जीन्स सगळेच वापरतात, पण करोडोंची जीन्स आणि त्यामागचा रंजक इतिहास तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगभरातील स्त्री असो व पुरुष जीन्स ची पँट न आवडणारा वर्ग सापडणे मुश्किल! जीन्स ची प्रचंड क्रेझ संपूर्ण जगभरात आहेच.
सर्व प्रकारच्या वयोगटात ही लोकप्रिय आहेच पण तरुणांची खास लाडकी!
एक तर या कापडाची आकर्षकता, सुलभता, ट्रेंडी प्रकार, पॉकेट्स आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जे लोकांनी शोधून काढलं ते म्हणजे, न धुता सुद्धा बरेच आठवडे ही जीन्स वापरली,तरी मळकट दिसत नाही!
भारतात जीन्स बरीच उशीरा साधारण ८० च्या दशकात आली. त्या सुमारास जीन्स ची पॅन्ट घालणं म्हणजे फार मॉडर्न असल्याचं समजलं जायचं!
पुढे अक्षय कुमार ‘रफ अँड टफ’ कंपनीची जाहिरात करताना ही जीन्स पँट घराघरात पोचली. भारतीय पुरुषच नाहीत तर महिलांनी सुद्धा जीन्स चा पेहराव चटकन आत्मसात करून घेतला.

केवळ पॅन्ट च नाही तर जीन्स कपड्याचं जॅकेट सुद्धा भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात लोकप्रिय झालं!
पण बाकी जगात जीन्स पॅन्ट चा उदय होऊन आता १४० वर्ष झाले. भारतात जरी ही पॅन्ट उशिरा आली असली तरी या जीन्स च्या कापडाचा आणि भारताचा घनिष्ठ संबंध आहे.
डेनिम कापड हे जगातल्या सर्वात जुन्या कापडांपैकी एक! या कापडाचा टिकाऊपणा आणि कम्फर्टनेस जगात प्रसिद्ध आहेच.
या शब्दाचा शोध हा फ्रेंच मधल्या एका वाक्यावरून लावल्याचा समज आहे ते वाक्य म्हणजे ‘Serge de Nimes’
जीन्स शब्द हा इटली मधल्या ‘जिनोवा’ या गावावरून आल्याचं सांगतात. इथल्या नाविकांना ‘जीन्स’ म्हटलं जायचं. डेनिम कापडासाठी ‘ डुंगरी’ हा हिंदी शब्द सुद्धा वापरात होता!
याचा अर्थ जाडं- भरड कापड जे नावाडी वापरायचे. डुंगरी म्हणजेच निळं डेनिम कापड! मुंबईतल्या डोंगरी किल्ल्यावरून हे नाव डेनिम ला पडलं!
‘Serge de Nimes’ कापडाचा शोध १७ व्या शतकात लागला. हे कापड कापूस आणि लोकरीच्या मिश्रणाने बनवण्यात आलं होतं.

काही इतिहासकारांचं निरीक्षण आहे की हे कापड सर्वप्रथम पोर्तुगलच्या नाविकांकडून वापरलं जायचं.
१६ व्या शतकात संपूर्ण युरोप भर या कापडाचा चांगलाच प्रसार झाला. पुढे १७ व्या शतकात इंग्रजांनी सुद्धा याला स्वीकारलं.
डेनीमचा अमेरिकेत प्रवेश :
१८१७ मध्ये अमेरिकेन नौ-सैनिकांना डुंगरी कापडाचा, बाहेरून पांघरण्यासाठी वापर करण्याची मुभा देण्यात आली.
एक तर हे कापड टिकाऊ होतं आणि सैनिक काम करताना, त्याची लगेच घडी करून ठेवता येत होती.
पुढे १८५३ ला जेव्हा अमेरिकेत ‘गोल्ड रश’ चालू झाला तेव्हा खाणीत काम करणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड वाढली.
या खाणकामगारांना टिकाऊ कपडे पुरावण्याचं कंत्राट होतं ते लॉइब स्ट्रॉस नावाच्या टेलर कडे. पण कामगारांच्या कामाच्या पद्धतीने, सतत हाताळण्याने त्या कपड्याचे खिसे वारंवार फाटू लागले.
या समस्येवर नेवाडा प्रांतातील जेकब डेव्हिस ने एक उपाय शोधून काढला.
त्याने एक पॅन्ट तयार केली, ज्याच्या खिशाच्या कडांना फाटू नये म्हणून तांब्याची बटणं लावली होती.

