' जपानमध्ये भारतीय संस्कृतीची प्रसारक ते भारतातील वंचितांची माय; ही महिला आहे लाखोंसाठी प्रेरणा

जपानमध्ये भारतीय संस्कृतीची प्रसारक ते भारतातील वंचितांची माय; ही महिला आहे लाखोंसाठी प्रेरणा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

काहीजण कितीही संकट आली तरीही त्यावर मात करून स्वतःचा वेगळा ठसा जनमानसात उमटवतात. ही कथा अशाच एका असामान्य स्त्रीची..!

जपानमध्ये भारतीय संस्कृतीची प्रसारक ते भारतातील गरीब मुलांची माय….नूपुर तिवारी!!

नुपुर तिवारी  ही एका पारंपरिक भारतीय, वेदशास्त्रसंपन्न, एकत्र कुटुंब असलेल्या घरात जन्माला आली आणि वाढली. तिच्या लहानपणापासून घरात सगळ्यांना योगाभ्यास करताना तिने बघितलं.

लहानपणी दहावीपर्यंत रोज, अगदी उन्हापावसात देखील तीन किलोमीटर चालत तिला शाळेत जावं लागत असे. कारण ती एका खेड्यावर राहत होती. त्या खेड्यावर वीज देखील नव्हती.

अशा खेड्यातून ती अकरावीला एका छोट्या शहरात शिकायला आली. तेव्हा तिला खेड्यातून, गरीब पार्श्वभूमीतून, मागास समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात कशी कुचंबणा होते, कसा न्यूनगंड येतो याची जाणीव झाली.

या स्वतः घेतलेल्या अनुभवांतूनच तिला पुढे जाऊन अशा वंचित मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली.

 

nupur tiwari inmarathi 1
https://dyslexiagoa.wordpress.com/

 

ती शिकत असतानाच तिला कलकत्ता युनिव्हर्स्टितील एका कॉलेजमध्ये शिकवण्याची नोकरी मिळत होती. परंतु तिला लहान शहरातील कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून आयुष्य घालवायचे नव्हते.

तरीही तिने काही दिवस ती नोकरी केली आणि त्यातून मिळालेले पैसे साठवून नंतर ती मुंबईत आली. मल्टीनॅशनल कंपन्या, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आदीतून कामं करत ती पुढे जात राहिली.

यातूनच एका जापनीज मल्टीनॅशनल कंपनीद्वारे ती जपानमध्ये गेली आणि तिला आपलं ध्येय तिथं सापडलं.

कुठलेही संस्कार हे आधी घरातूनच सुरू होतात असं म्हणतात. नूपुर देखील लहानपणापासूनच आपल्या घरातील मोठ्यांना, पालकांना समाजासाठी काम करत असताना पाहत आली होती.

त्याचाच सकारात्मक परीणाम होऊन आजची नूपुर घडलेली आहे.

सन २००५ पासून नूपुर भारतीय शास्त्रीय नृत्य, योग, आहार, सण-उत्सव, गीतेसारखे ग्रंथ यांच्या माध्यमांतून जपानमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार करत आहे.

या सर्व गोष्टी तिच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की, जपानमधील फुकुओका येथील लोक तिला भारतीय संस्कृतीची अनौपचारिक राजदूतच म्हणतात.

 

nupur tiwari inmarathi
https://www.myindiamyglory.com/

 

गेल्या जवळपास १२ वर्षांपासून जपानमधील ३२ शाळांमधून जगभरातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ती शिकवत असते. हील टोकियो’ या तिच्या संस्थेची ती संस्थापक आहे.

सकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.

या सर्वातून मिळालेल्या बिदागीतून नुपूरला आपल्या देशासाठी देखील काही करायचे असते. त्यासाठी ती योगवर्गातून मिळालेला पैसा भारतातल्या वेगवेगळ्या महानगरांतील झोपडपट्टीतल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरते.

