' 'हे' वाचलंत तर आरोग्याची चिंता न करता तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन फिटही राहू शकता

‘हे’ वाचलंत तर आरोग्याची चिंता न करता तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन फिटही राहू शकता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना, लॉकडाऊन या गोष्टींमुळे सध्या माणसाचं जीवन विचित्र अशा एका कक्षेपुरतं सीमित झालं आहे. बाहेर फिरण्यावर बंधने आली आहेत. सहाजिकच हॉटेलिंगही थांबलं आहे.

घरातलं रोजचं जेवण ठीक आहे पण अधून-मधून हॉटेलची आठवण येतेच. ते सगळे चमचमीत पदार्थ ही आठवतात.

आता हॉटेलिंग कधी करता येईल? लॉक डाऊन संपल्यावर तरी हॉटेलात जाणं शक्य आहे का? का, नुसतच आता, ‘गेले ते दिन गेले’ म्हणायची वेळ आली आहे असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे.

आता वर्षभर हॉटेलला जायचं नाही आणि ते पदार्थ खायचे नाहीत!! ही म्हणजे खवय्यांची गोचीच. परंतु अशा लोकांसाठी मदतीला आलं ते तंत्रज्ञान. लोक युट्युब वर रेसिपी पाहू लागले आणि नुसतं पाहू लागले नाहीत तर ते घरात बनवू लागले.

 

girl cooking inmarathi
thetempest.com

बाकी काही का असेना, कोरोनामुळे आता लोकांना कामाची सवय लागतेय.  स्वयंपाक घरातही निरनिराळे प्रयोग करून पाहता येतात हे समजत आहे.

विशेष म्हणजे घरातल्या प्रत्येकाचा सहभाग यामध्ये होत आहे. घरातली पुरुष मंडळी देखील एखादी वेगळी डिश ट्राय करून बघत आहेत. बच्चे कंपनी देखील यामध्ये हिरीरीने भाग घेत आहे.

घरातल्या लहान-थोर सगळ्यांनीच कामे केली तर अवघड काहीच नाही, याची जाणीव लोकांना होत आहे.

त्यासाठी घरातल्या बेसिक कामाच्या गोष्टी आता सगळ्यांनीच शिकणे जरुरीचे झाले आहे. यात मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव करून चालणार नाही, हेदेखील समजले आहे.

काहीजणांनी गरज म्हणून, तर काहीजणांनी हौस म्हणून, काहींनी नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून युट्युब पाहून अनेक पदार्थ घरात बनवले. अर्थात हा झालेला बदल खूपच चांगला आहे.

 

indian kid cooking inmarathi
theIndianexpress.com

 

पण बरेचदा युट्युब वरून जे पदार्थ दाखवतात ते बऱ्यापैकी तेलकट आणि हाय फॅट असलेले असतात. आपल्याला आपल्या आरोग्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

कारण सध्या नाही म्हटला तरी व्यायाम करण्यात, एक्सरसाइज करण्यात मध्ये मध्ये ब्रेक येत आहे. सध्याच्या covid-19 च्या काळात तर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ करता येतील याचा विचार करणे देखील जरुरीचे झाले आहे.

बऱ्याचदा या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे पदार्थ हे खूप वेगळे असतात. पूर्वी सगळे मॉल ओपन असायचे, तेव्हा तिकडून हे पदार्थ आपण आणू शकत होतो. पण आता तोही ऑप्शन बंद आहे.

आपल्या घराजवळील दुकानात या गोष्टी मिळतीलच याची खात्री नसते. मग त्या गोष्टींना काही पर्याय ठेवून काही घरातील उपलब्ध असणाऱ्या हेल्दी गोष्टी वापरून पदार्थ करता येतील का हा विचार देखील आता केला पाहिजे.

लॉक डाऊन च्या काळात घरोघरी सगळ्यात जास्त पदार्थ कोणता बनवले गेले असतील तर ते बेकरीचे. ते इतके बनले की त्यावर, ‘रवा आणि मैद्याची कमतरता निर्माण झाली,’ असे जोक्स तयार झाले.

बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यांना आवडतातच. त्यातही केक म्हणजे सगळ्यांचा एकदम आवडता पदार्थ. त्यामुळेच केक करून पाहणे हा सगळ्यांचा आवडता उद्योग झाला.

 

Chocolate cake InMarathi
FoodtoGlow.com

 

आपल्या शरीरासाठी जे पांढरे तीन पदार्थ घातक समजले जातात ते म्हणजे मैदा, मीठ आणि साखर. पण त्यांचाच वापर सध्या जास्त होताना दिसून येत आहे.

आता केक करताना जास्त करून वापरले जाते बटर किंवा तेल. पण हे जर आपण नेहमीच करून खायला लागलो तर आपल्या शरीरासाठी ते उपयुक्त नाही.

त्यामुळे केक करताना खूप पिकलेलं केळं घातलं तर त्याचा परिणाम हा बटर घातलेल्या केक सारखाच दिसून येईल. एक कप बटर मध्ये 1628 कॅलरीज असतात तर तेवढ्याच केळामध्ये फक्त 200 कॅलरीज असतात.

 

banana inmarathi
theindianexpress.com

 

शिवाय केळ्यामध्ये पोट्याशियम, विटामिन बी आणि फायबर या शरीराला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी मिळतील. त्यामुळे बटर कमी आणि केळ जास्त घालून केक बनवता येईल.

तसेच मैद्याच्या ऐवजी रवा किंवा गव्हाची कणीक वापरल्यास तो केक अधिक हेल्दी बनेल.

लॉकडाऊन मध्ये लोकांनी घरी ब्रेड बनवले, लादी पाव बनवले, पिझ्झा बनवला म्हणजे पिझ्झा बेस देखील घरी बनवला. पण या सगळ्याच गोष्टींना लागतो तो यीस्ट आणि मैदा.

हे दोन्ही पदार्थ जास्त खाणं शरीरासाठी घातक.  म्हणून मग यीस्ट ऐवजी जर दही वापरले तर तयार होणारा ब्रेड, पिझ्झा अगदी विकतच्या सारखा बनेल. याही ठिकाणी मैद्याच्या ऐवजी कणिक वापरता येईल.

 

yogurt-inmarathi
seriouseats.com

 

याशिवाय अनेक कुकीज देखील लोकांनी बनवल्या. त्याही जर कणकेच्या किंवा नाचणीच्या केल्या तर त्या जास्त हेल्दी राहतील आणि त्यात साजूक तुपाचा वापर केला तर अधिक चांगले.

विशेष म्हणजे हे पदार्थ बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन यांची गरज आहे असंही काही नाही. कुकर, कढई यामध्ये देखील हे पदार्थ बनवता येऊ शकतात.

 

cookies-inmarathi

 

आपण आपल्यात जेवणात मिठाचा वापर खूप करतो. जे हार्ट पेशंट, मधुमेही आहेत त्यांच्यासाठी अधिक मीठ वाईट. त्या लोकांनी असे पदार्थ कधी खायचे नाहीत का? तर तसं नाही असे पदार्थ ते खाऊ शकतात.

म्हणजे जर पिझ्झा पास्ता बनवायचा आहे त्या वेळेस त्यामध्ये बाहेरून आणलेला कोणताही सॉस त्यात घालायचा नाही, कारण त्यात अधिक मीठ आणि प्रिझर्वेटिव्हज असतात.

 काही फ्रेश भाज्या, फ्रेश टोमॅटो प्युरी आणि काही हर्ब्ज घातले आणि थोडंसं चांगल्या प्रतीचे चीज घातलं तर वेगळं मीठ घालायची गरज नसते. जेणेकरून अधिक सोडियम आपल्या शरीरात जाणार नाही.

असाच पर्याय साखरेसाठी ही निवडावा लागेल. कारण अति साखर खाणं सगळ्यात जास्त वाईट.

केक बनवताना तर साखर हवीच. पण जर एक कप साखरेऐवजी अर्धा कप साखर आणि अर्धा चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घातला तरीदेखील केक तितकाच गोड होईल.