या रिबीट चा अजून एक उद्देश होता ते म्हणजे कामगारांची छोटी टूल किट किंवा हत्यारं यांचं पाकीट या रिबीट ला बाहेरून अडकून ठेवता यायचं.
त्याने पँट च्या खिश्यावर येणारा ताण कमी झाला. ही कल्पना चालून गेली आणि कामगारांच्या पॅन्टचे खिसे फाटण्यापासून वाचू लागले!
पुढे त्याने १८७२ ला ही आयडिया लॉइब स्ट्रॉस ला दिली. पुढच्याच वर्षी त्याने खिश्याला लावायच्या तांब्याच्या रिबीट च पेटंट मिळवलं!
त्या बदल्यात जेकब खाण कामगारांसाठी डेनिम ची निळी पॅन्ट बनवू लागला. पुढे लॉइब स्ट्रॉस ने आपलं नाव बदलून ‘लिव्हि’ ठेवलं!
पहिली निळी जीन्स
२० मे १८७३ ला निळ्या जीन्स चं पेटंट मंजूर झालं. आज सुद्धा हाच दिवस जीन्स पॅन्ट चा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो.
ही पँट बनवण्यासाठी जीन्स कापडाला ‘इंडिगो’ नावाच्या निळ्या शाई ने रंगवण्यात आलं. पँट शिवताना पांढरे आणि निळे धागे एकत्र करून विणले गेले.
पहिली निळी जीन्स ही मुख्यत्वे खाणकामगार – मजूर यांच्या गरजा लक्षात ठेवून बनवण्यात आली होती. कामगारांमध्ये ही जीन्स ‘बुल डेनिम’ म्हणून प्रसिद्ध झाली!

लिव्हि च्या तांब्याच्या रिबीट, पॅन्ट ला बसवण्यासाठी लाल धाग्याचा वापर केला गेला कारण एक तर तांब्याच्या रिबीटला हा रंग सूट व्हायचा आणि धागा मजबूत टिकाऊ होता.
पुढे जीन्स रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर होत गेला.
भारत आणि इंडिगो निळ
वर सांगितल्याप्रमाणे जीन्स ला रंग देण्यासाठी त्या काळी इंडिगो निळीचा वापर केला जायचा. इंडिगो निळ ही एक नैसर्गिक आणि विशिष्ट निळ्या रंगाचा पोत देणारी निळं होती.
अगदी पूर्वीपासून याची निर्मिती भारतातच व्हायची. आपल्या देशाच्या नावानेच या निळीचं नामकरण ‘इंडिगो’ झालं!
प्राचीन काळापासून आपला देश या निळीचा व्यापार इजिप्त, ग्रीस आणि रोम बरोबर करायचा. भारतात ही निळ ‘Indigofera tinctoria’ या झाडापासून मिळवली जाते.
याचा रंग म्हणून वापर करण्यासाठी ही कापसावर पसरवून ठेवली जायची.