भारतातून निरक्षरता हद्दपार व्हावी आणि तळागाळातल्या वंचित मुलांची शिक्षणातून प्रगती व्हावी ही तिची इच्छा आहे. नूपुर तिवारी ही अशा प्रकारे हजारो लोकांची प्रेरणा बनली आहे.

नूपुर तिवारी ही जपानमध्ये जपानी भाषेत टिव्ही शोचे संयोजन करते. अशा प्रकारे तिथल्या टिव्हीवर कार्यक्रम संयोजन करणारी ती पहिली भारतीय आहे.

 

nupur tiwari inmarathi 2
https://www.asiancommunitynews.com/

 

ती तिथल्या वेगवेगळ्या राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय कार्यक्रमांचे देखील सूत्रसंचालन करत असते. याशिवाय ती जपानमधील वेगवेगळ्या अनेक व्यावसायिक उपक्रमांमधून मॉडेलिंग आणि त्या संबंधाने वेगवेगळी कामे देखील करत असते.

आपल्या ‘हील टोकियो’ (Heal Tokyo) या संघटनेबद्दल बोलताना ती म्हणते की, इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच असं म्हणतात. माझी हील टोकियो ही संघटना असाच एक मार्ग आहे. माझ्या इच्छेचे ते फलस्वरुप आहे.

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की, आपल्या प्रत्येकाचा जन्म हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी झालेला असतो. आपणा प्रत्येकाला आपल्याला दिलेले कर्तव्य पार पाडावे लागते.

आपले कर्तव्य किंवा नियतीने आपल्याला नेमून दिलेले काम नेमके कोणते? हे कधी ना कधी माणसाला कळतेच. ‘हील टोकियो’ हे माझे कर्म आहे आणि ते मला माझ्या ध्येयाच्या स्वरुपात सापडले आहे.

‘हिल टोकियो’ किंवा आता ‘हिल इंडिया’ हा देखील उपक्रम हा एक सामाजिक उपक्रम आहे. ही एक अशी संकल्पना आहे जिच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात शांतता आणि समानता आणता येईल.

 

nupur tiwari inmarathi 3
https://www.asiancommunitynews.com/

 

‘हील टोकियो’ची मुख्य संकल्पना योगाच्या माध्यमांतून साऱ्या जगाला एकत्र आणण्याची आहे. यातून लोकांना ‘अहं ब्रम्हास्मि’ ही भारतीय संकल्पना शिकवायची आहे.

“अहं ब्रम्हास्मि” म्हणजे, मीच ईश्वर असून मी या जगात चांगले काम करण्यासाठी आलो आहे. किंवा मी ईश्वराचे एक उत्कृष्ट सर्जन असून मी मनात आणले, तर मी कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो, ही ती कल्पना.

अर्थात आपल्या भारतीयांना ही असंकल्पना हजारो वर्षांपासून ठाऊक आहे. पण आता ती जगाला शिकवायची इच्छा आहे.

‘हिल टोकियो’ची कल्पना नुपूरच्या डोक्यात कशी आली? आणि या संघटनेच्या माध्यमातून भारतासाठी काम करण्याची कल्पना कशी सुचली?

नूपुरच्या म्हणण्याप्रमाणे, टोकियो हे जगातील महानगरांपैकी एक महानगर आहे. आणि हे सदैव व्यस्त आणि गतीमान असलेले आणि व्यस्त दिनक्रमांतून तिथल्या नागरिकांचा ताण-तणाव वाढवणारे शहर आहे.

 

tokyo japan inmarathi
livejapan.com

 

त्यात पुन्हा जापनीज लोक शिस्तीचे भोक्ते आहेत. वेळेचे पालन करणारे आहेत. या महानगरात ही शिस्त पाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

त्यातून त्यांच्या शरीरावर तसेच मनावरही ताण येतो. आणि त्या ताणाचे त्यांना दुष्परीणाम सहन करावे लागतात. कदाचित त्यामुळेच की काय इथे आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.

