' हैदराबाद मुक्तीसंग्रामातील “जालियानवाला बाग” –गोर्टा हत्याकांड – InMarathi

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील “जालियानवाला बाग” –गोर्टा हत्याकांड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
इतिहास अभ्यास मंडळ सदस्य ,
बालभारती, पुणे

===

हैदराबाद मुक्तीसंग्राम हे वास्तविक पाहता भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रतिकृतीच.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जसे इंग्रजाच्या कौर्याचे उदाहरण म्हणून जालियनवाला हत्याकांड ओळखले जाते तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढयात ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’व ‘रझाकार’यांच्या कौर्याचे प्रतिक म्हणून मुचलंब व गोरटा येथील हत्याकांड ओळखले जाते.

या पूर्णपणे दुर्लक्षित घटनेविषयी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळाचे सदस्य भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे यांचा लेख प्रकाशित करीत आहोत.

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग –गोर्टा

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण अजून स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली नव्हती, कारण भारतातील काही संस्थानिकांचा भारतात विलीनिकरणास विरोध होता.

भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे १५ ऑगस्ट १९४७ पुर्वीच भारतात विलीनीकरण केले.

पण काश्मिर, जुनागड व हैदराबादच्या संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि स्वातंत्र्य राहण्याचे मनसुबे रचू लागले, त्यातील आपले हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडा खाली होते.

संस्थानात आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी निजामाच्या आशीर्वादाने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना १९२८ साली झाली. या संघटनेचे खाकसार हे स्वयंसेवक दल होते याचा अध्यक्ष नवाब बहादूर यारजंग हा होता.

हा पट्टीचा वक्ता होता.या संघटनेने संपूर्ण संस्थानामध्ये मुसलमानाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पुढे चालून लातूरचा कासीम रझवी या संघटनेच्या अध्यक्षपदावर आला याने खाकसारच्या धर्तीवर रझाकार या संघटना बनवली.

खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली. या संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली.

रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती, प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळे.

कासीम रझवी हा लातूरचा साधा वकील होता मात्र त्याचे नेतृत्व अफाट होते. त्याची भाषणे ऐकणारे लोक सांगतात की त्याच्या भाषणामुळे सर्वसामान्य हिंदू समाजात धडकी भरत असे तर मुस्लीम त्वेषाने प्राणार्पण करण्यास तयार होत असत.

तो दिल्लीच्या लाल किल्यावर निजामाचा झेंडा फडकविणार अशी वल्गना करीत असे. कासीम रझवीच्या नेतृत्वाखालील रझाकार संघटनेने संस्थानातील हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरु केले हजारो लोकांच्या कत्तली केल्या.

अनेक गावे जाळली खून,बलात्कार, लुटालूट यांची परिसीमा गाठली.

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र २३ फेबुवारी १९३७ ला गुंजोटी(ता.उमरगा ) येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांची ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’च्या गुंडांनी घडवून आणलेल्या हत्येपासून सुरु होते.

गोर्टा येथे रझाकारांनी अन्याय ,अत्याचाराची परिसीमा गाठणारे हत्याकांड घडवून आणले. (भारतीय स्वातंत्र्यलढयातील ब्रिटीशाच्या कौर्याची परिसीमा गाठणारे हत्याकांड म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड प्रसिध्द आहे )

अर्थात हैदराबाद संस्थानातील गोरटा हत्याकांड मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे, गोर्टा हे गाव सध्या कर्नाटकातील बिदर जिल्हयात बस्वकल्याण पासून १४ कि.मी .अंतरावर आहे.

 

patil vada inmarathi

 

या परिसरात रझाकारांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होता ,निजामी राज्यात तिरंगा ध्वज फडकावण्यास बंदी होती, पण हाळगोर्टा व होनाळी या दोन गावातील लोकांनी स्टेट कॉग्रेसच्या आदेशानुसार आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला होता.

विशेषता होनाळीचे भाऊराव पाटील व हाळगोर्टा येथील विठोबा इंद्राळे यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज व आर्य समाजाचा ओमचा ध्वज फडकाविला होता.

ते आर्य समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते होते परिसरातील हिंदू बांधवाना एकत्रित करून संघटन करण्याचा प्रयत्न चालविला होता, चौकशीला गेलेल्या दोन पोलीसांचा भाऊराव पाटील यांनी अपमान केला होता.

ही बाब परिसरातील रझाकारांना समजल्याशिवाय राहिली नाही ,त्यात गोरटयाचा रझाकार सदर (प्रमुख ) हिसामोद्दिन यास समजली, तो संतप्त झाला.

