' रहस्याने वेढलेल्या या किल्ल्यातील गुप्त खजिना आणि त्याच्या मोहात पडलेल्या इंदिरा गांधींचं कनेक्शन

रहस्याने वेढलेल्या या किल्ल्यातील गुप्त खजिना आणि त्याच्या मोहात पडलेल्या इंदिरा गांधींचं कनेक्शन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

राजस्थानला स्वतःचा असा एक वेगळाच इतिहास आहे. ही भूमी लढवय्यांची, राजकारणाची, परकीय आक्रमकांच्या आक्रमणाची, त्यांना तिथेच थोपवून द. भारताला सुरक्षित ठेवणाऱ्या योद्ध्यांची आहे.

राजस्थान…  राजांचं स्थान. राज्य करणाऱ्याचं स्थान. इथं कैक राजे होऊन गेले आणि त्यांच्या कहाण्या पण. तुम्ही या भूमीवर पाय ठेवताच तुम्हाला इथल्या वातावरणातच त्या इतिहासाची खुमारी जाणवू लागेल.

या राज्यातल्या प्रत्येक भागाचा आपला असा इतिहास आहे. लढाया आहेत. राजांच्या कहाण्या आहेत. त्यापैकीच एक जालोर जिल्हा. इथला जयगड हा किल्ला सुप्रसिद्ध आहे. या किल्ल्याशी संबंधित बरेच प्रवाद आहेत.

ही वास्तु म्हणजे विश्वासघात आणि थरारक घटनांनी भरलेली आहे.

 

jaigad fort inmarathi
https://commons.wikimedia.org/

 

राजस्थानमध्ये अनेक महत्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या. उदा. १४ व्या शतकात, जालोर इथं अल्लाऊद्दीन खिलजी आणि कान्हड देव यांच्यातील दीर्घ लढाईनंतर खिलजीने कान्हड देवला पराभूत केले होते.

अकबराच्या १६ व्या शतकातील दोन आक्रमक लढायाही राजस्थानमधील प्रमुख लढाया म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. औरंगजेबाने देखील राजस्थानवर सतराव्या शतकाच्या दरम्यान दोनदा आक्रमण केले होते.

१६ व्या शतकातली प्रसिद्ध सॅमलची लढाई देखील इथेच झाली होती.

म्हणजेच ही भूमी आक्रमणं, लढाया, विश्वासघात यांनी भारलेली आहे. साहजिकच इथं अनेक हवेल्या, राजवाडे, किल्ले, गड यांची संख्याही इथं अधिक आहे. इथल्या वास्तू आपल्याला तिथल्या वैभवाचे, विश्वासघातांचे, आक्रमणाचे किस्से सांगत असतात.

 

battle inmarathi
https://www.rajras.in/

 

अर्थात इतिहासाची पाने चाळल्यास माणसाची ही वृत्ती सगळीकडे सारखीच दिसून येते. परंतु राजस्थान हा आपल्या भूमीतला भाग, आपल्या जवळचा प्रदेश. त्यामुळे साहजिकच आपल्याला राजस्थानबद्दल कुतुहल अधिक आहे.

असाच एक किल्ला – जयगड –

राजस्थानमधील जयगड किल्ला हा असंच एक उदाहरण. हा किल्ला केवळ भूतकाळातल्याच आक्रमणाचा साक्षीदार नाही, तर त्याने आताच्या काळातही हा छळ सोसला होता. त्याचीच ही कहाणी.

या लेखात आम्ही तुम्हाला जयगडच्या या किल्ल्याची मनोरंजक कहाणी सांगणार आहोत. मात्र कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी किल्ल्याची तपशीलवार माहिती आधी करून घेऊ या.

१५ व्या ते १८ व्या शतकांच्या दरम्यान या किल्ल्याचे बांधकाम झालेले आहे. जयगड किल्ला हा पर्यटकांचा आवडता किल्ला. आवडते स्थळ. राजस्थानच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा मागोवा घेण्यासाठी या किल्ल्याची सफर अधिक मार्गदर्शक ठरते.

हा किल्ला विजयी किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याची रचना आपल्याला मध्ययुगीन भारतातील स्थापत्य रचनेची ओळख करून देते.

