'कर्ण श्रेष्ठ की अर्जुन? कादंबऱ्या वाचून मत बनवू नका - "हे" समजून घ्या

कर्ण श्रेष्ठ की अर्जुन? कादंबऱ्या वाचून मत बनवू नका – “हे” समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : ओंकार डंके

===

आपल्याकडे कादंबरीकारांनी कर्णाला ग्लॅमर मिळवून दिलंय. त्यामुळे साहजिकच कर्ण म्हंटलं की ‘बिच्चारा’ अशी प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते.

कर्णाने इंद्र देवाला कवच कुंडल दिले त्यामुळे त्याने एकप्रकारे आपल्या मृत्यूला कवटाळले असे मानले जाते. आता कवच कुंडल ही फक्त सूर्याची वैयक्तिक संपत्ती नव्हती. तर ती स्वर्ग लोकातील देवाची संपत्ती होती.

 

karna and arjun inmarathi 1
youtube.com

 

कर्णाप्रमाणे अन्य पांडवही वेगवेगळ्या देवांचे पुत्र होते. त्यांना कोणतेही कवच कुंडल त्यांच्या वडिलांनी दिले नव्हते. कर्णाचा प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुनाकडेही कवच कुंडलं नव्हते.

त्यामुळे इंद्राने कर्णाकडून कवच कुंडल घेऊन कर्ण आणि अर्जून यांना समपातळीवर आणून ठेवले.

त्याचबरोबर अनेकांची अशीही समजूत आहे की कवच कुंडल असती तर कर्ण युद्धात अजिंक्य ठरला असता.

मला त्यांना इतकंच विचारायचे आहे, ‘कवच कुंडल ही सर्व अस्त्र थांबवणारे आणि युद्धात विजय मिळवून देणारे अस्त्र असेल तर इंद्र आणि सूर्य युद्धांमध्ये राक्षसांकडून अनेकदा का हरले ?’

‘पांडवांना लक्षागृहात ठार मारावे’ हा सल्ला कर्णानेच दुर्योधनाला दिला होता. ‘द्रौपदीला फरफटत घेऊन ये’ असे कर्णानेच दु:शासनाला सांगितले होते.

 

mahabharat-inmarathi
patrika.com

 

‘पाच पांडवांची पत्नी असलेली स्त्री चारित्र्यवान कशी असू शकते?’ हा प्रश्न कर्णानेच द्रौपदीला विचारला होता. आता द्रौपदीने नवा पुरुष शोधावा असा सल्लाही त्याने द्रौपदीला दिला होता.

एखाद्या महिलेविषयी राजसभेत अशा प्रकारचे वक्तव्य करणारा माणूस सदाचारी कसा असू शकतो?

कर्णाने त्या क्षणी द्रौपदीची बाजू घेऊन त्याच्या मित्राला दुर्योधनला आणि कौरवांना सुनावलं असतं तर द्रौपदीची विटंबना टळली असती. पर्यायने महाभारतामधील पुढचा अनर्थही ठळला असता.

चक्रव्युहात एकट्या अभिमन्यूला घेरुन मारताना कर्णाने सर्व कौरवांना तोलामोलाची साथ दिली होती. महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी तयार केलेले नियम तो विसरला. तेव्हा त्याला कोणताही धर्म आठवला नव्हता.

 

abhimanyu vadh inmarathi
pinterest

 

कर्णाने आयुष्यभर खूप कष्ट केले अशा समजुतीमधून त्याला सहानभूती देण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पण महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ होण्याची आकांक्षा असलेल्या सर्वांनीच कष्ट केले आहेत.

अर्जुनाने त्यांच्या वडिलांशी म्हणजेच इंद्राशी युद्ध केले. त्यानंतरच त्यांना इंद्राकडून नवी विद्या शिकता आली. कर्णाचा परममित्र दुर्योधनानेही सर्वश्रेष्ठ गदाधारी होण्यासाठी बलरामाकडे कठोर प्रशिक्षण घेतले होते.