त्याच्या सोबत फतरू नावाचा एक अति क्रूर रझाकार होता, त्यांनी पोलीस व रझाकारांच्या मदतीने होनाळीवर हल्ला केला ,पण या वेळी भाऊराव पाटील व त्यांचे साथीदार गावावर नव्हते.

रझाकारानी याचा पुरेपूर फायदा घेत पाटलांचा वाडा जाळून टाकला,गावातील अनेक स्त्रियांवर बलात्कार केला व गावची प्रचंड लुट केली, याची माहिती भाऊराव पाटलांना झाल्यावर त्यांनी हिसामोद्दिनचा कायमचा काटा काढायचा दृढनिश्चय केला.

एके दिवशी हिसामोद्दिन बस्वकल्याणला गेल्याची खबर भाऊराव पाटील यांना समजली ,गोपालदेव शास्त्री, यशवंतराव सायगावकर, व्यंकटराव मिरखल ,भीमराव मिरखल, केशव शास्त्री बेलूर हे होनाळी येथे जमले.

हिसामोद्दिन वरवटीला येणार असल्याची बातमी आली तेव्हा हे सर्वजण गोरटयाजवळील शिंदी बनात त्याची वाट पाहत बसले, थोडयावेळाने बैलगाडयांचे आवाज येऊ लागले,हिसामोद्दिन घोडयावर स्वार होता…

शिंदी बनात आल्यावर ते शिंदी पिण्यासाठी थांबले,शिंदीबनाचा गुतेदार धोंडीबा तेलंग यशवंतरावांना ओळखत होता,धोंडीबाने हिसामोद्दिन व त्याच्या साथीदारांना मागेल तितकी शिंदी पाजवली.

हिसामोद्दिनचे साथीदार नशेमध्ये अल्ला हो अकबर,कासीम रझवी झिंदाबादच्या घोषणा देऊ लागले, इतक्यात हर हर महादेवची गर्जना करीत भाऊराव पाटील व त्यांचे साथीदार रझाकारावर तुटून पडले.

अचानक झालेल्या हल्यामुळे रझाकार जीव वाचविण्याचा प्रयत्न करू लागले, दोन्हीकडून गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला इतक्यात भाऊराव पाटलाच्या गोळीने हिसामोद्दिनचा वेध घेतला.

हिसामोद्दिन तात्काळ खाली कोसळला, क्रूरकर्मा हिसामोद्दिन व त्याचे दोन साथीदार मारले गेले.

हिसामोदिनच्या वधामुळे परिसरातील रझाकार संतप्त झाले,त्यांनी परिसरात भाऊराव पाटलांचा कसून शोध घेतला पण ते तर वागदरी कॅम्पला निघून गेले होते.

मग त्यांनी भाऊराव पाटलांना ज्यांनी-ज्यांनी आपल्या घरी लपविले होते ,त्यांना ठार करून हिसामोदीनच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय रझाकारांनी केला.

सर्वप्रथम रझाकारांनी आपला मोर्चा मुचलंबच्या शरणाप्पा पाटील यांच्या टोलेजंग वाडयावर वळवला…

वेळ सकाळी अकराची होती, पाटील आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन जेवायला बसले होते, पाटलीन जेवण वाढत होत्या,अचानक झालेल्या रझाकारांच्या ह्ल्यामुळे पाटील काहीच हालचाल करू शकले नाहीत.

रझाकारांनी अगोदरच गावातील लोकांना पळवून लावले होते त्यामुळे कुठून मदत मिळेल ?वाड्याचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे रझाकारांना वाडयात प्रवेश करता येत नव्हता.

रझाकारांनी वाडयाला आग लावली ,बघता बघता ज्वालांचे लोळ भडकू लागले. बाहेर पडून रझाकारांच्या हाताने मरण्यापेक्षा अग्नी देवतेच्या स्वाधीन होणेच योग्य आहे असा पाटलानी विचार केला असेल.

पत्नी ,दोन मुले व नोकर अशा सात जणांचा त्या दिवशी जणू अग्नीजोहरच झाला.

त्या दिवशी पाटलाचे भाऊ काशीनाथ पाटील व भावजय डॉक्टरला दाखवण्यासाठी परगावी गेले होते म्हणून वाचले ,पाटलांची पाच वर्षाची पुतणी मात्र आश्चर्यकारक रित्या वाचली.

त्याचे झाले असे की नुकतच जेवण करून ती दारापुढे खेळत होती पण अचानक झालेल्या रझाकारांच्या हल्यामुळे घाबरून ती घरामागे पळाली आणि विलक्षण गोष्ट म्हणजे तेथील एका मुस्लिम कुटुंबाने तिला आपल्या घरात लपविले व त्यांचे प्राण वाचविले.