 

vannila extract inmarathi
simplyscratch.com

 

एक कप साखरेमध्ये 774 कॅलरीज असतात. पण साखरेचे प्रमाण कमी केल्याने कॅलरीज देखील कमी होतील. त्यामध्ये जर दालचिनीची पूड घातली तर साखर अजून कमी लागेल.

आता उन्हाळा आहे म्हणून आपण सरबत घेतो. आणि कोणत्याही सरबता मध्ये साखर प्रचंड प्रमाणात घातली जाते. लिंबाचं सरबत करताना जर पाणी लिंबू, पुदिन्याची पानं आणि मध घातला तर साखर टाळली जाते, आणि एक हेल्दी ड्रिंक तयार होतं.

 

lemonade-benifits1-inmarathi
reckontalk.com

 

बाजारात मिळणारे रेडिमेड ज्युसेस, सिरप टाळून आपल्याला घरच्या घरी सरबत तयार करता येतात. आता उन्हाळ्यात कैऱ्या उपलब्ध असल्यामुळे कैरीचं पन्हं करणं जास्त चांगलं आणि ते ही गूळ घालून.

सध्या मिळणारे कलिंगड आणि संत्र वापरून देखील काही हेल्दी ड्रिंक्स साखर न घालता तयार करता येतात. शुगर फ्री किंवा स्वीटनर देखील वापरू नये. खरंतर फळं नुसती खाणं केव्हाही चांगलं.

सध्या आंब्याचा सिझन आहे तर त्यापासूनही एक छानसं मँगो क्रीम तयार करता येते. त्यासाठी घरातील दही कपड्यात बांधून, टांगून दह्याचा चक्का करायचा आणि त्यात ताज्या आंब्याचा रस घालायचा आणि काही आंब्याच्या फोडी घालायच्या.

 

mango custerd inmarathi

 

एक्स्ट्रा कोणतेही फॅटी फुल्लक्रीम आणि एक्स्ट्रा साखर न घालता केलेलं हे मँगोक्रीम तुम्हाला इतर कुठंही मिळणार नाही.

आपण सँडविच बनवताना मेयोनिज वापरतो. पण त्याऐवजी जर तुमच्याकडे अवाकाडो मिळत असेल तर त्याच्या इतका हेल्दी ऑप्शन कोणताच नसेल. मेयॉनिजच्या ऐवजी अवाकाडो स्मॅश करून सॅंडविच बनवता येईल.

अवाकाडो मुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि टाईप 2 चा डायबिटीज ही शक्यताही कमी होते.

ब्रेडक्रम्सच्या ऐवजी जर ओट्स किंवा पोहे वापरले तर एक वेगळाच हेल्दी क्रंच पदार्थाला येईल.

 

 

बटाट्याच्या ऐवजी रताळे वापरले तर तोही एक चांगला पर्याय असेल. उपवासाचे थालीपीठ करताना त्यात रताळे वापरता येईल. त्यामुळे फायबर विटामिन C, A आणि B6 मिळेल.

भात प्रेमींनी पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राउन राईस वापरला तर तोही एक हेल्दी ऑप्शन असेल. कारण त्यामुळे वजन वाढणार नाही आणि उपयुक्त पोषणमूल्य मिळतील.

ग्रेवीच्या भाज्या, स्ट्यू इत्यादी बनविताना फुल क्रीम च्या ऐवजी जर कोकोनट क्रीम किंवा नारळाच दूध वापरलं तर हा ही एक चांगला ऑप्शन असेल.

तसेच फ्रॉईड एग च्या ऐवजी उकडलेली अंडी जास्त हेल्दी असतात.

 

eggs inmarathi

 

 

नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी चिकन किंवा मटण हे स्किनलेस असलेलं वापरावे. जेणेकरून नको असलेले फॅट्स मिळणार नाहीत. तसेच ते ही चांगले उकडून घ्यावे. अति तेलकट, मसालेदार बनवू नयेत.

अशा प्रकारची काळजी घेऊन बनवलेले पदार्थ युट्युब वरील पदार्थांइतकेच आकर्षक आणि स्वादिष्ट बनतील आणि आपण जितके प्रयोग करत जाऊ तितके नवीन नवीन पदार्थ शिकता येतील.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?