' कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!

कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

महाभारतातले युद्ध सुरू झालं. दोन्हीकडच्या बाजूची लोक युद्धामध्ये मारली जात होती शेवटी तर कौरव सेनेतले त्यांचे सगळे रथी-महारथी युद्धात मारले गेले होते.

पितामह भीष्म शरपंजरी पडले होते. गुरुवर्य द्रोणाचार्य, शुक्राचार्य, महारथी कर्ण याशिवाय शंभर कौरवांपैकी ९९ कौरव मारले गेले होते एकटा दुर्योधन जिवंत होता.

युद्ध चालू होऊन १७ दिवस पूर्ण झाले होते.

अत्यंत संहारक अशा या युद्धात आता एकटा दुर्योधन कौरव सेनेचा सेनापती होता. कौरवांचा पराजय निश्चित दिसत होता पण दुर्योधन ते मानायला तयार नव्हता.

त्याला युद्ध करून पांडवांचा पराजय करायचाच होता त्यासाठीच तर त्याने हा सगळा खटाटोप केला होता.

 

mahabharat 2 inmarathi

 

युद्धातली सगळी माहिती धृतराष्ट्र, गांधारी, कुंती यांच्यापर्यंत पोहोचत होती. गांधारीने युद्ध चालू व्हायच्या आधी कधीही दुर्योधनाला ‘विजयी भव’ असा आशीर्वाद दिला नव्हता.

तो जेव्हा पाया पडायला यायचा तेव्हा ती कायमच ‘आयुष्यमान भव’ म्हणायची. कारण तिलाही माहीत होतं की, दुर्योधन हा असत्याच्या, अधर्माच्या बाजूचा आहे. पांडवांशी तो अन्यायाने वागला आहे.

हे ही वाचा

===

पण युद्धात आपले ९९ पुत्र गमावले आणि गांधारीचाही धीर सुटत चालला. आपला एक तरी मुलगा जिवंत राहावा, नव्हे नव्हे, तो विजयी व्हावा असं तिला वाटू लागले.

शेवटी कितीही झालं तरी ती आईच!.मुलाचे अपराध पोटात घालणारी आई! आत्तापर्यंत केलेल्या तपस्येतून तिला मिळालेल्या सिद्धीद्वारे दुर्योधनाला विजयी करायचं वरदान द्यायचं तिने ठरवलं.

तिने दुर्योधनाला निरोप धाडला की, “आज रात्री मला विवस्त्र अवस्थेत भेटायला ये.”

गांधारी ही गंधार प्रदेशातील राजकन्या. तिचं लग्न जेव्हा धृतराष्ट्राशी झालं तेव्हा तिने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. “जर माझा नवरा काही बघू शकत नसेल तर मीही बघणार नाही”, असा पण तिने केला होता.

 

dhrutrashtra inmarathi

 

गांधारी शंकराची निस्सीम भक्त होती आणि इतके दिवस डोळ्यांवर पट्टी बांधली असल्यामुळे तिच्या डोळ्यात एक प्रकारची सिद्धी आली होती. आता आपल्या त्या सिद्धीचा वापर करायची वेळ आली आहे हे तिला कळून चुकलं.

आपल्या मुलाला वाचवायचं आणि त्याला विजयी करायचं असे तिने ठरवले, त्यासाठीच तिने दुर्योधनाला विवस्त्र बोलवलं.

आईने आपल्याला असं का बोलावलं? याचा विचार न करता दुर्योधनही रात्रीच्या वेळेस विवस्त्र अवस्थेत आपल्या आईला भेटायला निघाला. मध्यरात्र उलटून गेली होती. त्यामुळे सगळीकडे सामसूम झाली होती.

निजानीज देखील झाली होती अशा वेळेस कोणी जागे असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच दुर्योधनही निवांत निघाला होता, पण अचानक त्याला कृष्ण येताना दिसला.

त्याला क्षणभर संभ्रम पडला की, कृष्ण यावेळेस इकडे काय करतो आहे?

कृष्ण त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि मिश्कीलपणे हसू लागला. दुर्योधनाने त्याला विचारलं की, “तू इकडे कसा ?” कृष्ण म्हणाला,” माझं सोड, पण तू कुठे निघाला आहेस?

दुर्योधन म्हणाला,”मी माझ्या आईला भेटायला निघालो आहे.” कृष्ण हसला आणि त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळून गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘असा?’

कृष्णाच्या त्या नजरेनेच भांबावलेल्या दुर्योधनाने सांगितलं,”आईनेच मला असे यायला सांगितले आहे”.

लगेच कृष्ण म्हणाला,”अरे तू वेडा आहेस का? आता तू  मोठा झालास. आई असली म्हणून काय झाले? तिच्यासमोर असा विवस्त्र जाणार आहेस का? तुला साधे नीतीनियम माहीत नाहीत का? आपल्या वडीलधाऱ्यांसामोर असं जाणं योग्य नव्हे.”

कृष्णाच्या या बोलण्याने दुर्योधनही विचारात पडला. खरंच हे असं जाणं सभ्यपणाचा नाही असं त्यालाही वाटलं. त्याने कृष्णाला विचारलं, मग आता मी काय करू ?”