कर्ण दुर्दैवी होता अशी अनेकांची समजूत आहे – ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील बहुतेक काळ दुर्योधनासोबत राजवैभवात घालवला ती व्यक्ती दुर्दैवी कशी असू शकते?

दुर्योधनामुळे कर्णाला राजवैभव उपभोगता आले. परंतु महाभारतामधील निर्णायक युद्धात भीष्मांशी वाद झाल्यानंतर कर्ण तब्बल दहा दिवस स्वस्थ बसून होता.

मित्र अडचणीत असताना, मित्राच्या आयुष्यातील निर्णायक लढाईत दहा दिवस स्वस्थ बसून राहणारा कर्ण हा श्रेष्ठ मित्र कसा असू शकतो?

लक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न झालेला… मोठ्या भावाच्या द्यूत खेळण्याच्या सवयीमुळे बारा वर्षे वनवास आणि एक वर्षे अज्ञातवास भोगावाला लागलेला अर्जून हा कर्णापेक्षा अधिक दुर्दैवी नाही का?

 

pandav InMarathi

 

संपूर्ण महाभारतामध्ये कर्णाने सतत अर्जुनाचा द्वेष केला. अर्जुनापेक्षा आपण श्रेष्ठ धनुर्धर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न कर्णाने केला.

अगदी कर्ण आणि अर्जुन यांच्या पहिल्या भेटीतही कर्णाने अर्जुनाला डिवचले होते, तरीही अर्जुनाने संयम सोडला नाही.

द्रोणाचार्याच्या १०५ शिष्यांमध्ये अर्जुनाने धनुर्विद्या शिकण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. स्वकष्टाच्या जोरावरच तो आपल्या गुरुचा सर्वात आवडता शिष्य बनला.

द्रोणाचार्याने गुरुदक्षिणा मागितली त्यावेळी, ‘आता गुरु काय गुरुदक्षिणा मागणार?’ हा प्रश्न युधिष्ठिराह अन्य द्रोण शिष्यांना काही काळ पडला होता.

त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता एकटा अर्जुनच गुरुबद्दलच्या समर्पणाच्या भावनेतून गुरु मागतील ती गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार झाला.

 

dronacharya arjun inmarathi
http://hindi.lifeberrys.com/

 

द्रोणाचार्यांच्या आज्ञेवरुन अर्जुनाने राजा द्रुपदाला बंदी केलं. पण संपुर्ण युद्धात त्याने कधी द्रुपदाला अपमानित केले नाही.

अर्जुनाच्या या वागण्यावर प्रसन्न होऊनच द्रौपद राजाने आपली मुलगी द्रौपदी अर्जुनाला दिली. पुढे शेवटपर्यंत द्रुपद राजा पांडवांशी एकनिष्ठ राहिला.

अर्जुनाने युधिष्ठिरासाठी असंख्य युद्ध जिंकली. अनेक राजांना पराभूत केलं. पण कधीही त्याने राजगादीवर हक्क सांगितला नाही.

सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर आणि आई कुंतीला अर्जुन कधीही उलट बोलला नाही. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अर्जुनाने विनातक्रार ऐकली.

विराट नगरीवर चालून आलेल्या कौरवांच्या सैन्यात भीष्म, द्रोण, दुर्योधन दु:शासन, कर्ण, अश्वत्थामा हे महारथी होते. या सर्वांचा एकट्या अर्जुनाने पराभव केला.

या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या देवव्रत या शंखांचा आवाज ऐकल्यानंतर भीष्म आणि द्रोणांनी दुर्योधनाला धोक्याचा इशारा दिला होता. मात्र कर्णाने त्यांना उर्मटपणे त्यांना उलट उत्तर दिलं.

 

mahabharat inmarathi

 

दुर्योधनानेही कर्णाला यावेळी साथ दिली. ज्येष्ठांशी कसं बोलावं हे कर्ण त्याच्याकडील शक्तीच्या गर्वात विसरला होता.

