.com

 

गारुडीपण ते घाबरणं एंजॉय करायचा!! आपल्याला तर तो गारुडी एकदम शूरवीर वाटायचा.

लहानपणापासून आपण सापाच्या वेगवेगळ्या कथा ऐकल्या आहेत. तो शंकराच्या गळ्यात असतो.. महाभारतातील भीमाच्या शरीरातील विष शोषणारा नाग, बोरातील अळीचा साप होऊन परिक्षीत राजाला डसून शाप खरा करणारा तक्षक.. कालिया… किती काय त्या पुराणकथा..

भरीला भर हिंदी सिनेमात आठवणीने सूड घेणारा साप, मानवी रुप धारण करणारा इच्छाधारी नाग वगैरे वगैरे पाहून तर अजूनच दहशत निर्माण झाली.

नागपंचमीला लोक त्याची पूजा करतात. लाह्या, दूध वाहतात. पण तरीही साप या शब्दाचा धसका काही कमी होत नाही. अगदी सापशिडी खेळताना फासे उलटे पडून आपण ९९ वरुन सापाच्या तोंडात पडलो की थेट ९ वर नेणारा मोठा साप आठवतो ना?

 

snake and ladders featured inmarathi
YouTube.com

 

मनासारखं दान पडावं म्हणून तो ठोकळा वेगवेगळ्या तऱ्हेने फिरवून टाकत होतो.. एकंदरीत काय तर या दिवसांत सापाने केवळ लहानपणीच नाही तर आजही आपली दहशत टिकवून ठेवली आहे.

भारतातील प्रत्येक गावाला, खेड्याला आपलं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. स्वतःची संस्कृती आहे. काही विशेष आणि आगळ्यावेगळ्या परंपरा आहेत. काही आख्यायिका आहेत. त्यांचं उगमस्थान लोकांना माहिती नाही.

शहरीकरणाच्या रेट्यात खूप प्रथा मोडीत निघाल्या.काही नाममात्र पाळल्या जातात, पण खेडेगावात मात्र त्या परंपरा मात्र अगदी नेमाने पाळल्या जातात. लहानथोर सगळे त्या परंपरा मनापासून पाळतात.

अशी काही वेगळं वैशिष्ट्यं जपलेली कितीतरी खेडी आपल्या आसपास आहेत. सापांबाबत असलेल्या श्रद्धा मनात बाळगून मनापासून त्या रिवाजांचा अंगिकार करणारी महाराष्ट्रातील गावं तुम्हाला माहिती असतीलच.

 

shetpal maharashtra 1
amazingindiablog.com

 

बत्तीस शिराळ्याची नागपंचमी फार प्रसिद्ध होती. काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडून मिरवणूक काढली जायची. लोक गळ्यात साप घालून फोटो काढायचे. झुंजी लावायचे.

पण गेल्या काही वर्षांत त्यावर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बंदी घातली आहे. तो उत्सव थोडा कमी झाला आहे. आता तर प्रतिकात्मक मिरवणुक काढून नागपंचमी साजरी केली जाते. देशा विदेशातून लोक हा उत्सव बघायला यायचे. आता ती गंमत गेलीच.

पण अशाही काळात बत्तीस शिराळा सोडून आणखी एक गाव महाराष्ट्रात आहे जिथं साप निवांतपणे फिरतात… होय सापच!!! ना गावकरी सापांना घाबरतात..ना मारतात. साप अगदी बिनघोर इकडं तिकडं करतात.

आज त्याच गावाची माहिती आपण बघणार आहोत. कोणतं गांव आहे ते?

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ हे गांव. या गावाचं वैशिष्ट्य हेच आहे, इथं साप बिनदिक्कत गावभर फिरतात. शाळा चालू असताना वर्गात जातात. कुणाच्याही घरात हवं तेव्हा जाऊन बसतात.

आजवरच्या इतिहासात अडीच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात कुणालाही साप चावल्याची घटना घडली नाही. किंवा कोणा गावकऱ्यांने सापाला मारलं आहे अशीही नोंद नाही.

