रोजच्या रोज आंब्यावर ताव मारताना “ही” काळजी घेतली नाही तर जबर किंमत चुकवावी लागू शकते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
एप्रिल, मे दोनच या महिन्यांची वाट शाळेत असताना सगळेच बघायचो! एक तर शाळांना सुट्टी आणि दुसरं कारण म्हणजे आंबे! मनसोक्त खेळायचं आणि पोट (त्याहीपेक्षा मन) भरेस्तोवर आंबे खायचे.
सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधीही आणि कितीही आंबे खायचे! पूर्ण वर्षभर आंब्यांची खूप वाट पाहिली जायची.
मस्त पिकलेला आंबा तर दिसायला पण राजासारखाच दिसतो! अगदी पिवळा धम्मक, सोनेरी, लालसर कसाही असला तरीही!
त्याचा वास तर इतका मनमोहक की, अख्ख्या घरात त्याचा सुवास दरवळायचा आणि कधी आंबा खातोय असं व्हायचं. सगळ्या भावंडात आंबे खायची जणू काही चढाओढच लागली असायची!

पण, तेव्हा कामामुळे आणि मैदानी खेळांमुळे शारीरिक हालचाली पण खूप व्हायच्या! त्यामुळे कितीही आंबे खाल्ले तरी काही वाटायचं नाही, काही त्रास व्हायचा नाही त्याचा.
पण, आताची जीवनशैली खूपच बदलली आहे. माणसाने आपल्या सुविधेसाठी अनेक सुख सोयी वाढवल्या आहेत. यंत्र, वैज्ञानिक प्रगतीमुळे शारीरिक कसरत, व्यायाम कमी झाला आणि आरामाची सवय लागली.
तसेच, कामाच्या, खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्या आहेत, त्यामुळे पूर्वी सारखा सहज व्यायाम होत नाही. मधुमेह, रक्तदाबाच्या समस्या, अनेक रोग शरीरात ठाण माडून रहायला लागले आहेत.
सध्या काहीही खाल्लं तरी वजन वाढतं, ते कमी करण्यासाठी मुद्दामून व्यायाम, जिम मधे जाणं, वर्कआउट करणं ह्याची गरज वाटू लागली.
त्यामुळे आंबे खाताना पण काळजी घ्यावी लागते. कारण जास्त आंबे खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम होतात आता.
अती आंबे खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात, काय त्रास होतात तसेच ते दुष्परिणाम आणि त्रास टाळण्यासाठी काय करायचे, जेणेकरून आपण आपले मन न मारता आंबे मनसोक्त खाऊ शकू, ते आता आजच्या लेखातून आपण बघूया –
१) वजन वाढणे –

एका मध्यम आकाराच्या पिकलेल्या आंब्यामध्ये साधारण पणे १३५ कॅलरीज असतात.
त्यामुळे, आंब्याच्या अती सेवनाने आपल्या वजनात वाढ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये अडथळा येऊ शकतो.
पण, जर आपण आपल्या वर्कआउट करायच्या ३० मिनिट आधी आंब्याचे सेवन केले तर दोन फायदे होतात. एक तर वजन वाढण्यात अडथळा येतो म्हणजेच वजन वाढत नाही आणि व्यायाम करण्यासाठी खूप ऊर्जा देखील मिळते.
२) साखरेचे प्रमाण वाढणे –
आंब्याच्या गोड चवीला जबाबदार त्यातील फ़्रुक्टोज् किंवा फळ साखर असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
पण आंबा हे फळ व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते काही काळापुरते नाही तर संपूर्ण वर्षभर आपल्याला फायदेशीर ठरते.
तसेच आंबा अनेक जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध असतो. आरोग्याच्या दृष्टीने ह्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे, आंब्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीरच असते.

ज्यांना मधुमेह नाही त्यांना साखरेचे प्रमाण वाढण्याची भीती, काळजी नाही कराण रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये.
(बहुतेक वेळा मधुमेहींना डॉक्टर दिवसाला १ आंबा खायचा सल्ला देतात आणि चालण्याचा व्यायाम करायला सांगतात, तरीही मधुमेहीं रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, त्याशिवाय आंबा खाऊ नये).
३) अतिसार किंवा जुलाब
आंबा हा फायबरने युक्त असतो. त्यामुळे त्याचे अती सेवन आरोग्याला हानीकारक असते. म्हणजेच फायबरच्या समृद्धतेमुळे आंब्याचे अती सेवन अतिसार किंवा जुलाब ह्यासारख्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते.
ज्यांची पचनक्रिया खराब आहे किंवा ज्यांची पचनसंस्था नाजूक आहे त्यांनी आंब्याचे अती सेवन टाळावे. कमी प्रमाणात आंबे खावेत.
आंबे खाण्याचे प्रमाण कमी करावे पण,आंब्याचे सेवन जरूर करावे. कारण, त्यामधे विटॅमिन्स, प्रोटीन्स् आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात जी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात.
४) ऍलर्जी
आंब्याच्या हंगामाच्या सुरुवातीच्या काळात आंबा पिकलेला नसतो. फळ मोठे असले तरी ते पिकायला खूप वेळ लागतो. त्यामुळे, योग्य ती किंमत मिळत नाही कच्च्या फळाला!
मग योग्य ती किंवा जास्त किंमत यावी म्हणून आंबा कृत्रिम रित्या पिकवला जातो. फळे कृत्रिम पिकविण्यासाठी ज्यावर बऱ्याच देशांमध्ये बंदी आहे.
जसे- कॅल्शिअम कार्बाईट ह्यासारख्या रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे ऍलर्जी होण्याची खूप मोठ्या प्रमाणावर शक्यता असते, शरीरासाठी हे खूपच हानीकारक असते.
केवळ ऍलर्जीच नाही तर जळजळ होणे, त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे ह्यासारखे त्रास उद्भवतात. त्यामुळे हे त्रास टाळण्यासाठी सुरुवातीच्या हंगामाच्या सुरुवातीला पिकलेले (पिकवलेले) फळ शक्यतो घेणे टाळावे.

एप्रिल, मे महिन्यात प्रत्येकाने आंब्याचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे. शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे, कॅलरीज्, ऊर्जा मिळते जी तात्पुरती नसते तर वर्षभर मिळते.
आंब्याचा त्रास होणं आपल्या कॅलरीजच्या निवडीवर अवलंबून असतो. म्हणजेच जर आंबा नुसताच खाल्ल्याने जर त्रास होत असेल तर सॅलड, मॅंगो स्मूदी ह्यासारखे परदेशी प्रकार तर करू शकतोच.
पण, आपण भारतीय पदार्थ बनवतो जसे, आंबा पोळी, साखरांबा, मॅंगो लस्सी, मॅंगो मिल्कशेक ह्यासारख्या पदार्थातून आपण आंब्याचे सेवन करू शकतो.
आंब्याच्या गुणवत्तेची योग्य ती तपासणी करूनच मग ते फळ घ्यावे. रासायनिक गोष्टी वापरून तर ते पिकवले नाहीत ना ह्याची खात्री करून घ्यावी.
तसेच कीटकनाशकांचा वापर जास्त केला नाही ना ह्याची खातरजमा करून घ्यावी. कडक फळ घेऊ नये, थोडेसे दाबल्यावर जर ते आत गेले तर चांगले आहे हे समजावे आणि घ्यावे.
आंब्याचा मोसम आहे, मस्त आंबे खा आणि स्वस्थ रहा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.