अर्जुनाने मात्र युद्धाच्या सुरुवातीलाही सूचक बाण मारत गुरु द्रोणाचार्यांचे आशिर्वाद घेतले. विराट नगरीचा राजकुमार उत्तरला आपले गुरु द्रोण आणि पितामह भीष्म यांची आदरपूर्वक ओळख करुन दिली.

महाभारतातल्या निर्णायक युद्धातही अर्जुनाने भीष्म किंवा द्रोणाचार्यांच्याबद्दल कधी अपशब्द उच्चारल्याची नोंद नाही.

बारा वर्षाच्या वनवासात अर्जुनाने कठोर तप करत देवांना प्रसन्न केले. त्यांच्याकडून वेगवेगळी अस्त्र शिकली. ‘जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर’ अशी पाठिवर थाप द्रोणाचार्यांनी दिल्यानंतरी अर्जुनाची शिकण्याची इच्छा ही सदैव कायम होती.

 

dronacharya arjun inmarathi 1
star of mysore.com

 

त्या उलट ‘ऐनवेळी तुला ब्रह्मास्त्र आठवणार नाही’ असा परशुरामांचा शाप माहिती असूनही नवे अस्त्र शिकण्यासाठी कर्णाने नंतरच्या काळात परिश्रम घेतले नाहीत.

अर्जुनाची काही नावांचा अर्थ पाहिला तरी त्याच्या श्रेष्ठत्व लगेच समजते. अर्जुनाची काही प्रमुख नावे आणि त्याचा अर्थ असा :

धनंजय – जिथे जाईल तिथे धन आणि समृद्धी येईल अशी व्यक्ती

विजया – सदैव विजयी होणारा

सव्यासाची –धनुर्विद्येचा उपयोग दोन्ही हाताने समान करण्याची कला अवगत असणारा

परन्तप – सर्वाधिक एकाग्र

गाण्डीवधन्व – शंकराचे शक्तीशाली गाण्डीव धनुष्य ज्याच्याकडे आहे असा व्यक्ती. हे गाण्डीव धनुष्य देखील अर्जुनाने पराक्रामाच्या जोरावरच देवांकडून मिळवले होते.

जिष्णू – सर्व शत्रूंना युद्धामध्ये पराभूत करणारा. सदैव विजयी

किरीटीन – इंद्र देवाने दिलेला दिव्य मुकुट धारण करणारा व्यक्ती

विभित्सू – युद्धामध्ये भीषण संहार करणारा

ही सर्व अर्जुनाची जन्म नाव किंवा तत्कालीन प्रथेप्रमाणे आई- वडिलांच्या नावावरुन पडलेली नावं नाहीत. तर ही अर्जुनाला त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळालेली नावं आहेत.

त्या तुलनेत ‘दानशूर’ या नावाचा सन्मानीय अपवाद वगळता कर्णाची अशी किती नावं आपल्याला सांगता येतील?

अर्जुनाने श्रीकृष्णासोबतच्या नात्याचा/ मैत्रीचा कधीही गैरफायदा घेतला नाही. अर्जुन – कर्ण युद्धात सर्व देव हे अर्जुनाच्या बाजूने होते, याचे कारण म्हणजे अर्जुनाची बाजू धर्माची होती.

 

mahabharat inmarathi 2

 

अर्जुनाची बाजू नैतिक होती. अर्जुन हा कर्णासारखा अर्धमाच्या, अनैतिकतेच्या बाजूने युद्ध करत नव्हता. कर्णाचे वडील सूर्यदेवही महाभारताच्या निर्णायक युद्धात अर्जुनाच्या बाजूने होते.

या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्याचा साधक-बाधक विचार केल्यानंतर कर्ण आणि अर्जुनमध्ये अर्जुन श्रेष्ठ होता असे माझे मत झाले आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?