अजूनही त्या जिवंत असून त्यांचे नाव गुणवंतम्मा असे आहे , मी गेलो तेव्हा पहिल्यांदा पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे दर्शन घेतले ,त्यांनी कन्नड मधून मला माहिती दिली,असे हे मुचलंबचे हत्याकांड,२८ एप्रिल १९४८ ला झाले.

याचे कुठे ही स्मारक नाही पण पाटलांचा वाडा मात्र आहे. बाहेरचा भाग तसाच असून आतून मात्र डागडुजी केली आहे .

गोरटयाचे हत्याकांड

 

gorta smarak inmarathi

 

मुचलंबच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे रझाकारांना अधिकच जोर चढला, हिसामोद्दिनच्या वधात गोरटयातील लोकांचा सहभाग होता असा रझाकारांचा समज झाला होता.

गोर्टा या २००० लोकवस्तीच्या गावात ४०० घरे होती , १० मे १९४८ ला सकाळीच हिसामोद्दिनच्या वधाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमानी गोरटयावर आकस्मिक हल्ला केला.

यात घोरवाडी, भालकी, हुमनाबाद, बसवकल्याण, हुलसूर ,बेलूर ,मेहकर ,इ .गावचे रझाकार व पस्ताकौम होते. मोठया संख्येने हत्यारबंद रझाकार अचानक गावात घुसले व त्यांनी दिसेल त्यास मारण्यास सुरवात केली.

हिंदू लोकांची आकस्मिक हल्यामुळे पाचावर धारण बसली. ते गडबडले ,त्यांना काहीच सुचत नव्हते. जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता.

रझाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि जनावरे कापायच्या सुरीने त्यांचे नरडे उडवीत. आज जणू त्यांच्यात सैतानानेच प्रवेश केला होता.

नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी व बस्वप्पा मालीपाटील या सारख्या व्यक्तींना देखील त्यांच्या वाडयातून बाहेर ओढत आणून गावच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मीच्या देवळापुढे सुरीने मुंड्या धडावेगळया करू लागले.

भीमराव पोलिस पाटील व त्यांच्या पत्नीने आपले मुले बसप्पा व आणेप्पा यांना वाचवण्यासाठी गोरट्यातील रझाकार सदर रसुलखा यास ४२ तोळे सोने दिले.

रसूल हा भीमराव पाटलाजवळ बसलेला होता म्हणून त्यांनी विश्वास ठेवला पण त्यांचे वा मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रसूलने बाहेर जावून बेलूरच्या रझाकारांना पाठवून दिले.

रझाकार वाड्यात शिरताच भीमराव पाटील आपल्या मुलांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडू लागले तितक्यात एका माजोरी रझाकाराने बसप्पाला खाली पाडून सुरीने कापले.

समोरचे दृश्य पाहून पाटलीन चक्कर येऊन कोसळल्या, तितक्यात पाटलानाही ठार केले ,दरम्यान पाटलाचा भाऊ व आनेप्पा या दरम्यान बाहेर पळाले ,त्यांना तत्काळ मारले गेले .

गोरटयात महादप्पा डूमणे यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता,जणू छोटा किल्लाच. त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता.

 

dumne vada inmarathi

 

गावातील लुटालूट, जाळपोळ ,कापाकापी पाहून जवळपास ७०० ते ८०० लोकांनी या वाडयात आश्रय घेतला त्यात जांच्याकडे हत्यारे होती.

असे ह्त्यारधारी नागप्पा हलम्बरे ,काशाप्पा भालके ,सिद्रामप्पा पटणे, मारुतीअण्णा कोणे ,चनाप्पा डूमने,दानू कोळी व विठोबा कोळी हे कुशल वीर होते.

वाडयात जमलेल्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी या बहादूर तरुणांवर होती. माडीवर पत्रे लावून मोर्च्याच्या जागा केल्या गेल्या. मोर्चे धरले गेले.

इकडे गावात घोंगावणारे रझाकाररूपी वादळ आता डूमणे सावकाराच्या वाडयाकडे वळले , डूमणे सावकार हे परिसरातील प्रसिध्द आसामी होती,वेळ प्रसंगी दहा गावांना पोसण्याची ताकद त्यांच्यात होती.

डूमणे हे जरी सावकार असले तरी एक दानशूर व मदतीला धावून जाणारा म्हणून त्यांची ख्याती होती, डूमणे सावकाराचा वाडा लुटावा ,जाळून टाकावा या हेतूने रझाकार तिकडे वळले पण तिथे वेगळेच घडले.

रझाकाराना वाडयातून प्रतिकार होऊ लागला. वाडयातील तरुणांनी आता निर्वाणीचे युद्ध करायचे ठरविले होते,आतून फायरिग होऊ लागली. गोफण गुंडयाचा व दगड धोंडयाचा भयानक मारा सुरु झाला.