“मी त्यांच्यावर योग, ध्यान, सकारात्मकता आणि प्रेम, करुणा यांच्या माध्यमांतून उपचार करुन त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करते. मी त्यांना भगवद्गीतेचे सार सांगून त्याचे आपल्या जीवनात आचरण करण्यासंबंधी मार्गदर्शन करते.”

‘हिल टोकियो’ या संघटनेच्या माध्यमातून ती जपानमध्ये सगळीकडे योगवर्ग चालवते. आंतरराष्ट्रिय योग दिवस आणि योग कार्यक्रमात जपानमधील सर्व लहान थोर माणसांना या वर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न करते.

अशा कार्यक्रमांमुळे तणावग्रस्त झालेले सर्व लोक योग आणि ध्यान यांच्या माध्यमांतून आपल्या अंतर्मनात डोकावून पाहण्यास उद्युक्त होतात. आपण कशासाठी आणि किती धावपळ करतो याची त्यांना जाणीव होते.

स्वतःसाठी वेळ देणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव होते. आपण व्यर्थ एखाद्या यंत्रासारखे यांत्रिक जीवन जगतोय आणि आपल्या जीवनाचे खरे ध्येय, खरा आनंद विसरतोय याची त्यांना जाणीव होते.

 

 

नुपूर या सगळ्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ती त्याच्यातून पैसा कमवत नाही. फक्त आपल्याला फायदा झाला की गोरगरीबांनाही फायदा मिळवून द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगते.

या जगात वंचित असलेल्या घटकांना त्यांनी मदत करावी असे आव्हान त्यांना करते.

“ज्यांना माझ्या या संघटनेच्या कार्यक्रमांतून, वर्गातून फायदा होतो त्यांनी मला काही न देता जगभरातल्या वंचितांना मदत करावी” असे सांगते.

“त्यातून मिळालेल्या मदतीतूनच मी भारतातील मोठ्या शहरात असलेल्या वंचित मुलांसाठी शाळा चालवते” असे तिचे म्हणणे आहे.

सध्या ती अलिगढ, यू.पी येथे अशी शाळा यशस्वीपणे चालवत आहे. आणि लवकरच अजून ठिकठिकाणी अशा शाळा उघडण्याचा तिचा विचार आहे.

“या शाळेतून हसणारी, किलबिलणारी, आनंदित मुलं हाच माझा आनंद आणि माझी कमाई” असं तिला वाटतं.

भारतातील झोपडपट्टीतून मुलांना शिकवण्याच्या तिच्या योजना –

 

poor kids inmarathi
https://www.myindiamyglory.com/

 

कधी कधी ग्रामीण भागात सरकारी योजना पोचतात. परंतु मोठमोठ्या शहरातील झोपड्यांमध्ये लोक सुविधांपासून वंचित असतात. मोठ्या शहरांतील झोपडपट्ट्यांतील मुलं ही ग्रामीण भागातल्या गरीब मुलांपेक्षा अधिक वाईट स्थितीत जगत असतात.

“त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाच्या सोयी चांगल्या मिळाल्या तर ही मुलं देखील चांगले जीवन जगतील.” असं तिचं म्हणणं आहे.

भारतातील निरक्षरता दूर व्हावी आणि वंचित, गरीब मुलांनाही चांगले शिक्षण मिळण्याची आणि पर्यायाने चांगले जीवन जगण्याची संधी मिळावी असे तिला वाटते.

अशा या नुपूर तिवारीचा आज साऱ्या भारतीयांना अभिमान वाटावा अशी तिची कामगिरी आहे.

एका खेड्यातून आलेली मुलगी आपल्या आंतरिक प्रेरणेने कुठल्या कुठे जाऊन पोचू शकते हे तिचं आयुष्य इतर मुलींनाही प्रेरणा देणारं आहे नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?