कृष्ण म्हणाला,”कमरेभोवती काहीतरी गुंडाळून जा. असाच जाऊ नकोस. ”

रात्रीची वेळ, दुर्योधनाकडे एकही कापड नाही. युद्धभूमीचा परिसर, काय करावं हे दुर्योधनाला कळालं नाही. त्याने जवळपास असलेल्या झाडांची पाने काढून त्यांना वल्कलांसारखं आपल्या कमरेभोवती गुंडाळलं, आणि तो गांधारीला भेटायला गेला.

गांधारी त्याची वाटच पाहत होती. दुर्योधन आल्याआल्या तिने विचारलं, “मी सांगितलं होतं, तसंच आलास ना?” दुर्योधनाने,”हो” असं सांगितलं.

मग गांधारीने दुर्योधनाला आपल्यासमोर उभं रहायला सांगितले आणि डोळ्यांवरची पट्टी काढली. तिने दुर्योधनाकडे आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं.

 

gandhari and duryodhan inmarathi

 

दुर्योधनाने कमरेभोवती गुंडाळलेली ती पाने पाहिली. तिच्या डोळ्यातल्या तेजाने दुर्योधनाचं सगळं शरीर वज्रासारखं कठीण झालं, मात्र कमरेखालचा भाग तसाच मांसल, मऊ राहिला.

गांधारीने त्याला म्हटलं, “मी तुला स्पष्ट शब्दात विवस्त्र यायला सांगितलं होतं, आपल्या आईची इतकी आज्ञा देखील तू का पाळली नाहीस? कुणाच्या सांगण्यावरून तू असा आलास? तुला वाटेत कोणी भेटलं होतं का?”

दुर्योधन म्हणाला,”माते तुमच्यासमोर असे विवस्त्र येणं मला सभ्यपणाचं वाटलं नाही, म्हणून कृष्णानेच मला असं जायला सांगितलं.”

वाटेत श्रीकृष्णाची भेट झाली असे दुर्योधनाने गांधारीला सांगितले. गांधारीला कळून चुकलं, की दुर्योधनाचा पराभव आता निश्चित आहे. कृष्णाने यातदेखील पांडवांना अशाप्रकारे मदत केली आहे.

हे ही वाचा

===

गांधारीने दुर्योधनाला जेव्हा सांगितलं की, “माझ्या डोळ्यातल्या शक्तीमुळे तुझं शरीर वज्रासारखे कठीण झालं आहे, पण आता त्याचा काही उपयोग नाही तुझ्या मांड्या मात्र तशा नाहीत.”

 

naked durodhan inmarathi

 

दुर्योधन म्हणाला, “माते चिंता करू नकोस. ताकद तर आता मला मिळाली आहे, तुझा आशीर्वाद आहे. आणि युद्धाच्या नियमानुसार कोणीही माझ्यावर कमरेखाली वार करणार नाही.

पांडव हे नियमांचं पालन करून युद्ध करतात त्यामुळे आता मीच अजिंक्य. मी सगळ्या पांडवांचा पराभव करीन.” पण गांधारी त्याला वारंवार म्हणत राहिली की, “तू श्रीकृष्णाचा ऐकायला नको होतंस.”

शेवटी युद्धाचा अठरावा दिवस उगवला. आता भीम आणि दुर्योधन या दोघांमध्ये गदायुद्ध सुरू झालं. दोघेही पराक्रमी आणि शूर. एकमेकांवर गदेचा प्रहार करत होते पण कोणीही हार मानायला तयार नव्हतं.

भीमाने कितीही जोरदार प्रहार दुर्योधनावर केले तरी दुर्योधनाला काही फरक पडत नव्हता. भीमाला कळत नव्हतं की नक्की काय झालंय! तो जितका चिडून त्याच्यावर वार करायचा इतका दुर्योधन झेलायचा.

 

mahabharath inmarathi 1

 

काहीतरी गडबड आहे अशी शंका भीमाला आली. त्याने श्रीकृष्णाकडे पाहिले आणि श्रीकृष्णाने त्याला मांडीवर हात ठेवून तिकडे प्रहार करण्याची खूण केली.

भीमाला हे मान्य नव्हतं. युद्धाच्या नियमांमध्ये हे बसत नव्हतं. पण कृष्ण त्याला ती खूण करून सांगतच राहिला.

शेवटी भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदेने जोरदार प्रहार केला. त्या एका प्रहरात दुर्योधन कोसळला मग भीमाने अजून तिकडेच प्रहार करून दुर्योधनाचा वध केला.

त्यादिवशी युद्ध संपले. पांडव विजयी झाले आणि कौरवांचा विनाश झाला. गांधारीने आपल्या मुलाला वाचवायचा, विजयी करायचा हा प्रयत्नही फोल ठरला.

श्रीकृष्णाच्या इच्छेशिवाय महाभारताच्या युद्धात काही घडलं नाही. घडणार नव्हतंच!

===

हे ही वाचा

 

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?