वाडयातून होत असलेल्या आकस्मिक प्रतीकारामुळे अनेक रझाकार ठार झाले ,कित्येक जखमी झाले.आतील जबरदस्त प्रतिकारामुळे ते आता पुढे सरकू शकत नव्हते.

त्यांनी माघार घेऊन दर्ग्याजवळील मोठमोठ्या चिंचेच्या झाडावरून ते डूमणे सावकारच्या वाडयावर मारा करू लागले,तर काही रझाकार आसपासच्या माडयावर चढले.

विशेषता यमुनाबाई शंकरराव कुलकर्णी यांच्या माडीवरून गोळीबार करू लागले. दिवसभराच्या लढाईत अनेक रझाकार मारले गेले, रझाकारांशी लढतांना मारुतीअण्णा कोणे व चनाप्पा बिरादार या दोघांना वीरमरण आले.

दिवसभर हा मुकाबला चालला,सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला तशी रझाकारांनी फायरिंग बंद केली व ते गाव सोडून निघून गेले .

 

dumne vada inmarathi 2

 

रझाकार जाताच वाडयातील ग्रामस्थांनी विचार केला की अपमानित झालेले रझाकार उद्या दुप्पट तयारीने येतील या विचाराने रात्रीच्या सुमारास वाडयातील लोक बाहेर पडले व आपापल्या पाहुण्याच्या गावांनी रातोरात निघून गेले.

इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी रझाकार परत जोमाने आले ,आता गावात स्मशानशांतता पसरली होती सगळीकडे मृतदेहांच्या जळण्याचा वास येत होता.

बराच वेळ फायरिंग करूनही डूमणे सावकाराच्या वाडयातून कोणताच प्रतिकार होत नसल्याचे बघून आता हळूहळू रझाकार वाडयात घुसले,सर्व संपती लुटली व संपूर्ण वाडा कमरेइतका खोदून बघितला व शेवटी वाडयाला आग लावली गेली.

हा वाडा कित्येक दिवस जळत होता,वाडयाचा वरचा भाग पूर्ण जळाला असून लोखंडी बीम मात्र शाबूत आहेत ,आपल्यावरील जखमा दाखवत आजही तो उभा आहे.

गोर्टा हत्याकांडाची बातमी सर्व हैदराबाद संस्थानात पसरली ,स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर हायकोर्टातील वकिलांची प्रोटेस्ट कमिटी सरकारकडे पाठवून मागणी केली की, आम्ही गोरटयात जाऊन नेमके काय घडले आहे हे पाहू इच्छितो.

शेवटी सरकारला वकिलांची मागणी मान्य करावी लागली. वकिलांच्या ‘प्रोटेस्ट कमिटीने’ होनाळी ,गोरटा व परिसरातील गावांचा दौरा केला व तेथून निर्वासित झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या.

तसेच त्यांनी गावातील हरिजन, मुसलमान व पस्ताकौम यांच्याही मुलाखती घेतल्या. कमिटीच्या मते गावात फक्त पस्ताकौम व मुसलमानांची घरे न जळता शिल्लक होती.

कमिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या हल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले ,आर्थिक नुकसान सुमारे ७० लाख रुपयांचे झाल्याचे कमिटीने नमूद केले.

कमिटी १७ मे १९४८ ला म्हणजे घटनेनंतर सात दिवसाने गोरटयात पोहोचल्यानंतर केवळकुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता.  कावळे, गिधाडे मृतदेहांना खात होते. अनेक ठिकाणी अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले सर्व परिसरात दुर्गधी पसरली होती.

कडब्याच्या बनमीत अनेक मृतदेह आढळून आले. सात दिवसानंतरही एकही सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी आला नव्हता,या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेत पत्रिकेतही करण्यात आली आहे.

 

dumne vada inmarathi 1

हैदराबाद संस्थानातील भारत सरकारचे प्रतिनिधी के.एम.मुन्शी यांनी सुद्धा या परिसराचा दौरा केला व आपल्या ‘द एंड ऑफ अन इरा’या पुस्तकात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.

या घटनेमुळे परिसरातील अनेक गावातील लोकांनी आपले घरदार सोडून भारतीय हदीत आश्रय घेतला.

आजपर्यत येथे कुठलेही स्मारक उभारले नव्हते पण आता येथे भव्य स्मारक उभारले जात आहे, खूप उशिराने का होत नाही पण या दुर्लक्षित हुतात्म्यांचे स्मारक होत आहे ही समाधानाची बाब आहे.

मुचलंब व गोरटा हत्याकांडातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

याच विषयावर लेखकाने तयार केलेली Documentary youtube वर https://youtu.be/vqAAAs-ViqA या लिंकवर क्लिक करून पहा. किंवा Bhausahebumate या नावाने सर्च करून ही पाहू शकता ….

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?