पण अगोदर मध्य- आशिया किंवा युरोप साठी ही निळ आयात करणं खूप खर्चिक काम होतं!कारण,पर्शियन, ग्रीक आणि लेविनाइट मधले आडते याची किंमत कितीतरी पटीने जास्त सांगून विकायचे.
नंतर समुद्र मार्गाचा शोध लागल्यावर भारतातून नेऊन ब्रिटिश कॉलोनी मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली आणि इंडिगो निळ सहजरित्या उपलब्ध होऊ लागली.
कृत्रिम रंगांचा शोध लागे पर्यंत जीन्स रंगवण्यासाठी ‘इंडिगो’ निळीचाच वापर होत होता.
कामावरचा गणवेश ते फॅशन
सुरवातीला जीन्स ची पॅन्ट ही खाणीत काम करणारे तंत्रज्ञ आणि कामगार- मजूर लोकं वापरत. त्यांच्यासाठीच तिची निर्मिती झाली होती!
पुढे १९५० च्या सुमारास जेव्हा संगीत आणि चित्रपट क्षेत्राचा बोलबाला वाढला तेव्हा त्यातील बऱ्याच कलाकारांनी जीन्स वापरण्याचा ‘ट्रेंड’ सुरू केला.
मार्लन ब्रांडो आणि जेम्स डीन या दोन सुप्रसिद्ध कलाकारांनी डेनिम ची जीन्स त्या काळात लोकप्रिय केली. तेव्हा जीन्स वापरणं हे आधुनिक आणि बंडखोर असल्याचं लक्षण समजलं जायचं!

१९७० च्या सुमारास ‘स्टोन वॉशिंग’ तंत्राने डेनिम च्या क्षेत्रात क्रांती घडवली आणि डेनिम जीन्स आबालवृद्ध सर्व वयोगटात लाडकी झाली!
डेनिम च २१ व्या शतकातील पालटलेले रुपडं :
२१ व्या शतकात डेनिम वेग वेगळ्या स्वरूपात येऊ लागली.कारपेंटर, स्पोर्ट्स वेयर, खाकी, चिनोज आणि कॉमबॅट! या बरोबर ती निळ्या- पांढऱ्या पासून ते राखाडी-काळ्या रंगात सुद्धा उपलब्ध झाली.
आता जीन्स हा जगमान्य पोशाख झाला आहे. फॅशन मॉडेल, फिल्म कलाकार आणि सामान्य माणूस सर्वांमध्ये ही वापरली जाते.
काही दशकांपूर्वी अमेरिकेतल्या एका कापड क्षेत्रातल्या मासिकाने ‘जीन्स येत्या वर्षात फॅशन क्षेत्रात क्रांती घडवेल’ असं अनुमान केलं होतं आणि ते तंतोतंत खरं झालं!
जगामध्ये आता पर्यंत सर्वात महागडी निळ्या जीन्स पँट ची जोडी २५०,००० डॉलर्स ला विकली गेली आहे!सगळ्यात लांब जीन्स पँट ची उंची आहे ६८ मीटर!
आजच्या घडीला करोडो लोकांचा आवडता पेहराव जीन्सच आहे.

भारतात जीन्स लोकप्रिय असली तरी, बऱ्याच गावात जीन्स घालून येण्याला अजूनही प्रतिबंध केला जातो. काही शाळांत ,कॉलेज मधे जीन्स बंदीच्या बातम्या सुद्धा आपण ऐकल्या आहेत!
आपल्या देशात काही ठिकाणी, ‘जीन्स वापरणारा/वापरणारी’ म्हणजे मॉडर्न किंवा ‘अति-शहाणा’ असा काहीसा गैरसमज आहे. पण सबंध जगात ‘जीन्स’ ला आधुनिकते सोबत जोडण्यात आलं आहे.
कुठल्याही क्षेत्रात आधुनिकता आली तर त्याची भरभराट होण्यास वेळ लागत नाही.जीन्स ला आधुनिकतेच प्रतीक समजण्याचं अजून एक उदाहरण देता येईल.
महाराष्ट्रातले एक तडफदार नेते मागे भाषणात म्हणाले होते की, “मला महाराष्ट्राचा शेतकरी हा जीन्स मध्ये शेती करतांना पाहायचा आहे!”
अर्थात याचा शब्दशः अर्थ घेण्याची आवश्यकता नाही कारण, त्यांना म्हणायचं होतं की कृषी क्षेत्र इतकं आधुनिक झालेलं पाहायचं की त्या सोबत येणाऱ्या समृद्धीने शेतकऱ्यांचा पेहराव सुद्धा आधुनिक होईल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.