किल्ल्याचे महत्त्व –

 

jaigad fort inmarathi 1
https://www.thrillophilia.com/

 

एकेकाळी हा किल्ला राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र होते. इथं राजकीय खजाना ठेवलेला असे.आमेरची संरक्षण यंत्रणा देखील इथूनच आपल्या हालचाली ठरवत असे.

समुद्रसपाटी पासून बराच उंचीवर असलेला हा किल्ला सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स. १७२६ मध्ये बांधला. हा किल्ला एका अखंड संरक्षक भिंतीने वेढलेला आहे.

हा किल्ला भुयारी मार्गाने आमेरच्या किल्ल्याशीही जोडलेला आहे असे म्हणतात. जयगड किल्ला हा जयपूरच्या सर्वात मजबूत स्मारकांपैकी एक आहे.

जयगड किल्ल्याचे रहस्य –
जयगड किल्ल्याभवती असलेली ही लांबच्या लांब भिंत आमेरमध्ये तुम्ही कुठेही असलात तरी तिथून तुम्हाला दिसत राहते.

लाल रंगाच्या या भींती सॅन्ड स्टोनने बांधलेल्या आहेत. या भिंतींची लांबी जवळपास ३ किमी एवढी आहे.

जायवाना तोफ

 

tof inmarathi
https://en.wikipedia.org/

 

या किल्ल्यात एक भली मोठी तोफ आहे. ही तोफ जगातील सर्वात मोठी तोफ म्हणून ओळखली जाते. परंतु आश्चर्य म्हणजे या तोफेचा प्रत्यक्ष युद्धात कधीच उपयोग झालेला नाही असे म्हणतात.

ही तोफ किल्ल्यातच तयार केली गेली. भली मोठी चाकं असलेली ही तोफ प्रचंड मोठी आहे.

 

पाण्याची रहस्यमय टाकी –

 

jaigad fort inmarathi 2
https://trip101.com/

 

या तोफेच्या मागच्या बाजूलाच पाण्याची एक टाकी आहे. ही नेहमीच्या पाण्याच्या टाकीसारखीच दिसते. परंतु ती आतून प्रचंड मोठी आणि खोल आहे. यात पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा आहे.

या टाकीत जवळपास ६ मिलिअन गॅलन इतकं पाणी साठवण्याची क्षमता आहे. ही पाण्याची टाकी इतिहासकाळातच नव्हे, तर गेल्या शतकात म्हणजेच २० व्या शतकातही पुन्हा चर्चेचा विषय ठरली होती.

असे म्हणतात, की कछवाहा राजवंशातल्या राजांनी आपला खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला होता. याच पाण्याच्या टाकीखाली कोठारे असल्याच्या दंतकथा आहेत.

तिथे महाराजा मानसिंग यांनी लढाईत लुटलेली लूट दडवून ठेवली आहे असेही म्हटले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार जयपुरचा राजा मानसिंग पहिला हा अकबराचा संरक्षण खात्याचा मंत्री होता.

अकबराच्या आदेशानुसार त्याने अफगाणिस्तानवर हल्ला करून त्या लढाईत तो जिंकला होता. या लढाईतून अर्थात त्याने बरीच संपत्ती मिळवली होती.

 

battle 1 inmarathi
History discussion.com

 

यातील बरीचशी लूट राजाच्या हवाली न करता त्याने आपल्याजवळ ठेवून दिली होती. हाच खजिना त्याने जयगडच्या या किल्लात दडवून ठेवला होता असे म्हटले जाते.

या खजिन्याच्या चर्चा भारताला स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंतही केल्या जात होत्या. त्या किल्ल्यात प्रचंड खजिना असल्याच्या बातम्या तोपर्यंत नेहमीच चर्चिल्या जात असत.

जयगड किल्ला आणि इंदिरा गांधी यांचा संबंध –

 

jaigad fort inmarathi 3
http://hindustanleaks.blogspot.com/

 

इतिहासकाळात हा किल्ला आमेरचा रक्षक म्हणून मजबूतीने उभा होता. तर अलिकडच्या काळातही या किल्ल्याच्या संदर्भात विचित्र अशा अफवा असल्याने चर्चेत सापडला होता.

