' अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनी- प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवावा असा सोहळा !

अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनी- प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवावा असा सोहळा !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अट्टारी-वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लक्ष्मणरेषा आखणारी पंजाबकडील महत्त्वाची सीमा. अट्टारी हे पंजाब मधील भारताच्या अखत्यारीत असलेले शेवटचे गाव! आणि वाघा हे पाकिस्तानच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशामधील पहिले गाव. म्हणून या सीमेला अट्टारी-वाघा बॉर्डर असे म्हटले जाते. येथून लाहोर अवघं ५ किमी अंतरावर आहे.

पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधील इतर सीमा पर्यटनाच्या दृष्टीने जास्त सुरक्षित नसल्या, तरी अट्टारी-वाघा बॉर्डर मात्र त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी खुली आणि सुरक्षित आहे. त्यामुळे दरोरोज जवळपास हजारहून अधिक पर्यटक या सीमेला भेट देतात आणि पलीकडील पाकिस्तान न्याहाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

सीमेपलीकडल्या पर्यटकांची देखील हीच परिस्थिती! बरं तर ही अट्टारी-वाघा बॉर्डर अजून एका गोष्टीसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे- भारताचे बिएसएफ जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात रंगणारी बिटिंग रिट्रीट सेरेमनी!

 

wagah border ceremony-marathipizza
indiatravelforum.in

पर्यटक तर हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी खास गर्दी करतात. अर्ध्या-पाऊण तास चालणारा हा सोहळा दरोरोज संध्याकाळी ४:३० वाजता सुरु होतो. जेव्हा हा सोहळा सुरु होतो तेव्हा तेथील देशभक्तीपर वातावरण पाहून रक्त अगदी सळसळून उठतं. दोन्ही बाजूचे पर्यटक आपल्या देशाचे गुणगान गात असतात, नारेबाजी करत असतात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घोषणाबाजीत कुठेही अपमानकारक शब्द कानी पडत नाहीत.

दोन्ही देशांचे सैनिक परेड करत एकमेकांना ‘आव्हानात्मक मानवंदना’ देतात. सैनिकाच्या नजरा आणि त्यांचे जोशपूर्ण हावभाव पाहून भान हरपतं. सैनिकांचे एकाच सरळ रेषेत डोक्यापर्यंत पाय घेऊन जाऊन तो पुन्हा जमिनीवर आदळण्याचे कौशल्य पाहणाऱ्याला थक्क करून सोडतं.

शेवटी एकाच वेळी दोन्ही देशांचे झेंडे उत्कृष्ट पद्धतीने खाली उतरवून अतिशय काळजीपूर्वक घडी करून ठेवण्यात येतात. खास या सोहळ्याकरिता दोन्ही देशांकडून आपापल्या बाजूकडील लोखंडी गेट खोलले जातात. त्यानंतर दोन्ही देशांकडील ठराविक प्रतिनिधी हस्तालोंदन करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दोन्ही गेट पुन्हा बंद होतात. अश्याप्रकारे या सोहळ्याचा समारोप होतो.

 

wagah border ceremony-marathipizza01
blogs.wsj.com

१९५९ सालापासून अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनीच्या प्रथेला सुरुवात झाली आणि आजवर अखंड एकही दिवस न चुकता हा सोहळा रोज पार पाडला जातो हे विशेष! जेव्हा ही प्रथा सुरु झाली तेव्हा दोन्ही बाजुंच्या लष्कराने एकमेकांना मानवंदना देणे आणि शुभेच्छा देणे त्या मागचा मुख्य उद्देश होता.

परंतु काही वर्षांनंतर त्या मागचा हा खरा उद्देश लोप पावून दोन्ही देशांचे सैनिक आपल्या हालचालींमार्फत एकमेकांना आव्हान देऊ लागले. सोहळ्यास उपस्थित असणारे दोन्हीकडील नागरिक देखील दुसऱ्या देशातील नागरिकांना घोषणांमार्फत चिथावणी देऊ लागले. आंतरराष्ट्रीय सीमेवर अश्या प्रकारचे वर्तन हे अशोभनीय होते, त्यामुळे प्रसंगी हिंसेचे वातवरण निर्माण होण्याचीही शक्यता होती.

 

wagah border ceremony-marathipizza02
quora.com

हा धोका ओळखून २०१० साली पाकिस्तान रेंजर्सचे मेजर जनरल याकुब अली खान आणि बीएसएफचे डिरेक्टर जनरल रमण श्रीवास्तव यांनी सैनिकांच्या रागीट हालचाली सोहळ्यामधून हटवण्याचा निर्णय घेतला. जसे की एकमेकांना अतिशय क्रोधाने पाहणे, जोरजोरात पाय आपटणे आणि अश्या बऱ्याच हालचाली! सध्याच्या सोहळ्यामध्ये अश्या हालचाली पाहायला मिळतात, पण त्या तितक्याश्या आक्रमक नसतात.

या सोहळ्यासाठी दोन्ही देशाच्या सैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि खास याच सोहळा सादर करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली असते. तसेच खास त्याच्यासाठी सैन्यामार्फत मिशी आणि दाढी ठेवण्याचे अतिरिक्त धोरण ठरवण्यात आले आहे.

 

wagah border ceremony-marathipizza03
sundusafzaal.wordpress.com

भारत आणि पाकिस्तानच्या इतर सीमांवर जरी नेहमी तणावपूर्व वातावरण असले तरी अट्टारी-वाघा बोर्डरवर मात्र क्वचितच अशी परिस्थिती पाहायला मिळते. आजही या सीमेवर तैनात असणारे दोन्ही देश प्रत्येक सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई भरवतात. भारत आणि पाकिस्तानच्या अनोख्या संबंधाचे दर्शन या सीमेवर घडते.

 

wagah border ceremony-marathipizza04
parhlo.com

दोन्ही देशांमधील शत्रुत्व, बंधुभाव, सहकार्य या सर्वांचे रंग हा सोहळा दाखवतो. अंगावर शहारे येणं म्हणजे काय असतं याचा खरा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकदा तरी ही रिट्रीट सेरेमनी पाहिली पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 37 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?