अगदी ज्या नागाला आपण इतके घाबरतो, तो नागही या गावातील घरात एखाद्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा आरामात येतो..हवं तेव्हा.

 

shetpal maharashtra
thebetterindia.com

 

याहून मोठी गोष्ट अशी आहे की इथं लोकांनी आपल्या घरात एक कोपरा सापासाठी राखून ठेवलेला असतो. अगदी पूर्वापार. इतकंच नव्हे तर नवीन घर बांधताना पण एक कोपरा सापासाठी ठेवतात.

अगदी मोठी घरं असतील तर छोटंसं देऊळ बांधतात जिथं साप कधीही केव्हाही येऊन हक्काने विसावतो. मजेचा भाग असा, की लहान मुलंसुद्धा सापाला घाबरत नाहीत.

आपण जशी कुत्री मांजरं पाळतो त्यांचे लाड करतो तसेच शेटफळमध्ये सापांचे लाड केले जातात. एखाद्या पाळीव प्राण्यासारखी त्यांची बडदास्त ठेवली जाते.

कधी कधी शाळेत तास चालू असतानाही हे महाशय सरपटत सरपटत वर्गात हजेरी लावतात. आणि मुलंही घाबरत नाहीत.

जर हीच गोष्ट आपल्या इकडं झाली तर काय कल्लोळ माजेल याची कल्पनाच केलेली बरी!!! विद्यार्थी शिक्षक संपूर्ण शाळा डोक्यावर घेतील. सर्वांची पाचावर धारण बसेल. कुणा सर्पमित्राला बोलावून तो साप पकडून नेला जाईल. भीतीपोटी त्याला दगडं मारुन मारलंही जाईल.

पण असं चित्र शेटफळे या गावात नाही. मुलं पण सापांना आपल्यासोबत मोठं होताना बघतच मोठी झालेली असतात ना!!!

आपल्याकडं कुत्रा पाळला तर आपल्या घरातील लहान मुलं घाबरतात का? नाही.. अजिबात नाही!!! तो कुत्रा त्यांना इजा करतो का? नाहीच.. कारण तो ही त्यांच्यासोबतच मोठा झालेला असतो.

 

shetpal inmarathi 1
cocktail zindagi

 

तसंच इथं सापांचंही आहे. जशी आपली मुलं कुत्र्या- मांजरांशी खेळतात तशीच या गावातील मुलंही सापांशी खेळतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षात एकदाही कुणालाही साप चावण्याची घटना घडलेली नाही.

पण एखाद्या बाहेरच्या माणसाला मात्र हे साप लवकर स्वीकारत नाहीत.

तुमची इच्छा जर तीव्र असेल, त्या सापांशी, नागांशी मैत्रीच करायची असेल तर सोबत तुम्हाला थोडं दूध, अंडी आणि एक विश्वासार्ह वागणूक पाहिजे, जी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना तुमचा स्वीकार करायला मदत करेल.

वास्तविक साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. पिकाला लागणारे उंदीर, घुशी यांना खाऊन पिकाची नासाडी रोखून त्याचं होणारं नुकसान वाचवणारा जीव. पण माणसानं त्याला अगदी घाबरून शत्रूपक्षातच सामिल केलंय.

ही सर्पमैत्रीची शेटफळे गावातील प्रथा कधीपासून सुरू आहे याची कल्पना कुणालाच नाही. पूर्वापार हे चालू आहे इतकंच हे लोक सांगतात.

तुम्हाला ही माहिती वाचतांना शेटफळे गावाला भेट द्यायची इच्छा झाली तर मोडनिंब स्टेशनवरून एखादं खाजगी वाहन करुन शेटफळेला जाता येईल.

पुणे येथून सोलापूरला जाऊ शकता. तिथून मोडनिंब आणि मग शेटफळे. आॅक्टोबर ते मार्च या दरम्यानचा काळ शेटफळेला जाण्यासाठी उत्तम आहे. मग जायचा विचार आहे का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?