या किल्ल्यात अजूनही पूर्वीच्या मोगल काळातला तो मोठा खजिना लपला असल्याच्या वदंता होत्या. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात इथे पुन्हा राजकीय हालचालींना उत आला होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या किल्ल्यातील सर्व इमारतींमध्ये शोधमोहीम सुरू केली होती. पाण्याच्या टाकीखाली असलेला तो खजिना शोधून काढायची त्यांची इच्छा होती.

या काळात जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी या आणिबाणीच्या निमित्ताने तुरुंगवासात होत्या. याच संधीचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी या किल्ल्यात दडलेल्या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

जयगड किल्ल्याचे वारसदार – सवाई मानसिंग आणि राजमाता गायत्रीदेवी –

 

jaigad fort inmarathi 5
https://twitter.com/

 

गायत्रीदेवींनी या उत्खनन कामावर आक्षेप घेतल्यानंतरही इंदिराजींनी गडावर छापे टाकण्याचे आणि त्यासाठी सोबत सैन्य पाठवण्याचेही आदेश दिले होते.

त्या काळात तिथले वारसदार हे राजा सवाई मानसिंग आणि त्यांची पत्नी गायत्रीदेवी या तिथल्या किल्ल्याचे मालक होते. या दोघांचंही कॉंग्रेससोबत फार पटत नव्हतं.

गायत्रीदेवी यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला तिनदा हरवलं होतं आणि त्या निवडून आल्या होत्या. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला गायत्री देवी यांनी विरोध केल्यामुळे त्याना त्या काळात तुरुंगातही जावे लागले होते.

आणि त्याचाच परीणाम म्हणून इंदिरा गांधी यांनी तेव्हा आयटी डिपार्टमेंटला या राजघराण्याची संपत्ती ताब्यात घेण्याचे आदेशही दिले होते. भारतीय सैन्याची मदत घेऊन आयटी डिपार्टमेंटने जयगडच्या या किल्लात आणि राजवाड्यात छापे मारले होते.

हे काम जवळपास तीन महिने चालले होते. परंतु आयटी डिपार्टमेंटला तो कथित खजिना काही सापडला नाही. मात्र दिल्ली-जयपूर हायवे आर्मीच्या मोठ्या, जड वाहनांसाठी तीन दिवसांकरता बंद ठेवावा लागला होता.

काही जण म्हणतात की, त्या खोदकामात तो खजिना सापडला होता. नाहीतर मग आर्मीची ती मोठी वाहने कशाकरता तिथे नेण्यात आली होती. नक्कीच त्या वाहनांमध्ये तो खजिनाच वाहून नेला जात होता.

खजिन्याचा शोध लागला की नाही –

 

jaigad fort inmarathi 4
https://wahgazab.com/

 

त्या काळात या घटनेला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. राजमाता गायत्रीदेवी यांच्या ‘ए प्रिन्सेस रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रातही या घटनेचा उल्लेख आलेला आहे.

या प्रयत्नांतून इंदिरा गांधी यांना खरंच तो खजिना सापडला की, ती मोहीम पूर्णपणे फसली होती याबद्दल अजूनही लोकांना काही माहीती नाही. मात्र त्याबद्दलच्या चर्चा अजूनही अनेकदा होत असतात.

पण असं म्हणतात, की अफवा असतात तिथे काहीतरी सत्यही असतेच. धूर असतो म्हणजे तिथे आग ही असणारच, या न्यायाने या अफवांच्या मागे काहीतरी सत्यही असणारच.

म्हणजेच अजूनही या किल्ल्यात त्या पाण्याच्या टाकीखाली खजिना दडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा इंदिरा गांधीनी आदेश दिलेल्या त्या उत्खननात तो खजिना हस्तगतही झाला असावा.

ज्या खजिन्याच्या अफवेने इंदिरा गांधींसारख्या आयर्न लेडीला देखील मोहात टाकले तिथे तुमच्या आमच्यासारख्यांची काय कथा..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?