अमर्त्य सेन ह्यांची हेटाळणी करणाऱ्यांनी हे वाचायलाच हवं!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नुकतंच पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पक्षाच्या दिलीप घोष ह्यांनी अर्थशास्त्रात नोबेल मिळवलेल्या अमर्त्य सेन ह्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित केला आहे. घोष ह्यांनी सरळ नाव नं घेता टीका केली.

“आमच्या एका बंगाली व्यक्तीने नोबेल मिळवलं ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच पण त्यांनी राज्यासाठी काय केलंय? देशासाठी काय केलंय? इकडे बंगाल मध्ये तर त्यांचं काम कुणाला जास्त कळत सुद्धा नाही”

ह्यानंतर सगळीकडे प्रत्युत्तराची आणि टीकेची झोड काँग्रेस ने उठवली.

amartya sen Dilip ghosh marathipizza

अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांच्यावर सध्या उठणाऱ्या वावड्या बघून तुम्हाला त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या एकूण कार्याबद्दल प्रश्न निर्माण होण्याआधी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक – श्री राजीव साने, ह्यांचा सेन ह्यांच्या कामाची कल्पना देणारा लेख..

===

अमर्त्य सेन हेही न्युओलिबरलच (डावे नव्हेत) भाजपतील काही वाचाळवीरांनी अमर्त्य सेन यांना तुच्छ लेखण्याचा जो प्रकार चालवला आहे तो निंद्यच आहे. त्याचवेळी अमर्त्य सेन हे डावे विचारवंत आहेत हा समजही तितकाच चुकीचा आहे.

यासाठी अमर्त्य सेनांची नेमकी योगदाने कोणती हे स्पष्ट असायला हवे.

Amartya Sen-marathipizza00

स्रोत

  • जॉन रॉल्स हे अमर्त्य सेनांचे गुरू. रॉल्ससाहेब हे समतावादी नाहीत त्यांच्या विचारधारेला अग्रक्रमवाद(प्रायारिटेरियनिझम) असा शब्द आहे. त्यातल्या त्यात अशी विषमता निवडा की जी तळच्याला वर काढण्यात सर्वोत्तम असेल. हा रॉल्ससाहेबाचा मुख्य सिद्धांत आहे. जातीचा संदर्भ न आणता, अंत्योदयवाद असे म्हणता येईल. अमर्त्य सेन यांनी रॉल्समताचे कोठेही खंडन केलेले नसून त्यात तपशिलांची भर घातली आहे.
  • राज्यशास्त्रात अँरोज थिअरम म्हणून प्रसिध्द असलेला मुद्दा असा, की व्यक्तींच्या निवडक्रमांका (प्रेफरन्सेस) पासून जास्तीत जास्त व्यक्तीना समाधानकारक वाटेल असा सामजिक निवडक्रम तर्कतः निष्पन्न करणे हे केवळ अशक्य असते. सेनबाबूनी याचे खंडन करून मत-अजमावणीला जर बाजारव्यवस्थेची जोड असेल तर निवडक्रमांचे सिंथेसिस शक्य असते हे गणिताने सिद्ध केले. इतकेच नव्हे तर माओ यांच्या चीनमध्ये एकमेकांशी विनिमय बंद केल्याने अन्न उपलब्ध असून सुमारे पाच कोटी चीनी उपासमारीने मेले अशी जळजळीत टीका त्यांनी समाजसत्तावादावर केली आहे. रॉल्स आणि सेन हे दोघेही बाजारव्यवस्था शाबूत ठेवूनच कल्याणकारी राज्याला काय करता येईल याचा विचार करीत होते.

Economic-Planning-marathipizza

स्रोत

  • व्यक्तींना उपयोगिता किती प्राप्त होते याचे गणित करताना, व्यक्तीना काय काय मिळाले एवढेच न पाहता जे मिळाले ते उपयोगात आणण्याची क्षमता त्यांच्यात आणली गेली का? हेही पाहिजे पाहिजे, असे अमर्त्य सेनबाबूंनी ठासून मांडले व हे अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यांना सक्षमीकरणवादी(सवलतवादी नव्हे) म्हणता येईल. आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी सक्षमीकरणात आवश्यक असल्याने राज्याने त्यांच्यावर भर दिला पाहिजे (व त्या साठी नसते धंदे बंद केले पाहिजेत) ही शिफारस कोणीच नाकारणार नाही.
  • स्वातंत्र्य या तत्त्वाचा विचार करताना, इतरांनी सक्ती करता कामा नये, हे तर झालेच पण व्यक्तीला आपले स्वातंत्र्य वापरण्याची बुद्धी आणि शक्ती मिळाली पाहिजे. विकास म्हणजे स्वातंत्र्याचा विस्तार (समता नव्हे) अशीच धारणा सेन यांची आहे.
  • कल्याण आणि न्याय या वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायात अर्हता महत्वाची असते तर कल्याणात मानवतावाद महत्त्वाचा असतो. सेन ह्यांनी कल्याणातले मुद्दे न्यायातच समविष्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्यात (द आयडिया ऑफ जस्टीस) त्यांनी काही घोळ घातले आहेत.
  • कोणत्याही आधुनिक माणसाप्रमाणे सेन सुध्दा धर्माची लुडबुड नको असेच मानतात त्यात वेगळेपण असे नाही. त्यांनी वादविवादात भारतीय माणूस कसा जास्त पटाईत असतो हे दाखवले व वादपरंपरा खंडित झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले. पण अशा सेक्युलरिझमवरून त्यांना ‘हिंदू-वर्जित-सर्वधर्मसमभाव’ अभिप्रेत होता असे ठरत नाही.
  • जगदीश भगवती या तितक्याच मोठ्या विद्वानाने जागतिकीकरण ही विकसनशील राष्ट्रांना संधीच आहे असे मत मांडले आणि विकास होऊनही दारिद्र्य टिकून राहण्याला लोकसंख्या जबाबदार आहे असेही मांडले. सेन बाबूंनी भगवती यांचे खंडन केलेले नाही.

india-population-marathipizza

स्रोत

अमर्त्य सेनांचे महात्म्य हा डाव्या-पुरोगामी विचारांचा विजय आहे ही तितकीच चुकीची समजूत आहे, जितके की त्यांना तुच्छ लेखण्याचे प्रकार निंदनीय आहेत. विकासाचे अर्थशास्त्र हा सेन यांचा अभ्यास विषय आहे, मोनेटरी पॉलिसी हा नव्हे. समांतर अर्थव्यवस्था आणि तिला अधिकृत अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी काय करावे हा त्यांचा विषयच नाही.

विकास-द्वेष-ज्वर वाढविण्यास अमर्त्य सेन महात्म्य उपयोगी आहे असे वाटून घेणे हे त्यांच्या विषयी अज्ञान असले तरच शक्य आहे.

===

त्यांच्यावर टीका करणारा वर्ग जरी मोठा असला तरी पण अमर्त्य सेन ह्यांनी घोष ह्यांच्या वक्तव्यावर आपलं मत मांडलं

“आपल्याला घोष जे म्हणतायत त्याबद्दल काहीही तक्रार नसुन त्यांनी त्यांना जे बरोबर वाटलं ते केलं.”

ह्या सगळ्या गोंधळात चूक ही नेहमी एकाचीच असते असं नाही आणि एखादी व्यक्ती नेहमीच बरोबर असते असंही नाही.

दोन्ही बाजू समजून घेऊन त्यावर आपलं मत तयार करण्यास आपण समर्थ आहात!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?